‘सध्या दैनिक ‘सनातन प्रभात’मधून आपत्काळाची पूर्वसिद्धता म्हणून मोठ्या शहरांमधून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्यासाठी सूचना प्रसिद्ध होत आहेत. या सूचना प्रसिद्ध करण्यामागील उद्देश जाणून न घेता त्याविषयी सनातन संस्थेच्या विरोधकांकडून नाहक अपसमज पसरवले जात आहेत.
१. आक्षेप : काही विरोधक ‘तुम्ही अशी अवैज्ञानिक माहिती समाजात पसरवू नका’, ‘तुम्ही तिसर्या महायुद्धाच्या संदर्भात भीती पसरवत आहात’, अशी टीका करत आहेत.
खंडण : येथे टीका करणार्यांनी या चौकटी प्रसिद्ध करण्यामागील मुख्य उद्देशच समजून घेतला नसल्याचे लक्षात येते. स्थूलमानाने पाहिल्यास शहरांमधील बेसुमार गर्दीमुळे निर्माण झालेल्या समस्या, वर्तमानातील कोरोना संसर्गाचे संकट, जगातील विविध देशांमधील वाढते तणाव, खुद्द भारताची चीन आणि पाकिस्तान यांच्यासोबत निर्माण झालेली युद्धमान स्थिती, हे सर्व पहाता मोठ्या शहरांना भावी काळात किती संकटांचा सामना करावा लागू शकतो, याची कल्पना येते. तसेच अनेक संतांनी आणि नॉस्ट्रॅडॅमस यांच्यासारख्या भविष्यवेत्त्यांनी भावी आपत्काळाविषयी वारंवार सांगून मानवजातीला सतर्क केले आहे. या सर्व संकटांमधून साधकांना सुरक्षित रहाण्यासाठी सनातन संस्थेने आपत्काळाच्या पूर्वसिद्धतेच्या संदर्भातील सूचना दिल्या आहेत. या सर्व सूचना पूर्णत: ऐच्छिक आहेत. यात सनातन संस्थेने कुणालाही आग्रह केलेला नाही.
२. आक्षेप : ‘सनातन संस्था एकीकडे आपत्काळ येणार असे सांगते आणि त्याच वेळी ध्वनीचित्रीकरणाची उपकरणे अर्पण देण्याविषयी आवाहनही करते, असे कसे ?’ असे काहींनी विचारले आहे.
खंडण : कोरोना महामारी, आर्थिक महामंदी आणि सीमेवरील युद्धजन्य स्थिती, ही आपत्काळाची लक्षणे आपण सध्या अनुभवत आहोत. म्हणजे आपत्काळ आलेलाच आहे. या आपत्काळाची तीव्रता वाढत नाही, तोपर्यंत अध्यात्मप्रसाराचे कार्य करण्याची संधी आहे. अध्यात्मप्रसार करणे, हे सनातन संस्थेचे मुख्य कार्य आहे. कोरोनाच्या संकटामुळे ‘ऑनलाईन’च्या माध्यमातूनच अध्यात्मप्रसाराचे कार्य मोठ्या प्रमाणात चालू आहे. यात ऑनलाईन सत्संग, चर्चासत्रे, हिंदू अधिवेशने, शिबिरे सातत्याने चालू आहेत. हे कार्य आपत्काळाची तीव्रता वाढत नाही, तोपर्यंत चालू ठेवण्यासाठी तातडीची आवश्यकता म्हणून या वस्तू अर्पण करण्याचे आवाहन सनातन संस्थेने केले आहे.’
– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था (२८.९.२०२०)