प.पू. स्वामी विद्यानंद (उपाख्य दामोदर केशव पांडे) अमरावती जिल्ह्यातील सावरखेड येथे प.पू. स्वामी विद्यानंद यांचा जन्म झाला. विदर्भात शालेय शिक्षण संपवून ते नोकरीनिमित्त जबलपूर येथे आले. १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात हिरिरीने सहभागी होणार्या युवकांमध्ये त्यांचा समावेश होता. विवाहानंतर ते वर्ष १९४७ मध्ये पुण्यात स्थायिक झाले. ‘सीडॅक’ या नामांकित कार्यालयात त्यांनी नोकरी केली. लहानपणापासून त्यांना विविध देवतांची दर्शने होत. पुण्यात आल्यानंतर प.पू. स्वामी विद्यानंद कीर्तने आणि प्रवचने घ्यायचे. त्यांच्या मनात अध्यात्मविषयी ओढ निर्माण झाली. अनेक संत-महंतांच्या भेटीतून ती ओढ वृद्धींगत झाली. १९७४ मध्ये त्यांना पावस येथील श्री स्वामी स्वरूपानंद यांचा अनुग्रह प्राप्त झाला. १९७९ नंतर ते ‘स्वामी विद्यानंद’ म्हणून ओळखले जाऊ लागले. संत ज्ञानेश्वरप्रणित ‘सोहं’ साधना त्यांनी आत्मसात केली. ती त्यांनी त्यांच्या शिष्यांना सांगितली. त्यांचा शिष्यवर्ग महाराष्ट्र, देशात, तसेच विदेशातही आहे. प्रसिद्धीपासून प.पू. स्वामी विद्यानंद यांनी स्वतःला दूर ठेवले.
‘अध्यात्म हे आत्मसिद्धी, आत्मदर्शन अवगुंठित असावे’, या सूत्राचे त्यांनी पालन केले आणि इतरांनाही सांगितले. त्यांनी गद्य-पद्य अशा ७० हून अधिक ग्रंथांची निर्मिती केली. सामान्य जनांच्या शंकानिरसनापासून अद्वैत तत्त्वज्ञानाची मांडणी करणारे लिखाणही केले. शिष्य परिवार वाढल्यानंतर त्यांच्यासाठी आश्रम स्थापनेची आवश्यकता निर्माण झाली. खान्देश, जळगाव, वडकी (पुणे), तसेच माळशिरस (सोलापूर) येथे दिव्य जीवन वाटिकाश्रम स्थापून त्यांनी शिष्य साधकांसाठी साधनेची केंद्रे निर्माण केली. प.पू. स्वामी विद्यानंद यांनी त्यांच्या ३०० शिष्यांना घेऊन भारतभर आध्यात्मिक यात्रा आणि ३० हून अधिक विदेश यात्रा केल्या. त्यांनी तेथे इंग्रजी, हिंदी आणि मराठी या भाषांमध्ये आध्यात्मिक विषयांवर मार्गदर्शन केले.
पुड्डूचेरी येथील श्री योगी अरविंद यांच्या ‘अतिमानस तत्त्वज्ञाना’चा अभ्यास त्यांनी केला आणि ते सिद्धतेच्या शिखरावर जाऊन पोचले. श्री अरविंद यांच्या ‘सावित्री’ या महाकाव्यावर त्यांनी ‘जगावेगळे जीवनपुष्प’ ही कादंबरी लिहिली. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ आदी संतांची वचने त्यांच्या मुखात सतत असायची. इतके असूनही सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद यांचे त्यांना नित्य स्मरण होत असे. ते हडपसर येथील दिव्य जीवन वाटिकाश्रम येथे वर्ष १९९७ पासून वास्तव्यास होते. त्यांच्या सहश्रद्धेय आईसाहेब, तसेच इतर साधक परिवार येथे कायम वास्तव्यास आहे. आश्रमात प्रतिवर्षी ४-५ मोठे उत्सव होत. त्या वेळी सर्व ठिकाणांहून शिष्य परिवार येत असे. इतर आश्रमात स्थानिक स्वरूपात उत्सव होत असत.