राजा दशरथाने श्रीरामाला अयोध्येच्या सिंहासनावर राज्याभिषेक करायचे ठरवले, तेव्हा कौसल्या-सुमित्रेसह कैकेयी राणीलाही अत्यंत आनंद झाला होता; परंतु मंथरा दासीने कैकेयीच्या मनात विष कालवून ‘भरताला राज्याभिषेक आणि रामाला १४ वर्षे वनवास’, असे दोन वर राजा दशरथाकडून मागून घ्यायला सुचवले आणि ते कैकेयीला पटवूनही दिले. नेमके राज्याभिषेकाच्या मंगल समारंभात मत्सरी कैकेयीने दशरथाकडे ते दोन वर मागून रंगाचा बेरंग केला. राजा कैकेयीशी वचनबद्ध असल्याने त्याला तिला ‘नाही’ म्हणता येईना आणि ‘श्रीरामाचा वनवास श्रीरामाचा वियोग’ ही कल्पनाही दशरथाला सहन होईना !
तशातच राज्याभिषेकाची सर्व सिद्धता पूर्ण झाल्याचे सांगण्यासाठी आलेल्या सुमंत प्रधानाला कैकेयीने आणि दशरथाने ‘श्रीरामाला सत्वर घेऊन ये’, असा आदेश दिला. सुमंताच्या निरोपाप्रमाणे श्रीराम तात्काळ दशरथाच्या प्रासादात पोचलाही; परंतु राजाचे मुखमंडल म्लान, दीन, दुःखी आणि करुणाजनक असे श्रीरामाला दिसल्याने तोही चिंतीत झाला. त्याने राजाच्या म्हणजे पित्याच्या दुःखाचे कारण कैकेयीला विचारले. ती म्हणाली, ‘‘राजाच्या मनात जे काही आहे ते तू तंतोतंत पाळून आज्ञापालन करणार असशील, तरच मी राजाच्या मनातील सांगेन.’’ कैकेयीने श्रीरामाच्या पितृभक्तीविषयी संशय व्यक्त करताच श्रीरामाने कैकेयीला पितृनिष्ठेचे द्योतक असे उत्तर दिले.
कैकेयीच्या बोलण्याने व्यथित झालेल्या श्रीरामाने राजा दशरथासमोरच आपले मन पुढील शब्दात मोकळे केले.
अहो धिङ्नार्हसे देवि वक्तुं मामीदृशं वचः ।
अहं हि वचनाद् राज्ञः पतेयमपि पावके ॥
भक्षयेयं विषं तीक्ष्णं पतेयमपि चार्णवे ।
नियुक्तो गुरुणा पित्रा नृपेण च हितेन च ॥
– वाल्मीकिरामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग १८, श्लोक २८ आणि २९
अर्थ : श्रीराम माता कैकेयीला म्हणतात, ‘‘अरेरे ! धिक्कार आहे ! देवी ! माझ्याविषयी तू अशा प्रकारचे वचन बोलू नये. राजांच्या सांगण्यावरून मी अग्नीतसुद्धा उडी घेईन ! माझे हितकर्ता, गुरु आणि पिता असलेल्या राजाने आज्ञा केली असता, मी तीक्ष्ण (जहाल) विषाचे भक्षण करीन अथवा समुद्रातही उडी घेईन.’’
राजा दशरथाच्या मनातील आज्ञा त्याच्या वा कैकेयीच्या तोंडून ऐकण्यापूर्वीच श्रीरामाने प्राणार्पणाची भाषा केली, त्यावरून त्याची पितृभक्ती किती नैष्ठिक होती, ते कळते. राजा दशरथाला दुःखी-कष्टी पाहिले त्यावेळी त्याचे कारण विचारण्याच्या निमित्ताने श्रीरामाने स्वतःविषयी अनेक शंका व्यक्त केल्या आणि शेवटी म्हणाला,
यतोमूलं नरः पश्येत्प्रादुर्भावमिहात्मनः।
कथं तस्मिन्नवर्तेत प्रत्यक्षे सति दैवते ॥
– वाल्मीकिरामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग १८, श्लोक १६
अर्थ : जो (पिता) आपल्या जन्मास मूळकारण, ज्याच्यापासून आपण जन्माला आलो आणि म्हणून जो आपले प्रत्यक्ष दैवत, त्या पित्याच्या मनाप्रमाणे कोणता पुरुष वागणार नाही ?
वनवासाला निघण्यापूर्वी पित्राज्ञा पालनाचे महत्त्व दशरथाला समजावून सांगतांना श्रीरामाने ‘पितृमहिमा’ वर्णन केला तो असा – ‘‘हे तात ! देवांनीसुद्धा ‘पिता’ हेच दैवत मानले आहे; म्हणून मी देवता समजूनच पित्याच्या (आपल्या) आज्ञेचे पालन करीन.’’
पित्याच्या मनातील १४ वर्षांच्या आज्ञेचे सावत्र आई कैकेयीकडून कळल्यानंतर सत्यासत्य न जाणताच श्रीराम पित्राज्ञा पालनासाठी सत्ता, संपत्ती, राजैश्वर्य आणि पृथ्वीचे साम्राज्य यांचा तात्काळ त्याग करून एक व्रताचरण म्हणून वनवासाला निघूनही गेला ! या एकाच घटनेने श्रीरामाची पितृभक्ती आकाशाहूनही थोर ठरली ! आजही ती सार्या जगाला प्रेरक आणि उत्तेजक वाटली, तर नवल नव्हे !’