सनातनचे १३ वे संत पू. महादेव नकातेकाका
अनुक्रमणिका
२. चाकरी करण्यास आरंभ आणि विवाह
५. सनातन संस्थेच्या माध्यमातून साधनेला आरंभ
६. पू. काकांनी घरच्यांना साधनेत आणण्यासाठी केलेले प्रयत्न
७. पू. काकांचा सनातनच्या टोपीप्रती असणारा भाव
९. पू. काकांनी केलेल्या विविध सेवा
११. पू. नकातेकाकांना घरी पाठवल्यानंतर घडलेले प्रसंग
१२. पू. नकातेकाकांची प्रगतीपथावर वाटचाल
१. जन्म आणि शिक्षण
१ अ. जन्म
‘पू. काकांचा जन्म १.६.१९५४ या दिवशी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील बोराळे या छोट्याशा गावात झाला. त्या गावातच त्यांचे ११ वी पर्यंतचे शिक्षण झाले. त्यांनी आणि त्यांच्या आई-वडिलांनी इतरांचे शेत खुरपले अन् कसेबसे शिक्षण पूर्ण केले.
१ आ. बालपणातील कष्टमय जीवन
१. पोटभर जेवण आणि अंगभर कपडे न मिळणे
पू. नकातेकाकांचे बालपण अतिशय बिकट परिस्थितीत गेले. त्यांना पोटभर जेवण किंवा अंगभर कपडेसुद्धा मिळत नसत. त्यात पू. काकांना ५ बहिणी होत्या. त्यामुळे ‘घर चालवायचे आणि वयात आलेल्या मुलींचे विवाह कसे करायचे’, या विचाराने घरची शेती असूनही माझे आजी-आजोबा (पू. नकातेकाकांचे आई-वडील) प्रतिदिन पोट भरण्यासाठी इतरांच्या शेतावर काम करायला जायचे. स्वतःच्या शेतीत पीक यायचे नाही. प्रभु श्रीरामाला जसा १४ वर्षांचा वनवास भोगावा लागला, तसा पू. काकांच्या नशिबीही वनवास आला. घरात अन्न शिजेल, त्यात आई-वडील आणि एकूण ६ मुलांनी थोडे थोडे खायचे अन् दुसरा दिवस उजाडण्याची वाट पहायची, असे चालू होते.
२. कपडे मिळण्यासाठी मामाच्या घरी उन्हाळाच्या सुटीत भरपूर राबणे
पू. नकातेकाका मामाच्या घरी उन्हाळाच्या सुटीत १ सदरा आणि चड्डी यांसाठी गुरासारखे राबायचे. मामाच्या शेतातील शेंगा काढायच्या, हाताला घट्टे पडेपर्यंत काम करायचे. तसेच मामाचा शिवणाचा व्यवसाय असल्याने तीही सर्व कामे करायचे. हे सर्व करतांना मामींचा राग, प्रतिक्रियात्मक बोलणे, अपमान सहन करायचा. आई-वडिलांसमवेत इतरत्र कामाला जायचे. हे सर्व पू. काकांच्या हसून-खेळून मजेत जीवन घालवण्याच्या बालवयात नशिबी आले होते. ‘घरात एकटा मुलगा असल्याने आणि घरातील सर्वकाही बघायचे आहे’, या विचाराने दायित्व येऊन पू. काकांचे बालपण दारिद्र्य दूर करण्याच्या तणावयुक्त विचारातच गेले.
३. पुढचे शिक्षण घेण्यासाठी घर सोडणे आणि ‘कमवा अन् शिका’या योजनेअंतर्गत वाणिज्य शाखेचे शिक्षण पूर्ण करणे
पू. काकांना शिक्षणाची आवड होती. पुष्कळ शिकून दारिद्र्य दूर करण्याच्या तीव्र तळमळीमुळे त्यांनी पुढचे शिक्षण घेण्यासाठी घर सोडले. ख्रिस्ताब्द १९७२ मध्ये ते सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्थापन केलेल्या महाविद्यालयामध्ये गेले. त्या ठिकाणी ‘कमवा आणि शिका’ हे ब्रीद असल्याने पू. काकांनी पुढचे वाणिज्य शाखेचे (कॉमर्सचे) शिक्षण पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयाच्या शेतात कामे केली. तसेच इतरांच्या घरी पाणी भरले, दूध वाटप केले, वर्तमानपत्रे टाकली. महाविद्यालयात पडेल ते काम करून त्यांनी ख्रिस्ताब्द १९७६ पर्यंत शिक्षण पूर्ण केले. अशा प्रकारे त्यांनी ४ वर्षे दिवसभर भरपूर काम करायचे, महाविद्यालयाची वेळ पाळायची आणि रात्रीचा दिवस करून अभ्यास करायचा, असे शैक्षणिक जीवन संपवले. या कालावधीत त्यांना घालायला १ विजार आणि १ सदरा होता. त्यामुळे ते तो एकच पोशाख दिवसभर घालायचे आणि रात्री कपडे धुऊन सकाळी पुन्हा तेच कपडे घालून महाविद्यालयात आणि ठरलेल्या कामांना जायचे. पू. काकांचे जीवन इतके १८ विश्वे दारिद्र्याने भरले होते की, ख्रिस्ताब्द १९७२ पर्यंत त्यांना पायात चपला घालायचे ठाऊक नव्हते. या बिकट आणि हालाखीच्या परिस्थितीने त्यांना काटकसरीत जीवन कसे जगायचे, हे शिकवले. त्यामुळे त्यांच्या आवश्यकताही (गरजाही) सर्वसामान्यांच्या तुलनेत अतिशय अल्प आहेत.
२. चाकरी करण्यास आरंभ आणि विवाह
२ अ. पू. काकांनी मामीच्या बहिणीच्या घरी राहून
त्यांच्याच ओळखीने सोलापूर येथील सूतगिरणीत अंतर्गत तपासनीस म्हणून चाकरी करणे
नंतर पू. काका चाकरी शोधण्यासाठी सोलापूरला मामीच्या बहिणीच्या घरी आले आणि चाकरीच्या शोधात दिवसरात्र भटकू लागले. मामीच्या बहिणीने ओळखीने पू. काकांना सोलापूर येथील सूतगिरणीत अंतर्गत तपासनीस म्हणून कामाला लावले. पू. काकांचे कामाचे ठिकाण घरापासून ५ कि.मी. दूर असल्याने ते सकाळी लवकर उठून चालत जायचे आणि परत तेवढेच अंतर चालत घरी यायचे. कामासाठी ऊन, पाऊस आणि थंडी यांकडे न पहाता ते आई-वडिलांना साहाय्य करायचे. बहिणींचे विवाह करायचे असल्याने ते कितीही त्रास झाला, तरी सहन करायचे.
२ आ. मामीच्या बहिणीने निर्व्यसनी, कष्टाळू असलेल्या पू. काकांशी
आपल्या मुलीचा विवाह करण्याचे ठरवणे आणि ख्रिस्ताब्द १९७९ मध्ये त्यांचा विवाह होणे
पू. काकांच्या मामीच्या बहिणीने पू. काकांना आपल्या घरी ठेवून घेतले आणि २ वेळचे जेवण दिले. काही मासांनी एक सायकल घेऊन दिली आणि घड्याळ दिले. त्यांचे पू. काकांवर प्रेम होते. ते निर्व्यसनी, कष्टाळू आणि त्यांचे ऐकत होते, हे हेरून त्यांनी स्वतःच्या मुलीशी विवाह करण्याचे त्यांच्या आई-वडिलांकडून वदवून घेतले. अशा प्रकारे पू. काकांनी त्यांच्या विवाहापूर्वी म्हणजे ख्रिस्ताब्द १९७६ ते १९७९ पर्यंत पुढे होणार्या सासूबाईंच्या घरी राहून चाकरी केली. ख्रिस्ताब्द१९७९ मध्ये त्यांचा विवाह झाला. पू. काकांनी ख्रिस्ताब्द १९७६ ते २००१ पर्यंत महाराष्ट्रातील सूतगिरण्यांमध्ये मुख्य तपासनीस ते व्यवस्थापकीय संचालक (‘मॅनेजिंग डायरेक्टर’) अशा विविध पदांवर चाकरी केली.
पू. नकातेकाका आणि त्यांच्या धर्मपत्नी
३. कौटुंबिक जीवन
३ अ. तीनही मुले पू. काकांच्या शिस्तीत आणि आईच्या प्रेमात मोठी होऊ लागणे
२९.८.१९७९ या दिवशी पू. काकांच्या संसाराला आरंभ झाला. त्यांनी रहाण्यासाठी भाड्याने घर घेतले होते. ख्रिस्ताब्द १९८० मध्ये पू. काकांना पहिला मुलगा झाला. त्याचे नाव ‘मनोज’ ठेवले. त्यानंतर ख्रिस्ताब्द १९८४ मध्ये दुसरी मुलगी झाली. तिचे नाव ‘मेघा’ ठेवले आणि ख्रिस्ताब्द १९८६ मध्ये तिसरे कन्यारत्न झाले. तिचे नाव ‘वर्षा’ ठेवले. तीनही मुले पू. काकांच्या शिस्तीत आणि आईच्या प्रेमात मोठी होऊ लागली. पू. काकांची शिस्त इतक्या टोकाची होती की, आम्ही मुलांनी आमच्या वयाच्या २० – २२ व्या वर्षांपर्यंत आईला कधीच पू. काकांसमोर जेवणसुद्धा वेळेच्या आधी मागितले नाही; कारण त्यांचा स्वभाव अतिशय रागीट होता. त्यामुळे आम्ही मुले वाढलो, ती त्यांच्या भीतीतच.
३ आ. मुलांना परीक्षेत एखाद्या विषयात अल्प
गुण पडल्यास शिक्षा करणे आणि शिस्त अन् संस्कार करवून आदर्श बनवणे
पू. काकांना आम्हा मुलांना परीक्षेत एखाद्या विषयात अल्प गुण पडलेले मुळीच चालायचे नाही. सर्वांत लहान असणारी वर्षा (आताची सौ. वैष्णवी लोंढे) हिचे लक्ष अभ्यासात कधीच नसायचे. त्यामुळे तिने पू. काकांचा पुष्कळ मार खाल्ला आहे. ते रात्रभर शिक्षा म्हणून गाडीला दोरी बांधून तिला उलटे लटकवायचे. त्यांना वाटायचे, ‘मुलांना सर्वकाही मिळते, तर त्यांनी चांगले शिकून पुढे जावे. आमच्या तुलनेत यांचे नशीब चांगले आहे.’ त्यांच्या विचारानुसार कु. वर्षा वागत नसल्यामुळे ती मार खायची. आम्ही मुले कधीच आपले वडील म्हणून त्यांच्या जवळ जात नसू. मी मात्र (आताची सौ. प्रार्थना बुवा) पू. काकांच्या अपेक्षेप्रमाणे वागत असल्यामुळे ते माझे लाड करायचे. पू. काकांनी आम्हा मुलांना शिस्त आणि संस्कार करवून आदर्श बनवले. आता लक्षात येते की, त्या वेळी त्यांनी कठोर होऊन आम्हा मुलांना शिस्त लावली; म्हणून आमचे जीवन व्यवहारातील मुलांच्या तुलनेत अधिक चांगले आहे. प.पू. डॉक्टरांसारखे ईश्वरासमान गुरु मिळाले. त्यामुळे त्यांच्या चरणी कृतज्ञताच व्यक्त करावीशी वाटते.
४. आधीची साधना
४ अ. पू. काका लहानपणापासूनच भक्तीमार्गी असणे, त्यांची श्री स्वामी समर्थांवर
श्रद्धा असणे आणि सुटीच्या दिवशी अखंड ध्यान लावून बसल्याने त्यांना सर्व गोष्टींचा विसर पडणे
पू. काका लहानपणापासूनच भक्तीमार्गी होते. लहान असतांना ते त्यांच्या मामांसमवेत कीर्तनाला जात. आपले कुलाचार पाळत. ते अनेक संतांच्या ग्रंथांचे वाचन करत. तसेच मंत्र, आरत्या म्हणत. नंतर त्यांची श्री स्वामी समर्थांवर श्रद्धा बसली. ते प्रतिदिन कामावरून आले की, आम्हा मुलांना घेऊन स्वामी समर्थांचा १ घंटा जप करून घ्यायचे. संपूर्ण गीता म्हणून घ्यायचे. गणपति अथर्वशीर्ष, रामरक्षास्तोत्र म्हणून घ्यायचे. सकाळी उठल्यानंतर मनाचे श्लोक, सायंकाळी दिवेलागणीच्या वेळी श्लोक म्हणणे, असे आमच्याकडून करवून घ्यायचे. त्यांनी लहानपणापासूनच आम्हा मुलांमध्ये अध्यात्माचे बीज पेरले. सुटीच्या दिवशी संतांच्या गोष्टी सांगून त्यांनी त्यांचे जीवन कसे व्यतीत केले, हे सांगायचे, जेणेकरून आम्हीही तो आदर्श समोर ठेवून कठीण प्रसंग आला, तरी तो पार करून पुढे जाऊ शकू. नित्यनियमाने ‘श्लोक, आरत्या आणि नामजप झाल्यानंतरच जेवण करायचे’, असा पू. काकांचा कटाक्ष असायचा. त्याच्यात कधीच खंड पडला नाही. ते मासातून एकदा अक्कलकोट स्वामींच्या मठात दर्शनासाठी आम्हाला घेऊन जायचे. पुढे पुढे त्यांची श्रद्धा एवढी दृढ झाली की, सुटीच्या दिवशी ते देवघरात स्वामी समर्थांच्या छायाचित्रासमोर बसून अखंड नामजप करायचे. तसेच ध्यान लावून बसायचे. त्या वेळी त्यांना सर्वच गोष्टींचा विसर पडायचा. त्यांची ती अवस्था पाहून आम्हा सर्वांना वाटायचे, ‘पू. काका नामजप करता करता वेडे होतील कि काय !’ त्यामुळे आम्ही भावंडे आणि आई चर्चा करायचो.
५. सनातन संस्थेच्या माध्यमातून साधनेला आरंभ
५ अ. प.पू. डॉक्टरांच्या पहिल्या भेटीने
व्यवहारातील ओढ नष्ट होऊन पू. काकांचे मन त्यांच्याकडे धावू लागणे
एप्रिल १९९७ मध्ये प.पू. डॉक्टरांची सावंतवाडी येथे असणार्या जाहीर सभेत पहिली भेट झाली. त्यांच्या त्या अमृत दर्शनाने पू. काकांची व्यवहारातील ओढ नष्ट होऊन मन प.पू. डॉक्टरांकडे धावू लागले. त्या दर्शनानंतर पू. काकांचे लक्ष ना कामात लागायचे, ना घरातील कोणत्या गोष्टीत लागायचे. त्यांना अखंड प.पू. डॉक्टरांचे रूप आठवायचे. त्यामुळे त्यांना सतत सेवा करावीशी वाटून ते सेवेकडे ओढले जाऊ लागले.
५ आ. पू. काका सनातनच्या कार्याशी एकरूप झाल्याने त्यांचे घर आणि मुले यांकडे
दुर्लक्ष होऊ लागणे अन् घरून आईचा आणि बाहेरून नातेवाइक अन् मित्रमंडळी यांचा विरोध वाढणे
ख्रिस्ताब्द २००१ मध्ये त्यांना कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे सनातनचे साधक श्री. रंजन देसाई भेटले आणि पू. काका सनातनच्या कार्याशी इतके एकरूप होऊ लागले की, त्यांचे घर अन् मुले यांकडे दुर्लक्ष होऊ लागले. ते सायंकाळी ५ नंतर काम संपले की, थेट घरी न येता जेथे सनातनचे काही कार्यक्रम किंवा इतर काही असेल, तेथे जायचे आणि रात्री उशिरा घरी यायचे. त्यांच्या या गोष्टी पाहून आईला फार राग यायचा आणि ती पू. काकांशी भांडायची. आईच्या कोणत्याही प्रश्नाला ते उत्तर देत नसत. पुन्हा दुसर्या दिवशी त्यांच्या ठरलेल्या सेवा, कार्य करून रात्री उशिराच यायचे. या सर्व गोष्टींमुळे आईने नातेवाइकांना सर्व प्रकार सांगितला. यावर नातेवाइकांनी पू. काकांना सनातनमध्ये जाण्यास विरोध केला; पण त्यांचा मनोनिग्रह झाल्याने ते काही केल्या सनातनच्या कार्यापासून अलिप्त होऊ शकले नाहीत. घरून आईचा आणि बाहेरून नातेवाइक अन् मित्रमंडळी यांचा विरोध वाढत होता. पू. काकांनी होणार्या विरोधाला न जुमानता गुरूंवर दृढ श्रद्धा ठेवून ख्रिस्ताब्द २००१ मध्ये पूर्णकालीन साधक होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी चाकरी सोडली.
६. पू. काकांनी घरच्यांना साधनेत आणण्यासाठी केलेले प्रयत्न
६ अ. मुले आणि पत्नी सांगितलेल्या गोष्टी मनापासून करत
नसल्याचे लक्षात येताच निरनिराळ्या साधकांना घरी बोलावून त्यांना साधनेसाठी प्रवृत्त करणे
पू. काकांना साधनेसाठी घरून आईचा विरोध होता, तरीही ते आम्हा मुलांना सेवेचे महत्त्व, कुलदेवता आणि, दत्त यांच्या नामाचे महत्त्व सतत सांगत अन् साधना करून घेत. ते सांगत असलेल्या गोष्टी आम्ही मुले आणि आई मनापासून करत नाही, हे त्यांच्या लक्षात येऊ लागल्यानंतर ते सोलापूर येथील सनातनचे साधक श्री. दिलीप रोडी, श्री. नितीन कोठावळे, आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. शिल्पा कोठावळे, श्री. कांबळेकाका अशा निरनिराळ्या साधकांना घरी आणायचे आणि त्यांना आम्हाला सांगायला सांगायचे. त्यांच्या माध्यमांतून ते आम्हाला सत्संगाला येण्यास प्रवृत्त करायचे. आम्ही साधना करावी, यासाठी त्यांनी पुष्कळ कष्ट घेतले. आमच्या वयाच्या क्षात्रविरांना ते आमच्याशी बोलण्यासाठी घरी आणून आमची भेट घालून द्यायचे. मला प्रशिक्षणाची गोडी लागावी, त्या माध्यमातून मी साधनेला आरंभ करावा, यासाठी आम्ही रहात होतो, त्या ठिकाणी प्रशिक्षणवर्ग चालू केले. सत्संग चालू करण्याचे प्रयत्न केले. कार्यशाळेचेही आयोजन केले. प.पू. डॉक्टरांप्रती भाव वाढावा, यासाठी ते त्यांच्या अनुभूती, ते करत असलेले कार्य सातत्याने सांगायचे.
६ आ. पू. काकांची तळमळ आणि देवाची कृपा यांमुळे
दोघी मुली अन् पत्नी यांनी साधनेचे महत्त्व पटल्याने सेवा करू लागणे
पू. काकांची तळमळ आणि देवाची कृपा यांमुळे आम्ही दोघी बहिणी अन् आई ख्रिस्ताब्द २००३ पासून साधनेचे महत्त्व पटल्याने सेवा करू लागलो. आई शाळेत मुख्याध्यापिका म्हणून चाकरी करत होती. तिलाही साधना आणि सेवा यांचे महत्त्व पटल्यानंतर तीही राजीनामा देऊन पूर्णवेळ सेवा करू लागली. पू. काकांच्या हाकेला देव धावून आला आणि त्यांच्या मागचा साधनेतला घरचा विरोध मावळला. त्यामुळे पू. काकांची साधना निर्विघ्नपणे चालू झाली.
७. पू. काकांचा सनातनच्या टोपीप्रती असणारा भाव
ते चाकरी करत असतांना कामाच्या ठिकाणी सहकार्यांकडून मात्र सातत्याने त्यांना साधनेविषयी काहीतरी टोचून बोलले जायचे. त्यात ते मोठ्या पदावर असूनही सायकलवरून आणि तेही सनातनची टोपी घालून जायचे. त्यामुळे कार्यालयातील आणि समाजातील बरेच लोक त्यांची टिंगल करायचे. पू. काकांनी त्यांच्या बोलण्याला कधीच दाद दिली नाही. उलट ते सर्वांना सांगायचे, ‘‘ही सनातनची टोपी म्हणजे माझ्या गुरूंची छत्रछाया माझ्या डोक्यावर आहे. तो माझ्यासाठी आशीर्वाद आहे.’’ ते कार्यालयातच नव्हे, तर नातेवाइकांकडे किंवा घरी काही कार्यक्रम असला, तरी डोक्यावरची टोपी कधीच काढत नसत. त्यामागे त्यांचा उद्देश असायचा, ‘गुरुकार्याचा प्रसार आपल्यापेक्षा ही टोपी अधिक करते. त्यामुळे आपल्याला नुसते घालायला काय होते ?’ कधी कधी आम्हा मुलांनाच त्यांना आमच्या शाळेतील कार्यक्रमांना बोलवायला लाज वाटायची आणि आम्ही आईलाच घेऊन जायचो.
८. पू. काकांचा स्वभाव
८ अ. पू. काका शांत, मितभाषी आणि शिस्तप्रिय असणे अन् त्यांनी
अनाठायी व्यय न करता योग्य तेच कसे केले पाहिजे, हे कृतीतून शिकवून मनावर बिंबवणे
पू. काकांचा स्वभाव शांत, मितभाषी, कडक आणि १०० टक्के शिस्तप्रिय होता. ठरलेल्या आणि घालून दिलेल्या नियमांचे आचरण कठोर अन् कटाक्षाने स्वतः पालन करून आणि इतरांवरही तेवढेच बंधन घालून ते पाळण्यास प्रवृत्त करत. नियमावलीच्या बाहेर गेल्यास दंड हाच नियम त्यांच्या स्वतःसाठी आणि इतरांसाठीही असायचा. पू. काकांचे लहानपण अतिशय गरिबीत आणि हालाखीत गेल्यामुळे त्यांना परिस्थितीची जाणीव होती. त्यामुळे अनाठायी व्यय करणे किंवा अनावश्यक वेळ घालवणे त्यांना कधीच आवडायचे नाही. त्यांनी आजपर्यंतच्या आयुष्यात स्वतःसाठी काहीच केले नाही. त्यांच्या चपला तुटल्या, तरी ते तिला खिळे मारून वापरायचे. पू. काकांनी मोठ्या पदावर चाकर्या केल्या; पण त्यांनी शेवटपर्यंत सायकलवरूनच प्रवास केला. अनेकांनी त्यांना ‘दुचाकी घ्या’, असे सांगितले; पण त्यांनी स्वतःसाठी असे काहीच घेतले नाही. सर्व आयुष्य त्यांनी काटकसरीत काढले आणि आम्हा मुलांनाही काटकसरीने वागायला शिकवले. एखाद्या गोष्टीची आमच्याकडून हानी झाली की, त्याची शिक्षा ही व्हायचीच. त्यामुळेच आम्हाला प्रत्येक गोष्टीचे मोल लक्षात येऊ लागले. आम्ही मुलांनी पू. काकांना त्यांच्यासाठी काही घ्यायला सांगितले की, ते म्हणायचे, ‘‘आधी केले मग सांगितले असे असावे. मी कसाही वागलो, पैशांची उधळपट्टी केली, तर ‘तुम्हाला योग्य संस्कारानुसार आचरण करा, काटकसरीने वागा’, हे सांगण्याचा मला अधिकार नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे पालन प्रथम मी करतो आणि नंतर तुम्हाला सांगून ते तुमच्याकडून करवून घेतो.’’ त्यांनी आम्हाला अनाठायी व्यय न करता योग्य तेच कसे केले पाहिजे, हे कृतीतून शिकवले आणि मनावर बिंबवले.
८ आ. प्रामाणिकपणे वागणार्या आणि इतरांनाही वागण्यास भाग पाडणार्या पू. काकांना
भ्रष्टाचार करत नसल्याने जीवे मारण्याचा कट रचला जाणे अन् प.पू. डॉक्टरांनी त्यांचा जीव वाचवणे
१०० टक्के प्रामाणिकपणाने वागणार्या आणि इतरांनाही वागण्यास भाग पाडणार्या पू. काकांना त्यांच्या चाकरीच्या ठिकाणी सहकार्यांकडून भ्रष्टाचार करण्यासाठी बळजबरी होऊ लागली. एकदा ‘भ्रष्टाचार करणार नाही’, हे सांगितल्यावर जीवे मारण्याचा कटही केला गेला. तेव्हा त्यांच्या या प्रामाणिकपणामुळे प.पू. डॉक्टरांनी त्यांचा जीव भ्रष्टाचारी लोकांपासून वाचवला आणि दाखवून दिले की, तुमचा जीव मी केवळ साधना करण्यासाठीच वाचवला आहे. त्यानंतर पू. काकांनी मोठमोठ्या वेतनाच्या चाकर्या लाथाडल्या. पुढचे आयुष्य केवळ गुरुचरणी समर्पित करायच्या ध्येयाने प्रवृत्त होऊन त्यांनी व्यवहाराचा त्याग केला. अशा प्रकारे त्यांच्या खर्या आध्यात्मिक जीवनास आरंभ झाला आणि त्यांनी त्यांचे जीवन गुरुकार्यासाठी अर्पण केले.
९. पू. काकांनी केलेल्या विविध सेवा
जिल्ह्यात आधुनिक वैद्या (डॉ.) नंदिनी सामंत, कु. राजश्री सखदेव, श्री. आठलेकरकाका असे अनेक मार्गदर्शक येत असत. त्यांच्या मार्गदर्शनाची सिद्धता म्हणजे सभागृह ठरवणे, त्याची स्वच्छता करणे, कापडी फलक आणि भित्तीपत्रके लावणे, सर्वांना निमंत्रणे देणे, अशा सर्व सेवा पू. काका करायचे. त्यानंतर जिल्ह्यातील व्यवस्थापनाच्या सेवा केल्या. सर्व अहवाल आणि हिशोब ठेवणे या सेवा केल्या. ख्रिस्ताब्द २००७ मध्ये नेसाई सेवाकेंद्रात पूर्णवेळ सेवा करण्यास गेले. तेथे त्यांनी ग्रंथ बांधणी विभागात सेवा केल्या. ते ७ मास नेसाईत राहिले. अहं-निर्मूलन प्रक्रियेसाठी त्यांना रामनाथी आश्रमात पाठवले. तेथे त्यांनी हिशोब ठेवणे, भांडारपाल, मालमत्ता पहाणी, या सेवा केल्या. तसेच दिसतील त्या सेवा केल्या.
१०. पू. काकांचा स्वभाव कडक आणि रागीट असल्याने त्यांनी
सहसाधकांना दुखावणे आणि शिक्षा म्हणून त्यांना व्यष्टी साधनेसाठी घरी पाठवण्यात येणे
सर्वकाही त्याग करून पू. काका अध्यात्मात आले, तरीही त्यांना जी मनःशांती हवी होती, ती काही त्यांना मिळत नव्हती. त्यांच्या मनाची बेचैनी काही जात नव्हती. ‘ही जी स्थिती आहे, ती काही बाह्यतः नसून ती अंतरीचीच आहे’, हे गुरूंनी त्यांना दाखवून दिले. वडिलांचा स्वभाव कडक आणि रागीट असल्याने समोरचा एखादा चुकला किंवा त्याच्यामुळे गुरुकार्यात हानी झाली, हे त्यांना सहनच व्हायचे नाही. त्याचा परिणाम सहसाधक किंवा कुटुंबीय सातत्याने दुखावले जायचे आणि त्याचा परिणाम पुन्हा त्यांच्यावर होत असे. असे चालू असतांना २३.१२.२००८ या दिवशी रामनाथी आश्रमात सहसाधकांना दुखावण्याचे काही प्रसंग घडले आणि पू. काकांना शिक्षा म्हणून व्यष्टी साधनेसाठी घरी पाठवले. त्यांच्या आयुष्यातील व्यवहार आणि अध्यात्म यांमध्ये केलेला गणिताचा खेळ (चाकरीच्या ठिकाणी आणि साधनेतही त्यांना हिशोबाच्याच सेवा मिळाल्या होत्या) संपला आणि त्यांच्या जीवनातील व्यावहारिक हिशोबच गुरूंनी थांबवला. हे नंतरच्या त्यांच्या आयुष्यात आलेल्या विविध घटना आणि प्रसंग यांनी दाखवून दिले.
११. पू. नकातेकाकांना घरी पाठवल्यानंतर घडलेले प्रसंग
११ अ. सेवाकेंद्रात लिहिलेल्या फलकामुळे जिल्ह्यातील
सर्व साधकांनी पू. काकांशी संबंध ठेवणे किंवा बोलणे टाळणे
पू. काकांना व्यष्टी साधनेसाठी घरी पाठवल्यानंतर खर्या अर्थाने त्यांच्या अंतरंगात पालट होण्यास आरंभ झाला.
पू. काकांच्या मनात विचार आला, ‘आता जिल्ह्यात राहूनच सेवा आणि व्यष्टी साधना करूया’; पण ते घरी गेल्यावर सोलापूर येथील सेवाकेंद्रात फलक लिहिला, ‘श्री. नकातेकाकांना व्यष्टी साधनेसाठी शिक्षा म्हणून आश्रमातून घरी पाठवले आहे. त्यांच्याशी कोणीही संबंध ठेवू नये.’ त्याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व साधकांनी पू. काकांशी संबंध ठेवणे किंवा बोलणे टाळले. घरी केंद्रातील साधकांचा सत्संग असायचा. त्यामुळे साधक आईकडे यायचे; पण पू. काकांशी बोलायचे नाहीत किंवा त्यांना कोणत्याही सेवा देत नसत. सेवाकेंद्रातील फलक वाचून आईच्या मनात विचार आला, ‘साधकांनी त्यांच्याशी संबंध ठेवायचा नाही, तर आम्हीही साधक आहोत. मग आम्ही (वहिनी आणि आई) काय करायचे ?’ त्या वेळी आईने हे विचारून घेतले. तेव्हा आईला सांगण्यात आले, ‘‘तुम्ही कर्तव्य म्हणून त्यांच्याशी संबंध ठेवा आणि त्यांना साधनेत साहाय्य करा.’’
११ आ. आईने पू. काकांना मानसिक स्तरावर न हाताळता
त्यांच्या चुका परखडपणे सांगून घरातील फलकावर लिहायला लावणे
आईने पू. काकांची दिनचर्या ठरवून दिली. त्यामध्ये अंतर्मुख होण्यासाठी प्रार्थना लिहून दिल्या. स्वयंसूचनांची सत्रे करण्यासाठी स्वयंसूचना सिद्ध करून दिल्या. आई प्रत्येक रात्री पू. काकांचा आढावा घेत असे. तसेच काय करायला हवे, ते सांगून वेळप्रसंगी रागावून, तर कधी प्रेमाने त्यांच्या स्थितीला जाऊन सांगत असे. त्या काळात आईचे कौतुक म्हणजे तिने पू. काकांना मानसिक स्तरावर कधीच हाताळले नाही. ती त्यांच्या चुका परखडपणे सांगून घरातील फलकावर लिहायला लावायची. पू. काकांमधील प्रामाणिकपणामुळे ते सर्व चुका प्रांजळपणाने सांगत आणि लिहीत. घरी येणारे साधक फलकावरील चुका वाचून पू. काकांना अतिशय प्रतिक्रियात्मक बोलायचे आणि वागायचे. त्या वेळीही आई पू. काकांना घडत असणारे प्रसंग त्यांच्या प्रगतीसाठी कसे हितकारक आहेत, हेच सांगायची. आईच्या या आध्यात्मिक स्तराच्या आधाराने १ मासातच ते सावरले आणि सर्व प्रक्रिया राबवू लागले.
११ इ. हिंदु धर्मजागृती सभेच्या ठिकाणी मानहानी झाल्याने
आत्महत्येस प्रवृत्त होणे आणि प.पू. भक्तराज महाराजांनी वाचवून आश्वस्त करणे
त्या काळात एक प्रसंग घडला आणि त्यामुळे पू. काकांचे प्रयत्न खर्या अर्थाने मानसिक अन् बौद्धिक स्तरातून भक्तीच्या स्तरावर चालू झाले. सोलापूर येथे हिंदु धर्मजागृती सभा होती. त्या वेळी पू. काकांना ‘सभेला जाऊन सेवा करावी’, असे तीव्रतेने वाटत होते; परंतु तशी अनुमती नसल्याने आईने सांगितले, ‘‘तुम्हाला सेवा करता येणार नाही; पण तुम्ही सभेला येऊ शकता.’’ तेव्हा आई सेवेला गेली. पू. काकांचा मूळ पिंडच सेवा करण्याचा असल्याने ते कार्यक्रमापूर्वी कार्यक्रमस्थळी गेले. तेथे सेवा करणार्या साधकांना पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. ते एका साधकाजवळ जाऊन त्यांना नमस्कार करू लागले. तेव्हा त्या साधकाने म्हटले, ‘‘नमस्कार करून आमचा वेळ घालवू नका. आम्हाला सेवा करायच्या आहेत.’’ त्या वेळी पू. काकांची स्थिती मेल्याहून मेल्यासारखी झाली. ते आतले दुःख पचवत असेच पुढे कार्यक्रमस्थळी फिरत होते. प्रत्येक ठिकाणी त्यांना असेच अनुभव येत होते. त्यांनी कार्यक्रम पाहिला आणि त्यांच्या मनात विचार येऊ लागला, ‘जर माझ्या आयुष्यात सेवा नाही, सनातनचे साधक नाहीत, स्थुलातून गुरु नाहीत, तर मी जगून काय करू ? माझ्या जीवनात काहीच अर्थ नाही.’ त्यांना ‘आता जगायलाच नको’, असे वाटून ते आत्महत्या करण्यास गेले. तेव्हा प.पू. भक्तराज महाराजांनी ‘पू. काकांचा हात धरून त्यांना घरी आणले आणि ‘मी आहे ना, मग जगाची काय आवश्यकता ? मी अखंड तुझ्यासमवेत रहाणार’, असे सांगून प.पू. भक्तराज महाराज निघून गेले’, असे पू. काकांना जाणवले. वरील प्रसंग झाल्यानंतर पू. काका त्या रात्री अखंड प.पू. बाबांना या स्थितीतून काढण्यासाठी विनवू लागले. ढसाढसा रडू लागले. त्यांच्या या स्थितीत त्यांच्या समवेत प.पू. बाबा कृपेची सावली बनून पदोपदी त्यांना सांभाळत होते.
११ ई. सेवा चालू झाल्यावरही साधक मनाला लागेल, असे
पू. काकांना बोलत असणे आणि त्यांच्या अंतरात प.पू. बाबांची ओढ वाढू लागणे
पू. काका प.पू. बाबांच्या स्मरणात इतके दंग होऊ लागले की, ते त्यांचे जीवनच होऊन गेले. त्यांना त्यांच्या त्या स्थितीत तेच आनंद देत होते. पू. काका अहं निर्मूलनाच्या प्रक्रियेत असल्यामुळे ते त्यांच्या आतील आनंदाची स्थिती बाहेर कोणाला सांगू शकत नव्हते. काही दिवसांनी प्रसारातून त्यांना सेवेसाठी येण्यास सांगितले. पू. काकांची सेवा पुन्हा चालू झाली. प्रसारात साधकांना ठाऊक होते की, त्यांना शिक्षा म्हणून घरी पाठवले आहे. त्यामुळे साधकांचे वागणे प्रेमाचे नसायचे. साधक मनाला लागेल, असे पू. काकांना बोलायचे. साधक लहान-मोठेपणाची जाण न ठेवता त्यांना आज्ञा करत असत. या सर्वांमुळे पू. काका पुन्हा होरपळून निघत होते. यातूनच त्यांच्या अंतरात प.पू. बाबांची ओढ वाढू लागली. (काकांना साहाय्य करण्याऐवजी त्यांना लागेल असे बोलणे ही साधकांची अक्षम्य चूक होती. तेव्हाच जर हे कळवले असते, तर साधकांना सांगता आले असते. – डॉ. आठवले (पौष कृ. ९, कलियुग वर्ष ५११३ (१७.१.२०१२))
११ उ. पू. काकांना शारीरिक त्रास होत असूनही ते रात्रीपर्यंत
सेवा करत असणे आणि त्यांची स्थिती विरक्त झाल्याप्रमाणे जाणवणे
त्या काळात पू. काकांना शारीरिक त्रास होत होता. गुडघेदुखी, आंत्रपुच्छाचा (अपेंडिक्सचा) त्रास, पित्ताचा त्रास, चक्कर येणे, तोल जाणे, असे त्रास अधिक प्रमाणात होत होते; पण ‘हे त्रास होत आहेत’, हे ते कोणाला सांगू शकत नव्हते. हे सांगितल्यास ‘परत आपली सेवा काढून घेतली, तर काय करायचे’, या विचाराने पू. काका अशा त्रासात आणि कडक उन्हात प्रतिदिन १० – १२ कि.मी. सायकलवरून दैनिक ‘सनातन प्रभात’ अन् सनातनची उत्पादने यांचे वितरण करायचे. ते सकाळी ९.३० वाजता धर्मसभेचे निमंत्रण देणे, विज्ञापने आणणे, अशा सेवा करण्यासाठी घरातून निघायचे, ते रात्री ११ वाजता घरी परतायचे. घरातून निघतांना काही खाल्ले असेल, तेवढ्यावरच असायचे. नंतर रात्री घरी आल्यावर जेवायचे. सातत्याने बाहेरून होणारा मारा आणि कधी कधी घरातूनही होणारा मारा यांमुळे त्यांचे मन प.पू. बाबांच्या चरणांशी एकरूप होत होते कि काय, ठाऊक नाही. ते त्यांनाच ठाऊक असावे. तेव्हा पू. काकांची स्थिती विरक्त झाल्याप्रमाणे जाणवायची.
१२. पू. नकातेकाकांची प्रगतीपथावर वाटचाल
१२ अ. दोन प्रसंगांमुळे पू. काकांवर परिणाम होऊन
त्यांनी रात्रभर प.पू. बाबांना आळवणे, सकाळी त्यांना
अर्धांगवायूचा झटका येणे आणि लुळ्या पडलेल्या शरिराचा विसर पडून ते भजनात दंग होणे
फाल्गुन शु. सप्तमी, कलियुग वर्ष ५१११ (२१.२.२०१०) या दिवशी एक साधक पू. काकांना इतर साधकांसमोर अतिशय अपमानास्पद बोलले. घरातही एक प्रसंग झाला आणि त्याचा परिणाम त्यांच्यावर इतका झाला की, त्यांच्या मनात ‘आपल्याला प.पू. बाबांविना कोणीच नाही’, असे वाटून ते रडून म्हणू लागले, ‘प.पू. बाबा, तुम्ही मला आता तुमच्या भक्तीत वेडे करा. मला आता हे जग नको, कोणतीही नाती किंवा काहीच नको. मला केवळ आपले चरण हवेत.’ रात्रभर त्यांचे हे आळवणे चालू होते. दुसर्या दिवशी सकाळी ६.३० वाजता त्यांना शरिराच्या डाव्या बाजूला अर्धांगवायूचा (पॅरालिसिसचा) झटका आला. प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे अंतरातील प.पू. बाबांप्रती आळवणी तीव्र होती. त्यामुळे त्यांना अवघ्या जगाचा विसर पडला आणि ते प.पू. बाबांच्या भजनात वेडे झाले. लुळ्या पडलेल्या शरिराचा त्यांना विसर पडला आणि अशा स्थितीत ते उठून भजने म्हणू लागले, ‘गुरुचरणी ठेवी ध्यास, तोच पुरवी माझी आस ।’ आणि ‘बाप माझा हो ज्ञानवंत ।’
१२ आ. शारीरिक विकलांगतेत देवाच्या भेटीसाठी वेड्या झालेल्या पू. काकांवर
गुरुकृपेची उधळण चालू होणे आणि ते भजनांच्या माध्यमातून प.पू. बाबांच्या अनुसंधानात रहाणे
शारीरिक विकलांगतेत देवाच्या भेटीसाठी वेड्या झालेल्या पू. काकांवर गुरुकृपेची अफाट उधळण चालू झाली. अशा या नाजूक स्थितीतून प.पू. बाबा आणि प.पू. डॉक्टर यांनी त्यांना पूर्णपणे ठीक केले. साधकबांधव आणि नातेवाइक यांच्या प्रेमाचा वर्षाव पुन्हा चालू झाला. त्यानंतर पू. काकांची प.पू. बाबांच्या भजनांच्या माध्यमातून अनुसंधानात रहाणे, हीच साधना चालू होती. पू. काका प.पू. बाबांच्या अनुसंधानात इतके वेडे झाले की, त्यांना चराचरात तेच दिसू लागले. तसेच त्यांच्या दर्शनाने वेडे होऊन त्यांना स्थळकाळाचे भान न रहाता ते सर्वांना नमस्कार करू लागले. त्यांना झाडात प.पू. बाबा दिसायचे आणि ते त्या झाडाला जाऊन मिठी मारायचे. येणार्या-जाणार्यांमध्ये त्यांना प.पू. बाबा दिसायचे आणि ते त्यांच्या पाया पडायचे, त्यांच्या मागे धावायचे. अशा प्रकारे चराचरात देवाला पहाणार्या पू. काकांना प.पू. डॉक्टरांनी रामनाथी आश्रमात बोलावले आणि ५० टक्के पातळी गाठल्याचे घोषित केले.
१२ इ. अनुसंधानातील तल्लीनतेमुळे देहाला झालेल्या दुखापतीची जाणीव न होणे
आणि प.पू. डॉक्टरांनी ६० टक्के पातळी घोषित केल्याने पू. काकांची जन्म-मृत्यूच्या फेर्यातून मुक्तता होणे
पू. काकांची प.पू. बाबांविषयीची भक्ती तीव्र होत होती. त्यामध्ये पुन्हा एक प्रसंग घडला, तो म्हणजे ज्येष्ठ कृ. पंचमी, कलियुग वर्ष ५११२ (१.७.२०१०) या दिवशी घरातील जेवणाच्या पटलावरची मोठी काच पडून पू. काकांच्या पायाला मोठा घाव झाला (तळपायाचा भाग वेगळा झाला). त्यांच्या अनुसंधानातील तल्लीनतेमुळे त्यांच्या देहाला झालेल्या दुखापतीची जाणीव न होता, ते त्याही रक्तबंबाळ स्थितीत ‘बाप माझा हो ज्ञानवंत।’ हे भजन म्हणत होते. हे पाहून आईने मला कळवले. हा सर्व घटनाक्रम प.पू. डॉक्टरांना सांगितल्यानंतर त्यांनी मला सोलापूर येथे पू. काकांकडे जाण्यास सांगितले आणि ज्येष्ठ कृ. सप्तमी, कलियुग वर्ष ५११२ (४.७.२०१०) या दिवशी त्यांची ६० टक्के पातळी झाल्याचे घोषित केले. अशा प्रकारे पू. काकांचा जन्म-मृत्यूच्या फेर्यातील प्रवासास पूर्णविराम मिळाला आणि ते प.पू. बाबांच्या चरणांशी शांत मनाने स्थिर झाले.
१२ ई. ६० टक्के पातळी झाल्याने आनंदात वहावत न जाता ‘आणखी
प्रगती करून गुरुकृपेस पात्र व्हायचे आहे’, ही सतर्कता ठेवून आंतरिक पालट करणे
सतत गंभीर आणि मितभाषी असणारे पू. काका गुरूंच्या कृपाशीर्वादाने आनंदमय झाले. ते सतत हसत राहून इतरांना आनंद देत आहेत. व्यष्टी साधनेसाठी घरी पाठवण्यापूर्वी पू. काका म्हणजे रागाचा गोळाच म्हणावा लागेल; पण प्रक्रियेनंतर राग, चिडणे, प्रतिक्रियात्मक बोलणे हे सर्व त्यांच्या आयुष्यातून प.पू. डॉक्टरांनी गाळूनच टाकले कि काय, असे वाटते. या दोन वर्षांत ते कधीच कोणावर चिडलेले पाहिले नाही किंवा ऐकले नाही. उलट कोणीही त्यांना काही बोलल्यास ‘‘माझे काय चुकले’’, हे विचारून समोरच्याची क्षमा मागून त्यांना अंतर्मुख करून टाकतात. प.पू. डॉक्टरांनी पू. काकांना जिल्ह्यातील त्रास असणार्या साधकांवर उपाय करायला सांगून समष्टी साधना करून घेतली. ६० टक्के पातळी झाली; म्हणून लगेच आनंदात वहावत न जाता ‘आणखी प्रगती करून गुरुकृपेस पात्र व्हायचे आहे’, ही सतर्कता ठेवून त्यांनी आंतरिक पालट केले.
पू. नकातेकाका भावपूर्ण प्रार्थना करताना
१२ उ. अवघ्या ५ मासांत ९ टक्के पातळी वाढवून प.पू. डॉक्टरांनी
पू. काका संत झाल्याचे घोषित करणे आणि पू. काकांनी जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा गाठणे
त्या काळात पू. काका बाह्यांगाने जरी साधकांसमवेत हसत-बोलत असले, तरी त्यांचे अंतरंग प.पू. बाबांच्या चरणांवर शांत विसावलेले असल्याने अवघ्या ५ मासांत प.पू. डॉक्टरांनी ९ टक्के पातळी वाढवून पौष शु. चतुर्थी कलियुग वर्ष ५११३ (२८.१२.२०११) या दिवशी त्यांची ७१ टक्के पातळी झाल्याचे घोषित करण्यास पू. अनुताई यांना सांगितले आणि ते संतपदावर आरूढ झाले. अशा प्रकारे पू. काका आज सनातनच्या संतमालिकेतील १३ वे संत होऊन त्यांनी जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा गुरूंच्या कृपाशीर्वादाने गाठला. असे असले, तरी ‘आपले ध्येय संत बनणे नसून भगवंताशी एकरूप होईपर्यंत प्रयत्नरत रहायचे आहे’, अशी विचारांची दिशा ठेवून विचारून प्रयत्न करणार्या पू. काकांचा आदर्श घ्यावा तेवढा थोडाच आहे. पू. काका म्हणजे,
१. गुरुकार्याची तीव्र तळमळ, काटकसरीपणा, मायेत राहूनही विरक्त असणारे
२. पदोपदी देवाला अपेक्षित असे करण्यासाठी झटणारे
३. प.पू. बाबांच्या अनुसंधानात भजनांच्या माध्यमातून भावाच्या उच्च स्थितीला गेलेले
४. शरिराच्या विकलांगतेतही आपण काहीही करून देवापर्यंत पोहोचू शकतो, हा आदर्श समोर ठेवणारे,
५. राष्ट्र आणि धर्म यांविषयी प्रेम असणारे अन् साधकांचे रक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी अखंड प्रार्थना करून देवाला आळवणारे
६. चिकाटी, तळमळ आणि श्रद्धा यांच्या बळावर प.पू. बाबा अन् प.पू. डॉक्टर यांच्या कृपेस पात्र ठरलेले, असे आहेत.
१३. प्रार्थना
प.पू. डॉक्टरांनी जे काही माझ्यासारख्या अज्ञानी जिवाकडून लिहून घेतले, ते मी त्यांच्या चरणी अर्पण करते. अशा प्रकारे पू. नकातेकाकांचा जीवनाचा प्रवास कधीही न विसरला जाणारा आणि त्यातून आम्हा साधकांना प्रेरणा घेण्यासारखा आहे. हा प्रवास मला जवळून पहायला आणि अनुभवायला मिळाल्यामुळे प.पू. डॉक्टर, मी तुमच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहे. प.पू. डॉक्टर, पू. नकातेकाकांसारखी आम्हा सर्व साधकांचीही साधना करवून घ्या. आम्ही सर्व साधक आपल्या कृपेस आणि प्रेमास पात्र होण्यास आसुसलो आहोत. ‘आम्हाला आपल्या कृपेच्या वर्षावाखाली नहाता येऊ दे’, हीच आपल्या चरणी प्रार्थना !
१४. सर्व साधकांना विनंती
पू. नकातेकाकांना व्यष्टी साधनेसाठी घरी पाठवल्यानंतर ते प्रयत्न करून संतपदाला पोहोचले आणि गुरूंच्या कृपेस पात्र ठरले आहेत. आज व्यष्टी साधना करण्यासाठी जे साधक प्रक्रियेत आहेत, त्यांना आणि प्रयत्न वाढवण्याच्या दृष्टीने सर्वच साधकांना विनंती करावीशी वाटते की, पू. नकातेकाकांचा साधनेतील प्रयत्नांचा आदर्शपट आपल्या समोर ठेवूया आणि त्यांच्या मागे आपला क्रमांक लावून गुरूंच्या कृपेस पात्र ठरूया. कोण कोण आहेत यामध्ये …….? अरे बापरे ! आता मात्र साधकांच्या नावांची सूची न संपणारीच आहे. चला तर प्रयत्न करून गुरुचरणी शांतीचा विसावा घेऊया.’
– सौ. प्रार्थना बुवा (पू. नकातेकाकांची मोठी मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.