श्राद्धपक्षाच्या निमित्ताने महत्त्वाची माहिती !
‘पितृपक्षात ‘श्राद्ध-पिंडदान’ हे पितृऋण फेडण्याचे एक माध्यम आहे. माता-पिता, तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी, यांसाठीचा संस्कार म्हणजेच ‘श्राद्ध.’ श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. असे असले, तरी हिंदुविरोधक त्यावर ‘श्राद्ध म्हणजे ब्राह्मणांची पोटे भरण्यासाठीची सोय, तसेच मृत्यूनंतर पितरांसाठी दान-विधी करण्यापेक्षा गरिबांची सेवा करा, त्यांना अन्नदान करा’, असे म्हणून टीका करतात. पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संकल्पना केवळ भारतातच नाही, तर विदेशांतही पितरांच्या शांतीसाठी विविध पारंपरिक कृती करण्यात येतात. त्यांत पूर्वजांच्या मुक्तीसाठीची शास्त्रोक्त संकल्पना नसली, तरी किमान ‘पूर्वजांविषयी कृतज्ञ रहायला हवे’, एवढी भावना तर निश्चितच असते. तसेच विदेशात अन्य पंथांत जन्मलेले अनेक पाश्चिमात्य त्यांच्या पूर्वजांना मुक्ती मिळावी, या हेतूने भारतात येऊन पिंडदान आणि तर्पण विधी करतात. त्यामुळे श्राद्धविधींवर टीका करणार्यांना उत्तर देता यावे, यासाठी माहिती देणारा लेख येथे देत आहोत.
संकलक : श्री. रमेश शिंदे
१. अन्य पंथांमध्ये पूर्वजांच्या आत्म्याला शांती
लाभावी, यासाठी केल्या जाणार्या पारंपरिक कृती !
१ अ. पारशी पंथ
पारशी बांधवांच्या ‘पतेती’ या मुख्य सणानिमित्त वर्षातील शेवटचे ९ दिवस हे पितरांच्या शांतीचे दिवस म्हणून साजरे केले जातात. दहाव्या दिवशी ‘पतेती’ हा सण साजरा केला जातो. या दिवसापासूनच पारशी नववर्षाला प्रारंभ होतो. हिंदु संस्कृतीत आत्मा ‘अमर’ मानला आहे, तीच धारणा पारशी समाजात दिसून येते. ‘अवेस्ता’मध्ये (पारशींचा धर्मग्रंथ) पितरांना ‘फ्रावशी’ म्हटले असून ‘दुष्काळाच्या वेळी ते स्वर्गातील सरोवरांतून त्यांच्या वंशजांसाठी पाणी आणतात’, असे मानले जाते. त्यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभावी, यासाठी ९ दिवस वेगवेगळे विधी केल्यानंतर शेवटच्या दिवशी ‘पतेती’ साजरी केली जाते. पारशी लोकांची मूळ देवता ‘अग्नि’ असल्याने ते अग्नीची पूजा करतात. यामध्ये जळत्या अग्नीत चंदनाची लाकडे टाकली जातात. ‘पतेती’ म्हणजे पापातून मुक्त होण्याचा दिवस ! ‘पापेती’ म्हणजे पापाचे नाश करणारा दिवस. याच शब्दाचा पुढे अपभ्रंश होऊन ‘पतेती’ असा झाल्याचे जाणकार सांगतात. साधारणपणे ऑगस्ट मासात हा कालावधी येतो.
१ आ. कॅथोलिक पंथ
अमेरिका, लॅटीन अमेरिका आणि युरोप यांतील अनेक देशांमध्ये नोव्हेंबर मासात पितरांना तृप्त करण्याची प्रथा आहे. हा पूर्वजांच्या आत्म्याशी संबंधित दिवस असला, तरी त्याला उत्सवाप्रमाणे साजरा करण्याची प्रथा आहे. ३१ ऑक्टोबरच्या सायंकाळपासून ते २ नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. यात ३१ ऑक्टोबरच्या सायंकाळी ‘हॅलोवीन यात्रा’ (यातील ‘हॅलो’ हा ‘होली’ म्हणजे पवित्रचा अपभ्रंश आहे.) काढली जाते. १ नोव्हेंबर या दिवशी ‘ऑल सेंट्स डे’ (सर्व संत दिन), तर २ नोव्हेंबर या दिवशी ‘ऑल सोल्स डे’ (सर्व आत्मा दिन) असतो. या काळाला ‘हॅलो मास’ म्हणजेच ‘पवित्र काळ’ असेही म्हटले जाते.
ख्रिस्ती पंथातील हा उत्सव असला, तरी त्याचे मूळ ख्रिस्तपूर्व काळातील मूर्तीपूजक रोमन संस्कृतीशी जोडलेले आहे. रोमन लोक मृतांच्या आत्म्यास संतुष्ट करण्यासाठी सार्वजनिक बलीदानांसह ‘लेमुरिया’ नावाचा सण साजरा करत असत. ते स्मशानात जाऊन तेथील मृतात्म्यांना केक आणि वाईन अर्पण करत असत. कालांतराने चर्चने या दिवसाला ‘ऑल सोल्स डे’ म्हणून स्वीकारून साजरा करणे प्रारंभ केले. हा उत्सव २ नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो.
१ आ १. ‘ऑल सेंट्स डे’
या दिवशी स्वर्गप्राप्ती झालेल्या ज्ञात-अज्ञात सर्व पूर्वजांचे, संतांचे स्मरण केले जाते. या दिवशी शासकीय सुटी घोषित केली जाते.
१ आ २. ‘ऑल सोल्स डे’
मरण पावलेल्या; परंतु स्वर्गप्राप्ती न झालेल्या ज्ञात-अज्ञात सर्व पूर्वजांचे पापक्षालन व्हावे, यासाठी या दिवशी प्रार्थना केली जाते.
काही देशांत पितरांच्या आगमनाच्या आनंदात तेथे ‘सोल केक’ नावाचा गोड पदार्थ बनवण्याची प्रथा आहे. तेथील लोकांचा विश्वास आहे की, तो पदार्थ खाल्ल्यामुळे परलोकामध्ये रहाणार्या मृतात्म्यांना सुख आणि शांती यांची प्राप्ती होते.
१ इ. बौद्ध पंथ
चीनच्या बुद्धीस्ट आणि ताओ परंपरेनुसार चिनी दिनदर्शिकेच्या ७ व्या मासातील १५ व्या दिवशी पूर्वजांच्या संदर्भात ‘घोस्ट फेस्टिव्हल’ (भूतांचा/मृतांचा उत्सव) किंवा ‘युलान फेस्टिव्हल’ साजरा केला जातो. ऑगस्ट ते सप्टेंबर मासाच्या कालावधीत हा दिवस येतो. या ७ व्या मासाला ‘घोस्ट मास’ (भूतांचा/मृतांचा मास) म्हणून ओळखले जाते. या काळात ‘स्वर्गातील, तसेच नरकातील पूर्वजांचे आत्मे भूतलावर येतात’, अशी तेथील मान्यता आहे. या काळात पूर्वजांना दुःखातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यात परंपरागत भोजन बनवणे (बहुतांश शाकाहारी), धूप जाळणे, ‘जॉस पेपर’ (बांबूच्या कागदापासून बनवलेले आत्म्याचे चलन/धन) जाळणे आदी केले जाते. या कागदापासून वस्त्र, सोन्याच्या दागिन्यांचे प्रतीक असणारे दागिने आदी बनवून जाळले जातात. या वेळी भोजन करतांना ‘पूर्वज जणूकाही तेथे प्रत्यक्ष उपस्थित आहेत’, अशा प्रकारे त्यांच्यासाठी आसन रिकामे ठेवून त्यांना भोजन वाढले जाते. रात्री कागदी नाव, तसेच दिवे पाण्यात सोडून पूर्वजांना दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. बौद्ध परंपरा असणार्या बहुतांश देशांत हा उत्सव थोड्याफार फरकाने साजरा केला जातो.
२. विदेशातील विविध देशांत पूर्वजांच्या आत्म्यासाठी केल्या जाणार्या पारंपरिक कृती
२ अ. युरोपातील देशांत पूर्वजांच्या शांतीसाठीच्या विविध कृती
२ अ १. बेल्जियम : २ नोव्हेंबर या दिवशी ‘ऑल सोल्स डे’च्या दिवशी सुटी नसल्याने आदल्या दिवशी म्हणजे ‘ऑल सेंट्स डे’च्या दिवशी दफनभूमीत जाऊन प्रार्थना करतात, तसेच मृताम्यांच्या कबरीवर दिवा लावला जातो.
२ अ २. पोर्तुगाल : २ नोव्हेंबर या दिवशी संपूर्ण परिवारासह दफनभूमीत जाऊन प्रार्थना केली जाते. तसेच सायंकाळी लहान मुले जमून प्रत्येक घराच्या प्रवेशद्वाराजवळ जाऊन थांबतात. तेथे त्यांना केक आदी मिष्टान्न दिले जाते.
२ अ ३. जर्मनी : जर्मनीमध्ये कबरींची रंगरंगोटी केली जाते, भूमीवर कोळसा पसरवून त्यावर लाल रंगाच्या बोरांनी चित्र काढले जाते आणि कबरींना फुले अन् कळ्या यांच्या माळांनी सजवले जाते. शेवटी सर्व जण मिळून प्रार्थना करतात.
२ अ ४. फ्रान्स : फ्रान्समध्ये चर्चच्या रात्रकालीन प्रार्थनेच्या शेवटी लोकांनी त्यांच्या पितरांच्या संदर्भात चर्चा करणे आवश्यक समजले जाते. त्यानंतर ते त्यांच्या घरी भोजनगृहामध्ये एक नवीन पांढरे वस्त्र पसरवतात आणि त्यावर सरबत, दही, पक्वान्न आदी ठेवून सजावट करतात. तसेच जवळच अग्नीपात्रामध्ये लाकडाचा एक मोठा बुंधा जळण्यासाठी ठेवतात. त्यानंतर लोक झोपायला निघून जातात. थोड्या वेळाने व्यावसायिक वादक वाद्ये वाजवून त्यांना झोपेतून जागे करतात आणि मृतात्म्यांच्या वतीने त्यांना आशीर्वाद देतात. त्या वेळी सजावटीतील सर्व खाद्यपदार्थ त्या वादकांच्या प्रमुखाला अर्पण केले जातात.
३. लॅटीन अमेरिकेतील देशांत साजरा करण्याची पद्धत
३ अ. लॅटीन अमेरिकेतील ब्राझिल, अर्जेंटिना, बोलिविया, चिली, इक्वाडोर, पेरू, उरुग्वे आदी देशांत २ नोव्हेंबर या दिवशी लोक दफनभूमीत जाऊन त्यांच्या पूर्वजांना, तसेच नातेवाइकांना फुले अर्पण करतात.
३ आ. मेक्सिको : या देशात याला ‘मृतांचा दिन’ म्हणून ओळखले जाते. याला स्थानिक भाषेत ‘अल् देओ दे लॉस मुर्तोस’ असे नाव आहे. हा मूळ उत्सव ख्रिस्तपूर्व ३००० वर्षांपूर्वीच्या काळातील ‘अॅझटेक’ या मूर्तीपूजकांचा असल्याचे मानले जाते. स्पेनने आक्रमण करून ही संस्कृती संपवली. सध्याच्या काळात तो मूळ मेक्सिकन, युरोपियन आणि स्पॅनिश संस्कृती यांच्या संमिश्र परंपरेतून साजरा केला जातो. यात १ नोव्हेंबर या दिवशी बालपणी मृत झालेल्यांसाठी, तर २ नोव्हेंबरला वयस्कर मृतांसाठी प्रार्थना केली जाते.
३ इ. ग्वाटेमाला : या दिवशी मांस आणि भाज्या यांपासून ‘फियांब्रे’ नावाचा पदार्थ करून तो मृतांच्या थडग्यांवर ठेवला जातो. तसेच या दिवशी पतंग उडवण्याचा विशेष उत्सव असतो. मृतात्म्यांशी संबंध जोडण्याचे प्रतीक म्हणून हे पतंग उडवले जातात.
४. आशिया खंडातील देशांमध्येही पितृपूजेची प्रथा !
आशिया खंडातील भारत वगळता अन्य देशांमध्येही पितृपूजेची ही प्रथा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात प्रचलित आहे. तसेच बहुतांश सर्व ठिकाणी पितरांसाठी आवाहन करतांना विशेष कृती केल्या जातात.
४ अ. चीन
चीनच्या ‘हान’ परंपरेनुसार गेल्या २ सहस्र ५०० वर्षांपासून ‘क्विंगमिंग’ किंवा ‘चिंग मिंग’ उत्सव पूर्वजांच्या स्मरणार्थ केला जातो. चीनच्या सूर्यपंचांगानुसार हा काळ ठरवला जातो. साधारणपणे ४ ते ६ एप्रिल या कालावधीत हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाच्या निमित्ताने पूर्वजांच्या थडग्याची स्वच्छता केली जाते. तेथे पूर्वजांसाठी पारंपरिक खाद्यपदार्थ ठेवणे, सुगंधी अगरबत्ती लावणे, तसेच ‘जॉस पेपर’ जाळणे, अशा कृती केल्या जातात. हा उत्सव चीन, तैवान, मलेशिया, हाँगकाँग, सिंगापूर, इंडोनेशिया या देशांतही साजरा केला जातो.
४ आ. जपान
जपानमध्ये याला ‘बॉन फेस्टिव्हल’ म्हणून ओळखले जाते. ‘बुद्धीस्ट-कन्फ्युशियस’ परंपरेत हा पूर्वजांच्या सन्मानाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. याविषयी मान्यता आहे की, या काळात पूर्वजांचे आत्मे मूळ घरातील पूजास्थानी येतात. त्यामुळे संपूर्ण परिवार मूळ घरी जमतो आणि पूर्वजांची थडगी स्वच्छ करून तेथे धूपबत्ती लावतात. प्रतिवर्षी ८ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या काळात हा उत्सव ३ दिवस साजरा केला जातो. हा महोत्सव जपानमध्ये ‘दीपोत्सवा’सारखा साजरा केला जातो. जपानी लोकांची मान्यता आहे की, जोपर्यंत ते पूर्वजांना हा प्रकाश दाखवणार नाहीत, तोपर्यंत पूर्वजांना त्यांच्या वंशजांच्या घरांचा मार्ग शोधण्यास अडचण येईल. त्यामुळे या काळात थडग्यांच्या चारही बाजूंनी उंच बांबू भूमीत रोवून त्यावर रंगबेरंगी कंदील लटकवतात आणि त्याखाली मेणबत्तींच्या प्रकाशात बसून लोक त्यांच्या पूर्वजांना आवाहन करतात.
हा उत्सव मूळ संस्कृत भाषेतील ‘उल्लंबन’ (उलटे टांगणे) या शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘ओबॉन’ किंवा ‘बॉन’ या नावाने आता ओळखला जातो. या काळात ‘बॉन ओदोरी’ हे नृत्य केले जाते. या नृत्यपरंपरेच्या संदर्भात कथा आहे की, गौतम बुद्धाचे एक शिष्य महामुद्गलायन (मोकुरेन) याने त्याच्या दिव्य दृष्टीने पाहिले की, त्याची मृत आई मुक्त न होता भुतांच्या तावडीत सापडली असून दुःखी आहे. तो अत्यंत चिंतित होऊन बुद्धाकडे जातो आणि ‘आईला यातून कसे मुक्त करू’, असा प्रश्न विचारतो. तेव्हा बुद्ध त्याला अनेक बौद्ध भिक्खूंना दान करण्यास सांगतो. मोकुरेन त्याप्रमाणे कृती करतो आणि त्याला त्याची आई त्या भुतांच्या तावडीतून मुक्त होतांना दिसते. त्यामुळे अतिशय आनंदित होऊन तो नृत्य करतो. तेव्हापासून या काळात ‘बॉन ओदोरी’ किंवा ‘बॉन डान्स’ करण्याची प्रथा चालू झाली.
४ इ. कंबोडिया
बौद्ध परंपरेतील ‘पचूम बेन’ (Pchum Ben)ला ‘पूर्वजांचा दिन’ (अँसेस्टर्स डे) म्हणून देखील ओळखले जाते. ख्मेर परंपरेतील दिनदर्शिकेच्या १० व्या मासातील १५ व्या दिवशी हा विधी केला जातो. (२३ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत हा विधी केला जातो.) या दिवशी सार्वजनिक सुटी घोषित केली जाते.
यात साधारणत: ७ पिढ्यांपर्यंतचे मृत नातेवाइक आणि पूर्वज यांचा सन्मान करतात. प्रतिवर्षी १५ दिवस कुटुंबे अन्न शिजवून ते त्यांच्या स्थानिक प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी आणतात. त्यानंतर भाताचे गोळे (पिंड) करून ते मोकळ्या शेतात, तसेच हवेत फेकले जातात.
प्रत्येक कुटुंब बौद्ध भिक्खूंना स्वतःकडील अन्न (सहसा शिजवलेला भात) दान करतात. भिक्खूंना अन्नदान करून मिळवलेले पुण्य सूक्ष्म जगतातील दिवंगत पूर्वजांकडे हस्तांतरित होते, असे समजले जाते. ते भिक्खूदेखील संपूर्ण रात्र जप करून आणि पितृपूजेचा एक कठीण विधी करून त्यात स्वतः सहभागी होतात.
४ ई. श्रीलंका
येथील बौद्ध परंपरेनुसार व्यक्ती मृत झाल्यावर ७ व्या दिवशी, ३ मासांनी आणि वर्षपूर्तीच्या दिवशी त्या मृतात्म्यांना अन्नदान केले जाते. याला ‘मतकदानय’ असे म्हटले जाते. ‘अन्नदान करून मिळवलेल्या पुण्याच्या तुलनेत त्या मृतात्म्यांना त्यांच्या लोकांत योग्य त्या वस्तू मिळतात’, असे समजतात. जे मृतात्मे त्यांच्या लोकांत पोहोचू शकत नाहीत, ते तरंगत राहून विविध प्रकारचे आजार, तसेच आपत्ती आणून जीवित व्यक्तींना त्रास देऊ शकतात, अशी त्या परिवाराची धारणा असते. त्यामुळे बौद्ध भिक्खूंना आमंत्रित करून त्या आत्म्यांपासून सुरक्षित रहाण्यासाठी विधी केले जातात.
४ उ. म्यानमार (ब्रह्मदेश)
येथे हा सण जपानच्या अगदी उलट पद्धतीने, म्हणजे आनंदाऐवजी शोक समारंभाच्या रूपात करतात. त्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत लोकांच्या घरी रडणे-ओरडणे सतत चालू असते. परंपरेनुसार या शोक समारंभामध्ये केवळ त्याच लोकांना सहभागी होण्याचा अधिकार असतो, ज्यांच्या कुटुंबात मागील ३ वर्षांमध्ये न्यूनतम एका व्यक्तीचा मृत्यू झालेला असतो. म्यानमारमध्ये हा सण ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या प्रारंभी साजरा केला जातो आणि तेथेही यानिमित्ताने विविध खाद्यपदार्थ अन् वस्त्रे यांचे दान केले जाते.
४ ऊ. फिलीपीन्स
या देशात स्पॅनिश लोकांच्या आक्रमणापूर्वी प्रचलित असणार्या प्राचीन फिलिपिनो ‘अॅनिटिजम’ या पंथानुसार आपल्याला दिसणार्या स्थूल जगताप्रमाणे एक सूक्ष्म जगतही समांतर कार्यरत आहे. त्यात जगातील प्रत्येक भागात आत्मे (अॅनिटो) असतात. अॅनिटो हे पूर्वजांचे आत्मे आहेत आणि ते जिवंत व्यक्तींच्या जीवनातील घटनांवर प्रभाव पाडतात. तेथील ‘पेगॅनिटो’ सोहळा हा एक प्रकारचा आध्यात्मिक सोहळा आहे, ज्यामध्ये पारंपरिक ‘शमन’ (मृतात्म्यांशी संवाद साधण्याची क्षमता असणारा व्यक्ती) आत्म्यांशी संभाषण करतो. १९ फेब्रुवारीच्या दिवशी हा उत्सव केला जातो.
स्पॅनिश आक्रमणानंतर ख्रिस्ती पंथ स्वीकारलेले नागरिक २ नोव्हेंबर या दिवशी परिवारजन दफनभूमीत जाऊन थडगे स्वच्छ आणि दुरुस्त करून त्यावर फुले वहातात, तसेच मेणबत्ती लावतात. या दिवशी लहान मुलांना मेणबत्ती वितळून पडलेले मेण गोळा करून त्या मेणाचे गोल गोळे करण्यास सांगितले जाते. यातून ‘जेथे अंत होतो, त्या अंतातूनच पुन्हा पुनर्निर्मिती होते’, हा संदेश दिला जातो.
विविध पंथांच्या, तसेच अमेरिका, युरोप आणि आशिया खंडातील अनेक देशांमधील उदाहरणांमधून प्रत्येक ठिकाणी पूर्वजांचे महत्त्व अधोरेखित होते. तसेच सर्व ठिकाणी हा कालावधी ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत असतो, हेही स्पष्ट होते. विशेष म्हणजे भारतातही पितृपक्षाचा आश्विन मास जवळपास (ऑगस्ट किंवा सप्टेंबर) याच काळात येतो.
यातून पूर्वजांसाठी शास्त्रोक्त पद्धतीने श्राद्ध केल्याविषयी हिंदु धर्मावरच टीका करणार्यांचा हिंदुद्वेष स्पष्ट होतो.
५. रशियाचे दिवंगत नेते बोरिस येल्तसिन यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी रशियन
साम्यवादी नेत्या साझी उमालातोवा यांनी भारतात येऊन तर्पण आणि पिंडदान करणे
५ अ. कट्टर विरोधक असणारे येल्तसिन हे उमालातोवा
यांच्या स्वप्नात येणे आणि ते असंतुष्ट असल्याची त्यांना जाणीव होणे
मार्च २०१० मध्ये रशियन साम्यवादी नेत्या साझी उमालातोवा यांनी रशियाचे माजी राष्ट्रपती बोरिस येल्तसिन यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी भारतात तर्पण आणि पिंडदान केले होते. उमालातोवा रशियाच्या माजी संसद सदस्य असून त्या ‘पार्टी ऑफ पीस अॅण्ड युनिटी’च्या संस्थापक अध्यक्षा राहिल्या आहेत. त्या साम्यवादी (कम्युनिस्ट) विचारसरणीशी संबंधित नेत्या होेत्या. उमालातोवा या गोर्बाचेव्ह आणि येल्तसिन यांच्या कट्टर विरोधक होत्या. त्यांचा सोव्हिएत संघाच्या विघटनाला तीव्र विरोध होता. सोव्हिएत संघाच्या विघटनावरून त्यांच्यात तीव्र मतभेदही झाले होते. उमालातोवा यांचे म्हणणे होते की, येल्तसिन पुनःपुन्हा त्यांच्या स्वप्नामध्ये येतात आणि त्यांच्याशी राजकीय सूत्रांवर वाद करतात. कधी ते अपराधी भावनेमुळे दु:खी वाटतात. असे वाटते की, येल्तसिन यांचा आत्मा असंतुष्ट आणि अशांत आहे.
५ आ. उमालातोवा यांच्याकडून येल्तसिन यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी यज्ञ अन् तर्पण करण्याची इच्छा प्रदर्शित
उमालातोवा यांनी त्यांच्या या स्वप्नाविषयी हरिद्वार येथील देव संस्कृति विश्वविद्यालयाच्या विदेश विभागाचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मिश्र यांच्याशी चर्चा केली आणि त्यांच्याकडे येल्तसिन यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी यज्ञ अन् तर्पण करण्याची इच्छा प्रदर्शित केली.
५ इ. उमालातोवा यांना श्राद्ध-तर्पण केल्यापासून पुष्कळ
सहजता जाणवणे आणि त्यांनी वैदिक धर्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेणे :
उमालातोवा यांच्या इच्छेनुरूप हरिद्वारमध्ये पंडित उदय मिश्र आणि पंडित शिवप्रसाद मिश्र यांच्या मार्गदर्शनानुसार हे विधी पूर्ण करण्यात आले. तेथे त्यांनी येल्तसिन यांच्यासाठी तर्पण केले. तसेच त्यांनी त्यांचे आई-वडील आणि अफगाणिस्तानमध्ये मारले गेलेले त्यांचे दोन भाऊ यांच्यासाठीही यज्ञ अन् पिंडदान केले, तसेच शांतीसाठी प्रार्थना केली. यानंतर उमालातोवा म्हणाल्या, ‘‘श्राद्ध-तर्पण केल्यापासून मला पुष्कळ सहजता जाणवत आहे. मला वाटते की, माझ्यावर काही ऋण होते, जे उतरले आहे.’’ त्यानंतर उमालातोवा भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञान यांमुळे इतक्या प्रभावित झाल्या की, त्यांनी वैदिक धर्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला.
६. भारतामध्ये शास्त्रांनुसार अमावास्या पितरांसाठी
‘सर्वाधिक प्रिय तिथी’ असण्यामागील कारण आणि त्या तिथीचे महत्त्व
या संदर्भात मस्त्यपुराणात एक कथा आहे. मस्त्यपुराणात अच्छोद सरोवर आणि अच्छोद नदीचा उल्लेख आहे. सरोवर आणि नदी काश्मीरमध्ये आहेत.
अच्छोदा नाम तेषां तु मानसी कन्यका नदी ॥
अच्छोदं नाम च सरः पितृभिर्निर्मितं पुरा ।
अच्छोदा तु तपश्चक्रे दिव्यं वर्षसहस्रकम् ॥
– मत्स्यपुराण, अध्याय १४, श्लोक २ आणि ३
अर्थ : भगवान मरिचीचे वंशज जेथे रहात असत, तेथेच अच्छोदा नामक नदी वहाते, जी पितृगणांची मानसकन्या आहे. प्राचीन काळी पितरांनी तेथे अच्छोद नावाचे एक सरोवर निर्माण केले होते. पूर्वी अच्छोदाने (अग्निष्वात्तची मानसपुत्री) १ सहस्र वर्षे घोर तपश्चर्या केली होती.
काश्मीर भारतातील प्राचीन राज्य आहे. मरिचिचा पुत्र कश्यप यांच्या नावाने पूर्वी काश्मीरचे नाव ‘कश्यपमर’ किंवा ‘कशेमर्र’ होते. मत्स्यपुराणामध्ये म्हटले आहे की, सोमपथ नावाच्या ठिकाणी मरिचिचा पुत्र अग्निष्वात्त नावाच्या देवतेचे पितृगण निवास करत होते. कालांतराने तेथेच अग्निष्वात्तची मानसपुत्री अच्छोदा हिने १ सहस्र वर्षे घोर तपस्या केली. तिच्या तपस्येने प्रसन्न होऊन देवतासम सुंदर आणि कांतीवान पितृगण वरदान देण्यासाठी अच्छोदाजवळ आले. सर्व पितर मनाला मोहून टाकणारे होते. त्यांचे सौंदर्य आणि रूपबळ यांनी प्रभावित होऊन अच्छोदा ‘अमावसु’ नावाच्या एका पितरावर आसक्त झाली. पितृगणाविषयी अशा प्रकारची इच्छा मनात बाळगणे, हा मोठा अपराध होता. तेव्हा अमावसु याने तत्काळ अच्छोदाच्या याचनेचा अस्वीकार करत तिला शाप दिला. ज्या पुण्यतिथीला अमावसु याने अच्छोदाच्या वासनेचा अस्वीकार केला होता, त्याच्या मर्यादाप्रियतेमुळे ती तिथी त्याच्या नावानेच ‘अमावास्या’ या नावाने प्रसिद्ध झाली आणि तेव्हापासून आमच्या पितरांची ती सर्वाधिक आवडती तिथी आहे.
७. विदेशात रहाणार्या भारतियांनी दूरभाषद्वारे
पुरोहितांकडून श्राद्ध आणि तर्पण विधी करणे अयोग्य !
गेल्या काही वर्षांपासून विदेशात रहाणारे भारतीय त्यांच्या पितरांचे तर्पण आणि पिंडदान हे विधी करण्यासाठी उज्जैन अन् गया येथील पुरोहितांच्या साहाय्याने दूरभाषद्वारे आगाऊ नोंद करून घेत आहेत. काही आचार्यांनी याला मान्यताही दिली आहे. ते दूरभाषवरून आगाऊ नोंद करतांनाच यजमानाकडून संकल्प करून घेतात. त्यानंतर यजमानांनी सांगितलेल्या नावाने पुरोहित तर्पण आणि पिंडदान करतात. आपद्धर्माच्या काही परिस्थितीमध्ये ब्राह्मणाकडून तर्पण करवून घेता येते; परंतु केवळ धनाच्या लोभापायी विदेशात राहून अशा प्रकारे दूरभाषद्वारे संकल्प करून श्राद्धाचा विधी करणे अयोग्य आहे. पितरांच्या मुक्तीसाठी व्यक्तीने स्वत: तीर्थस्थानी देवतांच्या साक्षीने आपल्या पितरांचे तर्पण आणि पिंडदान केले पाहिजे. यामुळे पितरांची तृप्ती होऊन त्यांच्या मुक्तीचा मार्ग मोकळा होतो.
हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते सिल्वेस्टर स्टॅलॉन त्यांच्या मृत मुलाच्या शांतीसाठी संपूर्ण कुुटुंबाला भारतात पाठवून हरिद्वारमध्ये त्याचे पिंडदान आणि श्राद्ध करवून घेतात अन् विदेशस्थित हिंदू आम्हाला यासाठी वेळ नसल्याचे सांगतात, हे अयोग्यच !
८. हिंदु धर्मामध्ये श्राद्धातील महत्त्वाचा घटक असलेल्या पवित्र दर्भाचे महत्त्व
महाभारतातील कथेनुसार गरुडदेव स्वर्गातून अमृत कलश घेऊन आले असता त्यांनी काही वेळासाठी तो कलश दर्भावर ठेवला होता. दर्भावर अमृत कलश ठेवल्याने दर्भाला पवित्र समजले जाते.
श्राद्धाच्या वेळी दर्भापासून बनवलेली अंगठी अनामिकेत धारण करण्याची परंपरा आहे. असे म्हणतात की, दर्भाच्या अग्रभागी ब्रह्मा, मध्यभागी विष्णु आणि मूळभागी भगवान शिव निवास करतात. श्राद्धकर्मात दर्भाची अंगठी धारण केल्याने ‘आम्ही पवित्र होऊन आमच्या पितरांच्या शांतीसाठी श्राद्धकर्म आणि पिंडदान केले’, असा त्याचा अर्थ आहे.
९. सुवर्णदानापेक्षा आपल्या पितरांसाठी पिंडदान
आणि अन्नदान करणे श्रेष्ठ असल्याचे कर्णाच्या उदाहणावरून लक्षात येणे
एका प्रचलित कथेनुसार कर्णाच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा स्वर्गामध्ये पोचला, तेव्हा त्याला भोजन करण्यासाठी पुष्कळ प्रमाणात सोने आणि आभूषणे देण्यात आली. हे पाहून कर्णाच्या आत्म्याला प्रश्न पडला. तेव्हा त्याने इंद्रदेवाला विचारले की, त्याला भोजनाच्या ऐवजी सोने का देण्यात आले ? तेव्हा इंद्राने कर्णाला सांगितले की, ‘तुम्ही जिवंत असतांना संपूर्ण जीवन सुवर्णदानच केले; परंतु कधीच तुमच्या पितरांना अन्नदान केले नाही.’ तेव्हा कर्णाने सांगितले की, ‘मला माझ्या पूर्वजांविषयी माहिती नव्हती. त्यामुळे मी त्यांना काही दान करू शकलो नाही.’ कर्णाला त्याची चूक सुधारण्याची संधी देण्यात आली आणि त्याला पितृपक्षाचे १६ दिवस पृथ्वीवर परत पाठवण्यात आले. तेथे त्याने त्याच्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांचे श्राद्ध केले आणि अन्नदान केले. तसेच त्यांच्यासाठी तर्पण केले.
या प्रचलित कथेतून आपण समजू शकतो की, सुवर्णदानापेक्षा आपल्या पितरांसाठी पिंडदान, अन्नदान आणि तर्पण करण्याचे महत्त्व अधिक आहे !
१०. धर्मशास्त्राचा अभ्यास न करता हिंदुविरोधकांनी
श्राद्धासारख्या महत्त्वाच्या विधींवर आरोप करणे अज्ञानमूलक !
हिंदुविरोधक श्राद्धाच्या संदर्भात ब्राह्मणांना लक्ष्य करून विविध आरोप करतात. श्राद्धादी विधी करवून घेण्याच्या संदर्भात ब्राह्मणांविषयी जो उल्लेख येतो, त्यासंबंधी जाणून घेतल्यास या आरोपांतील खोटेपणा उघड होतो .
उदाहरणार्थ श्राद्धकर्म करणार्या ब्राह्मणांच्या संदर्भात शास्त्रग्रंथात काही नियम सांगितले आहेत, उदा. ब्राह्मण वेदज्ञानी असायला हवेत. ते पतितपावन असावेत. ते शांतचित्त, नियम-धर्माने वागणारे, तप करणारे, धर्मशास्त्रावर श्रद्धा असणारे, पित्याचा आदर करणारे, आचारवान आणि अग्निहोत्री असावेत. जर अशा योग्यतेचे ब्राह्मण मिळाले नाहीत, तर तत्त्वज्ञानी योग्याला बोलवून श्राद्ध कर्म करावे. असे योगीही मिळाले नाहीत, तर एखाद्या वानप्रस्थीला अन्नदान करून श्राद्ध कर्म करावे. वानप्रस्थीही मिळाले नाहीत, तर मोक्षाची इच्छा ठेवणार्या, अर्थात् साधकवृत्ती असणार्या गृहस्थाला अन्नदान करावे.
जो ब्राह्मण ध्यान-पूजा, यज्ञ आदी नियमित कर्म करत नाही, त्याला बोलावून श्राद्धकर्म केल्याने पितरांना आसुरी योनी प्राप्त होते. एवढेच नाही, तर मद्यपी, वेश्यागमन करणारा, असत्य बोलणारा, माता-पिता, गुरु यांचा आदर न करणारा, चरित्रहीन, वेदांची निंदा करणारा, ईश्वरावर विश्वास न ठेवणारा, तसेच उपकार न मानणारा अशा ब्राह्मणांना श्राद्धकर्म करण्यास बोलावू नये, तसेच त्यांना दक्षिणाही देऊ नये. जे दान सदाचारी व्यक्तीला दिले जाते, त्यालाच ‘दान’ म्हटले जाते. दान देतांना कुटुंबाची उपेक्षा करून दान देऊ नये.
शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या या नियमांमुळे विरोधकांच्या आरोपांमधील खोटेपणा स्पष्ट होतो.
हिंदु धर्मातील सिद्धांत वैश्विक असल्याने त्यांना
पंथांचे बंधन नसणे आणि अन्य पंथियांनाही त्याचा लाभ होणे
हिंदु धर्मातील सिद्धांतांना चिरंतन आणि वैश्विक सिद्धांत समजले जाते. हिंदु असो वा अन्य कोणत्याही पंथाची व्यक्ती असो, जी धर्मशास्त्रांचे पालन करील, तिला त्याचा निश्चित लाभ होईल. ज्याप्रमाणे एखादे औषध घेणार्या व्यक्तीला, मग ती कोणताही पंथ, जात, धर्म यांची असो, तिला त्याचा लाभ होतो, त्याप्रमाणे हिंदु धर्मशास्त्रानुसार कृती केल्याने सर्वांनाच लाभ होतो.
सध्या विदेशातील प्रगत देशांत बहुतांश (६० ते ८० टक्के) लोक मानसिक आजाराने ग्रस्त आहेत. अमेरिकेतही पाच व्यक्तींपैकी एका व्यक्तीला मानसिक आजार आहे, तर त्या तुलनेत भारतासारख्या विकसनशील; परंतु आध्यात्मिक देशात त्यांचे प्रमाण अल्प का, याचा अभ्यास का केला जात नाही ? केवळ आधुनिक विज्ञान आणि भौतिक प्रगती यांच्या आधारे सर्व समस्यांवर उपाय मिळत नाही. याच कारणामुळे गया (बिहार) या तीर्थक्षेत्री अनेक विदेशी नागरिक श्राद्ध-पिंडदान, तर्पण आदी करण्यासाठी येतात.
हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते सिल्वेस्टर स्टॅलॉन यांनी
त्यांच्या मृत मुलाच्या शांतीसाठी हरिद्वार येथे पिंडदान आणि श्राद्ध करणे
हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते सिल्वेस्टर स्टॅलॉन यांना त्यांच्या मृत मुलाच्या आत्म्याची सतत जाणीव होत होती. त्यामुळे त्यांनी मुलाच्या आत्म्याला शांती मिळावी, यासाठी संपूर्ण कुटुंबाला भारतात पाठवून हरिद्वार येथे पिंडदान आणि श्राद्ध विधी करवून घेतले. या विधीनंतर एकातरी हिंदूने म्हटले का की, ते ख्रिस्ती असल्यामुळे त्यांचे पिंडदान होऊ शकत नाही ? म्हणजेच हिंदु धर्मातील श्राद्धविधींचा पंथाशी कोणताही संबंध नाही.