लोकमान्य टिळक

कर्मयोगी व्यक्तीमत्त्व : लोकमान्य टिळक

जसजसा काळ जातो, तसतसे अनेक नेते लुप्त होतात; पण लोकमान्य टिळकांनी जी शाश्वत मूल्ये मांडली. त्यांचे तेज अजून चमकत आहे. लोकमान्य टिळकांनी चाळीस वर्षे खपून या भूमीत लोकशाहीचा भक्कम पाया घातला. `गीतारहस्य’ लिहून कर्मयोग सांगितला. त्या वेळी असलेली युरोपियन साम्राज्यशाही नष्ट होणे, हे केवळ भारतासाठीच नव्हे, तर अखिल मानवजातीच्या हितासाठी आवश्यक आहे, असे विचार त्यांनी मांडले. `भारताचे स्वराज्य हा काही विशिष्ट जातीपुरता किंवा भारतापुरताच मर्यादित नाही, तर पृथ्वीच्या सहाही खंडांत पसरलेल्या ब्रिटीश साम्राज्याचा किंवा मानवजातीच्या हिताचा प्रश्न आहे’, असा दृष्टीकोन त्यांनी समाजमनावर ठसवला. लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित लेख येथे प्रसिद्ध करत आहोत.

 

तेल्या-तांबोळयांचेही पुढारी असलेले लोकमान्य टिळक

लोकमान्य टिळकांच्या मनात `लोक’ या शब्दाची व्याप्ती स्पष्ट होती. राष्ट्रीय सभा कोणाची, तर त्यात ब्राह्मण आहेत, क्षत्रिय आहेत, वैश्य आहेत, सर्व वर्ण व धर्म यांचे लोक आहेत. काबाडकष्ट करून निर्वाह करणार्‍यांची संख्या जास्त होते. त्यांच्यापर्यंत लोकमान्यांच्या नेतृत्वाचे आवाहन पोहोचले होते. त्यामुळे त्यांना तेल्या-तांबोळयांचे पुढारी म्हणून ओळखले जाई.

 

कर्मयोगाच्या बैठकीवर राष्ट्ररचना

पाश्चिमात्य राष्ट्रांची धाव सुखोपभोगाकडे आहे. त्याप्रमाणे या पूर्वेकडील लोकांची नाही. `आयुष्य सुखात घालवण्याच्या साधनांपेक्षा आयुष्याचे परिणामी साफल्य कसे होईल’, हा विचार डोळयांसमोर ठेवून कर्मयोगाच्या बैठकीवर त्यांनी राष्ट्ररचना केली आणि राष्ट्राचे रूप निर्दोष ठेवण्याचा प्रयत्न केला.

 

अष्टपैलू व्यक्तीमत्त्व असलेले संपादक

योगी अरविंद म्हणत, ‘टिळकांनी एकदा ध्येय निश्चित केले की, कठीण परिस्थितीला तोंड देत ध्येयप्राप्तीच्या मार्गात येणारे अडथळे दूर करून ते गाठायचे. त्यांची इच्छाशक्ती पोलादासारखी होती. टिळकांचे व्यक्तीमत्त्व अष्टपैलू होते. त्यातल्या त्यात `पत्रकार टिळक’ हा पैलू सर्वांत महत्त्वाचा होता.’ त्या काळी वृत्तपत्र व्यवसाय हा पैसा मिळवण्याचा धंदा नसे. लोकजागृती व अन्यायाविरुद्ध झगडण्याचे लोकशिक्षणाचे ते साधन असे. अशाही परिस्थितीत न्यायबुद्धी आणि लढावू वृत्ती ठेवून टिळकांनी वृत्तपत्र चालू ठेवले. टिळकांसारखा निर्भीड, बहुश्रुत, सत्यनिष्ठ, व्यासंगी व प्रतिभावान संपादक नव्हता. त्यांचे शब्द वाचकांच्या अंत:करणाचा ठाव घेत असत. गतीहीन व दुर्बळ समाजाला उद्देशून त्यांनी `केसरी’त लिहिले होते, ‘सरकार बलिष्ट असेल, तर ते तुमच्याच मदतीने बलिष्ट झाले आहे. तुमच्यातील भेद हेच सरकारचे कवच आहे. तुमचे अज्ञान हे त्याचे सामर्थ्य आहे.’

 

ब्रिटीश सरकारच्या खुनशी वृत्तीवर `केसरी’तून कोरडे

अशाच प्रकारे त्यांनी `राज्य करणे’ म्हणजे `सूड उगवणे नव्हे’ हा लेख लिहिला. त्यात त्यांनी `राज्य करणे’ म्हणजे जिथे, तिथे आपली तलवार काढून `मानवा, तू काय समजलास !’ तुला सुपारीच्या खांडासारखा खाऊन टाकीन, मारीन, जाळीन व पोळीन, अशा तर्‍हेने लोकांना एकसारखे भिववीत सुटणे नव्हे. राजाने आपल्या शक्‍तीचा उपयोग दुष्टांचे शासन आणि निरपराधी लोकांचे रक्षण करण्याकडेच केला पाहिजे. राज्य कितीही चांगले असले, तरीही काही खून, चोर्‍या व दरोडे व्हायचेच. त्यात सरकारचे अधिकारीही एखादे वेळेस सापडायचे; पण या सर्व गुन्ह्यांचा निकाल राज्यातील नेहमीच्या व्यवस्थेनेच झाला पाहिजे. ज्या राज्यात तसा बंदोबस्त ठेवता येत नाही, तो राज्य करण्यास नालायक समजला पाहिजे. खून झाला, `आण फलटण आणि जाळ सर्व गाव’, हा न्याय नव्हे, राजनीती नव्हे आणि मुत्सदीपणाही नव्हे. अशा तर्‍हेने पोलिसांच्या जुलमी कारभारावर आणि सरकारच्या खुनशी वृत्तीवरच त्यांनी `केसरी’तून कोरडे ओढले. या लेखाबद्दल त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला. या लेखाचे केवळ निमित्त होते. खरेतर टिळकांची वाढती लोकप्रियता व सरकारवर तुटून पडण्याची त्यांची निर्भयता या गोष्टी त्याला मूळ कारणीभूत होत्या.

 

हिंदु समाजाला संघटित करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू

राजकारणाबरोबरच टिळकांनी गणेशोत्सवासारख्या धार्मिक उत्सवाला प्राधान्य दिले. १८९३ साली हिंदू-मुसलमानांची मोठी दंगल झाली. या दंगलीची झळ सार्‍या देशालाच पोहोचली. दंगलीनंतर मुसलमान अधिकच वरचढ झाले. अशा दंगलींना तोंड देता यावे. यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला. त्याला ज्ञानसत्राचे स्वरूप देण्यात आले. इंग्रजी शिक्षणामुळे हिंदूंचे आचार नष्ट होत चालले होते. धर्माबद्दल लोकांमध्ये औदासिन्य उत्पन्न होऊ लागले होते. यावर तोडगा म्हणून गणेशोत्सवात कीर्तने, प्रवचने व व्याख्याने हे कार्यक्रम केल्यास जनतेत जागृती निर्माण होईल. विस्कळीत झालेल्या हिंदु समाजाला संघटित करता येईल. जनता जागृत झाली की, राजकीय चळवळीत पुढचे पाऊल टाकता येईल, हा उद्देश होता. उत्सवातून त्यांनी जनतेला स्वाभिमानाचे आणि देशभक्‍तीचे धडे दिले.

 

जगाला थक्क करणारा `गीतारहस्य’ हा ग्रंथरूपी चमत्कार

लोकमान्य टिळकांवरील ऐतिहासिक खटल्याचा निकाल लागल्यावर त्यांना गुप्‍तपणे मंडाले येथील तुरुंगात नेण्यात आले. तेथील जीवन म्हणजे सहा वर्षांचा दारूण एकांतवास. तेथे त्यांना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. तरी त्याची त्यांनी कोठेही वाच्यता केली नाही. त्यांना तेथे सर्वस्वी पंचमहाभूतांच्या दयेवरच अवलंबून रहावे लागे. अशा स्थितीत बौद्धिक काम करणे अशक्य होते. तरीही त्यांनी बौद्धिक परिश्रम घेऊन `गीतारहस्य’ हा जगाला थक्क करून सोडणारा ग्रंथरूपी चमत्कार केला.

 

देशाला स्वातंत्र्य देणे, हे प्रथम कर्तव्य मानणारे लोकमान्य टिळक

मंडाले येथील तुरुंगवास संपल्यावर आपल्या आयुष्याची संध्याकाळ धार्मिक आणि तात्त्विक ग्रंथ लिहिण्यात घालवावी,

असा सल्ला अनेकांनी टिळकांना दिला; परंतु “तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणे, हे मला आवडले असते;पण जर माझा देश स्वतंत्र असता तर ! पण माझा देश स्वतंत्र नाही. त्याला स्वातंत्र्य देणे, हे माझ्या आयुष्याचे पहिले कर्तव्य आहे. राजकारणी म्हणूनच मी शेवटचा श्‍वास घ्यावा, अशी माझी नियती दिसते”, असे त्यांचे मत होते. सहा वर्षांनंतर परतलेल्या लोकमान्यांनी जगाला विसरावे आणि जगाने त्यांना विसरावे, यासाठी नियतीने त्यांना एकांतवास दिला होता; पण वियोगाने लोकांचे प्रेम यत्किंचितही कमी झाले नव्हते. उर्वरित आयुष्य देशसेवेसाठीच घालवायचे, असा निर्धार त्यांनी केला.

 

लोकमान्य टिळक : समग्र क्रांती घडवणारा आदर्श लोकनेता

९ एप्रिल १९०१ च्या केसरीमधील `श्री शिवजयंत्युत्सव’ या अग्रलेखात लोकमान्य टिळक यांनी म्हटले होते, `आपल्या देशातील थोर पुरुषांचे उत्सव करण्यापासून काय फायदे आहेत, यासंबंधाने मागे आम्ही अनेक लेख लिहिले आहेत. त्या सर्वांची आज येथे पुनरावृत्ती करण्याची काही जरूर नाही. तथापी सूर्यावर आलेली अभ्रे जशी वायूस वारंवार दूर करावी लागतात, तद्वतच काही अंशी प्रत्येक सार्वजनिक विषयांची स्थिती असल्यामुळे काही गढूळ मतीच्या लोकांकडून मध्यंतरी जे आक्षेप निघतात, त्यातील चुका दाखवणे, हे उत्सवाच्या पुरस्कर्त्यांचे काम आहे.’ या अग्रलेखातून व नंतरच्या प्रत्येक शिवोत्सवातून लोकमान्यांनी शिवचरित्ररूपी सूर्यावर आलेले मळभ दूर केले ! हल्ली लोकमान्यांवरही `गढूळ मतीच्या लोकांकडून’ बेजबाबदारपणे टीका केली जात आहे. टिळकांच्या वरील विचारांची कास पकडून आज टिळकांच्या चरित्रातील काही प्रसंग पाहूया, तसेच त्यांच्या चरित्रावर धर्मद्वेष्टे आणू पहात असलेले मळभही दूर करूया !

 

पुत्रवियोगातही स्थितप्रज्ञ !

लोकमान्यांचे सारे जीवन ब्रिटिशांशी झगडण्यात गेले. अन्य क्रांतीकारकांप्रमाणे त्यांनीही त्यांचे सर्वस्व राष्ट्रासाठी दिले. हे करतांना त्यांनी स्वत:च्या घरादाराची व कुटुंबिय यांचीही चिंता केली नाही. १९०२-०३ साली पुण्यात प्लेगने थैमान घातले होते. एकाच आठवड्यात टिळकांचा चुलतभाऊ आणि भाचा प्लेगला बळी पडला. त्याच आठवड्यात लोकमान्यांचा महाविद्यालयात शिकणारा ज्येष्ठ पुत्र विश्‍वनाथही प्लेगला बळी पडला. एवढे होऊनही लोकमान्य विचलित झाले नाहीत. मुलाच्या मृत्यूच्याच दिवशी सांत्वन करायला गेलेले जावई वि.ग. केतकर यांना लोकमान्य म्हणाले, “अहो, गावची होळी पेटल्यावर प्रत्येक घरच्या गोवर्‍या जाव्या लागतात, त्याप्रमाणेच हे झाले !”

 

रात्र-रात्र राष्ट्राचीच चिंता !

१८८२ मध्ये कोल्हापूर प्रकरणात टिळक व आगरकर यांना चार महिन्यांचा एकत्र कारावास झाला. हा त्यांचा पहिलाच कारावास होता. कारावासाच्या त्या १०१ दिवसांत फक्‍त दोनदाच मोठ्या खटपटीने त्यांना चंद्रदर्शन झाले, इतकी ती कोठडी बंदिस्त होती. आठ-दहा दिवस सुरवंटांनी त्यांना फार बेजार केले. यातील अनेक रात्री त्या दोघांना जागून काढाव्या लागल्या. अशा स्थितीत रात्रभर या दोन मित्रांच्या बोलण्याचे विषय होते, सरकारी नोकरी न पत्करता देशसेवेत आयुष्य घालवण्याचा त्यांनी केलेला निश्चय, देशावरच्या इंग्रजी सत्तेमुळे झालेले हित व अहित आणि हिंदुस्थानची भावी स्थिती ! लोकनेत्याचे कारावासातीलही चिंतन कसे असावे, याचा हा आदर्शच नव्हे काय ?

लो. टिळकांना मधुमेह होता. अशा आजाराचे निमित्त शोधून एखाद्याला शिक्षेच्या ३० दिवसांपैकी २४ दिवस रुग्णालयात व्यतीत करू देण्याएवढे त्या वेळचे सरकार भ्रष्ट नव्हते. नंतरच्या कारावासात लोकमान्यांनी या मधुमेहावर स्वत:वर प्रयोग करून पथ्य शोधून काढले. हे पथ्य म्हणजे अजिबात चव नसणारे सातु (यव) हे धान्य ! मंडाले येथे त्यांनी हेच अन्न खाऊन सहा वर्षे काढली. तेथे बंदिवासात असतांनाच त्यांची पत्‍नी निवर्तली. पत्‍नीचे अंत्यदर्शनही त्यांना झाले नाही. ४० वर्षे जिच्याबरोबर संसार केला, तिचे अंत्यदर्शनही न होऊ शकणार्‍या अशा देशभक्‍तांमुळेच आम्ही आज स्वतंत्र आहोत !

 

देशाची स्थिती फार वाईट आहे म्हणून….

लो. टिळकांचा व्यासंग चतुरस्र व व्यापक होता. ज्योतिर्गणित, प्रागैतिहास, वेदविद्या, धर्मशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र हे विषय एरव्हीही त्यांना खूप आवडायचे. एकदा टिळकांना त्यांचा मित्र म्हणाला, “बळवंतराव, स्वराज्यात तुम्ही कोणते काम पत्कराल ? तुम्ही मुख्य दिवाण व्हाल कि परराष्ट्रमंत्री बनाल ?” टिळकांनी उत्तर दिले, “नाही हो, स्वराज्य स्थापन झाल्यावर एखाद्या स्वदेशी महाविद्यालयात गणिताच्या प्राध्यापकाचे काम पत्करीन व सार्वजनिक चळवळीतून अंग काढून घेईन. मला राजकारणाचा तिटकारा आहे. `डिफरेन्शिअल कॅल्क्युलस’वर एखादे पुस्तक लिहावे, असे मला अजून वाटते. देशाची स्थिती फार वाईट आहे आणि तुमच्यापैकी कोणी काही करीत नाही, म्हणून मला इकडे लक्ष घालावे लागत आहे.” देशाची स्थिती फारच वाईट आहे म्हणून साधकांना राजकारणात पडावे लागते, हे सार्वकालिक सत्यच लोकमान्यांनी सांगितले आहे !

 

कोणाच्या उत्तेजनापेक्षा आत्मबळानेच पुढे सरसावा !

लोकमान्यांच्या संबंधातील प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनातील एक प्रसंग ठाकरे यांच्याच शब्दांत वाचूया !

“टिळक यांची व माझी पहिली आणि शेवटची जी एकच भेट झाली, त्या वेळी रा. काका जोशी यांच्या समक्ष झालेले संभाषण मी आठवण म्हणून उद्धृत करीत आहे. सन १९१८ चा मार्च महिना. तारीख स्मरत नाही. चित्रशाळेत माझा `वक्‍तृत्वशास्त्र’ हा ग्रंथ छापण्याचे काम चालू होते. २६० पानावरील बूकर टी. वॉशिंग्टनबद्दलचा मजकूर घेऊन मी दादरहून आलो व तडक चित्रशाळेत गेलो. नेहमीप्रमाणे काका जोशी टेबलाजवळ उभे राहून काही पत्रे वाचीत होते व जवळच्या बाकावर एक वृद्ध गृहस्थ काही छापील प्रुफासारखे कागद वाचीत होते. बाजूला उपरण्यावर पगडी ठेवलेली होती. ते गृहस्थ वाचनात मग्न होते. माझ्या कामाबद्दल योग्य तो खुलासा व निरवानिरव दोन-तीन मिनिटांत होताच काका जोशी त्या गृहस्थाकडे वळून म्हणाले, “वक्‍तृत्वशास्त्राचे कर्ते तुम्हाला पहावयाचे होते ना, हे पाहा आमचे ठाकरे !” मी नमस्कार केला.

 

टिळक : वक्‍तृत्वशास्त्र तुम्हीच लिहिले काय ? फार छान प्रयत्‍न आहे.

मी : आपण कधी वाचले ? पुस्तक तर अजून बाहेर पडलेले नाही.

टिळक : पुस्तक बाहेर पडले नसले तरी त्याची प्रुफे बाहेर जा-ये करतातच. मी बहुतेक सर्व प्रकरणे वाचली आहेत. काकांनीच मला प्रूफे दाखविली. मला हे पुस्तक फार आवडले. प्रसिद्ध झाल्यावर मीच त्यावर अभिप्राय देणार आहे.

मी : आपला मी फार आभारी आहे.

टिळक : आपण कोण, देशस्थ का ?

मी : नाही. मी कायस्थ आहे.

टिळक : तरीच ही लेखणी इतका टणत्कार करते. कायस्थांची लेखणी अलीकडे फार झोपाळू झाली आहे. ती जागी होईल, तर देशकार्याचा वेग बराच वाढेल; पण ती जागीच होत नाही.

मी : वाङ्मयक्षेत्र काबीज करणार्‍या ब्राह्मणांकडून तिला योग्य ते उत्तेजन मिळत नाही, असे मला वाटते.

टिळक : अहो, ब्राह्मण म्हणजे भिक्षुक. भिक्षुकांच्या आश्रयाची क्षत्रियांनी अपेक्षा करावी, यालाच मी `झोप’ म्हणतो. हा मोह आहे. कायस्थ म्हणजे स्वावलंबन व आत्मतेज यांचा आदर्श पाहिजे. त्याने कोणाच्या उत्तेजनाची किंवा अभिप्रायाची पर्वा न करता आत्मबळानेच पुढे सरसावले पाहिजे. शिवाजीच्या वेळी तुमचे शेकडो कायस्थ लोक देशकार्यासाठी मी मी म्हणत पुढे सरसावले, ते काय भिक्षुक ब्राह्मणांच्या उत्तेजनाने ? नंतर काही इकडे-तिकडे भाषण होऊन मी टिळकांची रजा घेतली.

 

‘पुस्तकाची एक प्रत तयार करून माझ्याबरोबर द्या. आम्ही विलायतेला जात आहोत. बोटीत निवांतपणे वाचू’, असे मला सांगितल्यावरून कापडी बाइंडिंगच्या दोन `अँडव्हान्स कॉप्या’ तयार करून त्या त्यांजकडे पाठवून दिल्या. त्यावर टिळकांनी `कीर्तन’ मासिकात पत्राद्वारे दिलेला अभिप्राय सर्वश्रुतच आहे.” प्रबोधनकारांनी कथन केलेल्या प्रसंगावरून अनेक गोष्टी स्पष्ट होतात.

हल्लीच्या दलित आणि ललित लेखकांकडून त्यांच्या लेखनाला प्रसिद्धी न मिळण्याचे खापर ब्राह्मणांवर किंवा ब्राह्मण समीक्षकांवर फोडण्यात येते. अशा तर्‍हेच्या आक्षेपाला वा दृष्टीकोनाला योग्य असे उत्तर लोकमान्यांकडून मिळाले आहे !

 

स्वत:च्या पुत्राने जोडे तयार केले तरी चालतील !

लोकमान्यांचे चिरंजीव रामचंद्र यांनी लोकमान्यांची एक आठवण सांगितली आहे. एकदा सिंहगडावर असतांना लोकमान्य आपल्या मुलांना म्हणाले, “तुम्ही पाहिजे तो धंदा करा. तुम्ही जोडे तयार केले तरी मला वाईट वाटणार नाही की, माझी ब्राह्मणांची मुले चांभार निघाली म्हणून; परंतु त्याचबरोबर हेही लक्षात ठेवा की, जे काही कराल ते इतके उत्कृष्ट झाले पाहिजे की, त्या धंद्यासंबंधी कोणी विचार करू लागला, तर तुमचे नाव त्याच्या मनामध्ये पहिल्यांदा उभे राहिले पाहिजे. उदाहरणार्थ, जसे चहाची आठवण झाली की, `लिप्टन’ हे नाव डोळयापुढे उभे राहते.”

आजचे किती नेते किंवा राजकारणी आपल्या मुलाला `तू जोडे तयार केलेस तरी चालतील’ असे सांगतील ?

कोणत्याही राष्ट्रभक्‍ताचे स्मरण आनंददायी असते, तसेच त्याच्यावर करण्यात येणारी चिखलफेकही क्लेशकारक असते. अशा चिखलफेकीचाही समाचार घेणे आवश्यक आहे.

 

ब्राह्मणद्वेषाची परिसीमा

‘बामसेफ’तर्फे वरळी (मुंबई) येथे मे २००६ मध्ये ‘मूलनिवासी मेला’ आयोजित करण्यात आला होता. त्याच्या सांगता समारंभात केलेल्या भाषणात पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले, “सावरकर, आगरकर, रानडे व टिळक हे सर्व जण हिंदु धर्माचे मक्‍तेदार आहेत. त्यांचा आपण सन्मान करत आलो आहोत. कोण साला तो टिळक ? म्हणे ‘मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही.’ अरे, आमच्या गाडगे महाराजांना सांगितले असते, तर त्यांनी असा आडमुठेपणा न करता हातात झाडू घेऊन खुशाल ती शेंगांची टरफले काढली असती.” पुरुषोत्तम खेडेकर हे ‘मराठा सेवा संघा’चे संस्थापक आहेत. ११ जून २००६ च्या दैनिक ‘पुढारी’ मधील लेखात ते म्हणतात, “११ नोव्हेंबर १९१७ रोजी बाळ गंगाधर टिळकांनी अथनी येथील भाषणात तेली, माळी, कुणबी, धनगर, शिंपी, न्हावी, कोळी अशा जातींच्या लोकांना विधिमंडळात पाठवून काय तेल काढायचे, शेती करायची, नांगर टाकायचा कि केस भादरायचेत, असा प्रश्‍न उपस्थित करून तेथे फक्‍त ब्राह्मणच पाठवावेत, असा आग्रह धरला. जातीवरच मेरीट ठेवावे हा जाती अहंकार टिळकांचा. म्हणून त्यांना पेशवाई पाहिजे होती. टिळकांचा हा जाती अहंकारावरच मेरीट व सत्ता हा विचार भारतातच १५ ऑगस्ट १९४७ रोजी राजसत्तेत अमलात आणला गेला.” लोकमान्य अथनी येथील भाषणात काय बोलले असतील, हे खोटारड्या खेडेकरांनी सांगायला नको. टिळकांना तेल्या-तांबोळयांचे पुढारी (म्हणजे जनसामान्यांचे) असे ब्रिटिशच म्हणत असत. त्यामुळे अथनी येथील भाषणात लोकमान्यांच्या तोंडी खेडेकरांनी घातलेली विधाने कोणाच्या मेंदूतून निघाली आहेत, हे सहज लक्षात येते. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांनाच सरकारी नोकरी न करण्याचा निश्चय करून तो आजन्म पाळणार्‍या टिळकांना शासकीय नोकरी करणार्‍याने, शासनाच्या जागेत आपल्या संस्थेचा फलक रोवणार्‍याने `साला’ म्हणावे काय ? जनाची नाही, तर मनाचीही लाज सोडल्याचेच हे लक्षण आहे !

 

देशभक्‍तांना आवाहन !

‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ?’ आणि `राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे !’ या ‘केसरी’तील अग्रलेखांमुळे टिळकांवर राष्ट्रद्रोहाचा पहिला अभियोग होऊन त्यांना १८ महिन्यांची सक्‍तमजुरीची शिक्षा झाली. हे दोन्ही अग्रलेख इंग्रजांनी प्लेगचे रोगी तपासण्याच्या निमित्ताने पुण्यातील जनतेवर केलेल्या अत्याचारांच्या विरोधात लिहिले होते. या लेखांमुळे झालेल्या कारावासात लोकमान्यांचे अतोनात हाल झाले. तुरुंगातले अन्न म्हणजे जाडी, भरडी, कोरडी भाकरी व कोरडी चटणी. चटणीत कांदा, लसूण असल्याने टिळक तिला शिवत नसत. भाकरीचा केवळ वरचा पापुद्रा कुस्करून सकाळी व संध्याकाळी तळहाताएवढा भाकरीचा एक तुकडा खाऊन त्यांनी दोन महिने काढले. त्यांचे वजन २५-३० पौंड कमी होऊन ११० वर आले. त्यांचे ओठ काळे पडले व तोंडास कोरड पडल्यामुळे बोलताही येईना. लोकमान्यांचे हे हाल वाचून कोणाही सहृदय माणसाचे डोळे पाणावतील. प्लेगचे रोगी तपासण्याच्या निमित्ताने पुण्यात रँडने केलेले अत्याचार हे फक्‍त ब्राह्मणांवरच नव्हे, तर सर्व समाजावरच करण्यात आले होते. या अत्याचारांची व त्याला विरोध करण्यापायी लोकमान्यांनी भोगलेल्या कारावासाची आठवण कोणी खेडेकरांना करून देईल काय ?

खेडेकरांसारख्यांच्या अशा बेताल बडबडण्यावरून आणि संदर्भशून्य लेखनावरून एक मात्र लक्षात येते की, येत्या २-४ वर्षांत लोकमान्यांची प्रतिमा जास्तीतजास्त मलीन करण्याचा प्रयत्‍न होणार आहे. पुराव्याशिवाय बोलणार्‍या अशा धर्मद्वेष्ट्यांची बोलती बंद करण्याकरता टिळकप्रेमींनी म्हणजेच देशभक्‍तांनी आता मैदानात उतरायला हवे ! लोकमान्यांच्या १५० व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने तर हे काम मोठ्या हिरीरीने व्हायला हवे !!

 

लोकमान्य टिळक यांचा ब्राह्मण व ब्राह्मणेतर वादाकडे पहाण्याचा दृष्टिकोन

महाराष्ट्राला लाभलेल्या द्रष्ट्या पुरुषांपैकी एक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होय. त्यांचे स्मरण करता प्रथम स्मरते ती आजच्या काळाला अत्यावश्यक असलेली त्यांची परखड लेखणी. सामान्यपणे १८८८ नंतर लोकमान्यांनी `केसरी’मध्ये लिहायला सुरुवात केली. लोकमान्य टिळकांचा मूळ पिंड तत्त्ववेत्त्याचा होता. हिंदूंच्या सामाजिक दोषांमुळे निर्माण झालेल्या `ब्राह्मण-ब्राह्मणेतर’ वादामुळे आपल्या समाजाचे विघटन झाले आहे व त्यामुळे समाजाची शक्‍ति क्षीण झाली आहे. परिणामी शत्रूला आपल्यावर मात करणे सोपे झाले, हे त्यांनी ओळखले होते. आजही या वादाची विषवल्ली पोसली जात आहे. त्याकरिता हिंदु समाजाची शक्‍ति क्षीण करू पहाणार्‍या `ब्राह्मण व ब्राह्मणेतर’ या वादावरची लोकमान्यांची मते आपण पाहूया.

माँटेग्यू हे इंग्रज गृहस्थ हिंदुस्थानी नेत्यांशी स्वराज्यविषयक काही सुधारणांबाबत (माँटेग्यू- चेम्सफर्ड सुधारणा) चर्चा करण्यासाठी भारतात येणार होते. त्यांच्या बरोबरील चर्चेत जातीनिहाय मतदारसंघांचाही विचार होणार होता. त्याच्या पूर्वसंध्येला स्वराज्याच्या चळवळीस विरोध करणार्‍या काही ब्राह्मणेतरांनी उचल खाल्ली व ब्राह्मण जातीसंबंधाने आपल्या मनातील मळमळ बाहेर टाकण्यास सुरुवात केली. या प्रसंगावर लोकमान्यांनी १ सप्टेंबर १९१७ च्या केसरीमध्ये अग्रलेख लिहिला. हा लेख श्री. राम शेवाळकर यांनी संपादित केलेल्या `लोकमान्य टिळकांचे निबंध’ या शीर्षकाखालील पुस्तकात वाचावयास मिळेल.

काही तात्कालिक प्रसंग नजरेआड केले, तरी ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादासंबंधी लोकमान्यांची मते आजही हिंदु समाजाला राष्ट्रीय व धार्मिक दृष्टिकोनांतून मार्गदर्शक आहेत. ती मते या लेखात मांडण्याचा प्रयत्‍न केला आहे.

 

एकाने विद्या, तर दुसर्‍याने द्रव्य पसंत केले !

ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांना शिक्षणापासून वंचित ठेवले, हा मुद्दा खोडून काढतांना लोकमान्य टिळक आपल्या अग्रलेखात म्हणतात, `प्रत्येक जातीने आपापले हित दक्षतेने पहाणे व त्याकरिता योग्य ती चळवळ करणे जरूर असले, तरी अखिल हिंदी जनतेचा `ब्राह्मण व ब्राह्मणेतर’ असा स्थूल विभाग करून जे केवळ ब्राह्मणद्वेषाचे अवास्तविक स्वरूप या वादास देण्यात येत आहे, ते दुष्ट बुद्धीचे आहे. कायदे कौन्सिलातील सर्व जागा किंवा बहुतेक जागा आपणासच असाव्यात, असा हक्क ब्राह्मणांनी पूर्वी केव्हाही सांगितलेला नाही व पुढेही सांगू इच्छित नाहीत. त्यांच्या वाट्याला प्रत्यक्ष व्यवहारात लोकसंख्येच्या प्रमाणाबाहेर जागा पडत असल्या, तर ते त्यांच्या जातिमूलक आग्रहाचे फळ नसून त्यांच्या शिक्षणाचे फळ आहे, ही गोष्ट नाकबूल करणे म्हणजे निवळ आडरानांत शिरणे होय. ब्राह्मणांनी पूर्वी इतर जातींना शिक्षणाच्या बाबतीत मुद्दाम मागे टाकले किंवा दडपून ठेवले हा आरोप सर्वस्वी खोटा आहे. व्यावहारिक शिक्षण व त्याला लागणारी साक्षरता ही क्षत्रिय व वैश्य यांनाच काय, पण शूद्रांनाही खुली होती. पुराण, इतिहास वगैरे वाचण्याचा त्यांचा अधिकार कोणी कधीही काढून घेतला नव्हता. तात्पर्य, वेदाध्यापनाचा तेवढा अधिकार केवळ ब्राह्मणांसच असला, तरी ज्याला हल्ली आम्ही शिक्षण म्हणतो ते कोणत्याही वर्णाला सुलभ होते; म्हणून ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांना शिक्षणरहित ठेवले, या म्हणण्यास काहीच आधार नाही. असे असता शिक्षणाकडे इतर वर्णांनी द्यावे तितके लक्ष दिले नाही. याचे खरे कारण त्यांनी आपापल्या धंद्याकडे विशेष लक्ष दिले व शिक्षणाकडे दुर्लक्ष केले; कारण नुसत्या पुस्तकी कृति दिसण्याला त्या वेळी मान मुळीच नव्हता, हेच होय. आपापल्या धंद्याकडे लक्ष देण्यापासून इतर वर्णांचा आर्थिकदृष्ट्या फार फायदा झाला व ब्राह्मण भेटले की, ते निर्धन व ब्राह्मणेतर म्हटले की ते सधन असा जो सामान्य भेद दिसतो तो त्यामुळेच उत्पन्न झाला आहे. पण या स्थितीस अनुलक्षून `आम्हाला द्रव्योत्पादक धंदा इतर वर्णांनी करू दिला नाही’, असे जर ब्राह्मण म्हणतील, तर ती जशी त्यांची चूक होईल तशीच `आम्हांला ब्राह्मणांनी सुशिक्षित होऊ दिले नाही’, असे ब्राह्मणेतरांनी म्हणणे हीही चूकच आहे. एकाने द्रव्योत्पादक शिक्षण व द्रव्य पसंत केले. दुसर्‍याने पुस्तकी विद्या व निर्धनत्व पसंत केले, अशी केवळ आपखुषीने पूर्वी वाटणी झाली. याबद्दल परस्परदोष कोणासच लावता येणार नाही.’

 

पुस्तकी विद्या मिळवण्याच्या कामी ब्राह्मणेतर उदासीन

लोकमान्य निर्भीड संपादक होते. शिक्षणविषयक सवलती सर्व प्रजेला समान असतांना ब्राह्मणेतर शिक्षणाकडे वळायला नाखूष असतात, हे त्यांनी निर्भीडपणे दाखवून दिले आहे. या अग्रलेखात ते म्हणतात, `ब्राह्मणेतरांत सुशिक्षित मिळतील, तर सरकार त्यांनाच आधी नेमील; पण शिक्षणविषयक सर्व सवलती समान असताही केवळ धंद्याच्या आवडीने ब्राह्मणेतर हे अद्यापि पुस्तकी शिक्षणाकडे वळावे तितके वळत नाहीत, याला कोणी काय करावे !’

 

लोकसंख्येच्या प्रमाणात जागा हे न शोभणारे

समाजात ब्राह्मण-ब्राह्मणेतर हा द्वेषमूलक भेद करता नये, असे सांगतांना ते म्हणतात, `ब्राह्मण- ब्राह्मणेतर यांच्यातील शिक्षणविषयक असमता कालांतराने निघून जाईलच; पण तोपर्यंतही समाजात ब्राह्मण व ब्राह्मणेतर असा द्वेषमूलक भेद कोणी न करिता सुशिक्षित व अशिक्षित असाच भेद केला पाहिजे. `आम्ही अशिक्षित असलो, तरी केवळ लोकसंख्येच्या प्रमाणानेच आम्हाला सर्व अधिकारांच्या जागा मिळाल्या पाहिजेत’, हे ब्राह्मणेतरांचे म्हणणे जात्याभिमानाला शोभणारे असले, तरी व्यवहारबुद्धीला शोभणारे नाही.’ याच विषयावरील लोकमान्य टिळकांचा आणखी एक अग्रलेख १६ मार्च १९२० रोजी `केसरी’त प्रसिद्ध झाला आहे. त्यात ते म्हणतात, `ब्राह्मण-ब्राह्मणेतर हा वाद लोकहिताचा नाही, न्याय्य नाही, तसाच तो आत्मघातकीपणाचा आहे.’ या वादाच्या पुरस्कर्त्यांचे विचार एककल्ली व अशास्त्रीय असल्याचे सांगून ते लिहितात, `ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर हा भेद कसा व कोणत्या शहाण्याने काढला हे आम्हांस कळत नाही. केवळ तर्कशास्त्रदृष्ट्या पाहिले, तर असा भेद करिता येईल, नाही असे नाही. या मतभेदास किंवा वर्गीकरणांस `डिव्हीजन बाय डायकॉटमी’ म्हणजे ‘अस्तिनास्तिरुपी’ किंवा `तत्तदितररुपी’ विभाग असे म्हणतात. जगातील काहीतरी एखादी विविक्षित वस्तु मुख्य कल्पून तिचा एक वर्ग करावयाचा आणि तदितर सर्व वस्तू दुसर्‍या वर्गात ढकलून द्यावयाच्या, हे यांतील तत्त्व आहे. `झाडे’ आणि `बिनझाडे’ असे सर्व सृष्टीचे याप्रमाणे दोन विभाग करता येतील, किंवा `दगड’ आणि `बिनदगड’ अशा प्रकारेही जगातील सर्व वस्तूंचा विभाग कल्पिता येईल. `ब्राह्मण’ आणि `ब्राह्मणेतर’ हाही विभाग अशाच प्रकारचा आहे व केवळ तर्कशास्त्रदृष्टीने जरी तो संभवनीय असला, तरी व्यवहारदृष्ट्या जर त्यात काही राम नसेल, तर तो निरुपयोगी किंवा तर्कटपणाचा समजला जाईल. ब्राह्मणेतर शब्दांत मुसलमान, पारशी, ख्रिस्ती अगर इंग्रज लोकही येऊ शकतील आणि मग तर हा भेद उपहासास्पदच होईल. हिंदुस्थानातील हिंदु प्रजेचाच अशा रीतीने विभाग करावयाचा आहे, असे आपण समजू. पण प्रतिपक्षास याप्रमाणे सवलत देऊनही विचार केला, तरी हा विभाग निरर्थक अतएव असमंजसपणाचाच ठरतो. हा विभाग कशाकरिता करावयाचा ? ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांस बुडवून नुसत्या ब्राह्मण वर्गाची थोरवी स्थापन केली आहे. एवढे दाखवण्याकरिताच ना. स्पष्ट भाषेत बोलावयाचे म्हणजे ब्राह्मण लुच्चे, ब्राह्मण लबाड, त्यांनी ब्राह्मणेतरांना बुडवून त्यांस खालच्या दर्जाचे किंवा पायरीचे ठरवले आणि त्यांस अज्ञानांधकारात लोटून आपमतलबीपणाने आपली थोरवी स्थापन केली ! ब्राह्मणेतरांच्या वतीने म्हणून कित्येकांनी जी ओरड सध्या चालू केली आहे, त्यातील इंगित हेच होय. कदाचित हेच इंगित भिन्न भिन्न शब्दांनी व्यक्‍त केले जात असेल, पण मुद्यांत काही अंतर नाही. म्हणून या मुद्याचाच आता आपण विचार करू.’

 

ब्राह्मणेतर म्हणून काही विशिष्ट जात आहे काय ?

लोकमान्य पुढे लिहितात, `ब्राह्मणेतर म्हणजे ब्राह्मण भिन्न वर्गातील सर्व लोक. यांत सयाजीराव गायकवाड येतात, महाराज शिंदे सरकार येतात, रजपूत राजेरजवाडे येतात, भाट्ये व मारवाडी व्यापारी लोक येतात, शेतकरी येतात, माळी येतात, कुंभार येतात, कोष्टी येतात, अस्पृश्य येतात, अंत्यज येतात, तेली येतात, तांबोळी येतात, जैन येतात, लिंगायत येतात, जातिवंत क्षत्रिय मराठे येतात, कुणबी येतात, ठाकूर येतात, कोळी येतात, रामोशी येतात, बेरड येतात, सरदार येतात, मोठमोठे इनामदारही येतात, सारांश यांत शिवाजी महाराजांचे वंशज किंवा रजपूत घराण्याचे वंशज यापासून तो तहत् बेरड, महार, मांग वगैरे अंत्यजांपर्यंत सर्व जातींचा एकसमयावच्छेदे करून समावेश होतो. `ब्राह्मणेतर’ म्हणून काही एक विशिष्ट जात आहे काय ? ब्राह्मणेतर हा शब्द सापेक्ष आहे, म्हणजे समाजाच्या अठरापगड जातींतून ब्राह्मण जात तेवढी निराळी काढून त्या ब्राह्मण जातीचे दोषाविष्करण करण्यासाठी तदितर इतर सर्व जातींशी ब्राह्मण जातीचा विरोध कल्पिला आहे. पण हा भेद कृत्रिम आहे, नैसर्गिक नाही आणि तर्कशास्त्रदृष्ट्या संभवनीय असला तरी केवळ तर्कटीपणाचा आहे, असे थोड्या विचारांती कोणासही सहज कळून येईल. ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांना बुडवले म्हणजे काय, मुक्‍तीचे द्वार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र यांसच नव्हे, तर अंत्यजासही भगवद्‌गीतेने खुले करून ठेवलेले असून त्यांतील तत्कालीन शक्य तेवढी व्यावहारिक अंमलबजावणी भागवत धर्मात, वैष्णव धर्मात किंवा वारकरी संप्रदायात झालेली आहे, हे काही कोणास नव्याने सांगावयास नको. तसेच इतिहासदृष्ट्या विचार केला, तरीही हिंदुस्थानातील हिंदी राज्यकर्ते बहुतेक सर्व ब्राह्मणेतर आणि त्यातले बरेचसे क्षत्रियच होते. ब्राह्मणांनी काही धार्मिक हक्क आपल्या हाती ठेवले होते खरे; पण गीतेत गुणकर्मविभागाने जी वर्णव्यवस्था दिली आहे त्यांत `ईश्‍वरभाव’ ब्राह्मणधर्मात सांगितला आहे. राजसत्ता क्षत्रिय धर्मात सांगितलेली असून कृषि म्हणजे शेती आणि वाणिज्य म्हणजे व्यापार ही वैश्यांची कर्मे म्हटली आहेत. ब्राह्मणेतरांत क्षत्रिय आणि वैश्य येतात काय, तर्कशास्त्रदृष्ट्या जर हा विभाग केलेला असेल, तर आलेच पाहिजेत आणि जर आले पाहिजेत तर ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांस बुडवले या वाक्याचा असा अर्थ होतो की, क्षत्रिय व वैश्य या कोणासही डोके वर काढू न देता ब्राह्मणांनी राजसत्ता बळकावली, व्यापार बळकावला, शेती बळकावली व सर्वांना आपले दास करून सोडले; पण जरा विचार केला, तर हे म्हणणे सर्वस्वी चुकीचे किंबहुना अत्यंत निराधार आहे, असे कोणासही कळून येईल.’

 

इंग्रजांमुळे क्षत्रियांचे वैभव कमी झाले

जातींचे पर्यायाने हिंदूंचे वैभव कमी व्हायला राज्यकर्ते (इंग्रज) कारणीभूत आहेत, हे त्यांनी या अग्रलेखात पुढीलप्रमाणे सांगितले आहे, `पूर्वी क्वचित् प्रसंगी ब्राह्मण दिवाणांनी खालावत चाललेल्या राजकुलाचा हक्क आपल्या ताब्यात घेतला असेल; पण हिंदुस्थानच्या पाच-सहा हजार वर्षांच्या इतिहासात अशी दोन-चारच उदाहरणे सापडतील. `हतो वा प्राप्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् ।’ हा क्षत्रिय धर्म आहे. ब्राह्मण धर्म नव्हे आणि याच धर्माने प्रेरित होऊन क्षत्रियांनी राजवैभव व राजसत्ता उपभोगली आहे आणि सध्याही काही थोड्याफार कमी अंशाने ते उपभोगत आहेत. क्षत्रियांचे हे वैभव सध्याच्या काळी जर कमी झाले असले, तर ते ब्राह्मणांनी कमी केलेले नसून बलिष्ठ इंग्रज सरकारच्या साम्राज्याचा तो परिणाम आहे, हे प्रत्येकाने नीट लक्षात ठेवले पाहिजे. उदेपूरचे घराणे आज सार्वभौम का नाही, शिखांचे राज्य आज का नष्ट झाले किंवा श्रीशिवछत्रपतींच्या वंशजाकडे छत्रपतित्व न रहाता कोल्हापूरच्या राजांच्या नावांपुढे केवळ आडनावाप्रमाणे `छत्रपति’ हे कोरडे उपपद का जोडण्यात येते याचा विचार केला, तर हा काळाचा परिणाम आहे, ब्राह्मणांच्या कृत्यांचा नव्हे, असे सहज कळून येईल. पेशव्यांनी शाहू महाराजांकडून महाराष्ट्रातील राजसत्ता काढून आपल्या हातात घेतली, असा कित्येकांचा ब्राह्मणांवर आक्षेप आहे; पण दिल्ली दरबारकडून इंग्रजांनी अशाच प्रकारे बंगाल्यातील दिवाणी अंमलाची सनद मिळवली होती, ही गोष्ट ते का विसरतात, हे आम्हास समजत नाही. शिवाय पेशव्यांना दोष देतांना दुसरे असेही लक्षात ठेवले पाहिजे की, शिंदे, होळकर इत्यादिकांच्या शूर व कर्त्या पूर्वजांना पुढे आणण्यास पहिला बाजीराव पेशवाच कारण झाला. पण अखेर पेशवाईवर जेव्हा धाड आली तेव्हा `तदितर खग भेणे वेगळाले पळाले’ या नलोपाख्यानातील वचनाप्रमाणे स्थिति होऊन मोठमोठे मराठे आणि ब्राह्मण सरदारही पेशव्यांकडे दुर्लक्ष करून आपापला बचाव करते झाले, अशी साक्ष इतिहास देत आहे, पण या ऐतिहासिक उखाळयापाखाळया काढण्यात आज अर्थ काय ! आज असा `कठीण समय’ आला आहे की, सर्वांनी एकदिल होऊन पंचतंत्रातील पक्ष्याप्रमाणे स्वराज्यरूपी जाळयाला प्रतिबंधक होणार्‍या खुंट्या उपटून वर काढल्या पाहिजेत.’

 

जातिभेद गुणकर्मसिद्ध मानावा

आजच्या काळातही या लेखातील तात्त्विक विवेचन उपयोगात आणण्यासारखे आहे. लोकमान्य पुढे लिहितात. `सर्वांची एक जात पाहिजे, `वर्णव्यवस्था नको, वर्णव्यवस्था मोडली पाहिजे’, असे एकीकडे म्हणावयाचे आणि दुसरीकडे केवळ अस्सल मराठ्यांचे-ब्राह्मणेतरांचेसुद्धा नव्हे-जातवार प्रतिनिधी पाहिजेत, असा आग्रह धरावयाचा, यात कितपत सुसंगतता आहे, हे ज्यांचे तेच जाणोत ! ब्राह्मण-ब्राह्मणेतर इत्यादि कृत्रिम व आत्मघातकी भेद न करिता सर्वांनी शक्य तेवढे आपापले वैशिष्ट्य कायम राखून, अमक्याने तमक्यास बुडवले, अशी भावना न ठेवता प्रस्तुतच्या देशकार्यांत ते कार्य करण्यास सक्षम असे पुरुष निवडून काढून त्यांना पूर्ण साहाय्य केले पाहिजे, विनाकारण जातिद्वेष वाढवणे योग्य नव्हे, अशी त्यांस आमची प्रार्थना आहे. हे म्हणणे काही थोड्या लोकांस रुचणार नाही, हे आम्ही जाणून आहोत; पण तिकडे लक्ष न देता केवळ सर्व जातींच्या व लोकांच्या हिताकरिता म्हणून प्रांजल व निरभिमान बुद्धीने आम्ही ही सूचना करत आहो. रणांगणांत तलवार गाजवणारा कोणी असला, तरी ज्याप्रमाणे तो क्षत्रिय अगर मराठा समजावयाचा, तद्वतच हल्लीच्या कठीण प्रसंगी कामास आलेला किंवा येणारा पुरुष ब्राह्मणेतर असला तरी तो ब्राह्मणच समजला पाहिजे. जातिभेद जन्मसिद्ध न मानता गुण-कर्मसिद्ध मानण्यास येथेच सुरुवात होते व झाली पाहिजे.’ आजही काही वेळा राज्यकर्ते, क्षत्रियांच्या काही तथाकथित संघटना, हिंदुहिताचा विचार न शिवलेली प्रसारमाध्यमे, जाती ववर्ण यांच्यातील फरक समजून न घेतलेली मंडळी या वादाला अनुसरून काही वक्‍तव्ये करत असतात. या सर्वांनी लोकमान्य टिळकांचे हे दोन्ही अग्रलेख निर्मळ अंत:करणाने वाचले, तर त्यांनाही नवीन दिशा मिळून हा हिंदु समाज अधिक बलशाली होईल. लोकमान्य टिळकांना तीच खरी श्रद्धांजली ठरेल.

 

देशभक्‍तांची देवता – बोधकथा (बालमित्रांसाठी)

लोकमान्य टिळक एकदा काही कामानिमित्त आपल्या ओळखीच्या गृहस्थाच्या घरी गेले. त्या गृहस्थाची पत्‍नी आपल्या मुलाला म्हणाली, `गजू ! अरे देवपूजा करायचा तू कंटाळा का करतोस ?’ गजू हळूच आईला म्हणाला, `आई, तुला एक महत्वाची गोष्ट सांगतो. अग, लोकमान्य टिळक हे सुद्धा देवाला मानतात परंतु ते आपला वेळ देवपूजा करण्यासाठी घालवीत नाहीत.’ गजूची आई रागावली व म्हणाली, `मूर्ख मुला, तू आपली तुलना त्यांच्याशी कुठे करतोस ? ते कुठे अन् तू कुठे ? ‘ ‘अग आई, तुलना त्यांच्याशी करीत नाही. फक्‍त ते देवपूजेत वेळ घालवीत नाहीत असं म्हणतोय.’ गजू म्हणाला. ‘अरे, तुला नीट माहीत नसेल लोकमान्य पूजा करतात की नाही ते. उगाच काहीतरी बोलू नकोस !’ आई म्हणाली.

`मग आई, आज अनायसे ते आपल्या घरी आले आहेत. मी त्यांनाच विचारून खात्री करून घेतो,’ गजू आईला म्हणाला. गजू लोकमान्यांजवळ गेला आणि त्याने त्यांना विचारले, `काका ! आपण देवाची पूजा करता का ?` लोकमान्य म्हणाले, `हो ! अगदी रात्रंदिवस.’ `कोणत्या देवाची ?’ मुलाने विचारले. त्याबरोबर त्यांच्यासमोर त्या दिवाणखान्यात जो भारताचा नकाशा लावला होता त्याकडे बोट दाखवून लोकमान्य म्हणाले, `या माझ्या मातृभूमीची.’

 

लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यामागचे उद्देश

१. हिंदूंमध्ये राष्ट्ररक्षण व धर्म यांबद्दल जागृति आणणे

२. हिंदूंमध्ये संघटितपणाची भावना आणणे

३. अन्यायाविरुद्ध व राष्ट्रविघातक शक्‍तींविरुद्ध लढण्यास त्यांना प्रवृत्त करणे.

४. त्यांच्यातील सुप्‍त सामर्थ्याची जाणीव करून देणे.

 

लोकमान्य टिळकांचा द्रष्टेपणा !

वर्षानुवर्षे मुसलमानांच्या धार्मिक उत्सवांत हिंदूंनी मनापासून सहभागी होऊनही आणि सर्व प्रकारे त्यांच्याशी गुण्यागोविंदाने राहूनही हिंदूंची मानखंडना करण्याची एकही संधी मुसलमान सोडत नाहीत, हे लक्षात आल्यामुळे श्री गजाननाच्या आराधनेला आपण व्यापक राष्ट्रीय आणि सामाजिक अधिष्ठान देत आहोत, अशा शब्दांत लोकमान्यांनी केसरीतून लोकांशी सुसंवाद साधला होता. गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी मुसलमानांना चिडवण्याकरता सुरू केला नव्हता, तर हिंदु- मुसलमान वादात हिंदु समाज एकजीव कसा होईल आणि मुसलमानांना न भीता तो आपले हक्क कसे प्रस्थापित करील, हे शिकवण्याचा त्यांचा हेतू होता.

 

सार्वजनिक गणेशोत्सवाची पूर्वपीठिका व त्यामागील उद्देश

तत्कालीन समाजाची स्थिती

१८९४ साली प्रथम लोकमान्य टिळकांनी विंचूरकर वाड्यात स्वत: गणपति बसविला व सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात केली.

गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वी तत्कालीन समाजाबाबतचे लोकमान्य टिळकांचे निष्कर्ष पुढीलप्रमाणे होते.

१. हिंदु लोक धर्माबद्दल उदासीन आहेत.

२. हिंदु समाज विस्कळीत आहे.

३. पाश्चात्त्यांच्या श्रेष्ठत्वाने भारतीय जनता दिपून गेली आहे.

४. भारतीय जनतेमध्ये असलेले अभिजात सामर्थ्य परिस्थितीमुळे सुप्‍त आहे.

 

उद्देश

१. कार्यक्रमांद्वारे हिंदूंमध्ये जागृति करणे.

२. हिंदूंमधील सुप्‍त सामर्थ्याची जाणीव त्यांना करून देणे.

३. समाजातील दुजाभाव नष्ट करणे.

४. समाजात लोकांच्या अधिकारांचा व कर्तव्याचा प्रसार करणे.

५. चांगल्या धार्मिक कल्पनांचे पुनरुज्जीवन करणे.

६. आधुनिक युगात आवश्यक अशा चळवळी करणे.

७. जनतेतील अंगभूत व परंपरेने निर्माण होणार्‍या शक्‍तींना कार्यान्वित करणे.

 

टिळकांच्या वेळच्या गणेशोत्सवातील कार्यक्रम

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला त्या वेळी श्री गणेशाची पूजाअर्चा करण्याबरोबरच भजन, कीर्तन, पोवाडे, शास्त्रीय गायन यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येत असे. यामुळे भारतीय संस्कृतीच्या विविध अंगोपांगांचा परिचय युवा पिढीला होत असे.

समाजप्रबोधन व लोकशिक्षण यांसाठी तत्कालीन समस्यांवर विद्वानांची व्याख्याने ठेवण्यात येत असत, तसेच या समस्यांवर विविध मान्यवरांचे परिसंवादही घडवून आणण्यात येत असत.

उत्सवकाळात रात्री `मेळा’ हा कार्यक्रम आयोजित केला जात असे. या मेळयात अनेक लहान मुले-मुली व तरुण एकत्र येऊन राष्ट्रीय गीते वगैरे सादर करत असत. सामाजिक व धार्मिक सुधारण करण्याचे, तसेच राष्ट्रभावना प्रखर करण्याचे कार्य या मेळयातून केले जाई.

लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या या गणेशोत्सवाचे फलित म्हणजे तत्कालीन समाज धर्म व राष्ट्र यांबद्दल जागृत होऊ लागला. या उत्सवातून स्फूर्ति घेऊन कित्येकांनी स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली.

 

सार्वजनिक गणेशोत्सव जनजागृती मोहीम

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आवाहन – उत्सव त्याच्या मूळ उद्देशानुरूप साजरा करा !

१०७ वर्षांपूर्वी लोकमान्य टिळक यांनी समाजसंघटन, राष्ट्ररक्षण, पाश्चात्त्य संस्कृतीच्या आक्रमणाचा प्रतिकार व धर्मजागृति या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला; परंतु सध्या उत्सवाच्या दरम्यान निधिसंकलनातील जबरदस्ती, गणपतीच्या दर्शनासाठी येणार्‍या महिलांशी असभ्य वर्तन, मंडपात मद्यपान करणे जुगार खेळणे, मिरवणुकीत दारू पिऊन नाचणे, ध्वनिप्रदूषण अशा अनेक गैरप्रकारांमुळे उत्सवाचा मूळ उद्देश हरपला आहे. उत्सवातील शास्त्रविसंगत मूर्ति, सजावटीवर होणारा अनावश्यक खर्च, उत्सवातील रेकॉर्ड डान्स, लैंगिकता असणारे चित्रपट यांसारख्या कार्यक्रमांमुळे त्याचे पावित्र्यही नाहीसे झाले आहे. या संदर्भात जनप्रबोधन करण्यासाठी सनातनतर्फे गतवर्षीप्रमाणे यंदाही `सार्वजनिक गणेशोत्सव जनजागृती मोहीम’ राबवण्यात येणार आहे. आपणही या मोहिमेत सहभागी झाल्यास उत्सवाचा मूळ उद्देश साध्य करणे शक्य होईल. आपल्या कृतीस सनातनची नियतकालिके उचित प्रसिद्धि देतील.

 

गणेशोत्सवकाळात फटाके लावू नका !

गणेशोत्सवाच्या काळात सर्वत्र गणपति पहाण्यासाठी लोकांची गर्दी झालेली असते. अशा वेळी फटाके लावणे अगर फटाक्यांच्या पेटत्या माळा हवेत फेकणे यांमुळे लोकांना, विशेषत: लहान मुलांना इजा होण्याचा संभव असतो. तसेच ध्वनिप्रदूषणाचा त्रासही मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतो. ही बाब सर्व गणेशोत्सव मंडळांनी व नागरिकांनी लक्षात घेऊन फटाके लावण्याचे टाळावे. यातूनही गणेशोत्सवाचे पावित्र्य राखण्यात व तो शांततेत साजरा करण्यात आपण खारीचा वाटा उचलू शकतो.

 

गणेशोत्सव मंडळांनो, गणेशोत्सवाचे आर्थिक नियोजन असे करा !

निधीचा सर्वांत जास्त उपयोग अध्यात्मप्रसारासाठी करावा. अध्यात्मप्रसाराची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

१. परिसरातील देवळांची साफसफाई, डागडुजी, देखभाल व जीर्णोद्धार करणे,

२. नजीकची तीर्थक्षेत्रे, देवळे यांचे उत्सव साजरे करण्यास मदत करणे,

३. भारतीय संस्कृतीची जोपासना करणार्‍या व्यक्‍ती व संस्था यांना मदत करणे,

४. वेद आणि योगशास्त्र यांचा अभ्यास करणार्‍या, तसेच दुर्मिळ आध्यात्मिक ग्रंथांचे जतन व अभ्यास करणार्‍या संस्थांना मदत करणे,

५. अध्यात्मप्रसार करणार्‍या संस्थांना वस्तुरूपाने किंवा आर्थिक रूपाने मदत करणे, उदा. प्रवचनासाठी ध्वनियंत्रणा अल्पदरात वा विनामूल्य उपलब्ध करून देणे.हेसुद्धा जनप्रबोधनात्मक असावे, उदा. समाजाचे प्रबोधन करणारे पथनाट्य, स्फूर्तिप्रद गीते, पोवाडे, इत्यादि.

 

गणेश मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्यात अडचण का ?

कोणतीही जबरदस्ती न करता सनातन एवढे मोठे कार्य करू शकते, तर गणेश मंडळांना एक छोटासा गणेशोत्सव का साजरा करता येत नाही ? सनातन प्रेमाने जनतेचे मन जिंकते, तर काही मंडळांचे कार्यकर्ते वर्गणीसाठी जबरदस्ती करतात. त्यामुळेच सनातनला जमते ते गणेश मंडळांना जमत नाही.

 

आदर्श गणेशोत्सव मंडळांना आवाहन !

गणेशोत्सवाचे पावित्र्य सांभाळून तो सण साजरा करायचे उद्दिष्ट आपण आपल्यासमोर ठेवले असले, तरी तसे न करणारीही गणेशोत्सव मंडळे आहेत. हे लक्षात घेऊन केवळ आपल्या गणेशोत्सवाचा विचार न करता, जेथे गैरप्रकार होतात ते बंद करण्यासाठी मोहिमेत सहभागी व्हा. त्याने व्यापक विचार करायची सवय होऊन पुढे राष्ट्राचाही विचार करता येतो.

 

ब्राह्मणेतर शब्दांत मुसलमान, पारशी,
ख्रिस्ती अगर इंग्रज लोकही येऊ शकतील !

ब्राह्मण-ब्राह्मणेतर हा वाद लोकहिताचा नाही, न्याय्य नाही, तसाच तो आत्मघातकीपणाचा आहे. या वादाच्या पुरस्कर्त्यांचे विचार एककल्ली व अशास्त्रीय आहेत. ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर हा भेद कसा व कोणत्या शहाण्याने काढला, हे आम्हांस कळत नाही. केवळ तर्कशास्त्रदृष्ट्या पाहिले, तर असा भेद करिता येईल, नाही असे नाही. या मतभेदास किंवा

वर्गीकरणांस`डिव्हीजन बाय डायकॉटमी’ म्हणजे अस्तिनास्तिरूपी किंवा तत्तदितररूपी विभाग असे म्हणतात. जगातील काहीतरी एखादी विविक्षित वस्तू मुख्य कल्पून तिचा एक वर्ग करावयाचा आणि तदितर सर्व वस्तू दुसर्‍या वर्गात ढकलून द्यावयाच्या, हे यांतील तत्त्व आहे. `झाडे’ आणि `बिनझाडे’ असे सर्व सृष्टीचे दोन विभाग करता येतील, किंवा `दगड’ आणि `बिनदगड’ अशा प्रकारेही जगातील सर्व वस्तूंचा विभाग कल्पिता येईल. `ब्राह्मण’ आणि `ब्राह्मणेतर’ हाही विभाग अशाच प्रकारचा आहे व केवळ तर्कशास्त्रदृष्टीने जरी तो संभवनीय असला, तरी व्यवहारदृष्ट्या जर त्यात काही राम नसेल, तर तो निरुपयोगी किंवा तर्कटपणाचा समजला जाईल. ब्राह्मणेतर शब्दांत मुसलमान, पारशी, ख्रिस्ती अगर इंग्रज लोकही येऊ शकतील आणि मग तर हा भेद उपहासास्पदच होईल. हिंदुस्थानातील हिंदु प्रजेचाच अशा रीतीने विभाग करावयाचा आहे, असे आपण समजू; पण प्रतिपक्षास याप्रमाणे सवलत देऊनही विचार केला, तरी हा विभाग निरर्थक अतएव असमंजसपणाचाच ठरतो. – लोकमान्य टिळक, केसरी, १६ मार्च १९२०

 

जातीद्वेष वाढवणे योग्य नव्हे, हे म्हणणे काही लोकांस रुचणार नाही !

`सर्वांची एक जात पाहिजे, वर्णव्यवस्था नको, वर्णव्यवस्था मोडली पाहिजे’, असे एकीकडे म्हणावयाचे आणि दुसरीकडे केवळ अस्सल मराठ्यांचे-ब्राह्मणेतरांचे सुद्धा नव्हे-जातवार प्रतिनिधी पाहिजेत, असा आग्रह धरावयाचा यात कितपत सुसंगतता आहे, हे ज्यांचे तेच जाणोत !

ब्राह्मण-ब्राह्मणेतर इत्यादी कृत्रिम व आत्मघातकी भेद न करिता सर्वांनी शक्य तेवढे आपापले वैशिष्ट्य कायम राखून, अमक्याने तमक्यास बुडवले, अशी भावना न ठेवता प्रस्तुतच्या देशकार्यात ते कार्य करण्यास सक्षम असे पुरुष निवडून काढून त्यांना पूर्ण साहाय्य केले पाहिजे, विनाकारण जातीद्वेष वाढवणे योग्य नव्हे, अशी त्यांस आमची प्रार्थना आहे. हे म्हणणे काही थोड्या लोकांस रुचणार नाही, हे आम्ही जाणून आहोत; पण तिकडे लक्ष न देता केवळ सर्व जातींच्या व लोकांच्या हिताकरिता म्हणून प्रांजल व निरभिमान बुद्धीने आम्ही ही सूचना करत आहोत.

रणांगणांत तलवार गाजवणारा कोणी असला, तरी ज्याप्रमाणे तो क्षत्रिय अगर मराठा समजावयाचा तद्वतच हल्लीच्या कठीण प्रसंगी कामास आलेला किंवा येणारा पुरुष ब्राह्मणेतर असला, तरी तो ब्राह्मणच समजला पाहिजे. जातीभेद जन्मसिद्ध न मानता गुण-कर्मसिद्ध मानण्यास येथेच सुरुवात होते व झाली पाहिजे. – लोकमान्य टिळक, केसरी, १६ मार्च १९२०

 

लोकमान्यांना जातीअहंकारी म्हणणार्‍यांचा खोटेपणा !

आम्हांस आज इतकेच सांगावयाचे आहे की, जातवार निवडणुकीचे तत्त्व राष्ट्रीयदृष्ट्या आम्हास संमत नसले, तरी ज्या कोणास ही हौस पुरवून घ्यायची असेल, त्याने ती खुशाल पुरवून घ्यावी. आम्ही त्याच्या आड येऊ इच्छित नाही….. ब्राह्मण लोकांना मात्र या तत्त्वाचा अंगीकार करण्याची इच्छा नाही, आम्ही ब्राह्मण म्हणून आम्हाला इतके प्रतिनिधी द्या, असे ते कधीही मागणार नाहीत व तसे दिले, तरी घेणार नाहीत. मग सर्व कायदेकौन्सिलात एकही ब्राह्मण नाही आला, तरी चालेल. आहेत – आमचे इतर जातवाले आहेत – ते आम्हा ब्राह्मणांच्या हक्कांचे रक्षण करतील, अशी आमची पक्की खात्री आहे. – लोकमान्य टिळक, केसरी, १८ सप्टेंबर १९१७

लखनौ येथील राष्ट्रीय सभेच्या प्रसंगी मुसलमानांच्या महत्त्वाकांक्षेसंबंधाने लो. टिळकांनी जे उद्‌गार काढले आहेत, ते लक्षात घेतले, म्हणजे स्वराज्याच्या बाबतीत ब्राह्मणेतरांना किती प्रेमळपणाने वागविण्यास ते सिद्ध होते, हे दिसून येते. `कायदेकौन्सिलात उद्या एक वेळ सगळेच ब्राह्मणेतर आले, तरी चालतील; पण तेथे लोकनियुक्‍त हिंदु लोकांचे प्राबल्य असले पाहिजे. परक्यांचे किंवा सरकारनियुक्‍तांचे प्राबल्य नसले पाहिजे’, हे त्यांचे शब्द कोणीही विसरू नयेत !

 

काळानुसार साधनेचे महत्त्व

लोकमान्य टिळकांच्या जीवनात घडलेला प्रसंग

`शेगावनिवासी श्रीगजानन महाराज आणि लोकमान्य टिळक यांची अकोला येथे शके १८३० अक्षय्यतृतीया या दिवशी एका व्याख्यानाच्या प्रसंगी भेट झाली. आपल्या भाषणात नेहमीप्रमाणे लोकमान्य टिळकांनी इंग्रज सरकारवर टीका केली. त्याच भाषणात लोकमान्य टिळकांनी महाराजांकडे स्वातंत्र्य मिळावे यासाठी आशीर्वादपर मागणे मागितले. त्या वेळेस श्रीगजानन महाराजांनी एवढेच म्हटले, “अरे अशानेच पडतात । काढण्या दोन्ही दंडाप्रत ।।” महाराजांचे हे भाकीत त्याच साली खरे ठरले. सरकारने लोकमान्य टिळकांना अटक करून ब्रह्मदेशात मंडाले येथे तुरुंगात ठेवले. टिळकांच्या सुटकेसाठी त्यांचे स्नेही व नामांकित वकील श्री. दादासाहेब खापर्डे यांनी एक पारमार्थिक उपाय म्हणून आपल्या मित्राकरवी श्री. कोल्हटकर यांना महाराजांना साकडे घालण्यासाठी शेगाव येथे पाठविले. त्या वेळी महाराज तीन दिवसांपर्यंत झोपून होते. तरीही चिकाटी न सोडता कोल्हटकर महाराजांच्या जवळ बसून होते. चौथ्या दिवशी जेव्हा महाराज देहावर आले, तेव्हा ते कोल्हटकरांना एवढेच म्हणाले, “तुम्ही अलोट प्रयत्‍न केले । परी फळ न येईल त्या ।। शेवटी `ईश्‍वरेच्छा बलीयसी’ ह्या न्यायाने या प्रकरणाकडे पहा व मी ही भाकरी प्रसाद म्हणून देतो ती टिळकास खाऊ घाला. यायोगे तो मोठी आध्यात्मिक कामगिरी करील आणि जगद्‌गुरूप्रमाणे लोक त्यांना मान देतील.” आणि झालेही तसेच. लोकमान्य टिळकांच्या हातून मंडालेच्या तुरुंगात `गीतारहस्य’ या ग्रंथाचे लेखन झाले. शेवटी श्रीदासगणूमहाराज म्हणतात,

स्वातंत्र्य हे साचार । येते-जाते वरचेवर ।

यात नाही फारसे सार । तो व्यवहार लौकिकी ।। १०६ ।। – श्रीगजानन महाराज पोथी, अध्याय १५

या सर्व प्रकरणाकडे आपण बारकाईने पाहिल्यास असे लक्षात येते की, स्वातंत्र्याच्या कामासाठी लोकमान्य टिळकांना पारमार्थिक मदत मिळाली नाही, तर आध्यात्मिक कारणासाठी मदत मिळाली.

धर्मप्रेमी आणि धर्मरक्षक लोकमान्य टिळक  !

श्री. संजय मुळ्ये

पुण्यातील प्लेगचे निवारण होण्यासाठी ग्रामदेवतेला साकडे घालणारे लोकमान्य !

वर्ष १८९६ – ९७ मध्ये पुण्यात प्लेगच्या साथीमुळे कहर उडाला होता. तेव्हा प्रयत्नवादाची कास धरून टिळकांनी पुण्याच्या नागरिकांसाठी सर्व लौकिक उपाय (उदा. नागरिकांना प्लेगसंबंधी माहिती व्हावी, या हेतूने त्यांनी तज्ञ डॉक्टरांकडून दोन लेख लिहून घेतले आणि ते केसरीत प्रसिद्ध केले; टिळकांनी खटपट करून हिंदूंसाठी एक वेगळे रुग्णालयही स्थापन केले.) तर केलेच; पण त्यासह दैवी उपायही केले. त्यांनी भाऊसाहेब अर्थात् लोहदेही गोखले यांना सांगितले, हे संकट आधिदैविक आहे. ते निवारण्यासाठी ग्रामदेवता श्री जोगेश्‍वरी हिला अभिषेक करायला हवा. त्या अभिषेकाची सर्व व्यवस्था करा आणि लागेल तो व्यय (खर्च) मागून घ्या. गावावर आलेल्या संकटापासून रक्षण करण्याचे कार्य ग्रामदेवता करते, असे धर्मशास्त्र सांगते. त्यानुसार प्रत्यक्ष कृती करणारे अन् त्यासाठी होणारा व्यय स्वतःच्या खिशातून देणारे टिळक लोकमान्य झाले नसते, तरच नवल !

लोकमान्यांची ईश्‍वरावरील श्रद्धा !

वर्ष १९०७ मध्ये सुुरत येथे काँगे्रसचे अधिवेशन होते. काँग्रेसमध्ये त्या वेळी जहाल आणि मवाळ असे दोन गट होते. जहाल गटाचे नेतृत्व टिळक करत होते. अधिवेशनाच्या काळात टिळकांचा एक विश्‍वासू सहकारी रात्री २ वाजता येऊन टिळकांना म्हणाला, विरोधी पक्षाने उद्या तुम्हाला मारण्याचा बेत केला आहे. तेव्हा काय उपाययोजना करायची ? टिळक चटकन् म्हणाले, मारू देत, खुशाल मारू देत. मी करीत आहे ते सत्कार्य आहे. मला कोण मारणार ? आमचे रक्षण करण्यास ईश्‍वर समर्थ आहे !

वर्ष १९०८ मध्ये इंग्रज शासनाने टिळकांना अटक केली, तेव्हा अनेकांचा धीर खचला. आता काय करावे, असे टिळकांना विचारल्यावर त्यांनी कळवले, मी चालवलेला मार्ग पुढे चालू ठेवा, त्यात चूक होऊ देऊ नका, तसेच सर्वांस सद्बुद्धी देण्यासाठी श्री ओंकारेश्‍वरास रुद्राभिषेक करा. त्यानुसार टिळकांवरील अभियोग (खटला) मुंबईला चालू असेपर्यंत पुण्याला श्री ओंकारेश्‍वरावर रुद्राभिषेक करून श्रींचा तीर्थप्रसाद आणि अंगारा प्रतिदिन कृ.मो. फाटक हे अधिवक्ता (वकील) मुंबईस घेऊन जात आणि लोकमान्यही त्याचा भावपूर्ण स्वीकार करीत.

भगवंताचे अधिष्ठान म्हणजे काय ?

टिळक शिष्टमंडळासह इंग्लंडला जायला निघाले, तेव्हाचा एक प्रसंग. त्या वेळी टिळकांना पुण्यातील ब्रह्मवृंदाच्या वतीने पानसुपारी (निरोप देण्याचा कार्यक्रम) झाली. त्या कार्यक्रमात टिळक म्हणाले, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे । परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे ।, असे समर्थांनी म्हटले आहे. मात्र कित्येकांना अशी शंका आहे की, आमच्या स्वराज्याच्या चळवळीला भगवंताचे अधिष्ठान नाही; मात्र भगवंताचे अधिष्ठान म्हणजे काय, याचा विचार फारसा कोणी करीत नाही. कोणतीही एखादी चळवळ चालू केली आणि त्या चळवळीच्या कचेरीत एखादी मूर्ती बसवली आणि तिच्यापुढे नित्य धूप जाळला, म्हणजे का तिथे भगवंताचे अधिष्ठान येते ?

जगात भगवंताचे कार्य म्हणजे साधूंचे रक्षण, दुष्टांचे निर्दालन आणि धर्माची संस्थापना ! ही कार्ये जिथे चालत असतील, तिथे भगवंताचे अधिष्ठान आपोआपच येते. आमची स्वराज्याची चळवळ ही परकीय जुलमातून हिंदुस्थानला सोडवण्यासाठी आणि सनातन धर्माचे रक्षण करण्यासाठी आहे. यासाठी ही कार्ये जिथे जिथे चालू असतील, तिथे तिथे भगवंताचे अधिष्ठान आहेच आहे !

देवता आणि संत यांचा मान राखणारे लोकमान्य !

वर्ष १९१७ मध्ये दौर्‍यावर असतांना, शिर्डीला श्री साईबाबांचे दर्शन घेतल्यावर लोकमान्य कोपरगावी गेले. तिथे त्यांचा सत्कार झाला. त्यांच्यासाठी बैठकीवर दत्ताचा मखमलीचा गालिचा अंथरला होता. सत्कार समितीचे प्रमुख लोकमान्यांना त्या गालिच्यावर बसायची विनंती करीत होते; पण तो गालिचा देवाचा आहे हे ओळखून, त्यांनी त्यास प्रथम नमस्कार केला आणि आपल्या पायाचा त्याला स्पर्श न होऊ देता तो स्वतः उचलून बाजूला ठेवला नि मग ते बैठकीवर बसले.

वर्ष १९०८ च्या मे मासात, शिवजयंती उत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्याने होती. अकोल्याला टिळकांच्या व्याख्यानाला शेगावनिवासी श्री गजानन महाराज हे आपणहून आले. त्या दिवशीच्या कार्यक्रमाचे दादासाहेब खापर्डे हे नियोजित अध्यक्ष होते; पण महाराज आलेले पाहून स्वतः टिळकांनीच म्हटले, आपल्या भाग्याने आज श्री गजानन महाराज येथे आले आहेत. तेव्हा अशा प्रसंगी अध्यक्षपद भूषवायला त्यांच्याहून अधिक पात्र कोण असणार ? तेव्हा महाराजांनीच अध्यक्षस्थान स्वीकारावे, अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. आश्‍चर्य असे की, महाराजांनी अध्यक्षस्थान स्वीकारलेही. आज किती राजकारणी संतांना असा सन्मान देतात ?

भावी पिढीला नीटपणे धर्मशिक्षण देऊन
धर्माचा र्‍हास टाळण्यास सांगणारे लोकमान्य !

गीतारहस्य हा ग्रंथ प्रसिद्ध झाल्यावर, एकदा एक विद्वान शास्त्री लोकमान्यांजवळ ग्रंथवाचन करीत होते. त्या वेळी य.ना. आठवले टिळकांकडे काही शंका विचारायला आले. टिळक म्हणाले, वैदिक कर्मकांडाविषयीच्या तुमच्या शंका शास्त्रीबुवा सोडवतील. त्यांना शंका विचारा. मात्र ते शास्त्रीबुवा आठवले यांचे नीट समाधान करू शकले नाहीत. ते पाहून टिळक शास्त्रीबुवांजवळ जाऊन म्हणाले, हे पहा शास्त्रीबुवा, अलीकडे ब्राह्मणांची शेकडा ५० हून अधिक मुले संध्या-वैश्‍वदेव इत्यादी ब्रह्मकर्म करीत नाहीत, याचे खरे कारण तुम्ही आहात. त्या कर्माचे महत्त्व पालक किंवा गुरुजन जर त्यांना नीट समजावत नसतील, तर ती धर्मकर्मे न करण्यासाठी मुलांना दोष का द्यावा ? संध्या केल्याने सूर्योपासना घडून तेजाची प्राप्ती होते, जलदेवतांपासून औषधींची प्राप्ती होते, दिक्पालांपासून अभय लाभते आणि गायत्री तर, सर्व मंत्रांची माता असल्याने गायत्रीच्या जपाने सर्व सुख-समृद्धी नि आयुरारोग्यही लाभते. अशा रितीने तुम्हा धर्मरक्षकांनी आणि पालकांनी जर लहानपणीच मुलांना समजुतीने शिकवले, तर मला विश्‍वास आहे की, सध्याच्या धर्मग्लानीच्या काळातसुद्धा ९० टक्के मुले अगदी हौसेने ब्रह्मकर्म करू लागतील; पण अशा होतकरूंच्या शंका आपण जर वाटाण्याच्या अक्षता लावून दूर करू लागलो, तर ते निरुत्साही होऊन वैदिक आचारापासून अधिक दुरावतील अन् त्या धर्मर्‍हासाला पर्यायाने आपणच कारणीभूत होऊ.

धार्मिक कृत्ये व्यवस्थित नि यथासांग करण्यास सांगणारे लोकमान्य !

टिळकांच्या मुलाच्या विवाहाच्या वेळचा प्रसंग. विवाहाच्या वेळी मातृकापूजन असते. त्यात २७ देवता असतात. टिळकांचे कुलोपाध्याय रामभाऊ ठकार यांनी टिळकांचा वेळ वाचावा नि त्यांना त्या वयात विशेष श्रम होऊ नयेत म्हणून गंध-दुर्वांनी सर्व देवतांवर एकदम प्रोक्षण करावे, असे सुचवले. टिळकांना तसे करणे आवडले नाही. ते ठकार यांना म्हणाले, कोणतेही कृत्य पद्धतशीर आणि यथासांगच केले पाहिजे. आपण व्यवहारात थोडे का श्रम घेतो ? मग इथेच हलगर्जीपणा का ? असे म्हणून त्यांनी त्या २७ देवतांना स्वतंत्रपणे गंध लावले आणि फूल वाहिले. तसेच ग्रहयज्ञातील ५१ देवतांनाही स्वतंत्रपणे गंध लावून आणि फूल वाहून त्यांचे पूजन केले.

या विवाह सोहळ्यात देवक उठवतांनासुद्धा असेच झाले. उपाध्यायांनी सर्वसामान्य पद्धतीप्रमाणे केवळ नंदिन्यादी मंडप-देवतांचीच पूजा करवून विसर्जन करवले. मातृकांचे पूजन आणि विसर्जन करवलेच नाही. तेव्हा लगेच टिळकांनी विचारले, काहो, या मातृकांचे पूजन नि विसर्जन का केले नाही ? उपाध्याय म्हणाले, तशी पद्धत नाही. त्यावर टिळक म्हणाले, विसर्जन न करणे चूक आहे. नांदीश्राद्धे कृते पश्‍चात् यावत् मातृ-विसर्जनम् । असे श्‍लोकात आहे ना ? मग तुम्हीच सांगा विसर्जन आवश्यक आहे कि नाही ?  अशा रितीने जे धर्मकृत्य करायचे ते समजून, व्यवस्थित नि यथासांग करावे, असा टिळकांचा आग्रह असे.

गोरक्षकांना आधार देणारे लोकमान्य !

गोरक्षणाच्या चळवळीसंबंधाने टिळकांनी एकदा सडेतोडपणे विचारले हिंदू गोरक्षण करतात म्हणून मुसलमान गोमांसभक्षणाच्या अभावी उपासमारीने तडफडून मरत आहेत, अशी परिस्थिती कुठेही आढळत नाही. मग गोरक्षणाच्या चळवळीमुळे मुसलमानांची माथी कशासाठी भडकतात ? आता तर काही नेत्यांचीही माथी भडकून ते गोरक्षकांना अटकाव करण्याची भाषा बोलू लागले आहेत. आज टिळक असते, तर पुन्हा एकदा सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? असे त्यांनी विचारले असते !

अपेक्षारहित राष्ट्रसाधना करणारे लोकमान्य !

एकदा लोकमान्यांना बाबामहाराजांचे कारभारी य.ग. कुलकर्णी यांनी विचारले, आपण (म्हणजे लोकमान्य टिळक) काही उपासना तर करीत नाही, तरी आपली चित्तशुद्धी तर झालेली आहे. ती कशामुळे झाली ? टिळकांनी उत्तर दिले, स्नान-संध्यादी कर्मे आणि देवतेची उपासना हा चित्तशुद्धीचा एक मार्ग आहे; पण दुसरा नि याहून सोपा मार्ग श्रीकृष्णानेच सांगितला आहे. तो म्हणजे अपेक्षा न ठेवता परोपकार करणे. या सवयीमुळे फार लवकर चित्तशुद्धी होते. याच मार्गाने मी जनता-जनार्दनाची उपासना करीत असतो. देशाकरिता आयुष्य वेचणे हीच माझी स्नान-संध्या नि उपासना, अन् मी ती प्रतिक्षणी करीत असतो !

एक दिवस आरामखुर्चीवर चिंतन करीत स्वस्थ पडले असता टिळक एकदम उठून उद्गारले, परमेश्‍वराने मला साक्षात् मोक्ष देतो म्हटले, तरी तो मी झिडकारून त्याला म्हणेन की, प्रथम माझा देश पारतंत्र्यातून मुक्त झालेला मला बघायचा आहे. देश पारतंत्र्यात असतांना वैयक्तिक मोक्ष मिळवणे, हासुद्धा एकप्रकारचा स्वार्थच असल्याचे समजणारे लोकमान्य धन्य आहेत ! लोकमान्यांच्या चरित्रातील हे काही प्रसंग वाचून आम्हा सर्वांना धर्माचरण आणि धर्मरक्षण करण्याची स्फूर्ती मिळो, हीच त्या धर्मसंस्थापक श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !

संकलक : श्री. संजय दिगंबर मुळ्ये, रत्नागिरी

पारतंत्र्याच्या काळात `भारतीय असंतोषाचे जनक’
ठरलेले लोकमान्य टिळक यांना विनम्र अभिवादन !

 

लोकमान्य टिळकांची काही दुर्मिळ छायाचित्रे

लाल - बाल - पाल
लाल – बाल – पाल
अभ्यासिकेत...
अभ्यासिकेत…
कुटुंबासमवेत...
कुटुंबासमवेत…

 

 मराठा व केसरीचे पहिले अंक
मराठा व केसरीचे पहिले अंक
 कणखर नेतृत्त्व
कणखर नेतृत्त्व

Leave a Comment