मंदिरांच्या दुःस्थितीची कारणे आणि हिंदूंचे धार्मिक कर्तव्य !

‘भारतात सांप्रत गाजत असलेला मंदिर प्रवेश आणि मंदिराच्या अनुषंगिक वाद (गर्भगृहात प्रवेश किंवा व्यवस्थापनात नियुक्ती वगैरे) याविषयी विविध माध्यमांतून चर्चा होत आहेत. न्यायालयाचे काही निकालही याविषयी आले आहेत. हिंदूंच्याच मंदिरांमध्ये ही स्थिती निर्माण होण्याला काही गोष्टी कारणीभूत आहेत. ‘याला आपण हिंदु बांधवच उत्तरदायी आहोत. अन्य कुणीही याला उत्तरदायी नाही’, असे माझे मत आहे. मी स्वत: पौरोहित्य करतो. व्याख्याने किंवा प्रवचने या निमित्ताने माझे अनेक ठिकाणी येणे-जाणे होते. माझ्या अल्पज्ञानाने ही कारणमीमांसा येथे मांडत आहे.

 

१. हिंदूंच्या मंदिरांची दुःस्थिती होण्यामागील विविध कारणमीमांसा

१ अ. भक्त म्हणून नव्हे, तर पर्यटक म्हणून मंदिरात जाणारे आणि मौजमजा करणारे हिंदू !

मंदिरांमध्ये भक्त म्हणून जायला हवे; पण हिंदू पर्यटक म्हणून जातात. आज अनेक मंदिरे ‘पर्यटन स्थळ’ म्हणून घोषित झालेली आहेत. पर्यटक मंदिरात बसून भगवंताचे ध्यान आणि नामस्मरण करण्यापेक्षा ‘सेल्फी’ (स्वतःची छायाचित्रे) काढण्यात मग्न असतात. त्यांना त्या मंदिरातील देव किंवा संत, तसेच त्यांचे कार्य यांविषयी जाणून घेण्यात रस नसतो. ते गप्पा मारत बसलेले असतात. मंदिरात बसून नामस्मरण करण्याऐवजी ते पुढच्या प्रवासाचे नियोजन करण्यात मग्न असतात.

१ आ. मंदिरात स्थापत्यशास्त्राविषयी माहिती दिली न जाणे

प्राचीन मंदिरांच्या स्थापत्यशास्त्राविषयी मंदिरांत माहिती दिली जात नाही. (खरेतर मंदिरांत भारतीय स्थापत्यशास्त्राचे उत्तुंग कार्य पहाता येते.) या उलट अनेक कार्यसम्राट नेत्यांची विज्ञापने किंवा उत्सवांच्या शुभेच्छा यांचे फलक, तसेच भावी आमदार, गल्लीतील नेते यांचे मोठमोठे होर्डिंग्ज मंदिरांच्या चहूकडे लावलेले असतात. मंदिराच्या आजूबाजूस विद्रूपीकरण केलेले असते.

१ इ. मंदिरांजवळ पूर्वीप्रमाणे धर्मशाळा नव्हे, तर भक्तनिवासांचे ‘लॉजिंग’ झालेले असणे

मंदिरांच्या जवळ पूर्वी धर्मशाळा किंवा भक्तनिवास असायचे. त्याला चार भिंती आणि छत असायचे. तेथे पांथस्थ मंडळी किंवा भक्तमंडळी यांना उपासनेसाठी रहाण्याची सोय असायची. भक्त तेथे आनंदाने रहायचे. ८ दिवस पारायणे, सप्ताह करत भगवंताची सेवा करायचे.

या भक्तनिवासांचे आता ‘लॉजिंग’ झाले आहे. पर्यटक विचारतात, ‘‘वातानुकूलित खोल्या आहेत का ? ‘डबल बेड’ आहे का ? खोलीत दूरचित्रवाणी संच आहे का?’’ (खर्‍या भक्तांना यापैकी कसलीही ‘लक्झरी’ सोय आवश्यक नसते.)

१ ई. भक्तनिवासांचा वापर हिंदूंकडून अनैतिक कामांसाठी केला जाणे

भक्तनिवास भक्तांसाठी किंवा उपासनेसाठी आहे. त्याचा वापर हिंदूंकडून अनैतिक कामांसाठी केला जातो. अनेक तरुण मंडळी ‘हनिमून’साठी भक्तनिवासाचा वापर करतात. अनेक ठिकाणच्या भक्तनिवासांत तरुण-तरुणींनी आत्महत्या केल्या आहेत. (हे पती-पत्नी नव्हते, तर घरातून पळून आलेले किंवा प्रियकर-प्रेयसी होते.)

१ उ. मंदिराच्या आजूबाजूस पान, गुटखा आणि सिगारेट यांची दुकाने असणे

मंदिराच्या आजूबाजूस पान, गुटखा आणि सिगारेट यांची दुकाने आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ही दुकाने हिंदूंचीच आहेत.

१ ऊ. भगवंताविषयी श्रद्धा नसलेले हिंदू !

काही मंदिरांत तर कर्मचारी, व्यवस्थापन आणि विश्‍वस्त यांनाच भगवंताविषयी श्रद्धा नसते. अनेक मंडळींना त्या देवतेचे किंवा संतांचे कार्य नीट ठाऊक नसते, तसेच त्या देवतेविषयी किंवा संतांविषयी लिहिलेली ग्रंथसंपदा, अभंग रचना, पुराणे अथवा संतवाङ्मय यांविषयीही अनास्था दिसते.

१ ए. आध्यात्मिक ज्ञानाचे केंद्र नसलेली मंदिरे !

सर्व संतांनी वेदांतील तत्त्वज्ञान सांगणारे सुलभ सोपे अभंग मराठीत लिहिले किंवा ओवीबद्ध केले. मंदिरांत या तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हायला हवा; मात्र तो म्हणावा तसा होत नाही. त्यामुळे मंदिरे आध्यात्मिक ज्ञानाचे केंद्र होत नाहीत आणि कुणीही उपटसुंभ हिंदूंच्या देवता किंवा कथा यांवर टीका करतो.

१ ऐ. मंदिर व्यवस्थापनात भक्तांची नियुक्ती न केली जाणे

मंदिर व्यवस्थापनात राजकारणी किंवा आर्थिक सधनता पाहून अथवा त्या प्रांतातील ‘वजनदार’ माणसाची वर्णी लावली जाते. मग तो भक्त किंवा सदाचरणी नसला, तरीही त्याची नियुक्ती केली जाते. (उत्तम साधक, उपासक, निष्काम भक्त आणि सदाचारी व्यक्ती मग ती कोणत्याही जातीची असेना, ती या पदावर नियुक्त झाली पाहिजे.)

 

२. शक्ती आणि भक्ती करण्यात न्यून पडणारे हिंदू !

वेदमूर्ती भूषण जोशी

हिंदूंची उपासना न्यून पडते. शक्ती आणि भक्ती करण्यातही हिंदू न्यून पडतात. सायंकाळी ‘शुभं करोति’च्या ऐवजी मालिकांचे स्वर कानी पडतात. ज्या वेळी लक्ष्मी घरात येते, त्या वेळी मालिकांमधील कटकारस्थाने, दोन बायकांच्या भानगडी, फसवणूक, एकमेकांवरील अविश्‍वास हेच कानी येते. त्यामुळे प्रत्येक घरातील सदस्य एकमेकांकडे संशयाने पहातो. हे नकळत घडू लागते. या संशयग्रस्त पिशाचांना ‘शांतीदूत’ रविवारी समूह संमोहित करतात आणि धर्मांतरित करतात. हिंदूंच्या देवतांची विटंबना सर्वाधिक मालिकांच्या माध्यमातूनच होत असते. हे कधी अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांची चेष्टा करतात का ? यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य केवळ हिंदूंंसाठीच असते. असे असूनही हिंदूंना याविषयी खेद न वाटणे दुर्दैवी !

 

३. ‘श्रीराममंदिर बांधावे का ?’, हा प्रश्‍नच निरर्थक !

हिंदूंच्या देवस्थानांमध्ये कुणीही उपटसुंभ येतो आणि काहीही गोंधळ घालतो; पण आपल्याला काहीच फरक पडत नाही. ‘श्रीराममंदिर बांधावे का ?’, हा प्रश्‍नच मुळात भारत देशात निरर्थक आहे. जो देशच प्रभु श्रीरामाचा आहे, तेथे अनुमती कशाला हवी ? बाबराने अनुमती घेऊन मशीद बांधली होती का ?

 

४. बलाची उपासना आणि उपासनेचे बल वृद्धींगत होणे आवश्यक !

आपल्या प्रत्येकाच्या घरातील बलाची उपासना आणि उपासनेचे बल या दोन्ही गोष्टी खंडित झाल्या आहेत. त्या वृद्धींगत होणे आवश्यक आहे, अन्यथा दुर्दैवाचे दशावतार असेच चालू रहातील, यात वाद नाही.

 

५. अधर्माने वागणार्‍यांसाठी मनुस्मृतीचा हितोपदेश !

ज्या व्यक्ती आज अधर्माने वागत आहेत, त्यांची पुढची अवस्था कशी असेल ? याविषयी सांगणारा एक श्‍लोक मनुस्मृतीत आहे. तो पुढीलप्रमाणे आहे.

अधर्मेणैधते तावत् ततो भद्राणि पश्यति ।
तत: सपत्नान् जयति समूलस्तु विनश्यति ॥

– (मनुस्मृति, अध्याय ४, श्‍लोक १७४)

अर्थ : मनुष्य अधर्माने प्रथम उन्नती करतो, मग तो आपले कल्याण (संपत्ती, सत्ता, मान) झालेले पहातो, मग तो आपल्या शत्रूंवर विजय प्राप्त करतो. नातेवाइकांना हरवतो आणि शेवटी समूळ नष्ट होतो.

(दुर्योधन हे याचे उत्तम उदाहरण आहे.) अधर्माचे फळ प्रारंभी चांगले भासते; पण शेवट फार भयंकर होतो.

 

६. भगवंत भक्तांसाठी धावून येतो, हे हिंदूंनी लक्षात ठेवावे !

मंदिरांचा उत्कर्ष करायचा असेल, तर स्वत:चे वर्तन प्रत्येकाने सुधारणे आवश्यक आहे. मंदिरात भक्त म्हणूनच जायला हवे, पर्यटक म्हणून नाही; कारण आजपर्यंत भगवंत भक्तासाठी धावल्याची सहस्रो उदाहरणे आहेत. पर्यटकांसाठी भगवंत धावल्याचे एकही उदाहरण नाही.’

– वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग.

Leave a Comment