‘पिळ्ळैयारपट्टी (‘पिळ्ळैयार’ म्हणजे तमिळ भाषेत श्री गजानन) येथील स्वयंभू गजाननाचे मंदिर हे तमिळनाडूमधील गजाननाच्या प्रमुख तीन मंदिरांपैकी पहिले मंदिर आहे. हे मंदिर एक सहस्र वर्षांपूर्वी पल्लव राजांच्या काळात बांधले गेले आहे. गजाननाचा आकार डोंगरातूनच उत्पन्न झाला आहे. मंदिरामागे गेल्यास या डोंगराचे आपल्याला दर्शन घडते. गजाननाच्या स्वयंभू आकाराच्या रहस्याचा कालखंड कुणालाही ठाऊक नाही. या गजाननाच्या उजव्या हातात शिवपिंडी धरलेली आढळून येते. सामान्यतः श्री गणेशाला ४ हात असतात. या स्वयंभू मूर्तीला मात्र २ हात आहेत. मूर्तीमागे डोंगरातच एक शिवपिंडीही आपोआप तयार झालेली आहे; परंतु या शिवपिंडीचे आपल्याला दर्शन घेता येणे शक्य होत नाही.