कर्नाटक राज्यात उडुपी जिल्ह्यात कुंभाशी येथे श्री आनेगुड्डे महागणपति मंदिर आहे. येथील श्री महागणपतीची मूर्ती अखंड पाषाणातून बनवलेली १२ फूट उंचीची आहे. श्री गणेशाला ५ किलो शुद्ध सोन्याचा मुखवटा आहे. मूर्तीवरील अन्य कवच शुद्ध चांदीने बनवलेले आहे. कन्नड भाषेत ‘आने’ म्हणजे ‘हत्ती’ आणि गुड्डे म्हणजे टेकडी, टेकडीवर वास्तव्यास असलेला गजानन’ या अर्थाने त्या गणपतीला ‘आनेगुड्डे श्री महागणपति’, असेही संबोधले जाते. हा गणपति अत्यंत जागृत आहे.
कुंभासुराचा वध करण्यासाठी श्री महागणपतीने भीमाला तलवार दिलेले स्थान !
द्वापरयुगातील हा प्रसंग आहे. त्या वेळी या परिसरात मोठा दुष्काळ पडला होता. वरुणदेवाची कृपा होऊन दुष्काळाचे निवारण व्हावे आणि पर्जन्यवृष्टी व्हावी, यासाठी अगस्तीऋषींनी या ठिकाणी यज्ञ आरंभला. कुंभासुर नामक राक्षसाने त्यांच्या यज्ञविधींत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी पांडवांचेही या भागात वास्तव्य होते. भीम त्या राक्षसाचा वध करण्यासाठी पुढे आला. श्री गणेशाने कुंभासुराच्या वधासाठी भीमाला तलवार दिली. भीमाने त्या तलवारीने कुंभासुराचा वध करून अगस्तीऋषींच्या यज्ञातील विघ्न दूर केले. ‘कुंभाशी हे नाव कुंभासुराच्या नावावरून प्रचलित झाले असावे’, असे म्हणतात.
श्री महागणपति मंदिराचे स्थानमहात्म्य
प्राचीन काळी विश्वेश्वर उपाध्याय नावाचे एक भक्त नियमितपणे गणपतीची उपासना करत असत. एक दिवस उपाध्याय यांच्या स्वप्नात एक ब्राह्मण बटू आला आणि म्हणाला की, ‘मला भूक लागली आहे.’ त्या स्वप्नात तो बटू एका पाषाणाजवळून दिसेनासा झाला. या असामान्य स्वप्नामुळे आश्चर्यचकित होऊन उपाध्याय यांनी दुसर्या दिवशी त्या जागेचा शोध घेतला. उपाध्याय या ठिकाणी नेहमी जात असत. तेथील तलावात ते स्नान करत असत. एके दिवशी त्यांना स्वप्नात जसा संगमरवरी दगड दिसला होता, ज्या पाषाणाजवळून तो बटू दिसेनासा झाला, तसाच पाषाण त्या तलावाजवळ दिसला. त्या पाषाणाच्या भोवती वाढलेल्या रानफुलांनी त्या ठिकाणाला एक दिव्य स्वरूप प्राप्त झाले होते. या दृश्यामुळे प्रभावित होऊन उपाध्याय यांनी त्या पाषाणाची पूजा करणे आरंभले. एके दिवशी त्यांना एक गाय त्या पाषाणावर दूधाने अभिषेक करतांना दिसून आले. या घटनेनंतर, त्यांची भक्ती स्थिर झाली आणि त्यांनी अधिकाधिक भक्तीने त्या देवाची उपासना केली. उपाध्याय यांना त्यांची उपासना चालू ठेवता यावी, यासाठी स्थानिकांनी त्यांना ती भूमी अर्पण केली आणि तेथे एक मंदिर उभारले ! तेच हे श्री महागणपति मंदिर !