श्री गणपति अथर्वशीर्षाच्या पठणातून निर्माण झालेल्या चैतन्यामुळे उपासकाला आध्यात्मिक स्तरावर लाभ होणे, तसेच गणेशोत्सवाच्या कालावधीत केलेल्या या स्तोत्रपठणाचा श्री गणेशमूर्तीवर झालेला सकारात्मक परिणाम

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल
ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘श्री गणेशचतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ सहस्र पटींनी कार्यरत असते. या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा अधिक लाभ होतो. फोंडा, गोवा येथील श्री. प्रणव साधले यांनी गणेशोत्सवाच्या कालावधीत १६.९.२०१८ या दिवशी श्री गणपति अथर्वशीर्ष स्तोत्राची १ सहस्र आवर्तने केली. ‘उपासकाने श्री गणपति अथर्वशीर्ष स्तोत्राचे पठण केल्याचा उपासकाला काय लाभ होतो, तसेच श्री गणेशमूर्तीवर त्याचा काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

 

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत गणेशोपासक श्री. प्रणव साधले यांनी अथर्वशीर्ष स्तोत्राचे पठण आरंभ करण्यापूर्वी आणि स्तोत्राची १ सहस्र आवर्तनेे पूर्ण केल्यानंतर त्यांच्या आणि श्री गणेशमूर्तीच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजणीच्या नोंदी करण्यात आल्या. या केलेल्या सर्व मोजणींच्या नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या संकेतस्थळाच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

 

२. केलेल्या मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन

२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन

२ अ १. अथर्वशीर्षाचे पठण झाल्यानंतर उपासकातील ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नाहीशी होणे

उपासकामध्ये (श्री. प्रणव साधले यांच्यामध्ये) आरंभी ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा होती. तिची प्रभावळ ०.९५ मीटर होती. अथर्वशीर्षाचे पठण झाल्यानंतर त्या उपासकातील ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नाहीशी झाली.

उपासकामध्ये अथर्वशीर्षाचे पठण आरंभ होण्यापूर्वी आणि पठण झाल्यानंतरही ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

२ अ २. श्री गणेशमूर्तीमध्ये ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आढळल्या नाहीत.

२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन

२ आ १. अथर्वशीर्षाचे पठण झाल्यानंतर उपासकामध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे

सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. अथर्वशीर्षाचे पठण आरंभ करण्यापूर्वी उपासकामध्ये सकारात्मक ऊर्जा काहीच नव्हती. अथर्वशीर्षाचे पठण झाल्यानंतर त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. तिची प्रभावळ १.८४ मीटर होती.

२ आ २. अथर्वशीर्षाचे पठण झाल्यानंतर श्री गणेशमूर्तीच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे

अथर्वशीर्षाचे पठण आरंभ होण्यापूर्वी श्री गणेशमूर्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा होती. तिची प्रभावळ २.०८ मीटर होती. अथर्वशीर्षाचे पठण झाल्यानंतर त्या गणेशमूर्तीच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत १.७२ मीटर वाढ होऊन ती ३.८० मीटर झाली.

२ इ. एकूण प्रभावळीच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन

२ इ १. अथर्वशीर्षाचे पठण झाल्यानंतर उपासक आणि श्री गणेशमूर्ती यांच्या एकूण प्रभावळीत वाढ होणे

सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते. अथर्वशीर्षाचे पठण झाल्यानंतर उपासक आणि श्री गणेशमूर्ती यांच्या एकूण प्रभावळीत झालेली वाढ पुढे दिली आहे.

एकूण प्रभावळ ( मीटर )
पठणापूर्वी पठणानंतर झालेली वाढ
उपासक ( श्री. प्रणव साधले ) १.३८ २.६३ १.२५
श्री गणेशमूर्ती २.५० ४.१३ १.६३

वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ३’ मध्ये दिले आहे.

 

३. केलेल्या मोजणीच्या नोंदींचेे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. स्तोत्र

‘स्तूयते अनेन इति’, म्हणजे ज्यायोगे देवतेचे स्तवन केले जाते ते स्तोत्र, अशी ‘स्तोत्र’ या शब्दाची व्याख्या आहे. स्तोत्रात देवतेची स्तुती असतेच; पण त्यासह स्तोत्रपठण करणार्‍याच्या भोवती कवच (संरक्षक आवरण) निर्माण करण्याची शक्तीही असते. हे स्तोत्रपठण ‘तदर्थभावपूर्वक = तत् + अर्थ + भावपूर्वक’, म्हणजे ‘त्याचा (स्तोत्राचा) अर्थ समजून भावासह’ झाले पाहिजे. केवळ यंत्राप्रमाणे प्राणहीन उच्चारण नको. उच्चारण असे व्हावे की, ज्याच्या योगाने जपकर्ता भगवद्भावयुक्त आणि भगवच्छक्तीयुक्त झाला पाहिजे. स्तोत्रांमध्ये फलश्रुुती दिलेली असते. आत्मज्ञानसंपन्न ऋषीमुनींना हे वाङ्मय परावाणीतून स्फुरत असल्याने आणि फलश्रुतीमागे त्यांचा संकल्प असल्याने पठण करणार्‍याला ते फळ फलश्रुतीमुळे मिळते.

३ आ. ‘अथर्वशीर्ष’ स्तोत्र

‘थर्व’ म्हणजे उष्ण (गरम), ‘अथर्व’ म्हणजे शांती आणि ‘शीर्ष’ म्हणजे मस्तक. ज्याच्या पुरश्‍चरणाने मस्तकास शांती प्राप्त होते, ते अथर्वशीर्ष होय. भगवान जैमिनीऋषींचे सामवेदीय शाखेतील शिष्य मुद्गलऋषी यांनी ‘साममुद्गल गणेशसूक्त’ लिहिले. त्यानंतर त्यांचे शिष्य गणकऋषी यांनी ‘गणपति अथर्वशीर्ष’ लिहिले. बहुतेक स्तोत्रांत देवतेचे ध्यान, म्हणजे मूर्तीचे वर्णन, आधी असते आणि स्तुती नंतर असते. याउलट अथर्वशीर्षात स्तुती आधी आणि ध्यान नंतर आहे.’

(संदर्भ – सनातनचा लघुग्रंथ – ‘श्री गणपति अथर्वशीर्ष अन् संकष्टनाशनस्तोत्र’)

३ इ. अथर्वशीर्षाच्या पठणातून निर्माण झालेल्या चैतन्यामुळे उपासकाला
‘त्याच्यातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होणे, त्याच्यामध्ये पुष्कळ सकारात्मक
ऊर्जा निर्माण होणे आणि त्याची एकूण प्रभावळ वाढणे’, हे आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणे

सूत्र ‘३ अ’ आणि ‘३ आ’ यांतून ‘अथर्वशीर्ष स्तोत्राच्या पठणामुळे चैतन्य निर्माण होते’, हे लक्षात येते. उपासकामध्ये आरंभी नकारात्मक ऊर्जा होती, तसेच सकारात्मक ऊर्जा काहीच नव्हती. अथर्वशीर्षाच्या पठणामुळे निर्माण झालेल्या चैतन्यामुळे उपासकातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली आणि त्याच्यामध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. यामुळे त्याच्या एकूण प्रभावळीतही वाढ झाली.

३ ई. अथर्वशीर्षाचे पठण झाल्यानंतर श्री गणेशमूर्तीची सकारात्मक ऊर्जा आणि एकूण प्रभावळ यांमध्ये वाढ होणे

‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, हा अध्यात्मातील एक सिद्धांत आहे. या सिद्धांतानुसार जेथे श्री गणेशाचे रूप आहे, तेथे श्री गणेशाची स्पंदने, म्हणजे गणेशतत्त्व आकृष्ट होणे स्वाभाविक आहे. यामुळे श्री गणेशमूर्तीमध्ये आरंभीच सकारात्मक ऊर्जा आढळली. अथर्वशीर्षात श्री गणेशाची स्तुती असल्याने पठणाच्या ठिकाणच्या वातावरणात श्री गणेशाची स्पंदने आकृष्ट झाली. याचा परिणाम म्हणून अथर्वशीर्षाचे पठण झाल्यानंतर केलेल्या मोजणीमध्ये श्री गणेशमूर्तीच्या सकारात्मक ऊर्जेत आणि एकूण प्रभावळीत वाढ झाल्याचे दिसून आले.

थोडक्यात सांगायचे, तर आपल्या थोर ऋषीमुनींनी मानवाच्या कल्याणासाठी देवतांची स्तोत्रे रचली. ‘या स्तोत्रांसाठी त्यांचा असणारा संकल्प अन् फलश्रुती यांमुळे त्या स्तोत्रांचे भावपूर्ण पठण केल्यास मानवाला आध्यात्मिक शक्ती आणि चैतन्य मिळते’, हे या वैज्ञानिक चाचणीतून स्पष्ट झाले.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१९.९.२०१८)

ई-मेल : [email protected]

 

श्री गणपति अथर्वशीर्ष स्तोत्राच्या पठणामुळे एकाग्रता लवकर साध्य होणे, तसेच
शुचिर्भूत होऊन पठण केल्याने आध्यात्मिक शक्ती ग्रहण करण्याची क्षमता वाढणे

‘अथर्वशीर्ष अगदी संथपणे, एका गतीत म्हणावे. स्तोत्र म्हणण्यापूर्वी स्नान करावे. बसण्यासाठी धूतवस्त्राची घडी, मृगाजिन, धाबळी किंवा दर्भाची चटई यांचा उपयोग करावा. पाठ म्हणून पूर्ण होईपर्यंत मांडी पालटावी (बदलावी) लागणार नाही, अशी सोपी मांडी घालावी. दक्षिण दिशा सोडून अन्य कोणत्याही दिशेला तोंड करून बसावे. पाठाला आरंभ करण्यापूर्वी गणपतीची पूजा करून त्याला अक्षता, दूर्वा, शमी आणि तांबडे फूल वहावे. पूजा करता न आल्यास काही क्षण (अनुमाने एक मिनिट) गणपतीचे ध्यान करावे, त्याला नमस्कार करावा आणि मग पाठास आरंभ करावा. स्तोत्र गणपतीच्या मूर्तीकडे किंवा ओंकाराकडे पाहून म्हणावे, अथवा डोळ्यांसमोर गणपतीची मूर्ती आणावी. (सनातन संस्थेने गणपतीचे सात्त्विक चित्र आणि मूर्ती बनविलेली आहे.) या सार्‍यामुळे एकाग्रता लवकर साध्य होण्यास साहाय्य होते, तसेच शुचिर्भूत होऊन पठण केल्याने आध्यात्मिक शक्ती ग्रहण करण्याची क्षमता वाढते.’

(संदर्भ : सनातनचा लघुग्रंथ – ‘श्री गणपति अथर्वशीर्ष अन् संकष्टनाशनस्तोत्र’)

Leave a Comment