सनातन संस्थेच्या १२ व्यासंत पू. (कु.) अनुराधा वाडेकर (भाग १)

अनुक्रमणिका

१. वैयक्तिक जीवन आणि साधनेतील प्रवास

१ अ. बालपण

१ आ. महाविद्यालयीन जीवन आणि कलाक्षेत्रातील व्यवसाय

१ इ. साधनेत येण्यापूर्वीची मनाची स्थिती

१ ई. साधनेला केलेला आरंभ (ख्रिस्ताब्द १९९७)

१ उ. वैयक्तिक साधना आणि साधनेतील अडचणी

१ ऊ. साधना करतांना क्रमाने येत गेलेले व्यापकत्व

१ ए. साधनेनंतर व्यावहारिक विचारांमधे क्रमाने झालेले पालट

१ ऐ. पुढील साधना आणि सेवा

१ ओ. वाईट शक्तींचा त्रास

१ औ. सूक्ष्म-चित्रविषयक सेवा

१ अं. विविध समष्टी सेवा

१ क. संतसेवा

१ ख. प्रार्थना


१. वैयक्तिक जीवन आणि साधनेतील प्रवास

१ अ. बालपण

१ अ १. स्वभाव

‘लहानपणापासून मी अतिशय समजूतदार, शांत स्वभावाची आणि सर्वांना आवडणारी अशी होते.

१ अ २. देवाविषयी आवड

माझा देवावर विश्वास होता. मंदिरात जायला मला आवडायचे. सातवीत असतांना श्रीराम आवडायचा. मी श्रीरामाला मनातील सांगायचे.

१ अ ३. चित्रकलेची आवड

अ. लहानपणापासून, म्हणजे इयत्ता तिसरीपासून मला चित्रकलेची आवड होती.

आ. सातवीत असतांना आपण कला महाविद्यालयात जायचे, असा मनाशी ठाम निश्चय केला.

१ आ. महाविद्यालयीन जीवन आणि कलाक्षेत्रातील व्यवसाय

१. कला महाविद्यालयात प्रवेश मिळाला आणि ते शिक्षण पूर्ण केले.

२. कलाक्षेत्रात चाकरी आणि काही काळ व्यवसाय करून विविध चांगले-वाईट अनुभव आले. व्यवहारातून केवळ प्रसिद्धी आणि पैसा मिळू शकतो; परंतु समाधान मिळत नाही, याची जाणीव झाली. (ख्रिस्ताब्द १९९५)

३. कुठेतरी एक असे जग आहे की, जिथे सर्व जण चांगले आहेत आणि निरपेक्षतेने प्रेम करतात, असे वाटणे.

महाविद्यालयात आणि व्यवसाय करतांना अपेक्षा अन् भावनाशीलता या दोषांमुळे दुःख काय असते, याची जाणीव होऊन ‘या जगतात जगण्यात काही अर्थ नाही’, असे वाटले. कुठेतरी एक असे जग आहे की, जिथे सर्व जण चांगले आहेत आणि निरपेक्षतेने प्रेम करतात, जिथे सुख-समाधान अन् शांती आहे, असे अधून-मधून वाटत रहायचे. मी अशा जगताच्या शोधात आहे, असे जाणवायचे.

१ इ. साधनेत येण्यापूर्वीची मनाची स्थिती

१ इ १. सर्वांमध्ये असूनही एकटे वाटणे आणि वाईट शक्तींच्या त्रासामुळे एखाद्याचे जीवन किती दुःखदायक असू शकते, हे स्वतः अनुभवणे

मी साधनेत येण्यापूर्वी माझ्या आयुष्यात काही कारण नसतांना दुःख का आहे, असे मला नेहमी वाटायचे. काहीही केले, तरी मी सर्वांपेक्षा अलिप्त आहे, असे जाणवायचे. मी सर्वांमध्ये असूनही मला पुष्कळ एकटे वाटायचे. मित्र-मैत्रिणी गमती-जमती करत असतांना मला त्याचा आनंद उपभोगता येत नसे. असे का होते, त्याचे उत्तर सापडायचे नाही. काहीही केले, तरी समाधान जाणवायचे नाही. बर्‍याच वेळा कोणीतरी वारल्यावर एखाद्याचा जसा तोंडवळा होईल, तसा माझा असायचा. वाईट शक्तींच्या त्रासामुळे एखाद्याचे जीवन किती दुःखदायक असू शकते, हे मी अनुभवले.

१ ई. साधनेला केलेला आरंभ (ख्रिस्ताब्द १९९७)

१ ई १. कलेची पहिल्यापासून आवड म्हणून कला शाखेत जाणे, स्वतःचे विज्ञापनाचे आस्थापन चालू करणे; पण मन वेगळ्या जगाच्या शोधात आणि शांतीच्या मागे धावत असणे

कलेची पहिल्यापासून आवड होती म्हणून मी कला महाविद्यालयात गेले. १९९६ मध्ये महाविद्यालयात जात असतांना मी काही काळ अर्धवेळ चाकरी केली. ‘बॅचलर ऑफ फाईन आर्टस्’ ही पदवी प्राप्त करून स्वतःचे विज्ञापनाचे आस्थापन चालू केले. व्यवहारात कलेची कदर अल्प आणि पैशाला अधिक महत्त्व, तसेच लोकांची वृत्ती अतिशय स्वार्थी असल्याचे प्रकर्षाने जाणवले. या जगात पैसा, प्रसिद्धी आहे; पण समाधान नाही, याची तीव्रतेने जाणीव झाली. याहीपेक्षा माझे मन नवीन वेगळ्या जगाच्या शोधात आणि शांतीच्या मागे धावत होते. योगासने केल्यावर मनःशांती मिळेल़, असे वाटले. त्यानंतर त्यातच पुढे शिकून वर्ग घेऊन समाजाला शिकवायचे, असे मी ठरवले. मी योगासने करून पाहिली; पण तात्पुरते मनाला बरे वाटायचे. तेव्हाच ठाण्याचे एक साधक श्री. श्रीकांत पाटील यांनी सनातन आणि साधना यांविषयी सांगितले. त्या वेळी मी त्याकडे अधिक लक्ष दिले नाही.

१ ई २. एका साधकासमवेत शीव आश्रमात जाण्याचा योग येणे, प.पू. डॉक्टरांची भेट होणे

१०.५.१९९७ या दिवशी श्री. श्रीकांत पाटील यांच्यासमवेत एकदा शीव आश्रमात जाण्याचा योग आला. तेव्हा प.पू. डॉक्टरांची भेट झाली. त्या वेळी त्यांच्याविषयी मला फारशी माहिती नव्हती. त्याच वेळी एका साधकाने (श्री. दिनेश शिंदे यांनी) संस्थेच्या प्रास्ताविक विवेचन या ग्रंथाच्या मुखपृष्ठासाठी स्प्रे पेंटींग बाहेरून करून प.पू. डॉक्टरांना आणून दाखवले. ते प.पू. डॉक्टरांना अपेक्षित असे झाले नव्हते. त्यात अनेक त्रुटी होत्या. त्यासाठी स्प्रे मशिनची आवश्यकता होती. मी ‘माझ्याकडे असलेले मशीन आणून देऊ का ?’, असे विचारले. ‘संस्थेला आपण काहीतरी साहाय्य करावे’, या उद्देशाने मी विचारले होते. तेव्हा प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘आमच्याकडे स्प्रे मशिन चालवणारे कोणी नाही.’’ तेथे स्प्रेची सेवा करणारे दुसरे कोणी साधक नसल्यामुळे ‘मी येऊन करू का’, असे विचारले. तेव्हा ‘ती सेवा २ घंट्यांची आहे आणि आपल्या कामातील एक दिवस काढून हे करून देऊ या’, असा माझा विचार होता. (माझा साधनेला आरंभ व्हावा, यासाठी देवाने आधीच नियोजन करून ठेवले होते. कोणती सेवा करायची, हेसुद्धा ठरवले होते, हे नंतर लक्षात आल्यावर कृतज्ञता वाटली.)

१ ई ३. दुसर्‍या दिवसापासून सेवा आरंभ होणे, नंतर पुष्कळ दिवस ‘व्यवहार सोडून सेवा करायला हवी’, असे वाटणे; पण तसे जमत नसणे आणि २-३ महिने आजारी पडणे

नंतर स्प्रे पेंटींगच्या निमित्ताने माझी दुसर्‍या दिवसापासून (ख्रिस्ताब्द १९९७ मध्येच) सेवा आरंभ झाली. शीवला आल्यावर आरंभी मला आश्रम शोधायलाच २ घंटे गेले. त्याच दिवशी प.पू. रामानंद महाराज शीवला आल्यामुळे त्यांचे दर्शन झाले. मला वाटणारी २ दिवसांची सेवा २ महिने झाले, तरी संपली नाही. त्यात इतर सेवा आणि विविध अडचणी आल्या. त्या अडचणींमधून ‘मी चित्रकार आहे’ इत्यादी माझा अहं देवाने न्यून करून घेतला.

मी प्रतिदिन शीवला माझे आस्थापनातील काम झाल्यावर संध्याकाळी येऊ लागले. मला येतांना फार त्रास व्हायचा, तरी मला आल्याविना चैन पडत नसे. सेवा मी का करते ? मला यातून काय मिळते, हे मला कळतही नव्हते; पण मी आपोआप खेचली जात होते.

नंतर पुष्कळ दिवस ‘व्यवहार सोडून सेवा करायला हवी’, असे वाटायचे; पण जमत नव्हते. अचानक माझे आजारपण चालू झाले. तेव्हा मी सेवाकेंद्रातच २१ घंटे झोपून असायचे. त्या वेळी ‘मी मरणार’, असे मला वाटायचे. त्यात ‘आपण संतांच्या दारी मरणार’, याचे मनाला समाधान असायचे. २- ३ महिने आजारी पडल्यामुळे व्यवहाराशी आपोआपच संबंध सुटला. क्षयरोग (टी.बी.) होण्याची शक्यता होती. वैद्यकीय अहवालामध्ये काही सकारात्मक भाग नव्हता. आजारपणही न्यून होत नव्हते.

१ ई ४. प.पू. डॉक्टरांनी गणपति आणि दत्त यांचे नामजप करायला सांगणे, त्या नामजपांमुळे बरे वाटू लागणे, तेव्हा स्वतःचे आजारपण काहीतरी वेगळे असल्याचे जाणवणे आणि मृत्यू टळून पुनर्जन्म झाल्यामुळे गुरूंची कृपा काय असते, याची जाणीव होणे

(ख्रिस्ताब्द १९९८) त्यानंतर प.पू. डॉक्टरांनी ‘श्री गणेशाय नमः ।’ या नामजपाच्या ६ आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपाच्या ९ माळा करायला सांगितल्या. त्या नामजपांमुळे मला बरे वाटू लागले. तेव्हा माझे आजारपण काहीतरी वेगळे असल्याचे मला जाणवले. आता कळते की, ते आध्यात्मिक होते. त्या वेळी माझा मृत्यू टळून पुर्नजन्म झाला, असे मला वाटले. तेव्हा ‘गुरूंची कृपा म्हणजे काय असते’, याची जाणीव झाली. गुरूंची सेवा करण्यापेक्षा आता दुसरे काही करावे, असे वाटेनासे झाले. इथे एवढे प्रेम आहे, ते सोडून आता मी कुठे जाणार आणि कशासाठी ? असेच वाटले. मी ज्या गोष्टीच्या शोधात होते, ते समाधान आणि प्रेम इथेच मला जाणवले. मी आपोआप इकडचीच झाले आणि शीव आश्रमात पूर्णवेळ सेवेसाठी जाऊ लागले.

१ उ. वैयक्तिक साधना आणि साधनेतील अडचणी

१ उ १. साधनेचे महत्त्व अनुभवता येणे

साधनेत आल्यानंतर माझ्या मनाच्या स्थितीत पालट होऊ लागल्याने मला साधनेचे महत्त्व थोडे थोडे समजू लागले. आजपर्यंत ज्या आनंदासाठी माझे मन शोध घेत होते, तो आनंद सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर कुलदेवतेच्या नामजपाने मला मिळाला. कुलदेवतेचा नामजप करतांना आयुष्यात प्रथमच मला काही क्षण कुलदेवीचे दर्शन होऊन तिच्याविषयी आत्मियता वाटू लागली.

१ उ २. अंतर्मुखता वाढल्याने स्वभावदोष आणि अहं या साधनेतील खर्‍या अडथळ्यांची जाणीव होणे

वैयक्तिक साधना चालू केल्यावर इतर गोष्टी किंवा परिस्थिती नाही, तर माझे स्वभावदोष आणि अहं हेच माझ्या साधनेत अडथळे आहेत, याची मला जाणीव झाली. दुसर्‍याला दोष देणे, प्रतिक्रिया येणे, बहिर्मुखता, भावनाशीलता, स्वतःला दोष देणे, या गोष्टींचा मनाला अतिशय त्रास होत होता. हे मनच नको, असे वाटायचे. प.पू. डॉक्टरांनी स्वभावदोष निर्मूलनाची प्रक्रिया शिकवली. आरंभी त्यांनीच स्वयंसूचना कशा बनवायच्या, हे शिकवले. अहंनिर्मूलनाची प्रक्रिया शिकवली. या प्रक्रिया अनुभवल्या नसत्या, तर जीवन दुःखातच गेले असते.

१ उ ३. अपेक्षांचा लय करण्यासाठी स्वतःला जे अपेक्षित आहे ते इतरांसाठी केल्यामुळे साधकांविषयी प्रेम वाटू लागणे

आधी मला अपेक्षेमुळे साधकांविषयी अधिक प्रतिक्रिया यायच्या. ‘दुसर्‍याला समजून घेणे ही साधना आहे, त्यांचे केवळ दोष न पहाता गुणही पहायचे’, हे प.पू. डॉक्टरांनी प्रसंगांतून लक्षात आणून दिले. अपेक्षांचा लय करण्यासाठी मला जे अपेक्षित आहे, ते इतरांसाठी करणे चालू झाले. त्यामुळे मला साधकांविषयी प्रेम वाटू लागले.

१ उ ४. मायेतील आणि विवाहाविषयीच्या विचारांतून ईश्वराने बाहेर काढणे

मायेतील आणि विवाहाविषयीचे विचार येऊन माझे मन अस्वस्थ होत होते. हा साधनेतील मोठा अडथळा आहे, असे वाटायचे. विवाहामुळे आपण संसारात अडकणार आणि नाही केला, तर या विचारांमधे अडकणार, असे वाटायचे. यातूनही ईश्वराने बाहेर काढले.

१ उ ५. घरातून सात वर्षे साधनेसाठी तीव्र विरोध असणे, घरात पूर्वजांच्या आणि वाईट शक्तींच्या तीव्र त्रासामुळे आई-वडिलांसह स्वतःलाही अनेक संकटांना तोंड द्यावे लागणे; पण देवाने तिघांचीही काळजी घेणे

घरातून मला सात वर्षे साधनेसाठी तीव्र विरोध होता. आई-वडिलांची एकुलती एक मुलगी या नात्याने त्यांच्या कोणत्याच व्यावहारिक अपेक्षा मी कधी पूर्ण करू शकले नाही. त्यांच्या मनाविरुद्ध साधना केल्याने माझ्यामुळे त्यांना पुष्कळ यातना सहन कराव्या लागल्या. घरात पूर्वजांच्या आणि वाईट शक्तींच्या तीव्र त्रासामुळेही तिघांनाही अनेक संकटांना तोंड द्यावे लागत होते. त्यात देवाने तिघांचीही काळजी घेतली; म्हणून आम्ही आज जिवंत आहोत. ईश्वरावरील श्रद्धा डळमळीत होईल, असे काही कठीण प्रसंग जीवनात आले; पण त्याच्याच कृपेमुळे माझ्या मनात साधनेविषयी कधीच विकल्प निर्माण झाला नाही.

<!–

१ उ ६. प.पू. डॉक्टरांनी वाईट शक्तींचा त्रास न्यून करणे

ख्रिस्ताब्द २००० पासून मला होणार्‍या वाईट शक्तींच्या त्रासांत वाढ झाली. प.पू. डॉक्टरांनी घंटोन्घंटे उपाय करून मला त्रास देणार्‍या मांत्रिकाचे बळ न्यून केले आणि मला माझे अस्तित्व दिले. सनातन संस्थेत आले नसते, तर अनेक जन्म मांत्रिकाच्या तावडीत अडकले असते.

–>

१ ऊ. साधना करतांना क्रमाने येत गेलेले व्यापकत्व

१. मी, माझी साधना आणि प.पू. डॉक्टर (ग्रंथांसाठी चित्रे काढणे, सात्त्विक अक्षरे काढणे)

२. मी आणि इतर साधकांशी संबंधित सेवा करणे

३. मला क्षुद्र वाटणार्‍या सेवा साधना म्हणून करणे (बांधकाम विभाग, खाऊ विभाग, अर्पणात आलेल्या कपड्यांचे वर्गीकरण करणे इत्यादी.)

४. मी आणि इतर साधकांची साधना यांविषयी विचार करणे, इतरांसाठी करणे हीच आपली साधना आहे.

५. मला काय वाटते, मला काय करायचे आहे, यापेक्षा देवाला काय वाटते, हे महत्त्वाचे आहे.

६. देवाला अपेक्षित आहे, तेच घडू दे.

७. देवाच्या इच्छेप्रमाणेच सर्वकाही होत असते. ते मला मनापासून स्वीकारता येऊ दे. त्यातून शिकता येऊ दे.

१ ए. साधनेनंतर व्यावहारिक विचारांमधे क्रमाने झालेले पालट

१. आवडीच्या क्षेत्रात प्रसिद्धी आणि पैसे मिळवायला हवेत.

२. व्यवहार पैसा आणि प्रसिद्धी देऊ शकतो; पण समाधान देऊ शकत नाही.

३. ज्यातून समाधान आणि आनंद मिळेल, तेच मला करायचे आहे.

४. लहान मुलांना शिकवल्याने मला समाधान मिळेल. मतीमंद मुलांच्या शाळेत जाऊन विनामूल्य शिकवूया, त्यात आनंद मिळेल.

५. समाजासाठी काहीतरी करायला हवे, त्यातून समाधान मिळेल.

६. योगासनांनी खरी शांती मिळेल. सर्व सोडून योगाचे वर्ग चालू करूया. (वर्गाला जाण्यास आरंभही केला.)

७. अध्यात्मात शांती मिळू शकते. संतांच्या आशीर्वादाने जीवनात पालट होतात.

८. गुरूंच्या कृपेविना जीवन व्यर्थ आहे. गुरुकृपेनेच जीवनाचे सार्थक होऊ शकते.

१ ऐ. पुढील साधना आणि सेवा

१. कला ही साधना आहे, याची जाणीव झाली. (ख्रिस्ताब्द १९९८)

२. ईश्वरप्राप्तीसाठी कलेचे प्रयत्न केले. (ख्रिस्ताब्द १९९८)

३. प.पू. डॉक्टरांच्या आईची सेवा करण्याची संधी मिळाली. (ख्रिस्ताब्द १९९९)

४. दैनिक ‘सनातन प्रभात’चे बोधचित्र करण्याची सेवा केली. (ख्रिस्ताब्द १९९९)

५. नंतर सूक्ष्मातील कळण्यास आणि सूक्ष्मातील दिसण्यास आरंभ झाला. (ख्रिस्ताब्द २०००)

६. त्यानंतर सूक्ष्म-चित्रे काढण्यास आरंभ झाला. (ख्रिस्ताब्द २०००)

७. खाऊ विभाग, बांधकाम विभाग अशा विविध सेवा केल्या.

१ ओ. वाईट शक्तींचा त्रास

१. धामसे येथे असतांना वाईट शक्तींचे तोंडवळे दिसण्यास प्रारंभ झाला. (ख्रिस्ताब्द २००१)

२. भगतबाबांचे सूक्ष्म-चित्र काढल्याने वाईट शक्तींच्या आक्रमणाला आरंभ झाला. (ख्रिस्ताब्द २००२)

३. मांत्रिक, चेटकीण, पिशाच यांचा त्रास होऊ लागला. (ख्रिस्ताब्द २००३)

४. वाईट शक्तींच्या त्रासांत श्री दुर्गादेवीने साहाय्य केले आणि त्या वेळी अनुभूती आल्या. (श्री दुर्गादेवी मायावी होती, हे नंतर कळले.) (ख्रिस्ताब्द २००४)

५. साधनेत अधिक प्रमाणात मानसिक आणि आध्यात्मिक अडथळे आले. (ख्रिस्ताब्द २००३-२००४)

६. साधनेसाठी घरातून तीव्र विरोध होता. (ख्रिस्ताब्द २०००-२००७ )

१ औ. सूक्ष्म-चित्रविषयक सेवा

१. प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार सूक्ष्मातून उत्तरे काढून देवतांची चित्रे बनवणे

२. प.पू. डॉक्टरांच्या कृपेने अक्षरयोगाची साधना करून सात्त्विक अक्षरांची निर्मिती झाली.

३. घाबरवणार्‍या आणि आक्रमण करणार्‍या वाईट शक्तींची चित्रे काढणे.

४. त्रास असणार्‍या साधकांवर उपाय करणे

५. सूक्ष्म-परीक्षण करणे

६. श्री. राम होनप यांच्या माध्यमातून श्री दुर्गादेवीचे चित्र काढण्याची संधी मिळाली.

१ अं. विविध समष्टी सेवा

१. मिरज आणि देवद आश्रमांतील कार्यशाळेत दायित्व घेऊन सेवा केली. (ख्रिस्ताब्द २००३)

२. समष्टी सेवेत सहभाग घेण्यास आरंभ झाला. (ख्रिस्ताब्द २००६)

३. उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात दौरा करून साधकांना मार्गदर्शन केले. (ख्रिस्ताब्द २००७)

४. देवद आश्रम व्यवस्थापन सेवेस साहाय्य करणे

५. विदेशातील शिबिरांच्या आयोजनात सहभागी होणे

६. ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांच्या दायित्वाची सेवा करण्यास प्रारंभ झाला. (ऑक्टोबर २०११)

१ अं १. प.पू. डॉक्टरांनी उत्तर भारतात, दक्षिण भारतात पाठवल्यामुळे आपले साधक किती लांब राहून गुरूंची मनोभावे सेवा करत असतात, हे लक्षात येणे

मला काही येत नसतांना, वाईट शक्तींचा तीव्र त्रास असतांना प.पू. डॉक्टरांनी शिकण्यासाठी मला व्यापक बनवले. प.पू. डॉक्टरांनी उत्तर भारतात, दक्षिण भारतात पाठवल्यामुळे आपले साधक किती लांब राहून गुरूंची मनोभावे सेवा करत असतात, हे लक्षात आले. प्रत्येकाचा भाव किती निराळा असतो, हे कळले. एवढ्या लांब असूनही गुरु त्यांना कसेअनुभूती देऊनसाहाय्य करतात, प.पू. डॉक्टर त्यांना त्यांच्या समष्टी रूपातून कसे शिकवतात, हे कळले. आधी मला केवळ आश्रमातील साधकांविषयी आत्मियता वाटायची. नंतर इतर आश्रमांत पाठवल्यामुळे तेथील साधकांविषयी आत्मियता वाटू लागली. बाहेर पाठवल्यामुळे त्यांच्याशी जवळीक निर्माण झाली. गुरु कसे टप्प्याटप्प्याने साधकाला पुढे घेऊन जातात, याची जाणीव झाली.

प.पू. डॉक्टरांनी या सेवा माझ्याकडून माझी क्षमता नसतांना करवून घेतल्या. साधनेला आरंभ करतांना माझा आध्यात्मिक स्तर ४० प्रतिशत होता. त्यांच्या कृपेमुळेच आता ७० प्रतिशत इतका झाला.

१ क. संतसेवा

१ क १. जीवनात आलेले संत
१ क १ अ. उत्तर भारतातून एक संत घरी येणे आणि त्यांनी एक मंत्र देणे

एकदा आमच्याकडे उत्तर भारतातून एक संत आले होते. आमच्या एका ओळखीच्या कुटुंबाने त्यांना आमच्याकडे पाठवले होते. ते आल्यावर मला विशेष काही वाटले नाही. त्यांनाच माझे जास्त कौतुक वाटत होते. त्यांनी मला एक मंत्र दिला. तो मंत्रजप करतांना त्यांचे स्मरण करण्यास सांगितले. मी कुठेही असले, तरी स्मरणाने त्यांची शक्ती आणि आशीर्वाद मला मिळत राहील, असे सांगितले. ते गेल्यानंतर मी त्यांनी सांगितलेला मंत्रजप प्रयोग म्हणून करून पाहिला. दोन दिवस मधे मधे त्यांची आठवण यायची. त्यानंतर मी त्यांना विसरून गेले.

१ क १ आ. एका संतांची दीक्षा घेऊन नामजप करतांना घुसमटल्यासारखे होत असल्याने नामजप करणे सोडून देणे

साधनेत येण्यापूर्वी मी माझ्या आईसह एका संतांची दीक्षा घेतली होती. त्यांनी सांगितलेला नामजप करण्याचा मी तीन दिवस प्रयत्न केला; पण माझा तो नामजप नीट झाला नाही आणि मला त्यात आनंदही मिळाला नाही. मला तो नामजप करतांना घुसमटल्यासारखे व्हायचे. मी नामजप करणे सोडून दिले. मी आईला सांगितले, ‘‘मी तो नामजप करणार नाही. त्यांची कृपा नाही झाली तरी चालेल.’’

१ क १ इ. स्वामी विवेकानंदांचे ग्रंथ

साधनेत येण्यापूर्वी मी स्वामी विवेकानंदांचे ग्रंथ वाचत होते. त्यातील एक वाक्य माझ्या मनात ठसले, ‘मनुष्यजन्माचे खरे ध्येय म्हणजे मोक्षप्राप्ती.’

१ क १ ई. एक हिंदी काव्य सुचणे आणि त्या काव्याने प.पू. डॉक्टर स्वतःसाठी काय आहेत, ते गुरु आहेत, याची जाणीव आतून होणे

प.पू. डॉक्टरांची भेट झाल्यावर ‘हे संत आहेत’, हीच जाणीव मला नव्हती. ‘केवढ्या मोठ्या विभूतीसमवेत मी आहे’, याची कल्पना नव्हती. त्या वेळी काहीच ध्यानीमनी नसतांना मला एक हिंदी काव्य सुचले. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे काव्य आगगाडीत चालीसकट सुचले. मी आतापर्यंत हिंदीमधे कधीच काव्य लिहिलेले नाही. त्या काव्याने ‘प.पू. डॉक्टर माझ्यासाठी काय आहेत, ते माझे गुरु आहेत’, याची जाणीव आतून झाली. ईश्वराने त्यांच्याविषयी आत्मियता निर्माण केल्याचे जाणवले. हा जीव ईश्वरी तत्त्वाशी या जन्मात खर्‍या अर्थाने त्या वेळी जोडला गेला, असे मला वाटले.

गुरुकी सेवा, गुरुकी कृपा हम उसीमें खो गये ।

हम उनके, वो हमारे अब हो गये ।। धृ. ।।

एक एक पल जो बिताया, खामोशी का साया ।

वो पल पल अब उन्होंने हर खुशीसे भर दिये ।

हम उनके, वो हमारे अब हो गये ।

गुरु की सेवा, गुरुकी कृपा हम उसी में खो गये ।। १ ।।

हम न थे हमारे, न हो सके थे किसीके ।

उन्होने जो अपनाया, हम सभीके हो गये ।

हम सभीके, सब हमारे अब हो गये ।

गुरु की सेवा, गुरुकी कृपा हम उसी में खो गये ।। २ ।।

आज तक जो ढुंढा, इन चरणोंमें पाया ।

अब और कहीं नही जाना, करू इन चरणोंकी सेवा ।

उन्होंने जो अपनाया, हम तो पागल हो गये ।

हम तो दिलसे दिलोजाँसे उनके हवाले हो गये ।। ३ ।।

प.पू. डॉक्टरांच्या सान्निध्यात अनेक सेवा शिकायला मिळाल्या. (ख्रिस्ताब्द १९९९ ते २००२) त्यांनी मला साधना आणि साधकत्व शिकवून घडवले. भरभरून प्रेम दिले.

१ क १ उ. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांच्या आश्रमात जायला मिळणे आणि विविध अनुभूतीतिथे येणे

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांच्या आश्रमाचे चित्रीकरण आणि त्यांच्या सुवर्णजयंतीच्या कार्यक्रमाचे ध्वनीचित्रीकरण करण्याच्या निमित्ताने मला त्यांच्या आश्रमात जाण्याची संधी मिळाली. त्यांनी धर्मासाठी केलेला त्याग, अखंड आयुष्य समष्टीसाठी वेचून प्रत्यक्ष खोली भरून जाईल इतके केलेले विपुल लिखाण पाहून भरून आले. तेथील साधकांचा त्यांच्या गुरूंप्रतीचा भाव पाहून मी थक्क झाले. आम्ही चित्रीकरणासाठी गेल्यावर गुरुदेव प्रत्येक कृतीत आमच्या समवेत असल्याची अनुभूती आली. तसेच ते विभूती घालून उपाय करत आहेत, ही अनुभूतीआली. तेव्हा मनातील विचारांचे प्रमाण न्यून झाले, काळ्या शक्तीचे आवरण न्यून झाले.

१ क १ ऊ. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या सहवासामुळे झालेले लाभ

योगतज्ञ दादाजी सनातन संस्थेच्या रक्षणासाठी देवद आश्रमात येऊन अनुष्ठान करायचे. त्या वेळी ते आमच्याशी इतक्या सहजतेने बोलायचे की, त्यांच्याविषयी त्या क्षणी आत्मियता निर्माण व्हायची. प.पू. डॉक्टरांनी मला होणार्‍या आध्यात्मिक त्रासाविषयी त्यांना सांगायला सांगितले होते. तसे मी योगतज्ञ दादाजी यांना सांगितल्यावर ‘ते सूक्ष्म रूपात माझ्या समवेत आहेत’, असे जाणवते.

१ क १ ए. प.पू. पांडे महाराजांच्या सहवासात ‘आनंदाचे डोही, आनंद तरंग’, असे वाटणे आणि वाईट शक्तींचा त्रास अल्प होऊन सकारात्मकता आल्याचे जाणवणे

प.पू. पांडे महाराजांनी सख्ख्या आजोबांपेक्षाही अनेक पटींनी मला प्रेम दिले. त्यांनी माझ्यावर आणि सौ. शुभांगीवर अनेक आध्यात्मिक प्रयोग करून आम्हाला त्रासाशी लढण्यास साहाय्य केले. प.पू. महाराज माझ्यासाठी अधिक मोठा आधार आहेत. मला त्यांची स्थुलातील सेवा करण्याची संधी मिळाली. त्यांच्या सहवासात असतांना आनंदाचे डोही, आनंद तरंग असे वाटते. वाईट शक्तींचा त्रास अल्प होऊन सकारात्मकता आल्याचे जाणवले. त्यांच्या सेवेत त्रासाचे प्रमाण न्यून होऊन प्राणशक्ती वाढणे, उत्साह जाणवणे, दिवसभर उत्साहाने सेवा करू शकणे, असे पालट जाणवले. त्या वेळी संतांची सेवा करण्याचे महत्त्व माझ्या लक्षात आले.

१ क १ ऐ. प.पू. देशपांडेकाका, पू. निकमतात्या, पू. पेठेआजी, पू. फडकेआजी, पू. सत्यवानदादा, पू. राजेंद्र शिंदे या सर्व संतांचे मार्गदर्शन, त्यांचा सहवास आणि प्रेम मला मिळाले.

१ ख. प्रार्थना

पू. अनुताईची प्रार्थना करतांनाची एक भावपूर्ण मुद्रा

पू. अनुताईची प्रार्थना करतांनाची एक भावपूर्ण मुद्रा

प.पू. डॉक्टर, आपण मला कोठून कुठपर्यंत आणलेत आणि यापुढेही घेऊन जाणारच आहात. आपण मला सर्वच दिलेत. माझ्या आयुष्यातील मला त्रास देणार्‍या मांत्रिकाची शक्ती आपण न्यून केली. अनेक जन्मांचे माझे संचित आणि प्रारब्ध संपवत आहात. आपण माझ्याकडून इतकी वर्षे साधना करवून घेतलीत. आपण मला सहन केलेत, समजून घेतलेत. माझ्या साधनेच्या दृष्टीने आवश्यक ते सर्वच मला दिलेत. कसलीच कसर ठेवली नाही. परमेश्वरा, आपण माझी योग्यता नसतांना माझ्यावर इतके भरभरून प्रेम केले. माझ्या आयुष्याचे सोने केलेत. आज मी जिवंत आहे, ही आपलीच कृपा आहे. माझा आपल्या चरणी कृतज्ञतेचा आणि शरणागतीचा भाव सतत राहू दे. आपली अखंड कृपादृष्टी राहू दे. आपल्याला अपेक्षित तेच माझ्या हातून घडू दे. या जिवाला आपले माध्यम बनवून आपल्या चरणी कायमचे लीन करून घ्या, हीच आपल्या चरणी प्रार्थना !’

– (पू.) कु. अनुराधा वाडेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.१०.२०११)

लेखाचा दुसरा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा !

Leave a Comment