सनातन संस्था निर्मित श्रीकृष्णाच्या सात्त्विक चित्राचा सूक्ष्मातील प्रयोग

Article also available in :

देवतांची शास्त्रीय माहिती देणारी आणि परिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारी सनातन संस्था

प्रयोगाचा उद्देश

‘सनातन संस्थेच्या साधक-कलाकर्ती सौ. जान्हवी शिंदे यांनी, इतर कलाकार-साधकांच्या साहाय्याने आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली देवतांची सात्त्विक चित्रे निर्माण केली आहेत. त्यामध्ये एखाद्या देवतेची सूक्ष्मातील स्पंदने जाणून त्याप्रमाणे त्या देवतेचे चित्र साकार करण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रातील देवतेचा आकार, तिचे अवयव, तिच्या अंगावरील दागीने, तिची शस्त्रे इत्यादी घटक देवतेच्या प्रत्यक्षातील त्या त्या घटकांशी किती प्रमाणात जुळतात, यावरून त्या चित्राची एकूण सत्यता, म्हणजेच सात्त्विकता ठरते. प्रत्येक देवतेचे चित्र निर्माण झाल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले त्या चित्राची सात्त्विकता सूक्ष्मातून जाणून ती अगदी दशांश आकड्यापर्यंत सांगतात, उदा. ३१.७ टक्के. ‘त्यांनी सांगितलेल्या सात्त्विकतेनुसार प्रत्यक्षात त्या देवतेच्या चित्राकडे पाहून अनुभूती येतात का आणि त्या देवतेचा नामजप केल्यास येणार्‍या अनुभूती देवतेच्या चित्राकडे पाहून आलेल्या अनुभूतींशी जुळतात का ?’ हे पहाणे’, हा या प्रयोगाचा उद्देश आहे.

‘आतापर्यंत काही बुद्धीप्रामाण्यवादी ‘सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या देवतांच्या सात्त्विक चित्रांतील देवतातत्त्वाचे प्रमाण खरे कशावरून ?’, असा प्रश्‍न विचारायचे. ‘ते सत्य असल्याचा अनुभव कसा घ्यायचा ?’, याची पद्धत सद्गुरु डॉ. गाडगीळ यांच्या या लेखावरून लक्षात येईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

 

१. श्रीकृष्णाचे २९.३ टक्के श्रीकृष्णतत्त्व असलेले चित्र

श्रीकृष्णाचे २९.३ टक्के श्रीकृष्णतत्त्व असलेले चित्र (वर्ष २०१२)

१ अ. श्रीकृष्णाच्या चित्राकडे पहाणे

१. ‘प्रयोगाच्या आरंभी माझी सूर्यनाडी कार्यरत होती.

२. मी श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहू लागल्यावर मला अनाहतचक्रावर थंडावा जाणवू लागला आणि २ – ३ मिनिटांतच माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली. सुषुम्ना नाडी कार्यरत झाल्यावरच स्पंदने खालील मणिपूरचक्राकडे गेली.

३. त्यानंतर मला क्रमाने माझ्या मणिपूर, स्वाधिष्ठान आणि मूलाधार या चक्रांवर थंडावा जाणवू लागला.

४. स्पंदने मूलाधारचक्रापर्यंत पोचल्यावर माझे ध्यान लागू लागले.

५. ध्यान लागत असतांनाही मी जागृत रहाण्याचा प्रयत्न केल्यावर माझ्या लक्षात आले, ‘माझी कुंडलिनीशक्ती जागृत होत आहे.’

६. कुंडलिनीशक्ती जागृत होतांना मला माझ्या पाठीमध्ये माकडहाडाच्या ठिकाणी थंड स्पंदने जाणवू लागली आणि ती पाठीतून वर वर चढू लागली. त्यामुळे मला पाठीत थंडावा जाणवू लागला. पुढे ती स्पंदने मानेत, त्यानंतर डोक्याच्या पाठीमागे आणि शेवटी सहस्रारचक्रावर जाणवली. त्यामुळे ‘कुंडलिनीशक्ती मूलाधारचक्रातून वर चढतांना पाठीतून चढते आणि तिचा प्रवास कसा असतो’, हे कळले. ती शक्ती असली, तरी तिच्यामध्ये थंडावा असतो, हेही कळले.

७. सहस्रारचक्रापर्यंत गेल्यावर कुंडलिनीशक्ती पुन्हा खाली आली.

८. ‘कलियुगातील सध्याचा काळ हा आपत्काळही आहे, तसेच पुढे येणार्‍या चांगल्या काळाअगोदरचा संधिकाळही आहे. अशा या काळात धर्मसंस्थापनेसाठी श्रीकृष्ण ही पोषक देवता आहे. ती साधना करवून घेणारी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी पोषक अशी देवता आहे. त्यामुळे श्रीकृष्णाच्या चित्राने मूलाधारचक्रापर्यंत स्पंदने पोचवून कुंडलिनीशक्ती जागृत करून दिली’, असे मला जाणवले.

९. श्रीकृष्णाच्या चित्रातील स्पंदनांशी पूरक अशी मुद्रा शोधल्यावर ती ‘अंगठ्याच्या मुळाशी तर्जनीचे टोक लावणे’ ही आकाशतत्त्वाशी संबंधित मुद्रा आली. ती मुद्रा केल्यावर मला थेट सहस्रारचक्रावर स्पंदने जाणवू लागली.

१०. माझ्या शरिराभोवती संरक्षककवच निर्माण झाल्याचे मला जाणवले. त्यानंतर माझे ध्यान लागू लागले. यावरून लक्षात आले, ‘सध्याच्या आपत्काळात श्रीकृष्णाशी अनुसंधान ठेवणे आणि आकाशतत्त्वाची मुद्रा करणे, हे उपाय केल्यास आपले रक्षण होणार आहे.’ परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना हेच उपाय करायला सांगितले.

११. प्रयोगाच्या आरंभी माझ्या नाडीचे ठोके ५४ होते. प्रयोगानंतर ते तेवढेच राहिले.

१ आ. ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप करणे

१ आ १. श्रीकृष्णाच्या नामजपातून अनुभवलेली स्पंदने सनातन संस्थेच्या श्रीकृष्णाच्या सात्त्विक चित्राच्या स्पंदनांशी अगदी तंतोतंत जुळणे

आश्‍चर्य म्हणजे या नामजपाच्या प्रयोगामध्ये जाणवलेली स्पंदने श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून केलेल्या प्रयोगातील स्पंदनांशी अगदी तंतोतंत जुळली. स्पंदनांचा जाणवलेला क्रम, कुंडलिनीशक्ती जागृत होणे, तसेच पूरक मुद्रा आणि तिच्यामुळे जाणवलेली स्पंदने हेही सारखेच होते.

१ आ २. नामजप करतांना जाणवलेली इतर काही वैशिष्ट्ये

अ. श्रीकृष्णाचा नामजप करतांना जेव्हा नामजपाची स्पंदने मूलाधारचक्रापर्यंत पोचली, तेव्हा माझे ध्यान लागू लागले. श्रीकृष्णाच्या चित्राकडे बघतांनाही तसेच झाले; पण नामजप करतांना तो डोळे मिटून करत असल्याने मला ध्यानावस्थेतून जागृतावस्थेत येण्यासाठी पुष्कळ प्रयत्न करावे लागले. नामजपाच्या स्पंदनांचा पुढील प्रवास कळण्यासाठी ते आवश्यक होते.

आ. नामजप करतांना आकाशतत्त्वाची पूरक मुद्रा केल्यावर जेव्हा शरिराभोवती संरक्षककवच निर्माण झाले, तेव्हा ‘श्रीकृष्णाच्या नामजपाच्या कवचामध्ये आपण आहोत’, असे मला जाणवले.

१ इ. चित्रामधील श्रीकृष्णाच्या कुंडलिनीचक्रांवर जाणवलेली स्पंदने

मी ‘चित्रातील श्रीकृष्णाच्या आज्ञाचक्रापासून पुढील प्रत्येक चक्रावर लक्ष केंद्रित केल्यावर काय जाणवते ?’, असा प्रयोग केला. श्रीकृष्णाचे चित्र कमरेपर्यंतच असल्याने मणिपूरचक्रापर्यंतच प्रयोग करता आला. मला पुढे दिलेल्या सारणीप्रमाणे स्पंदने जाणवली.

१ इ १. श्रीकृष्णाच्या चित्रामधील कुंडलिनीचक्रांवर
जाणवलेल्या स्पंदनांचा क्रम आध्यात्मिकदृष्ट्या उलट जाणवण्याचे कारण

येथे ‘चक्रांच्या संदर्भात जाणवलेल्या स्पंदनांचा क्रम उलट कसा ?’, असा प्रश्‍न कुणालाही पडेल. त्याचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे.

कुंडलिनीचक्र जाणवलेली स्पंदने
१. आज्ञाचक्र शक्ती
२. विशुद्धचक्र शक्ती आणि आनंद
३. अनाहतचक्र आनंद
४. मणिपूरचक्र शांती

मनुष्यामध्ये मूलाधारचक्र ते सहस्रारचक्र असे गेल्यास आध्यात्मिकदृष्ट्या त्या चक्रांचा स्तर उच्च उच्च होत जातो आणि सहस्रारचक्रावर शांतीची स्पंदने जाणवतात. याचे कारण म्हणजे मनुष्याचा प्रवास ‘पिंडी ते ब्रह्मांडी’, असा वरच्या दिशेने असतो. देवतेच्या चित्रामध्ये मात्र ब्रह्मांडातून देवतेची स्पंदने येत असल्याने चक्रांचा आध्यात्मिकदृष्ट्या स्तर सहस्रार ते मूलाधार असा उच्च उच्च होत जातो. त्यामुळेच देवळात एखाद्या देवतेचे दर्शन घेतांना तिच्या चरणांकडे पाहिल्यावर आपल्याला शांतीची स्पंदने जाणवतात, तर तोंडवळ्याकडे (चेहर्‍याकडे) पाहिल्यावर शक्ती जाणवते; म्हणून देवाचे दर्शन घेतांना दर्शन घेत घेत मुखाकडून चरणांकडे यायचे असते आणि तिथे स्थिर व्हायचे असते. त्यामुळे आपल्याला शांती मिळते.

१ ई. निष्कर्ष

श्रीकृष्णाच्या २९.३ टक्के सात्त्विकता असलेल्या चित्रामधील स्पंदने आणि श्रीकृष्णाच्या नामजपाची स्पंदने एकमेकांशी जुळतात.’

– सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (३१.१०.२०१८)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment