पूरग्रस्त क्षेत्रातील नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती
पावसाळ्यात अतीवृष्टी झाल्यास जलप्रलय (महापूर) येतो. अन्य ऋतूंमध्येही ढगफुटी झाल्यास जलप्रलय येऊ शकतो. वर्ष २०१९ मध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांतील अनेक शहरे अतीवृष्टीमुळे जलमय झाली. बर्याच गावांना जोडणारे रस्ते खचल्याने वाहतूक ठप्प झाली. सहस्रो नागरिकांची घरे पाण्याखाली गेली. काही ठिकाणी पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की, त्यात माणसे आणि गुरे-ढोरे, गाड्याही वाहून गेल्या. पेट्रोल, डिझेल, दूध आदी जीवनावश्यक वस्तू मिळणे दुर्लभ झाले. अकस्मात उद्भवलेल्या या नैसर्गिक आपत्तीने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले.
‘भविष्यात अशी स्थिती पुन्हा कधी उद्भवू शकेल ?’, हे सांगता येत नाही. त्यामुळे ‘पूरग्रस्त क्षेत्रांतील नागरिकांनी कशा प्रकारे पूर्वसिद्धता करावी ?’, या संदर्भातील मार्गदर्शक सूत्रे पुढे दिली आहेत. मागील लेखात आपण ‘पूरग्रस्त क्षेत्रात नवीन घराचे बांधकाम करत असल्यास काय करावे ?’, ‘महत्त्वाची कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित रहाण्यासाठी काय करावे ?’ याची माहिती पाहिली. आता पुढील सूत्रे पाहू.
भाग १ वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://www.sanatan.org/mr/a/73657.html
४. ‘पाणी, अन्नधान्य आदींचा तुटवडा भासू नये’, यासाठी काय करावे ?

४ अ. शुद्ध जलाची टंचाई निर्माण झाल्यास पाणी साठवण्यासाठी करावयाची पर्यायी व्यवस्था !
महापूर आल्यानंतर वीज रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर) पाण्यात गेल्यामुळे विजेचा तुटवडा निर्माण होतो. वीजेअभावी शुद्ध जलाची टंचाई निर्माण होते. मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पाण्याचे टँकरही पोचणे अवघड असते. परिणामी पिण्याचे पाणी मिळू शकत नाही. त्या दृष्टीने पुढील सिद्धता करता येईल.
१. अतिरिक्त पाण्याची साठवणूक करण्यासाठी मोठी टाकी, भांडी आणि पिंपे असावीत.
२. अनेक घरांच्या आगाशीवर पाणी साठवण्याची टाकी असते. शक्य असल्यास त्याच टाकीला अतिरिक्त टाकी जोडून पाण्याची साठवणूक करता येते, जेणेकरून अधिक कालावधीपर्यंत पाणी साठून राहू शकेल.
३. घरांच्या छतावरून जेथे पावसाचे पाणी खाली येते, तेथे छपराला पन्हाळी लावून स्वच्छ पाणी वापरता येईल आणि साठवूनही ठेवता येईल.
४. उपलब्ध असलेले पाणी काटकसरीने वापरावे. पाण्याची काटकसर करण्यासाठी जेवणात ताटे आणि वाट्या यांऐवजी पत्रावळी किंवा कागदी (डिस्पोजेबल) ताटल्या, वाट्या, चमचे आदींचा वापर करावा.
४ आ. पाणी शुद्ध करण्याच्या पद्धती
१. पावसाळ्यात, तसेच पूरस्थितीत गढूळ पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे पाणी उकळून, गाळून पिणे, तुरटीचा उपयोग करणे, आदी पाणी शुद्ध करण्याच्या घरगुती पद्धतींचा वापर करावा.
२. नारळाची करवंटी जाळल्यावर तिचे जे तुकडे उरतात, ते पाण्यात घातल्यावर पाण्याचे नैसर्गिकरित्या निजर्तुंकीकरण होते.
३. बर्याच औषधालयांमध्ये ‘वॉटर डिसइन्फेक्शन टॅबलेट्स’ (पाणी शुद्धीकरण करणार्या गोळ्या) मिळतात. २० लिटर पाण्यात याची एक गोळी घालून ठेवल्यानंतर अर्ध्या घंट्याने पाणी आपोआप निर्जंतुक होते.
४. सध्या बाजारात ‘फिल्टर वॉटर बॉटल’ मिळतात. या बाटल्यांमध्ये बसवलेल्या फिल्टरची १ सहस्र लिटर पाणी शुद्ध करण्याची क्षमता असते. त्या बाटलीत अशुद्ध पाणी घातले की, फिल्टरमुळे पाण्यातील जिवाणू, क्षार आदी नष्ट होऊन पाणी शुद्ध होते. आपत्कालीन स्थितीत पिण्याचे पाणी उपलब्ध नसेल, तर पाणी शुद्धीकरणासाठी हा पर्याय वापरता येईल.
४ इ. धान्य उन्हात वाळवून हवाबंद प्लास्टिक पिशवीत ठेवणे
पूरस्थितीत भाज्या, फळे यांचा पुरवठा होत नाही. त्यामुळे धान्य, कडधान्य आदींची अगोदरच साठवणूक करावी. यासाठी ते व्यवस्थित निवडून उन्हात वाळवून घ्यावे. ‘धान्याला कीड लागू नये’, यासाठी त्यात औषध घालून ते चांगल्या गुणवत्तेच्या हवाबंद प्लास्टिक पिशवीत घालावे. या पिशव्या मोठ्या ड्रममध्ये ठेवून तो उंच ठिकाणी (उदा. पोटमाळा) ठेवावा. धान्याचे ड्रम वारंवार उघडल्यास औषधाचा परिणाम टिकून रहात नाही, तसेच बाहेरील हवा लागून धान्य खराब होऊ शकते. त्यामुळे एका मासासाठी आवश्यक धान्य एकाच वेळी काढून घ्यावे.
पिठात किडे होत असल्याने त्यांची वरील प्रकारे साठवणूक करता येत नाही.
४ ई. भाजीपाल्याची साठवणूक करणे
पूरस्थितीमध्ये वाहतूक बंद झाल्यामुळे भाजीपाला, दूध, तसेच खाद्यपदार्थ उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे त्यांची अगोदरच साठवणूक करणे आवश्यक आहे.
१. चांगले वाळलेले कांदे, लसूण, सुरण आदी भाज्या १ – २ मासांपर्यंत चांगल्या रहातात. या भाज्या कोरड्या ठिकाणी ठेवाव्यात.
२. वांगी, गवारी, कोथिंबीर, कडीपत्ता, मिरच्या, मेथी आदी भाज्या कडक उन्हात ठेवून पूर्णतः वाळवून घ्याव्यात. त्यातील पाण्याचा अंश पूर्ण जाण्यासाठी त्या ५ – ६ दिवस उन्हात ठेवाव्या लागतात. त्यानंतर या भाज्या कोरड्या ठिकाणी ठेवाव्यात. त्या शीतकपाटात ठेवण्याची आवश्यकता नाही. अशा सुकलेल्या भाज्या १ – २ मासापर्यंत चांगल्या राहू शकतात. या भाज्या वापरण्यापूर्वी काही वेळ पाण्यात ठेवल्यास पाणी शोषून घेतात आणि त्या पूर्वीप्रमाणे थोड्या टवटवीत होतात.
३. कारले, बटाटे यांच्या चकत्या करून त्यांना मीठ लावून उन्हात वाळवावे. असे केल्यास त्या काही मास टिकू शकतात.
४. कोहळा, दुधी भोपळा आदी भाज्या वाळवून त्यांचे सांडगे करून ठेवावेत. पुढे या सांडग्यांची भाजी किंवा आमटी करता येते.
४ उ. कोरडा आणि टिकाऊ खाऊ घरात ठेवा !
लोणचे, चटणी, मुरांबा आदी टिकाऊ पदार्थ, तसेच मसाले, तेल आदींचा हवाबंद (‘एअर टाईट’) डब्यांमध्ये साठा करून ठेवता येईल. यासह दुधाची पावडर, तसेच कोरडा आणि टिकाऊ खाऊ घरात ठेवावा. कार्यालयात अथवा अन्य ठिकाणी जातांनाही खाऊ समवेत ठेवावा. विपरित परिस्थितीमुळे घरी पोचण्यास अडचण येत असेल, तर निदान हा खाऊ खाऊन काही वेळ निभावून नेता येईल.
५. नियमित घेण्याच्या औषधांचा थोडा साठा करून ती सुरक्षित ठिकाणी ठेवणे
औषधे संपल्यास ती आयत्या वेळी मिळवण्यामध्ये अनेक अडचणी येतात. नित्य वापरातील औषधे (उदा. रक्तदाबावरील गोळ्या, मधुमेहावरील औषधे, ताप, सर्दी, खोकला, सांधेदुखी यांवरील औषधे) थोड्या अधिक प्रमाणात ठेवावीत. अधिक काळपर्यंत त्यांचा वापर करता येईल, या दृष्टीने उशिरा कालबाह्य होणार्या दिनांकाच्या (‘लाँग एक्सपायरी’च्या) औषधांचा साठा करावा.
‘ही औषधे सुरक्षित रहावीत’, यासाठी ती प्लास्टिकच्या पिशवीत घालून उंचावर ठेवावीत. असे करतांना ‘त्यांच्यावर थेट सूर्यप्रकाश पडणार नाही’, याची काळजी घ्यावी. औषध इंजेक्शनद्वारे (‘इन्जेक्टेबल’ (उदा. ‘इन्सुलिन’)) घ्यायचे असल्यास ते शीतकपाटात ठेवणे क्रमप्राप्त असते. शीतकपाटाविना औषधे टिकून रहावीत, यासाठी ती ‘आईस बॅग’मध्ये (बर्फाच्या पिशवीत) ठेवावीत. जेणेकरून आपत्कालीन स्थितीत घरातून बाहेर पडावे लागले, तर काही काळ तरी ती टिकून राहू शकतील.
(प्रस्तुत लेखमालिकेचे सर्वाधिकार (कॉपीराईट) ‘सनातन भारतीय संस्कृती संस्थे’कडे संरक्षित आहेत.)
वाचकांना आवाहन !
महापुराच्या दृष्टीने काही मार्गदर्शक सूत्रे येथे दिली आहेत. या विषयाच्या अनुषंगाने वाचकांना काही सूत्रे सुचवायची असल्यास त्यांनी ती खालील संगणकीय किंवा टपाल पत्त्यावर पाठवावीत, ही विनंती ! यामुळे हा विषय समाजापुढे सखोलपणे मांडण्यास साहाय्य होईल.
संगणकीय पत्ता : [email protected]
टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१