‘आरनमुळा कण्णाडी’ म्हणजे ‘देवाच्या मुखदर्शनासाठी बनवलेला वैशिष्ट्यपूर्ण आरसा’ !

Article also available in :

देवळांमध्ये देवतेचे पूजन करतांनाच्या उपचारांपैकी ‘दर्पण’ या उपचारात देवतेला आरसा दाखवतात किंवा आरशातून सूर्याचे किरण देवतेकडे परावर्तित करतात. यासाठी केरळमध्ये धातूपासून बनवलेले वैशिष्ट्यपूर्ण आरसे वापरण्याची परंपरा आहे. हे आरसे ‘आरनमुळा कण्णाडी’ या नावाने प्रसिद्ध आहेत. हा आरसा केरळमधील संस्कृतीमध्ये सांगितलेल्या ‘अष्टमंगल’ वस्तूंपैकी, म्हणजे विवाहादी पवित्र धार्मिक विधींमध्ये वापरण्याच्या ८ पवित्र वस्तूंपैकी एक आहे. हे आरसे समृद्धी आणि भाग्यकारक मानले जातात, तसेच ते म्हणजे प्राचीन भारतातील विकसित धातूविज्ञानाचे एक उत्तम उदाहरण आहे. या आरशांच्या निर्मितीची प्रक्रिया आणि त्यातील धातूंच्या मिश्रणाचे प्रमाण हे पूर्वापार काळापासून गुप्त ठेवण्यात आले आहे.

या आरशाविषयी माहिती मिळवण्याच्या उद्देशाने २१.३.२०१९ या दिवशी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’चे साधक हे आरसे जेथे बनतात तेथे, म्हणजे केरळमधील पत्तनम्तिट्टा जिल्ह्यातील आरनमुळा या गावी गेले. तेथे त्यांनी ‘श्रीकृष्ण हँडिक्राफ्ट सेंटर’ या आरसे बनवणार्‍या कारखान्याला भेट दिली. या कारखान्याचे मालक श्री. के.पी. अशोकन् यांचा ‘आरसे बनवणे’ हा पिढीजात व्यवसाय आहे. ते अशा प्रकारचे आरसे बनवणार्‍या उद्योजकांच्या ‘विश्‍वब्राह्मण मेटल मिरर निर्माण सोसायटी’ या संघटनेचे सक्रीय सदस्य आहेत. त्यांनी हे वैशिष्ट्यपूर्ण आरसे बनवण्याच्या संपूर्ण प्रक्रियेची उद्बोधक आणि उपयुक्त माहिती दिली.

 

१. ‘आरनमुळा कण्णाडी ’ म्हणजे काय ?

‘आरनमुळा’ हे एका गावाचे नाव आहे, तर आरशाला मल्याळम् भाषेत ‘कण्णाडी’, असे म्हणतात. त्यामुळे ‘आरनमुळा’ या गावात बनवल्या जाणार्‍या धातूच्या आरशाला ‘आरनमुळा कण्णाडी’ हे नाव पडले. केरळमधील पत्तनम्तिट्टा जिल्ह्यात ‘पम्बा’ या नदीकिनारी ‘आरनमुळा’ हे गाव आहे. तेथील पार्थसारथी मंदिर सुप्रसिद्ध आहे. या मंदिराच्या आसपास असलेल्या अनेक दुकानांमध्ये ‘आरनमुळा कण्णाडी’ हे वैशिष्ट्यपूर्ण आरसे पहायला मिळतात. या आरशांचा प्रतिबिंबदर्शक भाग तांबे आणि कथील या धातूंच्या विशिष्ट प्रमाणातील मिश्रणावर विशिष्ट प्रक्रिया करून बनवलेला असतो, तर या आरशाचे कोंदण (फ्रेम) पितळ्याचे असते. या आरशांचे वैशिष्ट्य म्हणजे एखादी वस्तू या आरशाला टेकवून ठेवली, तर ती वस्तू आणि आरशात दिसणारे त्या वस्तूचे प्रतिबिंब अगदी एकमेकांलगत दिसतात (त्यांत अंतर नसते). याचे कारण म्हणजे या आरशात वस्तूचे प्रतिबिंब आरशाच्या पृष्ठभागावर दिसते. सर्वसाधारण आरशांमध्ये एखाद्या काचेला मागील बाजूस प्रतिबिंबदर्शक रसायनाचा लेप लावलेला असतो. त्या रासायनिक लेपामध्ये वस्तूचे प्रतिबिंब दिसते. त्यामुळे अशा आरशाला एखादी वस्तू टेकवून ठेवली, तर ती वस्तू आणि तिचे प्रतिबिंब यांमध्ये आरशाच्या काचेच्या जाडीएवढे अंतर रहाते. प्रतिबिंब दिसण्यातील ही त्रुटी ‘आरनमुळा कण्णाडी’मध्ये नाही. हे या आरशाचे एक अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. (छायाचित्र क्र. ३)

शंखाच्या आकारातील ‘आरनमुळा कण्णाडी’

 

२. आरनमुळा कण्णाडी आरशांचा इतिहास

उत्तमोत्तम वस्तू देवासाठी वापरण्याची हिंदूंची परंपरा आहे. ‘देवतापूजनातील ‘दर्पण’ या उपचारात वापरण्यात येणारा आरसाही उत्तमच असला पाहिजे’, ही भाविकांची तळमळ आणि देवतेने केलेली कृपा यांतून ‘आरनमुळा कण्णाडी’ या आरशाची निर्मिती झाली. हे आरसे बनवण्याचा व्यवसाय करणारे श्री. के.पी. अशोकन् यांनी या आरशांच्या निर्मितीचा इतिहास पुढीलप्रमाणे सांगितला.

त्यांचे पूर्वज ‘पार्थसारथी’ या श्रीकृष्णाच्या मंदिराच्या कामासाठी आपले मूळ गाव सोडून आरनमुळा या गावी येऊन वसले. त्यांच्या पूर्वजांपैकी एकाला स्वप्नात धातूचा आरसा बनवण्याचे ज्ञान मिळाले. त्यानुसार प्रयत्न करून त्यांनी आरसा बनवला आणि तेव्हापासून धातूचे आरसे बनवणे आरंभ झाले. सध्या हे आरसे विविध आकारांत उपलब्ध असले, तरी त्यांचे शंख, पद्म आदी काही परंपरागत आकार आणि त्यांची लांबी-रूंदी यांचे प्रमाण ठरलेले आहे.

 

३. आरनमुळा कण्णाडी (धातूचा आरसा) बनवण्याची प्रक्रिया

आरनमुळा कण्णाडी बनण्याची प्रक्रिया साधारणपणे पुढीलप्रमाणे आहे.

३ अ. रेखांकन करणे

आरनमुळा कण्णाडीमध्ये प्रतिबिंब दिसणारा धातूचा भाग (आरसा) आणि हा आरसा ज्यात बसवतात ते पितळेचे कोंदण (फ्रेम), असे दोन भाग असतात. या दोन्ही भागांचे कागदावर रेखांकन केले जाते.

चिकणमाती, गायीचे शेण आदींपासून आरशासाठी साचा बनवण्याची प्रक्रिया

३ आ. रेखांकनानुसार साचे बनवणे

कागदावर केलेल्या रेखांकनानुसार आरसे बनवण्यासाठी चिकणमाती, गायीचे शेण, भुसा, काथा, सुती कापड आदींपासून साचे बनवले जातात. (छायाचित्र क्र. १)

तांबे आणि कथिल वितळवून बनवलेले मिश्रण साच्यामध्ये ओतून बनवलेला धातूचा गोल

३ इ. साच्यामध्ये धातूचे वितळवलेले मिश्रण ओतून आरसा आणि त्याचे कोंदण (फ्रेम) बनवणे

आरशाचा प्रतिबिंब दिसणारा भाग बनवण्यासाठी साच्यामध्ये योग्य प्रमाणात घेतलेले तांबे आणि कथील वितळवून बनवलेले मिश्रण ओतले जाते, तर आरशाच्या कोंदणासाठी साच्यामध्ये वितळवलेले पितळ ओतले जाते. हे मिश्रण थंड झाल्यावर बाजूची माती काढून टाकून धातूचा भाग स्वच्छ केला जातो. (छायाचित्र क्र. २)

३ ई. प्राथमिक स्वरूपाचा आरसा आणि कोंदण यांना परिश्रमपूर्वक अंतिम रूप देणे

प्राथमिक स्वरूपातील आरसा काही घंटे ‘पॉलीश पेपर’वर सतत घासून त्यापासून प्रतिबिंब स्पष्ट दिसेल असा अंतिम आरसा बनवला जातो. हा टप्पा अत्यंत परिश्रमपूर्वक करावा लागतो.

‘आरनमुळा कण्णाडी’ला एखादी वस्तू टेकवून ठेवली, तर ती वस्तू आणि तिचे प्रतिबिंब आरशामध्ये एकमेकांलगतच दिसते !

३ उ. धातूचा आरसा पितळी कोंदणामध्ये (फ्रेममध्ये) बसवणे

धातूचा बनवलेला गोल किंवा लंबगोल आकाराचा आरसा लाख, मेण आदींच्या साहाय्याने कोंदणात (फ्रेममध्ये) बसवला जातो. अशा प्रकारे ‘आरनमुळा कण्णाडी’ तयार होतो.’

– कु. प्रियांका विजय लोटलीकर आणि श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१९.१०.२०१९)

 

साधक, वाचक आणि हितचिंतक यांना विनम्र आवाहन !

‘भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. या देशात अनेक वैशिष्ट्यपूर्ण कला, कलाकृती आणि कलाकार आहेत. त्यांच्याविषयी आपल्याला काही माहिती असल्यास ती आम्हाला अवश्य कळवा. तसेच आपल्याकडे काही वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती (उदा. ‘म्युरल’ चित्रे, ताडपत्रीवरील हस्तलिखिते इत्यादी) असल्यास आणि आपण ती आध्यात्मिक संशोधन अन् संग्रह यांसाठी देऊ इच्छित असल्यास अवश्य कळावा.’

ई-मेल : [email protected]
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment