सामगायन ऐकण्याचा आध्यात्मिक त्रास नसलेल्या आणि असलेल्या साधकांवर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी ‘थर्मल इमेजिंग (Thermal Imaging)’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी

 

१. प्रस्तावना आणि उद्देश

‘हिंदु संस्कृतीतील मंत्रपठणाचा आध्यात्मिक त्रास नसलेल्या आणि असलेल्या व्यक्तींवर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी त्यांना सामवेदातील काही मंत्रांचे पठण ऐकवण्यात आले. हे पठण ऐकत असतांना त्यांच्या कुंडलिनीचक्रांच्या ठिकाणचे तापमान मोजण्यात आले. अशा प्रकारे सामवेदातील मंत्रपठण ऐकल्यामुळे कुंडलिनीचक्रांवर होणार्‍या परिणामाचा वैज्ञानिकदृष्ट्या तुलनात्मक अभ्यास केला. त्यासाठी २६.५.२०१६ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात घेण्यात आलेल्या चाचणीत ‘थर्मल इमेजिंग (Thermal Imaging)’ या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

 

श्री. रूपेश रेडकर

२. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत आध्यात्मिक त्रास असलेल्या आणि नसलेल्या, अशा दोन साधकांची चाचणीकक्षात प्रवेश करण्यापूर्वी ‘थर्मल कॅमेर्‍या’द्वारे छायाचित्रे घेतली. त्यानंतर चाचणीकक्षात ध्वनिफितीतील सामगायनाचा आरंभ होण्यापूर्वी आणि आरंभ झाल्यानंतर साधारणपणे प्रत्येक १० मिनिटांनी त्यांची छायाचित्रे घेतली. अशा प्रकारे ‘थर्मल कॅमेर्‍या’द्वारे घेतलेल्या सर्व छायाचित्रांचे ‘थर्मल कॅमेर्‍या’ला जोडलेल्या संगणकीय प्रणालीद्वारे विश्लेषण करण्यात आले. त्या आधारे दोन्ही साधकांच्या कुंडलिनीचक्रांवर सामगायनाचा झालेला परिणाम अभ्यासता आला.

 

३. वैज्ञानिक चाचणीतील घटकांविषयी माहिती

३ अ. चाचणीत सहभागी झालेले साधक

या चाचणीत दोन साधक सहभागी झाले होते. दोन्ही साधक मागील काही वर्षांपासून नियमितपणे साधना करत आहेत. त्यांपैकी एका साधकाला तीव्र आध्यात्मिक त्रास (टीप) आहे.

टीप : आध्यात्मिक त्रास असणे, म्हणजे व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

३ आ. सामगायन

चाचणीच्या वेळी सामगायन, म्हणजे सामवेदातील मंत्रांचे पठण महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील ‘श्री योगराज वेद विज्ञान आश्रमा’च्या दोन वेदमूर्तींनी (टीप) केले. सामगायन करणार्‍या या दोन्ही वेदमूर्तींना अनेक यज्ञांमध्ये सामगायन करण्याचा अनुभव असल्याने त्यांचे सामगायन परिणामकारक आहे.

टीप : वेदांचे शिक्षण घेतलेल्या पुरोहितांना ‘वेदमूर्ती’ म्हणतात. वेदांचे शिक्षण गुरु-शिष्य परंपरेनुसार दिले जाते. एका वेदाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी साधारण १२ वर्षे लागतात.

 

४. ‘थर्मल इमेजिंग (Thermal Imaging)’ तंत्रज्ञानाची ओळख

चाचणीतील घटकाकडून (वस्तू, व्यक्ती आदींकडून) प्रक्षेपित होणारी ऊर्जा ‘थर्माेग्राफी कॅमेर्‍या’द्वारे चित्रित केली जाते. या ‘कॅमेर्‍या’त घटकाकडून प्रक्षेपित होणार्‍या ऊर्जेतील सूक्ष्म-पालट टिपण्याची क्षमता असते. घटकाकडून प्रक्षेपित होणार्‍या ऊर्जेच्या प्रमाणात होणारा पालट हा त्या घटकाच्या तापमानातील पालटानुसार होत असतो. ‘थर्माेग्राफी कॅमेर्‍या’ला जोडलेल्या संगणकीय प्रणालीमुळे घटकाकडून प्रक्षेपित होणारी ऊर्जा तिच्या प्रमाणानुसार छायाचित्रात विविध रंगांमध्ये दिसते, तसेच तिचे विश्लेषण करता येते. अशा प्रकारे ‘थर्माेग्राफी कॅमेर्‍या’द्वारे मिळालेल्या छायाचित्रांना ‘थर्मल इमेजेस’ किंवा ‘थर्माेग्राम’ असे म्हणतात. ‘थर्मल इमेजिंग (Thermal Imaging)’ या तंत्रज्ञानाचा वापर संरक्षण, संशोधन, वैद्यकीय आदी विविध क्षेत्रांत केला जातो.

४ अ. थर्मल छायाचित्रक (‘थर्मल कॅमेरा’)

या चाचणीसाठी ‘फ्लर-इ ८ (Flir-E8)’ हा थर्मल छायाचित्रक वापरण्यात आला आहे. त्याविषयी माहिती www.flir.com/instruments/ex-series या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 

५. चाचणीसंबंधाने घेतलेली दक्षता

चाचणीवर प्रभाव टाकू शकतील, असे सर्व घटक चाचणीच्या पूर्ण कालावधीत नियंत्रित रहातील, याची दक्षता घेण्यात आली होती.

५ अ. चाचणीतील साधकांचे तापमान भौतिक कारणांमुळे
(प्रकाश, हवा आदींमुळे) प्रभावित होऊ नये, याची दक्षता घेणे

ज्या कक्षात चाचणी घेतली, त्या कक्षातील प्रकाशव्यवस्था आणि तापमान चाचणीच्या आरंभापासून ते चाचणी पूर्ण होईपर्यंत एकसारखेच ठेवले होते. वातानुकूलन यंत्रात तापमान २६ अंश सेल्सिअसवर स्थिर ठेवले होते. कक्षाबाहेरील हवा, प्रकाश आणि उष्णता यांचा कक्षातील चाचणीवर परिणाम होऊ नये, यासाठी कक्ष बंदिस्त ठेवण्यात आला होता.

५ आ. चाचणीतील साधकांचे तापमान शारीरिक कारणांनी प्रभावित होऊ नये, याची दक्षता घेणे

चाचणीत सहभागी झालेल्या साधकांनी चाचणीच्या वेळी स्वतःच्या शारीरिक तापमानात पालट होऊ शकेल, अशा शारीरिक कृती, उदा. अत्यधिक शारीरिक हालचाली करणे इत्यादी टाळले होते.

५ इ. चाचणीतील मंत्रपठणाचा साधकांवर मानसिक स्तरावरील प्रभाव होऊ नये, याची दक्षता घेणे

चाचणीत सहभागी झालेल्या साधकांना सामवेदातील मंत्र, त्यांचे अर्थ, स्वर आदींविषयी कोणतीही माहिती दिली नव्हती, तसेच ते सामवेदाचे पठण प्रथमच ऐकत होते. त्यामुळे ते ऐकत असलेल्या पठणाशी त्यांचा भावनिक स्तरावरील कोणताही संबंध निर्माण झाला नव्हता. अशा प्रकारे या चाचणीतील साधकांवर मंत्रपठणाचा मानसिक स्तरावरील प्रभाव टाळता आला.

५ ई. चाचणीतील साधकांची वेशभूषा आणि बैठकव्यवस्था

चाचणीत सहभागी झालेले दोन्ही साधक एकाच सोफ्यावर; पण एकमेकांपासून थोडे अंतर ठेवून बसले होते. दोन्ही साधकांनी पांढर्‍या रंगाचे धोतर परिधान केले होते. त्यांचा कमरेपासून वरचा भाग उघडा होता. त्यामुळे ‘थर्मल कॅमेर्‍या’द्वारे साधकांच्या मणिपूर, अनाहत, विशुद्ध आणि आज्ञा या कुंडलिनीचक्रांच्या ठिकाणच्या शारीरिक तापमानातील पालट अचूकपणे चित्रित करता आले.

५ उ. चाचणीच्या वेळी वापरण्यात आलेल्या ‘फ्लर-इ ८’ या थर्मल छायाचित्रकाचे वळण (‘थर्मल
कॅमेर्‍या’चे ‘सेटींग’) आणि त्याचे व्यक्तीपासूनचे अंतर सर्व निरीक्षणांच्या वेळी एकसारखेच ठेवण्यात आले होते.

थोडक्यात सांगायचे, तर चाचणीवर प्रभाव टाकू शकतील, असे सर्व घटक चाचणीच्या पूर्ण कालावधीत नियंत्रित रहातील, याची दक्षता घेण्यात आली होती.

 

६. चाचणीतील निरीक्षणे समजून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त सूत्रे

६ अ. वातावरणातील पालट आणि शारीरिक कारणे यांव्यतिरिक्त अन्य
(मानसिक आणि आध्यात्मिक) कारणांमुळेही शरिराचे तापमान घटणे किंवा वाढणे

वैद्यकीय शास्त्रानुसार व्यक्ती, प्राणी आदींच्या शरिराच्या तापमानात बाह्य (वातावरणातील) किंवा शारीरिक कारणांमुळे जसे पालट होत असतात, तसेच ते मानसिक आणि आध्यात्मिक कारणांमुळेही होत असतात. ‘क्रोध, भीती, दुःख, कामवासना आदी मानसिक कारणांमुळे व्यक्तीच्या शरिराचे तापमान वाढते’, असे आयुर्वेद सांगतो. व्यक्ती उत्तेजित झाल्यावर किंवा तणावाखाली असतांना शरिरातील काही भागांत रक्ताभिसरण वेगात होते. परिणामी तिच्या शरिराच्या त्या भागातील तापमान थोडे वाढते. याउलट निद्रा, ध्यान या अवस्थांमध्ये व्यक्ती शिथील झाल्याने तिच्या शरिराचे तापमान थोडे घटते, असा सार्वत्रिक अनुभव आहे. वातावरणातील नकारात्मक ऊर्जेमुळे व्यक्तीला होणार्‍या त्रासांत एकदम वाढ झाली, तर काही वेळा व्यक्तीचे शारीरिक तापमान प्रभावित होते. या पार्श्वभूमीवर सामगायनाचा व्यक्तीवर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम अभ्यासण्यासाठी ‘थर्माेग्राफी कॅमेर्‍या’द्वारे साधकांचे निरीक्षण करण्याचे निश्चित केले.

६ आ. कुंडलिनीचक्रे

‘शरिरात श्वसनसंस्था, पचनसंस्था आदी अनेक संस्था आहेत, त्याप्रमाणे कुंडलिनी योगानुसार शरीर आणि लिंगदेह यांना शक्ती पुरवणारी शक्तीसंस्था आहे. इतर संस्था शवविच्छेदनाने डोळ्यांना दिसू शकतात, तर शक्तीसंस्था डोळ्यांना दिसत नाही. रक्ताभिसरण संस्थेचे प्रमुख केंद्र हृदय आहे, मज्जासंस्थेचे प्रमुख केंद्र मेंदू आहे, तर शक्तीसंस्थेत निरनिराळी केंद्रे आहेत. त्यांना ‘चक्रे’ असे म्हणतात. शक्तीसंस्थेतील ७ प्रमुख चक्रे आणि त्यांची शरिरातील स्थाने पुढीलप्रमाणे आहेत.

१. मूलाधारचक्र : पाठीच्या मणक्याच्या शेवटी (माकडहाडाच्या टोकाजवळ)

२. स्वाधिष्ठानचक्र : जननेंद्रियाच्या १ ते २ सें.मी. वर (लिंगमूळ)

३. मणिपूरचक्र : नाभी

४. अनाहतचक्र : छातीच्या मध्ये

५. विशुद्धचक्र : कंठ म्हणजे स्वरयंत्राचा भाग

६. आज्ञाचक्र : भ्रूमध्य म्हणजे दोन भुवयांच्या मध्ये

७. सहस्रार : डोक्याचा मध्य, टाळू

६ इ. ‘थर्माेग्राफी कॅमेर्‍याद्वारे सातपैकी चार कुंडलिनीचक्रांचे एकाच वेळी निरीक्षण करणे

या चाचणीत सहभागी झालेल्या साधकांच्या मूलाधार, स्वाधिष्ठान आणि सहस्रार या चक्रांच्या स्थानांचे निरीक्षण ‘थर्माेग्राफी कॅमेर्‍या’द्वारे एकाच वेळी करता येणे कठीण असल्याने ते केलेले नाही; मात्र अन्य ४ कुंडलिनीचक्रांचे निरीक्षण एकाच वेळी केले आहे.

६ ई. ‘थर्मल इमेजेस’मधील तापमानाची आकडेवारी संगणकीय प्रणालीद्वारे मिळालेली असणे

‘थर्माेग्राफी कॅमेर्‍या’द्वारे दोन्ही साधकांच्या नाभीपासून वरच्या भागाची छायाचित्रे (‘थर्मल इमेजेस’) निरीक्षणासाठी काढली आहेत. या छायाचित्रांतील तापमानाची मिळालेली आकडेवारी ‘थर्माेग्राफी कॅमेर्‍या’ला जोडलेल्या संगणकीय प्रणालीद्वारे मिळालेली आहे.

६ उ. मूळ नोंद

सामगायन ऐकल्यानंतर साधकांच्या शारीरिक तापमानात झालेला पालट अभ्यासण्यासाठी सामगायन ऐकण्यासाठी चाचणीकक्षात प्रवेश करण्यापूर्वी त्या साधकाचे थर्मल कॅमेर्‍याद्वारे छायाचित्र घेण्यात आले. ही या चाचणीतील ‘मूळ नोंद’ होय. चाचणीतील इतर निरीक्षणांची ‘मूळ नोंदी’शी तुलना केल्यानंतर साधकांवर सामगायनाचा झालेला परिणाम लक्षात येतो.

६ ऊ. चाचणी कक्षातील तामपान आणि आर्द्रता यांच्या नोंदी ठेवणे

वातावरणात सातत्याने पालट होतो आणि त्याचा परिणाम व्यक्तीच्या शारीरिक तापमानावर होतो. ही चाचणी एका बंदिस्त कक्षात घेण्यात आली. त्यामुळे कक्षातील तापमान आणि आर्द्रता नियंत्रित ठेवता आली. चाचणीत प्रत्येक वेळी साधकांचे थर्मल छायाचित्र घेतांना वातावरणातील तापमान आणि आर्द्रता यांच्याही नोंदी केल्या. त्यातून ‘चाचणीतील साधकांच्या विविध कुंडलिनीचक्रांच्या ठिकाणच्या शारीरिक तापमानात झालेला पालट वातावरणामुळे आहे कि सामगायन ऐकल्यामुळे ?’, असा संदेह राहिला नाही.

२६.५.२०१६ या दिवशी दुपारी १२ ते १ या वेळेत गोव्यातील रामनाथी येथील सनातन आश्रमात घेण्यात आलेल्या चाचणीतील विविध निरीक्षणांच्या वेळी असणारे चाचणीकक्षातील तापमान आणि आर्द्रता यांविषयी माहिती सूत्र ‘७ अ’ मध्ये दिलेल्या सारणीत दिली आहे.

 

७. निरीक्षणे

७ अ. आध्यात्मिक त्रास नसलेल्या आणि असलेल्या
साधकांच्या कुंडलिनीचक्रांच्या ठिकाणचे तापमान दर्शवणारी सारणी

निरीक्षण कक्षातील तापमान
(अंश सेल्सिअसमध्ये)
कुंडलिनीचक्रांच्या ठिकाणचे सरासरी
(टीप १) तापमान (अंश सेल्सीअसमध्ये)
आध्यात्मिक त्रास
नसलेला साधक
आध्यात्मिक त्रास
असलेला साधक
१. मूळ नोंद (सामगायन ऐकण्यासाठी कक्षात प्रवेश करण्यापूर्वी) ३१.६ ३२.७ ३४.२
२. कक्षात प्रवेश केल्यानंतर सामगायन आरंभ होण्यापूर्वी २८.० ३३.२ ३३.९
३. सामगायनाला आरंभ झाल्यानंतर १० मिनिटांनी २७.२ ३४.४ ३४.८
४. सामगायनाला आरंभ झाल्यानंतर २० मिनिटांनी २६.५ ३४.७ ३४.९
५. सामगायनाला आरंभ झाल्यानंतर ३८ मिनिटांनी (टीप २) २६.१ ३३.७ ३४.४
६. सामगायनाला आरंभ झाल्यानंतर ४५ मिनिटांनी २६.१ ३४.३ ३४.५

टीप १ – आज्ञाचक्र, विशुद्धचक्र, अनाहतचक्र आणि मणिपूरचक्र या एकूण चक्रांच्या तापमानाची बेरीज भागिले ४

टीप २ – या निरीक्षणाच्या पूर्वी सामगायन करणार्‍यांना पाणी पिता यावे, यासाठी सामगायन साधारणपणे ५ मिनिटांसाठी थांबवले होते.

 

८. निरीक्षणांचे विवरण आणि निष्कर्ष

८ अ. वातानुकूलन यंत्रामुळे चाचणी कक्षातील तापमान घटणे;
पण सामगायनामुळे साधकांच्या चक्रांच्या ठिकाणचे तापमान वाढणे

वातानुकूलन यंत्रामुळे मूळ नोंदीच्या तुलनेत शेवटच्या निरीक्षणाच्या वेळी कक्षातील तापमान साधारण ५ अंश सेल्सिअसने घटले; पण दोन्ही साधकांच्या सर्वच चक्रांच्या ठिकाणचे शरिराचे तापमान वाढले आहे.

वातावरण आणि व्यक्तीचे शरीर यांत ऊर्जेची देवाण-घेवाण होत असते. सर्वसाधारणपणे वातावरणाचे तापमान व्यक्तीच्या शारीरिक तापमानापेक्षा अधिक असते, तेव्हा शरिराचे तापमानही वाढते; पण या चाचणीत कक्षातील तापमान घटलेले असतांना साधकांच्या शरिराचे तापमान वाढले आहे, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. हा सामगायनाचा साधकांच्या शरिरातील ऊर्जेवर झालेला परिणाम आहे.

८ आ. सामगायनामुळे निर्माण झालेल्या ऊर्जेचा ऐकणार्‍याच्या देहातील विशिष्ट चक्रांवर अधिक परिणाम होणे

दोन्ही साधकांच्या सर्व चक्रांच्या ठिकाणच्या शरिराच्या तापमानात झालेला पालट एकसारखा नाही. त्यांच्या आज्ञा आणि विशुद्ध चक्रांपेक्षा अनाहत अन् मणिपूर या चक्रांच्या ठिकाणच्या तापमानात अधिक प्रमाणात पालट झालेला आढळतो. यावरून ‘सामवेदातील ठराविक मंत्र ऐकणार्‍याच्या देहातील विशिष्ट चक्रांवर अधिक परिणाम होतो’, असे लक्षात येते.

८ इ. सामगायन चालू असतांना साधकांच्या चक्रांच्या
ठिकाणचे तापमान वाढणे, तर सामगायन थांबल्यानंतर तापमान घटणे

सामगायन आरंभ झाल्यापासून, म्हणजे ‘निरीक्षण क्र. २’ पासून ‘निरीक्षण क्र. ४’पर्यंत दोन्ही साधकांच्या सर्व चक्रांच्या ठिकाणच्या तापमानात वाढ झाली आहे; पण ‘निरीक्षण क्र. ५’च्या वेळी सर्व चक्रांच्या ठिकाणच्या तापमानात घट झाली आहे, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. ‘निरीक्षण क्र. ५’ च्या पूर्वी सामगायन करणार्‍या वेदमूर्तींना पाणी पिता यावे, यासाठी सामगायन साधारणपणे ५ मिनिटांसाठी थांबवले होते, म्हणजे सामगायन चालू असतांना चक्रांच्या ठिकाणचे तापमान वाढत होते, तर सामगायन थांबल्यानंतर ते घटू लागले. यातून सामगायनाचा साधकांच्या चक्रांवर होणारा थेट परिणाम लक्षात येतो.

८ ई. सामगायनाचा आध्यात्मिक त्रास असलेल्या आणि नसलेल्या साधकांवर सकारात्मक परिणाम होणे

‘सामगायन ऐकल्यामुळे साधकांच्या विविध चक्रांवर झालेला परिणाम सकारात्मक आहे कि नकारात्मक ?’, हे केवळ थर्मल छायाचित्रांच्या आधारे ठामपणे सांगता येत नाही; पण ‘सामवेदातील मंत्रांमुळे ऊर्जा निर्माण होते आणि ही ऊर्जा सामगायन ऐकणार्‍यांच्या चक्रांना प्रभावित करते’, हे या निरीक्षणांतून स्पष्ट होते. चाचणीतील साधकांना ‘सामगायन ऐकतांना काय जाणवले ?’, असे विचारल्यावर दोन्ही साधकांनी त्यांना ‘पुष्कळ शक्ती जाणवली (टीप १)’, असे सांगितले, तर आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकाने ‘सामगायन ऐकतांना स्वतःला चैतन्य मिळत असल्याचे जाणवत होते’, असे जाणवले’, असे सांगितले. यांतून ‘दोन्ही साधकांवर सामगायन ऐकण्याचा सकारात्मक परिणाम झाला’, हे लक्षात येते.

टीप १ : दोन्ही साधक गेल्या काही वर्षांपासून साधना करत असल्याने त्यांच्यात सूक्ष्म स्पंदने जाणण्याची क्षमता निर्माण झाली. त्यामुळे त्यांना सामगायनामुळे निर्माण झालेली शक्तीची स्पंदने जाणवली.

८ उ. आध्यात्मिक त्रास नसलेल्या आणि असलेल्या साधकाच्या
शारीरिक तापमानात झालेला पालट सामगायनामुळे झालेला असणे

येथे दिलेली चाचणी नियंत्रित वातावरणात घेण्यात आली होती. त्यामुळे ‘चाचणी घेण्यात आलेल्या साधकांच्या शारीरिक तापमानात झालेला पालट हा कोणत्याही बाह्य, शारीरिक किंवा मानसिक कारणांमुळे झालेला नाही, तर सामगायनामुळे झालेला आहे’, हे स्पष्ट होते.’

– श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय (२०.१२.२०१६)

ई-मेल : [email protected]

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment