ऑनलाईन ‘नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला प्रारंभ

हिंदुत्वनिष्ठांच्या अपूर्व उत्साहात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित ऑनलाईन ‘नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे उद्घाटन !

वैचारिक ध्रुवीकरणाच्या काळात हिंदु धर्माची बाजू प्रभावीपणे घेत
हिंदु राष्ट्राच्या दिशेने मार्गक्रमण करा ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समिती

दीपप्रज्वलन करतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

फोंडा (गोवा) – कोरोना महामारीच्या काळात तबलिगी जमातने ‘कोरोना वाहका’ची भूमिका निभावली, तर अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ‘कोरोना योद्धे’ बनून समाजसेवा केली. या काळात संपूर्ण जगाने अभिवादनाची नमस्काराची पद्धत, योग, शाकाहार, प्राणायाम आदी हिंदु धर्मातील तत्त्वे उचलून धरली. कोरोनाच्या निमित्ताने संपूर्ण जग तिसर्‍या महायुद्धाकडे वाटचाल करत आहे. भारतातही अंतर्गत विरोध उफाळून येत आहे. काही मासांपूर्वी सरकारने इस्लामी देशांतील पीडित हिंदूंसाठी नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केला; पण त्याला देशविरोधी शक्तींनी मोठ्या प्रमाणात विरोध केला. देशातील मंदिर संस्कृतीवर घाला घातला जात आहे. आगामी काळात देशाला जिहादी, साम्यवादी आणि ‘सेक्युलर’ शक्तींचा सामना करावा लागणार असल्याचे यातून स्पष्ट होते. एकंदरीत सध्याच्या काळात राजकारण, शिक्षणक्षेत्र, प्रसारमाध्यमे, कलाक्षेत्र आदी सर्वच क्षेत्रांत देशभक्त आणि धर्मप्रेमी विरुद्ध देशद्रोही अन् धर्मविरोधी असे ध्रुवीकरण होत आहे. या वैचारिक ध्रुवीकरणाच्या काळात हिंदु धर्माची बाजू प्रभावीपणे घेत हिंदु राष्ट्राच्या दिशेने मार्गक्रमण करा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले. ‘ऑनलाईन’ पद्धतीने चालू झालेल्या ‘नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या उद्घाटन समारंभामध्ये ते बोलत होते.

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

शंखनाद आणि वेदमंत्रपठण करून अधिवेशनाला आरंभ झाला. सनातन पुरोहित पाठशाळेचे पुरोहित श्री. ईशान जोशी यांनी शंखनाद केला, तर पुरोहित श्री. अमर जोशी आणि श्री. ईशान जोशी यांनी वेदमंत्रपठण केले. सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर अधिवेशनाच्या निमित्ताने सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेल्या संदेशाचे सनातन संस्थेचे धर्मप्रसारक सद्गुरु सत्यवान कदम यांनी वाचन केले. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी अधिवेशनाचा उद्देश अवगत केला. ‘१०० कोटी हिंदूंचे जगभरात एकही अधिकृत राष्ट्र नाही. भारत आणि नेपाळ हे अधिकृतरित्या हिंदु राष्ट्र व्हावे, या उद्देशाने हे अधिवेशन आयोजित केले जात आहे. हिंदु राष्ट्राचा विचार घराघरांत, मनामनांत पोचवण्यासाठी कृतीशील व्हा’, असे ते म्हणाले.

प्रतीवर्षी फोंडा, गोवा येथे होणारे अधिवेशन कोरोना महामारीमुळे ‘ऑनलाईन’ पद्धतीने होत आहे. असे असले, तरी हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांचा उत्साह तसूभरही अल्प झाला नाही. उलट देशस्तरावर या अधिवेशनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. अधिवेशनाच्या निमित्ताने ट्वीटरवरही #We_Want_Hindu_Rashtra हा हॅशटॅगद्वारे हिंदु राष्ट्राची चर्चा चालू असल्याचे दिसून आले.

‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ होण्यामध्ये समितीचाही वाटा !

वर्ष २०१४ मध्ये झालेल्या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या वेळी ‘पाकिस्तान आणि बांगलादेश येथील पीडित हिंदूंना भारताचे नागरिकत्व मिळावे’, असा प्रस्ताव एकमुखाने संमत करण्यात आला होता. हा प्रस्ताव केंद्र सरकारला मिळाल्यानंतर एका मासात केंद्र शासनाने पाकिस्तानातून विस्थापित झालेल्या हिंदूंसाठी कार्य करणार्‍या संघटनांची देहली येथे बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे आयोजक या नात्याने हिंदु जनजागृती समितीला आमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीमध्ये समितीने शरणार्थी पाकिस्तानी हिंदूंना भारताचे नागरिकत्व मिळावे, अशी ठोस भूमिका मांडली. ही बैठक पुढे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मसुद्याची बैठक म्हणून सिद्ध झाली. ‘नागरिकत्व कायदा-१९५५’ यामध्ये बांगलादेशाचा उल्लेख नव्हता; कारण त्या वेळी बांगलादेश हा स्वतंत्र देश नव्हता. या बैठकीमध्ये समितीने बांगलादेशी शरणार्थी हिंदूंनाही भारताचे नागरिकत्व मिळावे, अशी भूमिका मांडली. त्यानंतर केंद्र सरकारने केंद्रीय बैठक आयोजित करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर शासनाने बांगलादेशी हिंदूंसाठी कार्य करणार्‍या संघटनांची माहिती समितीकडे मागितली. त्यानंतर पुढील ६ वर्षांमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्यामध्ये बांगलादेश, तसेच अफगाणिस्तान यांचाही समावेश झाल्याचे आपण पाहिले. एकंदरीत, ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ ही एकप्रकारे अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाची फलश्रुती म्हणता येईल.

– सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

 

युद्धकाळात सत्त्वगुणी हिंदूंचे रक्षण करण्‍याची सिद्धता करा !
– परात्‍पर गुरु डॉ. जयंत आठवले, संस्‍थापक, सनातन संस्‍था

नवव्‍या ‘अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशना’साठी संत संदेश

‘नवव्‍या ‘अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशना’ला उपस्‍थित सर्व धर्मबंधूंना माझा नमस्‍कार ! हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेचे व्रत घेऊन आपण सर्व जण त्‍याग करत आहात. वर्ष २०२३ मध्‍ये या त्‍यागाचे फळ निश्‍चितच आपल्‍याला हिंदु राष्‍ट्राच्‍या रूपात मिळणार आहे.

चांगले घडण्‍यापूर्वी वाईट काळ सोसावा लागतो, त्‍याप्रमाणे हिंदु राष्‍ट्र येण्‍यापूर्वी म्‍हणजे वर्ष २०२१ ते २०२३ या कालावधीमध्‍ये भारताला आणि भारतातील हिंदूंना युद्धकाळाला सामोरे जावे लागेल.

युद्धकाळ म्‍हणजे तिसरे महायुद्ध, सीमापार युद्ध आणि गृहयुद्ध यांचा काळ ! या काळात प्रचंड जीवितहानी होण्‍याची शक्‍यता आहे. या युद्धकाळात हिंदुत्‍ववाद्यांना सीमेवरील सैनिकांप्रमाणे देशातील नागरिकांचे रक्षण करण्‍याचे दायित्‍व हाती घ्‍यावी लागेल. अशा संकटकाळात प्रत्‍येकाचे रक्षण करणे शक्‍य होणार नाही; म्‍हणून प्राधान्‍याने संत, साधना करणारे, सत्त्वगुणी, धर्मप्रेमी आणि देशभक्‍त हिंदूंचेच संरक्षण करा ! हीच काळानुसार साधना आहे ! युद्धकाळानंतर हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना होणारच आहे, यावर श्रद्धा ठेवा !’

– (परात्‍पर गुरु) डॉ. जयंत आठवले, संस्‍थापक, सनातन संस्‍था. (२१.७.२०२०)

 

‘नवम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाच्या
पहिल्‍या दिवशीच्‍या दुसर्‍या सत्रातील मान्‍यवरांचे उद़्‍बोधक विचार !

भारत आणि नेपाळ यांना हिंदु राष्‍ट्र घोषित करण्‍यासाठी संघटित होऊन प्रयत्न करण्‍याचा हिंदुत्‍वनिष्‍ठ मान्‍यवरांचा निर्धार !

३० जुलै या दिवशी ‘ऑनलाईन’ आयोजित केलेल्‍या ‘नवम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशना’च्‍या दुसर्‍या सत्रात ‘हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना’ या उद़्‍बोधन सत्रात माननीय वक्‍त्‍यांनी त्‍यांचे विचार मांडले. सर्वच मान्‍यवरांनी आजची परिस्‍थिती बिकट असून हिंदूसंघटनाशिवाय पर्याय नाही, अशा आशयाचे मत मांडले. हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी हिंदूसंघटनासह धर्मानुसार आचरण करणेही आवश्‍यक आहे, हे मान्‍यवरांनी त्‍यांच्‍या भाषणांतून अधोरेखित केले.

चिरंतन सत्‍यावर आधारित असलेल्‍या ‘सनातन वैदिक हिंदु धर्मा’नुसार आचरण करणे आवश्‍यक !
– पू. डॉ. शिवणारायन सेन, अध्‍यक्ष, शास्‍त्र धर्म प्रचार सभा, कोलकाता, बंगाल

पृथ्‍वीवरील सर्व प्राणी आहार, निद्रा, भय, मैथुन या क्रिया करतात; मात्र धर्माचे आचरण केवळ मनुष्‍य प्राणीच करू शकतो. पूर्वी हिंदूंवर धर्माचा प्रभाव होता. त्‍यामुळे इतरांवर अन्‍याय करण्‍याची वृत्ती नव्‍हती. पुरुष एकपत्नी तर महिला पतिव्रता होत्‍या; मात्र आज जनता धर्मभ्रष्‍ट आणि धर्मद्रोही होऊ लागली आहे. पृथ्‍वीवर ७५ टक्‍के पाप आणि २५ टक्‍के पुण्‍य घडते आहे. त्‍यामुळे चिरंतन सत्‍यावर आधारित एकमेव अशा ‘सनातन वैदिक हिंदु’ धर्मानुसार आचरण करणे आवश्‍यक आहे, तरच संपूर्ण विश्‍वाचे कल्‍याण होईल.

सध्‍याच्‍या साम्‍यवादी नेपाळी राज्‍यकर्त्‍यांच्‍या विरोधात संघर्ष करून नेपाळमध्‍ये हिंदु राष्‍ट्राची पुनर्स्‍थापना करू ! – डॉ. मानव भट्टराई, अध्‍यक्ष, राष्‍ट्रीय धर्मसभा नेपाल, काठमांडू, नेपाळ

नेपाळ ‘हिंदु राष्‍ट्र’ होते; मात्र विदेशी प्रभाव आणि राजकारण यांमुळे ते ‘धर्मनिरपेक्ष’ राष्‍ट्र घोषित करण्‍यात आले. आजही ९० टक्‍के नेपाळी जनतेला ‘नेपाळ हे हिंदु राष्‍ट्र व्‍हावे’, असेच वाटते. विदेशी आणि धर्मविरोधी लोकांची हिंदु राष्‍ट्रावर कुदृष्‍टी आहे; म्‍हणून हिंदु राष्‍ट्राच्‍या विरोधात तेथे धनशक्‍तीचाही प्रयोग केला जात आहे. सध्‍याची राजसत्ता धर्म, संस्‍कृतीविरोधी आणि लोकांची दिशाभूल करणारी आहे. धर्मशास्‍त्राचे ज्ञान मिळवण्‍यासाठी विश्‍वातील लोक नेपाळला भेट देत होते. ‘वाल्‍मिकी रामायण’ हे नेपाळच्‍या पवित्र भूमीत लिहिले गेले. नेपाळ ‘हिंदु राष्‍ट्र’ झाले नाही, तर प्राचीन वारसा आणि गौरव पुन्‍हा प्राप्‍त करता येणार नाही. नेपाळमध्‍ये हिंदूंच्‍या हितासाठी कार्य करणार्‍या अनेक संघटना आहेत; मात्र त्‍यांच्‍यामध्‍ये समन्‍वय, संघटितपणा नाही. असे असले, तरी मला विश्‍वास आहे की, येत्‍या काळात नेपाळची मठ, मंदिरे, प्राचीन धर्मशाळा, गोशाळा यांना गतवैभव प्राप्‍त होईल. आम्‍ही पर्यावरणपूजक आहोत. येथे नदी, डोंगर, वन यांचे पूजन केले जाते. नेपाळ धर्मनिरपेक्ष राष्‍ट्र झाल्‍याने पदोपदी अडचणी येत आहेत. तरी त्‍यांच्‍यावर मात करून भारत आणि नेपाळ यांना हिंदु राष्‍ट्र घोषित करण्‍यासाठी शेवटच्‍या श्‍वासापर्यंत प्रयत्न करू.

ज्‍याप्रमाणे जेवणाला मिठाशिवाय चव नाही, त्‍याप्रमाणे जीवनाला धर्माशिवाय अर्थ नाही ! – श्री. धर्मयेशा जी, इंडोनेशिया

‘धर्म’ या संकल्‍पनेकडे केवळ स्‍वार्थासाठी नव्‍हे, तर जीवनावश्‍यक घटक म्‍हणून पहाणे आवश्‍यक आहे. ‘धर्म म्‍हणजे मोक्षप्राप्‍तीचे साधन’, ही खरी धारणा आहे. ज्‍याप्रमाणे जेवणाला मिठाशिवाय चव नाही, त्‍याप्रमाणे जीवनाला धर्माशिवाय अर्थ नाही.  स्‍वतःला ‘धर्मरक्षक’ म्‍हटले तर अहंकार वाढतो आणि ‘धर्मसेवक’ म्‍हटले तर अहंकार अल्‍प होतो. ‘धर्मो रक्षति रक्षितः ।’ या उक्‍तीप्रमाणे जो धर्माचे रक्षण करेल त्‍याचे धर्म म्‍हणजेच ईश्‍वर रक्षण करतो; म्‍हणून हिंदूंनी संघटितपणे, एक परिवार बनून धर्माची सेवा करावी. शाळांमधून रामायण, महाभारत, पंचतंत्र, हितोपदेश अशा प्रकारचे ग्रंथ शिकवले गेले, तर विद्यार्थ्‍यांवर आपोआप संस्‍कार होतील.

‘हिंदुविरोधा’च्‍या विषाणूवर ‘हिंदु राष्‍ट्र’ हाच उपाय ! – प्रमोद मुतालिक, संस्‍थापक अध्‍यक्ष, श्रीराम सेना, कर्नाटक

देशात सातत्‍याने लव्‍ह जिहाद, भ्रष्‍टाचार आणि आतंकवादी कारवाया घडत आहेत. हिंदूसंघटन, तसेच हिंदूंमध्‍ये जागृती करणे, हे ईश्‍वरी कार्य आहे. जात, पात, पक्ष, संघटना बाजूला ठेवून केवळ ‘हिंदू’  म्‍हणून संघटित होणे आवश्‍यक आहे. हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेच्‍या कार्यात देशाच्‍या प्रत्‍येक नागरिकाने योगदान द्यायला हवे. आज जगभरात कोरोनाच्‍या विषाणूने थैमान घातले आहे. या विषाणूप्रमाणे ‘हिंदूविरोध’ विषाणू रोखणे आवश्‍यक आहे. या विषाणूवर ‘हिंदु राष्‍ट्र’ हाच उपाय आहे. हिंदू संघटनांच्‍या एकत्रीकरणाचे आव्‍हानात्‍मक कार्य करत हिंदु जनजागृती समितीने हिंदूशक्‍ती निर्माण केली !

 

३० जुलै ते २ ऑगस्ट आणि ६ ते ९ ऑगस्ट या कालावधीत प्रतिदिन सायंकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत ‘ऑनलाईन अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ होणार असून ते सर्वांसाठी खुले असेल. खालील ‘लिंक्स’वर त्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

 YouTube Channel : HinduJagruti

 Facebook page : /HinduAdhiveshan

 Twitter : @HinduJagrutiOrg

‘फेसबूक’द्वारे केलेले थेट प्रक्षेपण ४४ सहस्रांहून अधिक जणांनी पाहिले, तर अधिवेशनाचा विषय २ लाख ७१ सहस्र ५६३ जणांपर्यंत पोचला (रिच). तसेच यू ट्यूबद्वारे थेट प्रक्षेपण १० सहस्र ४३१ जणांनी पाहिले.

 

Leave a Comment