श्री गणेश पूजाविधी (काही मंत्रांच्या अर्थ आणि Audio सहित)

श्री गणपति Ganpati
श्री गणपति

 

१. ‘पूजा’ या शब्दाचा खरा अर्थ

‘संत, गुरु आणि देवता यांच्याविषयी परम आदरभाव ठेवून अहंकाररहित होऊन त्यांची पूजा करणे, हा ‘पूजा’ या शब्दाचा खरा अर्थ आहे.’ – डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत आठवले, चेंबूर, मुंबई. (वर्ष १९८१)

 

२. पूजेची सिद्धता (तयारी)

श्री गणेश पूजाविधी (Audio) ऐका…

२ अ. पूजेची सिद्धता करतांना स्तोत्रपठण किंवा नामजप कसा करावा ?

पूजेची सिद्धता करत असतांना स्तोत्रपठण किंवा नामजप करावा. नामजपाच्या तुलनेत स्तोत्रात सगुण तत्त्व जास्त असते; म्हणून स्तोत्र मोठ्याने म्हणावे आणि नामजप मनातल्या मनात करावा. नामजप मनातल्या मनात होत नसल्यास मोठ्याने करण्यास आडकाठी (हरकत) नाही.

२ आ. पूजासाहित्याची सूची (यादी)

१. कलश १ १४. देवाची मूर्ती (श्री गणपति) १ २७. दक्षिणा म्हणून नाणी १० ४०. आम्रपल्लव (आंब्याचे) ५ टाळे
२. पळी १ १५. मूर्ती ठेवण्यासाठी चौरंग/पाट/पटल (टेबल) १ २८. अक्षता (धुऊन वाळवलेले अखंड तांदूळ) १०० ग्रॅम ४१. विड्याची २५ पाने
३. पंचपात्री १ १६. देव पुसण्यासाठी वस्त्र (कापड) १ २९.  हळद १०० ग्रॅम ४२. पंचामृत (दूध, दही, तूप, मध आणि साखर प्रत्येकी १ लहान वाटी)
४. ताम्हण ३ १७. देवाचे आसन पुसण्यासाठी वस्त्र १ ३०. पिंजर (कुंकू) १०० ग्रॅम ४३. मोदक २१
५. घंटा १ १८. पूजकासाठी सोवळे किंवा धूतवस्त्र (धोतर) १ आणि उपरणे १ ३१. गंध (उगाळलेले)/अष्टगंध १०० ग्रॅम ४४. तुळशी (२ पाने असलेली) ५ टिक्शा
६. समई १ किंवा २ १९. आसन किंवा पाट ३ ३२. सिंदूर १०० ग्रॅम ४५. बेलाची ५ पाने (त्रिदल)
७. निरांजने ४ २०. रांगोळी पाव किलो ३३. अत्तर १ कुपी ४६. जास्वंद इत्यादी फुले/बाजारी फुले १ किलो
८. तबके (ताटे) ५ २१. काडेपेटी १ ३४. धूप १०० ग्रॅम ४७. फुलांचा हार १
९. वाट्या १५ २२. तिळाचे तेल १ लिटर ३५. उदबत्त्या १ पुडा/२५ काड्या ४८. फळे ५
१०. पातेली १ २३. शुद्ध तूप १०० ग्रॅम ३६. कापूर २५ ग्रॅम ४९. दूर्वा ५० (१०८ किंवा १ सहस्र नामावलीने पूजा करणार असल्यास त्यानुसार दूर्वा किंवा शमी यांच्या संख्येत वाढ करावी.)
११. एकारती १ २४. तांदूळ १ किलो ३७. वाती ५०
१२. पंचारती १ २५. नारळ ५ ३८. देवासाठी लाल रंगाचे सोवळे-उपरणे किंवा कापसाची (७ मण्यांची आणि कुंकू लावलेली) दोन तांबडी वस्त्रे
१३. परात १ २६. सुपार्‍या १५ ३९. यज्ञोपवीत (जानवे) १

२ इ. पत्री (प्रत्येकी ५ किंवा त्याहून अधिक पाने)

चमेली, माका, बेल, पांढर्‍या दूर्वा, बोर, धोतरा, तुळस, आघाडा, शमी, केवडा, कण्हेर, आपटा, रुई, अर्जुनसादडा, गोकर्ण, डाळिंब, देवदार, मरवा, निगडी किंवा लिंगड, जाई आणि अगस्ती.

२ ई. पूजास्थळाची शुद्धी आणि उपकरणांमधील देवत्वाची जागृती करणे

२ ई १. पूजास्थळाची शुद्धी

अ. पूजा करणार त्या खोलीतील केरपूजकाच्या व्यतिरिक्त अन्य व्यक्तीने काढावा. तसे करणे शक्य नसल्यास पूजकाने केर काढावा.

आ. केर काढल्यावर खोलीतील भूमीचा पृष्ठभाग मातीचा असल्यास ती भूमी शेणाने सारवावी. भूमीचा पृष्ठभाग मातीचा नसून लादीचा असल्यास ती भूमी स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावी.

इ. आंब्याच्या किंवा तुळशीच्या पानाने खोलीत गोमूत्र शिंपडावे. गोमूत्र उपलब्ध नसल्यास पाण्यात सा‌त्त्विक उदबत्तीची विभूती घालावी आणि ते पाणी खोलीत शिंपडावे. त्यानंतर खोलीत धूप दाखवावा.

२ ई २. उपकरणांमधील देवत्वाची जागृती

देवपूजेची उपकरणे घासूनपुसून स्वच्छ करून घ्यावीत. त्यानंतर त्यांच्यावर तुळशीचे पान किंवा दूर्वा यांनी जलप्रोक्षण (पाणी शिंपडणे) करावे.

२ उ. रांगोळी काढणे

1346862229_g-sagun320
गणेशतत्त्व : सगुण १३ ठिपके : १३ ओळी
1346862267_g--nirgun320
गणेशतत्त्व : निर्गुण १२ ठिपके : १२ ओळी

१. रांगोळी स्त्रियांनी काढावी. स्त्रियांना शक्य नसल्यास पुरुषांनी रांगोळी काढावी.

२. ज्या देवतेची पूजा करणार, तिच्या तत्त्वाशी संबंधित रांगोळी काढावी.

३. देवाच्या नावाची किंवा रूपाची रांगोळी न काढता स्वस्तिक किंवा बिंदू यांनी युक्त असलेली रांगोळी काढावी.

४. रांगोळी काढल्यावर तिच्यावर हळदी-कुंकू वहावे.

अधिक रांगोळ्या पहाण्यासाठी यावर ‘क्लिक’ करा !

२ ऊ. शंखनाद करणे

शंखनाद करणे
शंखनाद करणे

१. शंखनाद करतांना उभे राहून मान वरच्या दिशेने करून आणि थोडी मागे झुकवून मनाची एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करावा.

२. श्वास पूर्णतः छातीत भरून घ्यावा.

३. त्यानंतर शंखध्वनी करण्यास प्रारंभ करून ध्वनीची तीव्रता वाढवत न्यावी आणि शेवटपर्यंत तीव्र नाद करावा. शक्यतो शंख एका श्वासात वाजवावा.

४. शंखिणीचा ध्वनी करू नये.

२ ए. देवपूजेला बसण्यासाठी पाट घेणे

देवपूजेला बसण्यासाठी आसन म्हणून लाकडी पाट घ्यावा. तो दोन फळ्या जोडून न बनवता अखंड असावा. त्याला लोखंडाचे खिळे मारलेले नसावेत. तो शक्यतो रंगवलेला नसावा़ पाटाखाली रांगोळी काढलेली असावी.
(देवपूजेच्या पूर्वसिद्धतेविषयीचे सविस्तर विवरण सनातन-निर्मित ग्रंथ ‘देवपूजेपूर्वीची तयारी’ यात केले आहे.)

 

३. पूजेच्या संदर्भातील काही सूचना

अ. पूजेच्या प्रारंभी सोवळे किंवा धूतवस्त्र (धोतर) आणि उपरणे परिधान करावे.

आ. पूजा आरंभ करण्यापूर्वी घरातील वडीलधारी मंडळी आणि पुरोहित यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत.

इ. पूजेसाठी पाटावर बसण्यापूर्वी उभे राहून भूमी आणि देवता यांना प्रार्थना करावी, ‘या आसनाच्या ठायी आपला चैतन्यमय वास असू दे.’

ई. पूजा करतांना ‘देवता आपल्यासमोर प्रत्यक्ष प्रगट होऊन आसनस्थ झाली आहे आणि आपण अनन्य शरणागत भावाने करत असलेली पूजा ती स्विकारत आहे’, असा भाव मनात ठेवावा अन् या भावाने प्रत्येक उपचार देवाच्या चरणी अर्पण करावा.

उ. प्रतिदिन सकाळी मूर्तीवरील निर्माल्य काढून षोडशोपचार पूजा करावी. संध्याकाळी षोडशोपचार पूजा किंवा गंधादी पंचोपचार पूजा करावी.

ऊ. पूजेतील श्लोक किंवा मंत्र उच्चारता येत नसलेल्या व्यक्तींनी केवळ नाममंत्र उच्चारून देवतेला उपचार (उदा. आसनासाठी अक्षता) समर्पित करावेत, उदा. ‘‘श्री सिद्धिविनायकाय नमः । आसनार्थे अक्षतान् समर्पयामि ॥’’, असे म्हणावे.

ए. मूर्ती मातीची असल्यास पूजा करतांना पाद्य, अर्घ्य, पंचामृत इत्यादी अभिषेकापर्यंतचा प्रत्येक उपचार २ दूर्वांनी प्रोक्षण करावेत. मूर्ती धातूची असल्यास प्रत्यक्ष उपचार अर्पण करू शकतो.

ऐ. येथे दिलेला संपूर्ण पूजाविधी ‘पूजासमुच्चय’ या ग्रंथाला प्रमाण मानून त्याच्या संदर्भाने घेतला आहे.

 

४. प्रत्यक्ष पूजाविधी

४ अ. पूजेच्या प्रारंभी करावयाची प्रार्थना

‘हे श्री सिद्धिविनायका, तुझी पूजा माझ्याकडून भावपूर्ण होऊ दे. पूजा करत असतांना माझे मन सातत्याने तुझ्या चरणी लीन राहू दे. तू प्रत्यक्ष माझ्या समोर आसनस्थ झाला आहेस आणि मी तुझी पूजा करत आहे, असा माझा भाव सतत असू दे. पूजेतील संभाव्य विघ्ने दूर होऊ देत. पूजेतील चैतन्य मला आणि सर्व उपस्थितांना मिळू दे.’

४ आ. कुंकुमतिलक लावणे

पूजकाने (यजमानाने) प्रथम स्वतःला कुंकुमतिलक लावावा.

४ इ. आचमन करणे

उजव्या हाताने आचमनाची मुद्रा करावी. नंतर डाव्या हाताने पळीभर पाणी उजव्या हाताच्या तळव्यावर (मुद्रेच्या स्थितीतच) घ्यावे आणि श्रीविष्णूच्या प्रत्येक नावाच्या शेवटी ‘नमः’ हा शब्द उच्चारून ते पाणी प्यावे –

१. श्री केशवाय नमः ।

२. श्री नारायणाय नमः ।

३. श्री माधवाय नमः ।

चौथे नाव उच्चारतांना ‘नमः’ या शब्दाच्या वेळी उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडावे.

४. श्री गोविन्दाय नमः ।

पूजकाने हात पुसून नमस्काराच्या मुद्रेत छातीजवळ हात जोडावेत अन् शरणागत भावासह पुढील नावे उच्चारावीत.

५. श्री विष्णवे नमः ।

६. श्री मधुसूदनाय नमः ।

७. श्री त्रिविक्रमाय नमः ।

८. श्री वामनाय नमः ।

९. श्री श्रीधराय नमः ।

१०. श्री हृषीकेशाय नमः ।

११. श्री पद्मनाभाय नमः ।

१२. श्री दामोदराय नमः ।

१३. श्री सङ्कर्षणाय नमः ।

१४. श्री वासुदेवाय नमः ।

१५. श्री प्रद्मुम्नाय नमः ।

१६. श्री अनिरुद्धाय नमः ।

१७. श्री पुरुषोत्तमाय नमः ।

१८. श्री अधोक्षजाय नमः ।

१९. श्री नारसिंहाय नमः ।

२०. श्री अच्युताय नमः ।

२१. श्री जनार्दनाय नमः ।

२२. श्री उपेन्द्राय नमः ।

२३. श्री हरये नमः ।

२४. श्री श्रीकृष्णाय नमः ।।

पुन्हा आचमनाची कृती करून २४ नावे म्हणावीत. नंतर पंचपात्रीतील सर्व पाणी ताम्हणात ओतावे अन् दोन्ही हात पुसून छातीशी नमस्काराच्या मुद्रेत हात जोडावेत.

४ ई. देवतास्मरण

श्रीमन्महागणाधिपतये नमः ।

अर्थ : गणांचा नायक असलेल्या अशा श्री गणपतीला मी नमस्कार करतो.

इष्टदेवताभ्यो नमः ।

अर्थ : माझ्या आराध्य देवतेला मी नमस्कार करतो.

कुलदेवताभ्यो नमः ।

अर्थ : कुलदेवतेला मी नमस्कार करतो.

ग्रामदेवताभ्यो नमः ।

अर्थ : ग्रामदेवतांना मी नमस्कार करतो.

स्थानदेवताभ्यो नमः ।

अर्थ : (येथील) स्थानदेवतांना मी नमस्कार करतो.

वास्तुदेवताभ्यो नमः ।

अर्थ : (येथील) वास्तुदेवतेला मी नमस्कार करतो.

आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः ।

अर्थ : सूर्यादी नऊ ग्रहदेवतांना मी नमस्कार करतो.

सर्वेभ्यो देवेभ्यो नमः ।

अर्थ : सर्व देवांना मी नमस्कार करतो.

सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः ।

अर्थ : सर्व ब्राह्मणांना (ब्रह्म जाणणार्‍यांना) मी नमस्कार करतो.

अविघ्नमस्तु ।

अर्थ : सर्व संकटांचा नाश होवो.

 

सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः ।

लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः ।।

धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः ।

द्वादशैतानि नामानि यः पठेच्छृणुयादपि ।।

विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा ।

सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्तस्य न जायते ।।

अर्थ : सुमुख (सुंदर मुख असलेला), एकदंत (एक दात असलेला), कपिल (फिकट करडा रंग असलेला), गजकर्णक (हत्तीप्रमाणे कान असलेला), लंबोदर (विशाल पोट असलेला), विकट (दुर्जनांच्या नाशासाठी़ विक्राळ रूप धारण केलेला), विघ्ननाश (संकटांचा नाश करणारा), गणाधिप (गणांचा नायक), धूम्रकेतु (धुरकट रंगाचा), गणाध्यक्ष (गणांचा प्रमुख), भालचंद्र (मस्तकावर चंद्र धारण करणारा) आणि गजानन (हत्तीप्रमाणे तोंड असलेला) या श्री गणपतीच्या १२ नावांचे विवाहाच्या वेळी, विद्याभ्यासाला आरंभ करतांना, (घरात) प्रवेश करतांना अथवा (घरातून) बाहेर पडतांना, युद्धावर जातांना किंवा संकटकाळी जो पठण करील किंवा ही नावे श्रवण करील, त्याच्या कार्यात विघ्ने येणार नाहीत.

 

शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजम् ।

प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये ।।

अर्थ : सर्व संकटांच्या नाशासाठी शुभ्र वस्त्र नेसलेल्या, शुभ्र रंग असलेल्या, ४ हात असलेल्या आणि प्रसन्न मुख असलेल्या अशा देवाचे (भगवान श्रीविष्णूचे) मी ध्यान करतो.

 

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।

शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तुते ।।

अर्थ : सर्व मंगलामध्ये मंगल, पवित्र, सर्वांचे कल्याण करणार्‍या, तीन डोळे असलेल्या, सर्वांचे शरण स्थान असलेल्या आणि शुभ्र वर्ण असलेल्या हे नारायणीदेवी, मी तुला नमस्कार करतो.

 

सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाममङ्गलम् ।

येषां हृदिस्थो भगवान्मङ्गलायतनं हरिः ।।

अर्थ : मंगल अशा निवासात (वैकुंठात) रहाणारे भगवान श्रीविष्णु ज्यांच्या हृदयामध्ये असतात, त्यांची सर्व कार्ये नेहमी मंगल होतात.

 

तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव ।

विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेंऽघ्रियुगं स्मरामि ।।

अर्थ : हे लक्ष्मीपती (श्रीविष्णो), तुझ्या चरणकमलांचे जे स्मरण तेच लग्न, तोच उत्तम दिवस, तेच ताराबळ, तेच चंद्रबळ, तेच विद्याबळ आणि तेच दैवबळ होय.

 

लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः ।

येषामिन्दीवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः ।

अर्थ : निळसर काळा रंग असलेला, सर्वांचे कल्याण करणारा असा (भगवान श्रीविष्णु) ज्यांच्या हृदयांमध्ये वास करतो, त्यांचा पराजय कसा होईल ? त्यांचा नेहमी विजय होईल, तसेच त्यांना सर्व (इच्छित) गोष्टी प्राप्त होतील.

 

यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः ।

तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ।।

अर्थ : ‘जेथे महान योगी असा श्रीकृष्ण आणि महान धनुर्धारी अर्जुन आहेत, तेथे ऐश्वर्य आणि जय निश्चित असतो’, असे माझे ठाम मत आहे.

 

विनायकं गुरुं भानुं ब्रह्मविष्णुमहेश्वरान् ।

सरस्वतीं प्रणौम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये ।।

अर्थ : सर्व कार्ये सिद्धीस जाण्यासाठी प्रथम गणपति, गुरु, सूर्य, ब्रह्मा, विष्णु, महेश आणि देवी सरस्वती यांना नमस्कार करतो.

 

अभीप्सितार्थसिध्द्यर्थं पूजितो यः सुरासुरैः ।

सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः ।।

अर्थ : इच्छित कार्य सिद्धीस जाण्यासाठी, देव आणि दानव सर्वांना पूजनीय असलेल्या, तसेच सर्व संकटांचा नाश करणार्‍या अशा गणनायकाला मी नमस्कार करतो.

 

सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः ।

देवा दिशन्तु नः सिद्धिं ब्रह्मेशानजनार्दनाः ।।

अर्थ : तिन्ही लोकांचे स्वामी असलेले ब्रह्मा-विष्णुमहेश हे त्रिदेव (आम्हाला) आरंभ केलेल्या सर्व कार्यांमध्ये यश देवोत.

४ उ. ‘देशकाल’ आणि ‘संकल्प’

‘देशकाल’ उच्चारून झाल्यानंतर ‘संकल्प’ उच्चारायचा असतो.

४ उ १. देशकाल (वर्ष २०२४)

पूजकाने स्वतःच्या दोन्ही डोळ्यांना पाणी लावून पुढील ‘देशकाल’ म्हणावा.

श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्‍वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगे युगचतुष्के कलियुगे प्रथमचरणे जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखण्डे दक्षिणपथे रामक्षेत्रे बौद्धावतारे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणतीरेे शालिवाहन शके अस्मिन् वर्तमाने व्यावहारिके क्रोधी नाम संवत्सरे, दक्षिणायने, वर्षा ऋतौ, भाद्रपद मासे, शुक्ल पक्षे, चतुर्थ्यां तिथौ, शनि वासरे, चित्रा (१२.३४ नंतर स्वाती) दिवस नक्षत्रे, ब्रह्मा योगे, विष्टी करणे, तुला स्थिते वर्तमाने श्रीचंद्रे, सिंह स्थिते वर्तमाने श्रीसूर्ये, वृषभ स्थिते वर्तमाने श्रीदेवगुरौ, कुंभ स्थिते वर्तमाने श्रीशनैश्‍चरे, शेषेषु सर्वग्रहेषु यथायथं राशिस्थानानि स्थितेषु एवङ्गुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ…
४ उ १ अ. ‘देशकाला’च्या संदर्भातील सूचना

पंचांग
पंचांग

ज्या प्रदेशाला ‘दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे बौद्धावतारे रामक्षेत्रे’ हे वर्णन लागू नसेल किंवा प्रदेशाचा ‘देशकाल’ पूजकाला ठाऊक नसेल, त्या वेळी वर उल्लेखिलेल्या शब्दांच्या ठिकाणी ‘आर्यावर्त देशे’ असे म्हणावे.

ज्यांना वरील ‘देशकाल’ म्हणणे शक्य नसेल, त्यांनी पुढील श्लोक म्हणावा आणि नंतर ‘संकल्प’ उच्चारावा.

तिथिर्विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च ।
योगश्च करणं चैव सर्वं विष्णुमयं जगत् ।।

अर्थ : तिथी, वार, नक्षत्र, योग, करण इत्यादींच्या उच्चारणाचे सर्व फल श्रीविष्णूच्या स्मरणाने प्राप्त होते; कारण सर्व जगच विष्णुमय आहे.

४ उ २. संकल्प

उजव्या हातात अक्षता घेऊन ‘संकल्प’ उच्चारावा.

मम आत्मनः परमेश्वराज्ञारूपसकलशास्त्र-श्रुतिस्मृतिपुराणोक्तफलप्राप्तिद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं मम श्रीसिद्धिविनायकप्रीतिद्वारा सकलपापक्षयपूर्वकं  सर्वकर्मनिर्विघ्नत्वपुत्रपौत्राभिवृद्धि महैश्वर्यविद्याविजयसंपदादिकल्पोक्त-फलसिद्ध्यर्थम् श्रीसिद्धिविनायकदेवताप्रीत्यर्थं ध्यानावाहनादि षोडशोपचारैः पूजनमहं करिष्ये । तत्रादौ निर्विघ्नतासिध्द्यर्थं श्री महागणपतिपूजनं करिष्ये । शरीरशुद्ध्यर्थं विष्णुस्मरणं करिष्ये । कलशशङ्खघण्टादीपपूजनं च करिष्ये ।।
४ उ २ अ. ‘संकल्पा’च्या संदर्भातील सूचना

१. प्रत्येक वेळी डाव्या हाताने पळीभर पाणी घेऊन ते उजव्या हातावरून खाली सोडतांना ‘करिष्ये’ असे म्हणावे.

२. भारतातील अनेक प्रांतांमध्ये केवळ श्री सिद्धिविनायकाचे पूजन करतात; म्हणून आम्ही संकल्पासह पूजेमध्ये केवळ श्री सिद्धिविनायकाचा उल्लेख केला आहे. (गोवा राज्य आणि महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्हा या भागात बहुतेक ठिकाणी श्री सिद्धिविनायकासह पार्वती आणि शंकर यांचे पूजन करतात; म्हणून संबंधितांनी संकल्पात ‘श्रीउमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकदेवताप्रीत्यर्थम्’ आणि पूजेच्या अंतर्गत प्रत्येक उपचार अर्पण करतांना ‘श्रीउमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः ।’ असे म्हणावे.)

४ उ ३. ‘देशकाल’ आणि ‘संकल्प’ यांचा अर्थ

महापुरुष भगवान श्रीविष्णूच्या आज्ञेने प्रेरित झालेल्या या ब्रह्मदेवाच्या दुसर्‍या परार्धामधील विष्णुपदातील श्रीश्वेतवाराह कल्पामधील वैवस्वत मन्वंतरामधील अठ्ठाविसाव्या युगातील चतुर्युगातील कलियुगाच्या पहिल्या चरणातील जम्बु द्वीपावरील भरतवर्षामध्ये भरत खंडामध्ये दंडकारण्य देशामध्ये गोदावरी नदीच्या दक्षिण तटावर बौद्धावतारात रामक्षेत्रात सध्या चालू असलेल्या शालिवाहन शकातील व्यावहारिक ‘अमुक’नावाच्या वर्षातील दक्षिणायनातील वर्षा ऋतूतील भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी या तिथीला ‘अमुक’वारी ‘अमुक’ नक्षत्रातील शुभयोगातील शुभघडीला वरील गुणविशेषांनी युक्त शुभ आणि पुण्यकारक अशी आज तिथी आहे. सर्व शास्त्रे आणि श्रुती-स्मृती-पुराणे ही मला परमेश्वराच्या आज्ञेसारखी आहेत. यांत सांगितलेले फळ मला मिळावे आणि परमेश्वराने माझ्यावर प्रसन्न व्हावे, यासाठी मी हे पूजन करत आहे. श्री सिद्धिविनायकाच्या कृपेने सर्व पापांचा क्षय होऊन सर्व कर्मांतील विघ्ने दूर व्हावीत; तसेच पुत्रपौत्रांची भरभराट व्हावी; चांगले वैभव लाभावे; शास्त्रांत सांगितलेल्या विद्या, विजय, संपत्ती इत्यादी फळांची प्राप्ती व्हावी, या उद्देशाने श्री उमामहेश्वरसहित श्री सिद्धिविनायक-देवतेला प्रसन्न करण्यासाठी मी ही पूजा करत आहे. त्यामध्ये पहिल्यांदा विघ्ननाशनासाठी श्री महागणपतिपूजन आणि शरीरशुद्धीसाठी विष्णुस्मरण करत आहे. त्याचप्रमाणे कलश, शंख, घंटा आणि दीप यांची पूजा करत आहे.


४ ऊ. श्री महागणपतिपूजन

प्रथम पार्थिव मूर्तीच्या समोर किंवा उपलब्ध स्थानानुसार ताम्हण अथवा केळीचे पान ठेवावे. त्यावर तांदळाची रास घालावी. त्यावर श्रीफळ ठेवतांना त्याची शेंडी आपल्या दिशेने ठेवावी. नंतर चंदनादी उपचारांनी श्री महागणपतीचे पूजन करावे.

४ ऊ १. ध्यान

नमस्काराची मुद्रा करून हात छातीशी घ्यावेत आणि श्री महागणपतीचे रूप डोळे मिटून मनात आठवावे अन् पुढील श्लोक म्हणावा.

वक्रतुण्ड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।

अर्थ : कुमार्गाने जाणार्‍यांना सरळ मार्गावर आणणार्‍या, प्रचंड शरीर असलेल्या अन् कोटी सूर्यांचे तेज असलेल्या हे गणपतिदेवा, माझ्या कार्यांतील विघ्ने तू सदोदित दूर कर.

श्री महागणपतये नमः । ध्यायामि ।।
(मी तुला नमस्कार करून तुझे ध्यान करतो.)

४ ऊ २. आवाहन

उजव्या हातात (मध्यमा, अनामिका आणि अंगठा एकत्र करून) अक्षता घेऊन ‘आवाहयामि’ म्हणतांना त्या श्रीफळरूपी श्री महागणपतीच्या चरणी वहाव्यात.

श्रीमहागणपतये नमः । महागणपतिं साङ्गं सपरिवारं सायुधं सशक्तिकं आवाहयामि ।।

४ ऊ ३. आसन

उजव्या हातात अक्षता घेऊन ‘समर्पयामि’ म्हणतांना त्या श्री महागणपतीच्या चरणी वहाव्यात.

श्री महागणपतये नमः । आसनार्थे अक्षतान् समर्पयामि ।।

४ ऊ ४. चंदनादी उपचार

उजव्या हाताच्या अनामिकेने गंध (चंदन) देवाला लावा. त्यानंतर पुढील नाममंत्र म्हणतांना ‘समर्पयामि’ हा शब्द उच्चारत कंसात दिल्याप्रमाणे उपचार देवाच्या चरणी अर्पण करावेत.

श्री महागणपतये नमः । चन्दनं समर्पयामि ।। (गंध लावावे.)

ऋद्धिसिद्धिभ्यां नमः । हरिद्रां समर्पयामि ।। (श्री महागणपतीच्या चरणी हळद वहावी.)

ऋद्धिसिद्धिभ्यां नमः । कुङ्कुमं समर्पयामि ।। (श्री महागणपतीच्या चरणी कुंकू वहावे.)

श्री महागणपतये नमः । ऋद्धिसिद्धिभ्यां नमः । सिन्दूरं समर्पयामि ।। (सिंदूर वहावा.)

श्री महागणपतये नमः । अलङ्कारार्थे अक्षतान् समर्पयामि ।। (अक्षता वहाव्यात.)

श्री महागणपतये नमः । पुष्पं समर्पयामि ।। (फूल वहावे.)

श्री महागणपतये नमः । दूर्वाङ्कुरान् समर्पयामि ।। (दूर्वा वहाव्यात.)

श्री महागणपतये नमः । धूपं समर्पयामि ।। (उदबत्ती ओवाळावी.)

श्री महागणपतये नमः । दीपं समर्पयामि ।। (निरांजन ओवाळावे.)

 

उजव्या हातात २ दूर्वा घेऊन त्यावर पाणी घालावे. नंतर दूर्वांनी ते पाणी नैवेद्यावर प्रोक्षण करून (शिंपडून) दूर्वा हातातच धरून ठेवाव्यात आणि आपल्या डाव्या हाताची बोटे दोन्ही डोळ्यांवर (पाठभेद : डावा हात छातीवर) ठेवून नैवेद्य समर्पण करतांना पुढील मंत्र म्हणावेत.

प्राणाय नमः ।

अपानाय नमः ।

व्यानाय नमः ।

उदानाय नमः ।

समानाय नमः ।

ब्रह्मणे नमः ।।

 

टीप – वेदोक्त पूजाविधीमध्ये ‘प्राणाय नमः ।’ या ठिकाणी ‘ॐ प्राणाय स्वाहा ।’ अशा प्रकारे मंत्र म्हणतात. हातातील एक दूर्वा नैवेद्यावर आणि दुसरी दूर्वा श्री गणपतीच्या चरणी वहावी. हातावर पाणी घ्यावे अन् पुढील प्रत्येक मंत्र म्हणतांना ते पाणी ताम्हणात सोडावे.

 

श्रीमहागणपतये नमः । नैवेद्यं समर्पयामि ।। मध्ये पानीयं समर्पयामि ।

उत्तरापोशनं समर्पयामि । हस्तप्रक्षालनं समर्पयामि । मुखप्रक्षालनं समर्पयामि ।। (गंध-फूल वहावे.)

करोद्वर्तनार्थे चन्दनं समर्पयामि ।।

 

नमस्काराची मुद्रा करून प्रार्थना करावी.

 

कार्यं मे सिद्धिमायातु प्रसन्ने त्वयि धातरि । विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि गणनायक ।।

अर्थ : हे विधात्या, देवांचा नायक असलेल्या श्री गणपति, ‘तू प्रसन्न हो आणि माझ्या कार्यामध्ये येणार्‍या विघ्नांचा नाश कर. माझे कार्य सिद्धीस जाऊ दे.’

 

यानंतर पळीभर पाणी घ्यावे आणि ‘प्रीयताम्’ हा शब्द म्हणतांना ते ताम्हणात सोडावे.

अनेन कृतपूजनेन श्री महागणपतिः प्रीयताम् ।

४ ए. श्रीविष्णुस्मरण

दोन्ही हात पुसून नमस्काराच्या मुद्रेत छातीशी हात जोडावेत. नंतर ९ वेळा ‘विष्णवे नमो’ म्हणावे अन् शेवटी ‘विष्णवे नमः ।’ असे म्हणावे.

४ ऐ. पूजेशी संबंधित उपकरणांचे पूजन

४ ऐ १. कलशपूजन

कलश पूजा
कलश पूजा

गङ्गे च यमुने चैव गोदावरि सरस्वति ।

नर्मदे सिन्धुकावेरि जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु ।।

अर्थ : हे गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधु अन् कावेरी या नद्यांनो, या पाण्यामध्ये तुम्ही वास करा.

 

कलशे गङ्गादितीर्थान्यावाहयामि ।।

कलशदेवताभ्यो नमः ।

सर्वोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि ।।

 

कलशामध्ये गंध, अक्षता अन् फूल एकत्रित वहावे.

४ ऐ २. शंखपूजा

शंखपूजा
शंखपूजा

शङ्खदेवताभ्यो नमः ।

सर्वोपचारार्थे गन्धपुष्पं समर्पयामि ।।

अर्थ : हे शंखदेवते, मी तुला वंदन करून सर्व उपचारांसाठी गंध-फूल समर्पित करतो. (प्रत्येक घरी शंख असतोच, असे नाही. ज्यांच्या घरी शंख असेल, त्यांनी वरीलप्रमाणे पूजन करावे.)

 

४ ऐ ३. घंटापूजा

घंटापूजा
घंटापूजा

आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसाम् ।

कुर्वे घण्टारवं तत्र देवताह्वानलक्षणम् ।।

अर्थ : देवतांनी यावे आणि राक्षसांनी निघून जावे, यासाठी देवता-आगमनसूचक असा नाद करणार्‍या घंटादेवतेला वंदन करून गंध, अक्षता अन् फूल समर्पित करतो.

 

घण्टायै नमः । सर्वोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि ।।

४ ऐ ४. दीपपूजा

दीपपूजा
दीपपूजा

भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः ।

आरोग्यं देहि पुत्रांश्च मतिं शान्तिं प्रयच्छ मे ।।

दीपदेवताभ्यो नमः ।

सर्वोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि ।।

अर्थ : हे दीपदेवते, तू ब्रह्मस्वरूप आहेस. सर्व ज्योतींचा अव्यय असा स्वामी आहेस. तू मला आरोग्य, पुत्रसौख्य, बुद्धी आणि शांती दे. मी तुला वंदन करून सर्व उपचारांसाठी गंध, अक्षता अन् फूल समर्पित करतो. (दीपदेवतेला हळद-कुंकू वहाण्याचीही पद्धतही आहे.)

४ ऐ ५. मंडपपूजन

पुढील मंत्र म्हणतांना ‘समर्पयामि’ या शब्दाच्या वेळी मंडपावर गंध, अक्षता आणि फूल वहावे.

 

मण्डपदेवताभ्यो नमः ।

गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि ।।

 

टीप – गोव्यात आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी मंडपावर विविध प्रकारची फळे बांधून आरास केली जाते, याला ‘माटोळी’ असे म्हणतात.

४ ओ. पूजासाहित्य आणि पूजास्थळ यांची, तसेच स्वतःची (पूजकाची) शुद्धी

कलश आणि शंख यांतील थोडेसे पाणी पळीमध्ये एकत्र घ्यावे. पूजकाने पुढील मंत्र म्हणत तुळशीपत्राच्या साहाय्याने ते पाणी पूजासाहित्य, स्वतःच्या सभोवती (भूमीवर) अन् स्वतःवर (स्वतःच्या डोक्यावर) प्रोक्षण करावे (शिंपडावे).

 

अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थाङ्गतोऽपि वा ।

यः स्मरेत् पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यन्तरः शुचिः ।।

अर्थ : अपवित्र किंवा कोणत्याही अवस्थेतील मनुष्य पुंडरीकाक्षाच्या (विष्णूच्या) स्मरणाने अंतर्बाह्य शुद्ध होतो. वरील मंत्र म्हणणे कठीण वाटल्यास ‘श्री पुण्डरीकाक्षाय नमः ।’ हा नाममंत्र म्हणत वरील कृती करावी. त्यानंतर तुळशीचे पान ताम्हणात सोडावे.

४ औ. श्री सिद्धिविनायकाच्या पार्थिव मूर्तीची पूजा

४ औ १. श्री गणेशमूर्तीची स्थापना आणि प्राणप्रतिष्ठा

अ. श्री गणेशमूर्तीची स्थापना पूर्व दिशेला करावी. तसे करणे शक्य नसल्यास ‘पूजकाचे मुख दक्षिण दिशेकडे होणार नाही’, अशा रीतीने श्री गणेशमूर्तीची स्थापना करावी.

आ. ज्या पाटावर मूर्तीची स्थापना करायची आहे, त्या पाटाच्या मध्यभागी १ मूठ अक्षता (धुतलेले अखंड तांदूळ) ठेवाव्यात. त्यावर पिंजरीने स्वस्तिक काढावे.

इ. नंतर त्या तांदळावर पुढीलप्रमाणे मूर्तीची ‘प्राणप्रतिष्ठा’ करावी. ‘प्राणप्रतिष्ठा’ म्हणजे मूर्तीमध्ये देवत्व आणणे. यासाठी पूजकाने स्वतःचा उजवा हात मूर्तीच्या हृदयाला लावून ‘या मूर्तीत श्री सिद्धिविनायकाचे प्राण (तत्त्व) आकृष्ट होत आहे’, असा भाव ठेवून पुढील मंत्र म्हणावेत.

अस्यश्रीप्राणप्रतिष्ठामन्त्रस्य ब्रह्मविष्णुमहेश्वराय-ऋषयः ऋग्यजुःसामानिछन्दांसि पराप्राण-शक्तिर्देवता आं बीजं ह्रीं

शक्तिः क्रों कीलकम् अस्यां मुर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोगः ।।

ॐ आंह्रींक्रों अंयंरंलंवंशंषंसंहंळंक्षंअः क्रोंह्रींआं हंसः सोहम् । देवस्य प्राणाइहप्राणाः ।।

ॐ आंह्रींक्रों अंयंरंलंवंशंषंसंहंळंक्षंअः क्रोंह्रींआं हंसः सोहम् । देवस्य जीव इह स्थितः ।।

ॐ आंह्रींक्रों अंयंरंलंवंशंषंसंहंळंक्षंअः क्रोंह्रींआं हंसः सोहम् । देवस्य सर्वेन्द्रियाणि ।।

ॐ आंह्रींक्रों अंयंरंलंवंशंषंसंहंळंक्षंअः क्रोंह्रींआं हंसः सोहम् । देवस्य वाङ्मनःचक्षुःश्रोत्रजिह्वाघ्राणप्राणा इहागत्य सुखंसुचिरं तिष्ठन्तु स्वाहा ।।

 

टीप – प्राणप्रतिष्ठेचे वरील मंत्र वेदोक्त आहेत. वेदोक्त मंत्रपठण न शिकलेल्यांनी पुढील श्लोक म्हणावा.

अस्यै प्राणाः प्रतिष्ठन्तु अस्यै प्राणाः क्षरन्तु च ।

अस्यै देवत्वमर्चायै मामहेति च कश्चन ।।

नंतर ‘ॐ’ किंवा ‘परमात्मने नमः ।’ असे १५ वेळा म्हणावे.


४ औ २. षोडशोपचार पूजा ध्यान

षोडशोपचार पूजा
षोडशोपचार पूजा

 

हात जोडून नमस्काराची मुद्रा करावी.

 

णानांत्वाणपतिंहवामहे-
विंकवीनामुमश्रवस्तमम् ।
ज्येष्ठराजंब्रह्मणांब्रह्मणस्प-आनःशृण्वन्नूतिभिःसीसादनम् ।।

टीप – हा मंत्र वेदोक्त आहे. वेदोक्त मंत्रपठण न शिकलेल्यांनी पुढील श्लोक म्हणावा.

 

कदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजम् ।
पाशाङ्कुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकम् ।।

अर्थ : ज्याच्या मुखकमलात एकच दात आहे, कान सुपासारखे मोठे रुंद आहेत, तोंड हत्तीचे आहे, चार हात आहेत आणि हातांमध्ये अंकुश अन् पाश धारण केला आहे, अशा श्री सिद्धिविनायकदेवाचे मी ध्यान (चिंतन) करतो.

श्री सिद्धिविनायकाय नमः । ध्यायामि ।।

१. पहिला उपचार – आवाहन

उजव्या हातात अक्षता घेऊन त्या ‘आवाहयामि’ म्हणतांना श्री सिद्धिविनायकाच्या चरणी वहा. (अक्षता वहातांना मध्यमा, अनामिका  (करंगळीच्या शेजारचे बोट) आणि अंगठा एकत्र करून वहाव्यात.)

 

आवाहयामि विघ्नेश सुरराजार्चितेश्वर ।

अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थं गणनायक ।।

अर्थ : हे विघ्नेशा, देवगणांनी पुजलेल्या, अनाथांच्या नाथा आणि सर्वज्ञ गणनायका, मी पूजेसाठी तुझे आवाहन करतो.

 

श्री सिद्धिविनायकाय नमः । आवाहयामि ।।

२. दुसरा उपचार – आसन

उजव्या हातात अक्षता घेऊन ‘समर्पयामि’ म्हणतांना देवाच्या चरणी वहा.

विचित्ररत्नरचितं दिव्यास्तरणसंयुतम् ।

स्वर्णसिंहासनं चारु गृहाण सुरपूजित ।।

श्री सिद्धिविनायकाय नमः ।

आसनार्थे अक्षतान् समर्पयामि ।।

३. तिसरा उपचार – पाद्य

डाव्या हाताने पळीभर पाणी घ्या आणि उजव्या हातात २ दूर्वा घ्या. नंतर ‘समर्पयामि’ म्हणतांना ते पाणी २ दूर्वांद्वारे श्री सिद्धिविनायकाच्या चरणांवर प्रोक्षण करा.

सर्वतीर्थसमुद् भूतं पाद्यं गन्धादिभिर्युतम् ।

विघ्नराज गृहाणेदं भगवन्भक्तवत्सल ।।

श्री सिद्धिविनायकाय नमः । पाद्यं समर्पयामि ।।

४. चौथा उपचार – अर्घ्य

उजव्या हाताने एक फूल घेऊन ते पंचपात्रीतील पाण्याने किंचित् ओले करावे. मग उजव्या हातात ते फूल, गंध, अक्षता आणि सुपारी घ्यावी. नंतर पुढील मंत्रामध्ये ‘समर्पयामि’ म्हणतांना ते सर्व श्री सिद्धिविनायकाच्या उजव्या हातावर किंवा चरणांशी ठेवावे.

अर्घ्यं च फलसंयुक्तं गन्धपुष्पाक्षतैर्युतम् ।
गणाध्यक्ष नमस्तेऽस्तु गृहाण करुणानिधे ॥

अर्थ : हे गणाध्यक्षा (गणनायका), तुला नमस्कार असो. हे करुणेच्या सागरा, गंध, फुले, अक्षता आणि फळे यांच्यासह असणार्‍या या अर्घ्याचा स्वीकार कर.

श्री सिद्धिविनायकाय नमः । अर्घ्यं समर्पयामि ॥

५. पाचवा उपचार – आचमन

डाव्या हातात पळीभर पाणी आणि उजव्या हातात २ दूर्वा घ्या. नंतर ‘समर्पयामि’ म्हणतांना ते पाणी दूर्वांद्वारे श्री सिद्धिविनायकाच्या चरणांवर प्रोक्षण करा.

विनायक नमस्तुभ्यं त्रिदशैरभिवन्दितम् ।

गङ्गोदकेन देवेश शीघ्रमाचमनं कुरु ।।

अर्थ : हे विनायका, देवांनीही अभिवादन केलेल्या देवेशा, या गंगेच्या पाण्याचा आचमनार्थ तू स्वीकार कर.

श्री सिद्धिविनायकाय नमः । आचमनीयं समर्पयामि ।।

६. सहावा उपचार – स्नान

पळीभर पाणी घ्या. मग उजव्या हातात दूर्वा घेऊन ‘समर्पयामि’ म्हणतांना ते पाणी दूर्वांद्वारे श्री सिद्धिविनायकाच्या चरणांवर प्रोक्षण करा.

गङ्गासरस्वतीरेवापयोष्णीयमुनाजलैः ।

स्नापितोऽसि मया देव तथा शान्तिं कुरुष्व मे ।।

अर्थ : गंगा, सरस्वती, रेवा (नर्मदा), पयोष्णी आणि यमुना या नद्यांच्या पाण्याने मी तुला स्नान घालत आहे. हे देवा, मला शांती प्रदान कर.

श्री सिद्धिविनायकाय नमः । स्नानं समर्पयामि ।।

६ अ. पंचामृतस्नान

देवतेला दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे स्नान घालण्यासाठी उजव्या हातात २ दूर्वा घ्या‍व्यात. नंतर पुढीलप्रमाणे ‘समर्पयामि’ म्हणतांना श्री सिद्धिविनायकाच्या चरणांवर दूध आणि नंतर पंचपात्रातील शुद्ध पाणी प्रोक्षण करावे. अशाच प्रकारे अनुक्रमे उर्वरित प्रत्येक उपचाराद्वारे देवाला स्नान घालावे.

श्री सिद्धिविनायकाय नमः । पयस्नानं समर्पयामि ।

दूर्वांच्या साहाय्याने पुढील प्रत्येक उपचाराद्वारे स्नान घातल्यानंतर ‘तदन्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि ॥’ असे म्हणत ‘श्री सिद्धिविनायकाच्या चरणी शुद्ध पाणी प्रोक्षण करावे.

श्री सिद्धिविनायकाय नमः । दधिस्नानं समर्पयामि ॥

श्री सिद्धिविनायकाय नमः । घृतस्नानं समर्पयामि ॥

श्री सिद्धिविनायकाय नमः । मधुस्नानं समर्पयामि ॥

श्री सिद्धिविनायकाय नमः । शर्करास्नानं समर्पयामि ॥

६ आ. गंधोदकस्नान

पाण्यात गंध अन् कापूर घालून ते पाणी श्री सिद्धिविनायकाच्या चरणी प्रोक्षण करावे. नंतर शुद्धोदक प्रोक्षण करावे.

श्री सिद्धिविनायकाय नमः । गन्धोदकस्नानं समर्पयामि  ॥ तदन्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि  ॥

६ इ. अभिषेक

पंचपात्रीमध्ये पाणी भरून घ्यावे आणि उजव्या हातात दूर्वा घ्याव्यात. नंतर पळीतील पाणी दूर्वांद्वारे देवावर प्रोक्षण करतांना ‘श्रीगणपति अथर्वशीर्ष’ किंवा ‘संकटनाशन गणपतिस्तोत्र’ म्हणावे.

७. सातवा उपचार – वस्त्र

‘समर्पयामि’ म्हणतांना श्री सिद्धिविनायकाला लाल रंगाचे सोवळे-उपरणे किंवा कापसाची वस्त्रे (कापसाची ७ मण्यांची आणि कुंकू लावलेली दोन तांबडी वस्त्रे घ्या. नंतर त्यांतील एक वस्त्र मूर्तीच्या गळ्यात अलंकारासारखे घाला आणि दुसरे वस्त्र मूर्तीच्या चरणांवर ठेवा.) किंवा अक्षता अर्पण करा.

श्री सिद्धिविनायकाय नमः । वस्त्रं / वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं / वस्त्रोपवस्त्रार्थे अक्षतां समर्पयामि ॥

८. आठवा उपचार – यज्ञोपवीत

श्री सिद्धिविनायकाला यज्ञोपवीत (जानवे) अर्पण करावे किं‍वा अक्षता वहाव्यात.

राजतं ब्रह्मसूत्रं च काञ्चनस्योत्तरीयकम् ।

विनायक नमस्तेऽस्तु गृहाण सुरवन्दित ।।

अर्थ : हे सुरगणपूजित विनायका, सुवर्णाचे उत्तरीय अन् रुप्याप्रमाणे लखलखित यज्ञोपविताचा तू स्वीकार कर.

 

श्री सिद्धिविनायकाय नमः । यज्ञोपवीतं / यज्ञोपवीतार्थे अक्षतान् समर्पयामि ।।

यज्ञोपवीत हे श्री गणेशाच्या गळ्यात घालावे आणि नंतर ते मूर्तीच्या उजव्या हाताखाली घ्यावे.

९. नववा उपचार – चंदन

श्री सिद्धिविनायकाला अनामिकेने गंध लावावे.

श्रीखण्डं चन्दनं दिव्यं गन्धाढ्यं सुमनोहरम् ।

विलेपनं सुरश्रेष्ठ चन्दनं प्रतिगृह्यताम् ।।

अर्थ : हे देवश्रेष्ठा, अत्यंत मनोहर, भरपूर सुगंधाने पुष्ट असणार्‍या दिव्य अशा श्रीखंड चंदनाच्या लेपाचा तू स्वीकार कर.

 

श्री सिद्धिविनायकाय नमः । विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि ।।

ऋद्धिसिद्धिभ्यां नमः । हरिद्रां कुङ्कुमं समर्पयामि ॥ (मूर्तीच्या चरणी हळद-कुंकू वहावे.)

श्री सिद्धिविनायकाय नमः । सिन्दूरं समर्पयामि ॥ (श्री सिद्धिविनायकाच्या चरणी शेंदूर वहावा.)

१०. दहावा उपचार – फुले-पत्री

उपलब्ध असलेली विविध प्रकारची फुले आणि पत्री अर्पण करावीत.

माल्यादीनि सुगन्धीनि मालत्यादीनि वै प्रभो ।

मया हृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम् ।।

सेवन्तिकाबकुलम्पकपाटलाब्जैः पुन्नागजातिकरवीररसालपुष्पैः ।

बिल्वप्रवालतुलसीदलमालतीभिः त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद ।।

अर्थ : हे प्रभो, मी पूजेसाठी आणलेल्या फुलांच्या माळा, तसेच चमेली आदी सुगंधित फुले यांचा आपण स्‍वीकार करावा. तसेच शेवंती, बकुळ, चाफा, गुलाब, कमळ, नागचाफा, कण्हेर, आंब्याचा मोहर, बेल, प्रवाळ, तुळस, चमेली आदी फुलांनी मी तुझी पूजा करतो. हे जगदीश्वरा, तू प्रसन्न हो.

 

श्री सिद्धिविनायकाय नमः । ऋतुकालोद्भवपुष्पाणि समर्पयामि ।।

अंगपूजा

पुढील नावांनी श्री सिद्धिविनायकाच्या चरणी किंवा देवाच्या त्या त्या अवयवांवर उजव्या हाताने (मध्यमा, अनामिका [करंगळीच्या शेजाचरचे बोट] आणि अंगठा एकत्र करून) अक्षता वहाव्यात.

श्री गणेशाय नमः । पादौ पूजयामि ।। (चरणांवर)

श्री विघ्नराजाय नमः । जानुनी पूजयामि ।। (गुडघ्यांवर)

श्री आखुवाहनाय नमः । ऊरू पूजयामि ।। (मांड्यांवर)

श्री हेरम्बाय नमः । कटिं पूजयामि ।। (कमरेवर)

श्री कामारिसूनवे नमः । नाभिं पूजयामि ।। (बेंबीवर)

श्री लम्बोदराय नमः । उदरं पूजयामि ।। (पोटावर)

श्री गौरीसुताय नमः । हृदयं पूजयामि ।। (छातीवर)

श्री स्थूलकण्ठाय नमः । कण्ठं पूजयामि ।। (गळ्यावर)

श्री स्कन्दाग्रजाय नमः । स्कन्धौ पूजयामि ।। (खांद्यांवर)

श्री पाशहस्ताय नमः । हस्तौ पूजयामि ।। (हातावर)

श्री गजवक्त्राय नमः । वक्त्रं पूजयामि ।। (मुखावर)

श्री विघ्नहर्त्रे नमः । नेत्रे पूजयामि ।। (डोळ्यांवर)

श्री सर्वेश्वराय नमः । शिरः पूजयामि ।। (मस्तकावर)

श्री गणाधिपाय नमः । सर्वाङ्गं पूजयामि ।। (सर्वांगावर)

 

पत्रीपूजा

पुढील नावांनी देठ देवाकडे करून ‘समर्पयामि’ असे म्हणतांना देवाच्या चरणी पत्री वहावी. (सर्व ठिकाणी प्रत्येक प्रकारची पत्री उपलब्ध असेलच, असे नाही. त्यामुळे जी पत्री उपलब्ध झाली नसेल, त्या पत्रीच्या ठिकाणी देवाला २ दूर्वा किंवा अक्षता वहाव्यात.)

 

श्री सुमुखाय नमः । मालतीपत्रं समर्पयामि ।। (चमेलीचे पान)

श्री गणाधिपाय नमः । भृङ्गराजपत्रं समर्पयामि ।। (माका)

श्री उमापुत्राय नमः । बिल्वपत्रं समर्पयामि ।। (बेल)

श्री गजाननाय नमः । श्वेतदूर्वापत्रं समर्पयामि ।। (पांढर्‍या दूर्वा)

श्री लम्बोदराय नमः । बदरीपत्रं समर्पयामि ।। (बोर)

श्री हरसूनवे नमः । धत्तूरपत्रं समर्पयामि ।। (धोतरा)

श्री गजकर्णाय नमः । तुलसीपत्रं समर्पयामि ।। (तुळस)

श्री गुहाग्रजाय नमः । अपामार्गपत्रं समर्पयामि ।। (आघाडा)

श्री वक्रतुण्डाय नमः । शमीपत्रं समर्पयामि ।। (शमी)

श्री एकदन्ताय नमः । केतकीपत्रं समर्पयामि ।। (केवडा)

श्री विकटाय नमः । करवीरपत्रं समर्पयामि ।। (कण्हेर)

श्री विनायकाय नमः । अश्मन्तकपत्रं समर्पयामि ।। (आपटा)

श्री कपिलाय नमः । अर्कपत्रं समर्पयामि ।। (रुई)

श्री भिन्नदन्ताय नमः । अर्जुनपत्रं समर्पयामि ।। (अर्जुनसादडा)

श्री पत्नीयुताय नमः । विष्णुक्रान्तापत्रं समर्पयामि ।। (गोकर्ण)

श्री बटवेनमः । दाडिमीपत्रं समर्पयामि ।। (डाळिंब)

श्री सुरेशाय नमः । देवदारूपत्रं समर्पयामि ।। (देवदार)

श्री भालचन्द्राय नमः । मरूबकपत्रं समर्पयामि ।।(मरवा)

श्री हेरम्बाय नमः । सिन्दुवारपत्रं समर्पयामि ।। (निगडी / लिंगड)

श्री शूर्पकर्णाय नमः । जातीपत्रं समर्पयामि ।। (जाई)

श्री सर्वेश्वराय नमः । अगस्तिपत्रं समर्पयामि ।। (अगस्ति)

 

यानंतर श्री सिद्धिविनायकाची १०८ किंवा १ सहस्र नावे उच्चारून एकेक दूर्वा अर्पण करतात.

११. अकरावा उपचार – धूप

धूप दाखवावा किं‍वा उदबत्ती ओवाळावी.

वनस्पतिरसोद्भूतो गन्धाढ्यो गन्ध उत्तमः ।

आघ्रेयः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् ।।

अर्थ : वनस्पतींच्या रसांतून उत्पन्न झालेला, पुष्कळ सुगंधाने युक्त असलेला आणि सर्व देवतांनी सुवास घेण्याजोगा असा हा धूप मी तुला दाखवत आहे. हे देवा, तू याचा स्वीकार कर.

श्री सिद्धिविनायकाय नमः । धूपं समर्पयामि ।।

१२. बारावा उपचार – दीप

निरांजन ओवाळावे.

आज्यं च वर्तिसंयुक्तं वह्निना योजितं मया ।

दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापह ।।

भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने ।

त्राहि मां निरयाद् घोराद् दीपोऽयं प्रतिगृह्यताम् ।।

अर्थ : हे त्रिभुवनातील अंधार दूर करणार्‍या देवेशा, मी अग्नीने संयुक्त केलेली तुपाची वात तुला अर्पण करत आहे. हे परमात्मने, भक्तीपूर्वक अर्पण केलेल्या या दीपाचा तू स्वीकार कर. हे भगवंता, तूच मला घोर नरकातून सोडव.

श्री सिद्धिविनायकाय नमः । दीपं समर्पयामि ।। (निरांजन ओवाळावे.)

१३. तेरावा उपचार – नैवेद्य

उजव्या हातात २ दूर्वा (दूर्वा नसल्यास शमी किंवा बेलाचे पान चालेल.) घेऊन त्यांच्यावर पाणी घालावे. ते पाणी नैवेद्यावर शिंपडून दूर्वा हातातच धराव्यात. दूर्वांसह पाण्याने नैवेद्याभोवती मंडल करावे. नंतर आपला डावा हात छातीवर ठेवावा (पाठभेद : आपल्या डाव्या हाताची बोटे दोन्ही डोळ्यांवर ठेवावी). तसेच आपल्या उजव्या हाताच्या बोटांनी श्री सिद्धिविनायकाला त्या नैवेद्याचा गंध देतांना (नैवेद्य समर्पित करतांना) पुढील मंत्र म्हणावा.

नैवेद्यं गृह्यतां देव भक्तिं मे ह्यचलां कुरु । ईप्सितं मे वरं देहि परत्र च परां गतिम् ।।

शर्कराखण्डखाद्यानि दधिक्षीरघृतानि च । आहारं भक्ष्यभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम् ।।

अर्थ : हे भगवंता, या नैवेद्याचा स्वीकार करावा आणि माझी भक्ती अचल करावी. या लोकात माझे अभीष्ट आणि ईप्सित पूर्ण करावे. तसेच परलोकात मला श्रेष्ठ गती प्राप्त व्हावी. खडीसाखर आदी खाद्यपदार्थ; दही, दूध, तूप आदी भक्ष्य आणि भोज्य आहाररूप अशा नैवेद्याचा आपण स्वीकार करावा.

 

श्री सिद्धिविनायकाय नमः ।

पुरतस्थापितमधुरनैवेद्यं निवेदयामि ।।

प्राणाय नमः । अपानाय नमः । व्यानाय नमः ।

उदानाय नमः । समानाय नमः । ब्रह्मणे नमः ।।

टीप – वेदोक्त पूजाविधीमध्ये ‘प्राणाय नमः ।’ या ठिकाणी ‘ॐ प्राणाय स्वाहा ।’ अशा प्रकारे मंत्र म्हणतात.

 

पूजकाने हातातील १ दूर्वा नैवेद्यावर ठेवावी आणि दुसरी श्री सिद्धिविनायकाच्या चरणी वहावी. डाव्या हातातील पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन पुढील प्रत्येक मंत्रातील ‘समर्पयामि’ असे म्हणतांना ते पाणी ताम्हणात सोडावे.

नैवेद्यं समर्पयामि । मध्ये पानीयं समर्पयामि । उत्तरापोशनं समर्पयामि ।

हस्तप्रक्षालनं समर्पयामि । मुखप्रक्षालनं समर्पयामि ।।

फुलाला गंध लावून ते फूल देवाला वहावे.

श्री सिद्धिविनायकाय नमः । करोद्वर्तनार्थे चन्दनं समर्पयामि ।।

अ. आरती

नंतर आरती करावी. तत्पूर्वी तीन वेळा शंखनाद करावा. आरती करतांना ‘श्री गणेश प्रत्यक्ष समोर आहे आणि मी त्याची आळवणी करत आहे’, या भावाने आरती करावी. आरतीचे तबक देवाभोवती घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने पूर्ण वर्तुळाकृती फिरवावे. आरती ओवाळतांना ती देवाच्या डोक्यावरून ओवाळू नये, तर देवाच्या अनाहत ते आज्ञाचक्रापर्यंत (छातीपासून कपाळापर्यंत) ओवाळावी.

आरतीला उपस्थित असलेल्यांनी आरतीचा अर्थ लक्षात घेऊन ती म्हणावी. आरती म्हणतांना ताल धरण्यासाठी टाळ्या हळुवारपणे वाजवाव्यात. टाळ्यांच्या जोडीला वाद्ये हळुवार वाजवावीत. घंटा मंजुळ नादात वाजवावी आणि तिच्या नादामध्ये सातत्य ठेवावे.

आ. कापूर-आरती

आरती झाल्यावर ‘कर्पूरगौरं करुणावतारं०’ हा मंत्र म्हणत कापूर-आरती करावी.

इ. आरती ग्रहण करणे

कापूर-आरती ग्रहण करावी, म्हणजे ज्योतीवर दोन्ही हातांचे तळवे धरून मग उजवा हात डोक्यावरून पुढून पाठी मानेपर्यंत फिरवावा. (काही कारणास्तव कापूर-आरती केली नसल्यास तुपाच्या निरांजनाच्या ज्योतीवर हात धरून आरती ग्रहण करावी.) सध्या बर्‍याच ठिकाणी आरतीनंतर ‘मंत्रपुष्प, प्रदक्षिणा आणि नमस्कार’ या क्रमाने उपचार केले जातात. परंतु शास्त्रात आरतीनंतर ‘नमस्कार, प्रदक्षिणा आणि मंत्रपुष्प’ हा क्रम सांगितला आहे. यासाठी येथे याच क्रमाने उपचार दिले आहेत.

१४. चौदावा उपचार – नमस्कार

पुढील श्लोक म्हणून देवाला पूर्ण शरणागत भावाने साष्टांग नमस्कार घालावा.

नमः सर्वहितार्थाय जगदाधारहेतवे ।

साष्टाङ्गोऽयं प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृतः ।।

नमोऽस्त्वनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरोरुबाहवे ।।

सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटीयुगधारिणे नमः ।।

अर्थ : सर्व जगाचा आधार आणि कारण असलेल्या अन् सर्वांचे हित करणार्‍या देवा, मी तुला साष्टांग प्रणाम करतो. सहस्रशरिरे, पाद (पाय), नेत्र, शिर, मांड्या आणि बाहू असलेल्या; सहस्र नावे असलेल्या; सहस्र कोटी युगांना धारण करणार्‍या; शाश्वत अन् अनंत अशा महापुरुषाला माझा नमस्कार असो.

श्री सिद्धिविनायकाय नमः । नमस्कारान् समर्पयामि ।।

१५. पंधरावा उपचार – प्रदक्षिणा

नमस्काराच्या मुद्रेत छातीजवळ दोन्ही हात जोडावेत आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने स्वतःच्या भोवती गोल फिरून पुढील मंत्र म्हणतांना प्रदक्षिणा घालावी.

यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च ।

तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणपदे पदे ।।

अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम् ।

तस्मात्कारुण्यभावेन रक्ष माम् परमेश्वर ।।

अर्थ : आतापर्यंत जन्मोजन्मी माझ्याकडून घडलेली पापे मी तुला प्रदक्षिणा घालतांना पडत असलेल्या पावलागणिक नष्ट होत आहेत. हे देवा, तुझ्याविना मला कोणीही त्राता नाही, तूच माझा आधार आहेस. म्हणून हे भगवंता, करुणामय दृष्टीने माझे रक्षण कर, हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे.

 

श्री सिद्धिविनायकाय नमः । प्रदक्षिणां समर्पयामि ।।

 

अ. दूर्वायुग्मसमर्पण (पाठभेद : काही ठिकाणी नैवेद्यानंतर दूर्वायुग्म वहातात.)

दूर्वांचे देठ देवाकडे आणि अग्र आपल्याकडे करून पुढील प्रत्येक नावाने दोन दूर्वा एकत्र करून देवाच्या चरणी वहाव्यात, उदा. श्री गणाधिपाय नमः । दूर्वायुग्मं समर्पयामि ।। याप्रमाणे प्रत्येक नाममंत्र उच्चारल्यावर ‘दूर्वायुग्मं समर्पयामि ।’ असे म्हणावे.

श्री गणाधिपाय नमः । श्री उमापुत्राय नमः ।

श्री अघनाशनाय नमः । श्री एकदन्ताय नमः ।

श्री इभवक्त्राय नमः । श्री मूषकवाहनाय नमः ।

श्री विनायकाय नमः । श्री ईशपुत्राय नमः ।

श्री सर्वसिद्धिप्रदायकाय नमः । श्री कुमारगुरवे नमः ।।

 

नंतर पुढील श्लोक म्हणून देवाच्या चरणी एकविसावी दूर्वा वहावी.

गणाधिप नमस्तेऽस्तु उमापुत्राघनाशन । एकदन्तेभवक्त्रेति तथा मूषकवाहन ।।

विनायकेशपुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक । कुमारगुरवे तुभ्यं पूजयामि प्रयत्नतः ।।

श्री सिद्धिविनायकाय नमः । दूर्वामेकां समर्पयामि ।।

१६. सोळावा उपचार – मंत्रपुष्पांजली आणि प्रार्थना

देवाला अर्पण करण्यासाठी फुले हातांच्या ओंजळीत घ्यावीत आणि पुढील श्लोक म्हणून ती देवाच्या चरणी अर्पण करावीत.

मालतीमल्लिकाजातीपद्ममन्दारचम्पकैः ।

भक्त्यार्पितं मया देव गृहाण कुसुमाञ्जलिम् ।।

अर्थ : हे देवा, मी चमेली, मोगरा, जाई, कमळ, मंदार आणि चाफा यांची भक्तीने अर्पण केलेली पुष्पांजली स्वीकार.

श्री सिद्धिविनायकाय नमः । मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि ।

 

नंतर पुढील प्रार्थना करावी.

आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम् । पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर ।।

मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर । यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे ।।

अपराधसहस्राणि क्रियन्तेऽहर्निशं मया । दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर ।।

अर्थ : मला तुझे आवाहन आणि अर्चन, तसेच तुझी पूजा कशी करावी, हेही ज्ञात नाही. पूजा करतांना काही चूक झाली असल्यास मला क्षमा कर. हे देवा, मी मंत्रहीन, क्रियाहीन आणि भक्तीहीन आहे. जी काही मी तुझी पूजा केली आहे, ती तू परिपूर्ण करवून घे. दिवस-रात्र माझ्याकडून कळत नकळत सहस्रो अपराध घडत असतात. ‘मी तुझा दास आहे’, असे समजून मला क्षमा कर.

 

कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् ।

करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि ।।

अर्थ : हे देवा, पूजा करतांना माझ्याकडून काया-वाचा-मन-बुद्धी आदींद्वारे काही चुका झाल्या असल्यास मला क्षमा करावी आणि पूजा परिपूर्ण करून घ्यावी.

 

अनेन देशकालाद्यनुसारतः कृतपूजनेन ।

श्री सिद्धिविनायकदेवता प्रीयताम् ।। (हातावर पाणी घेऊन ताम्हणात सोडावे.)

प्रीतो भवतु । तत्सद्ब्रह्माऽर्पणमस्तु ।।

अर्थ : अशा प्रकारे मी देशकालास अनुसरून केलेल्या पूजेने श्री सिद्धिविनायक संतुष्ट होऊ दे. देव माझ्यावर प्रसन्न होऊ दे. हे सर्व मी कर्म ब्रह्माला अर्पण करतो.

जयघोष

देवतांच्या नावांचा जयघोष करावा.

पूजेच्या शेवटी व्यक्त करावयाची कृतज्ञता

‘हे श्री सिद्धिविनायका, तुझ्या कृपेने माझ्याकडून भावपूर्ण पूजा झाली. तुझ्या कृपेने पूजा करत असतांना माझे मन सातत्याने तुझ्या चरणी लीन राहिले. पूजेतील चैतन्याचा मला लाभ झाला. यासाठी मी तुझ्या चरणी कृतज्ञ आहे.’

या वेळी डोळे मिटून ‘मूर्तीतील चैतन्य आपल्या हृदयात येत आहे’, असा भाव ठेवावा.

प्रसादग्रहण

प्रसाद भावपूर्णपणे ग्रहण करावा.

४ औ ३. मोदक वायनदान

एका केळीच्या पानावर किंवा ताटामध्ये २१ मोदक ठेवावेत. त्यातील एका मोदकाचा नैवेद्य श्री सिद्धिविनायकाला दाखवावा. (पूजेमध्ये यापूर्वी नैवेद्य दाखवण्याची कृती दिली आहे.) उर्वरित मोदकांपैकी १० मोदक केळीच्या पानावर किंवा ताटामध्ये घेऊन त्यावर दुसरे केळीचे पान किंवा ताट उपडे ठेवावे. त्यावर गंध-फूल वहावे. नंतर पुढील मंत्र म्हणून ब्राह्मणाला १० मोदकांचे वायनदान द्यावे.)

विनायक नमस्तुभ्यं सततं मोदकप्रिय । अविघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।
दशानां मोदकानां च दक्षिणाफलसंयुतम् । विप्राय तव तुष्ट्यर्थं वायनं प्रददाम्यहम् ।।

अर्थ : मोदक प्रिय असणार्‍या हे विनायका, तुला सतत नमस्कार असो. तू सर्वदा माझ्या सर्व कार्यांतील विघ्ने दूर कर. मी तुझ्या संतुष्टीसाठी ब्राह्मणाला दक्षिणेसह १० मोदकांचे ‘वायनदान’ (व्रताच्या सांगतेनिमित्त दिलेले ‘दान’) देत आहे.

नंतर उर्वरित १० मोदक यजमानासह कुटुंबियांनी ‘देवाचा प्रसाद’ म्हणून ग्रहण करावेत. मग दोन वेळा आचमन करून ‘विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः ।’ असे म्हणावे.

४ अं. सिद्धिविनायकाच्या पार्थिव मूर्तीची उत्तरपूजा

कुलाचाराप्रमाणे मूर्तीचे विसर्जन योग्य दिवशी करावे. त्या वेळी पूजेसाठी गंध, फुले, धूप, दीप आणि नैवेद्यासाठी दही, भात, मोदक असे पदार्थ पूजेत असावेत. प्रारंभी स्वतःला कुंकुमतिलक लावावा. नंतर आचमन करावे आणि हातांत अक्षता घेऊन पुढील संकल्प करावा.

श्री सिद्धिविनायकदेवताप्रीत्यर्थम् उत्तराराधनं करिष्ये ।

तदङ्गत्वेन गन्धादिपञ्चोपचारपूजनमहं करिष्ये ।

श्री सिद्धिविनायकाय नमः । ध्यायामि ।

(आता मी श्री सिद्धिविनायकाला नमस्कार करून त्याचे ध्यान करत आहे.)

१. गंध (चंदन) लावणे

श्री सिद्धिविनायकाय नमः । विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि ।।

(लेपनासाठी चंदन अर्पण करत आहे.)

ऋद्धिसिद्धिभ्यां नमः । हरिद्रां कुङ्कुमं समर्पयामि ॥

(ऋद्धिसिद्धीला नमस्कार करून सिद्धिविनायकाच्या चरणी हळद-कुंकू वहात आहे.)

२. पत्री आणि फुले वहाणे

श्री सिद्धिविनायकाय नमः । ऋतुकालोद्भवपुष्पाणि समर्पयामि ।।

(श्री सिद्धिविनायकाला नमस्कार करून या ऋतूमध्ये उत्पन्न झालेली नानाविध पत्री आणि फुले अर्पण करत आहे.)

३. धूप (उदबत्ती) दाखवणे किंवा उद्बत्ती ओवाळणे

श्री सिद्धिविनायकाय नमः । धूपं समर्पयामि ।। (धूप दाखवत आहे.)

४. दीप ओवाळणे

श्री सिद्धिविनायकाय नमः । दीपं समर्पयामि ।। (दीप ओवाळत आहे.)

५. नैवेद्य दाखवणे

श्री सिद्धिविनायकाय नमः । नैवेद्यं समर्पयामि ।। (नैवेद्य अर्पण करत आहे.)

(वरील उपचार करतांना करावयाच्या कृती यापूर्वी सांगितल्या आहेत.)

यानंतर काही ठिकाणी परंपरेनुसार आरती, प्रदक्षिणा आणि नमस्कार करतात.

अनेन कृतपूजनेन श्री सिद्धिविनायकः प्रीयताम् ।

(‘प्रीयताम्’ म्हणतांना उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडावे.)

नंतर पुढील मंत्र म्हणावा.

प्रीतो भवतु । तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु ।

उजव्या हातात अक्षता घेऊन पुढील मंत्र म्हणावा.

यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवात् ।

इष्टकामप्रसिध्द्यर्थं पुनरागमनाय च ।।

अर्थ : पार्थिव (मातीच्या) मूर्तीची मी आजपर्यंत केलेली पूजा सर्व देवगणांनी स्वीकारावी आणि ईप्सित कार्याच्या सिद्धीसाठी अन् पुन्हा येण्यासाठी आता प्रस्थान करावे.

नंतर त्या अभिमंत्रित अक्षता श्री महागणपतिपूजन केलेल्या नारळावर, तसेच श्री सिद्धिविनायकावर वहाव्यात. नंतर मूर्ती स्थानापासून थोडी हालवावी. यानंतर दोन वेळा आचमन करून ‘विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः ।’ असे म्हणावे, कुलाचारांनुसार नैसर्गिक जलस्रोतात मूर्तीचे विसर्जन करावे. (पूजेविषयीचे सविस्तर शास्त्रीय विवेचन सनातन-निर्मित ग्रंथ ‘पंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र’ यात दिले आहे.)

 

श्री गणेश उत्तर पूजाविधी (Audio) ऐकण्यासाठी येथे क्लिक करा !

 

सनातन-निर्मित सात्त्विक नामपट्टी
सनातन-निर्मित सात्त्विक नामपट्टी

 

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्री गणेश पूजाविधी’

Leave a Comment