‘देशात सर्वत्र ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे आणि त्यामुळे अनेक जण मृत्यूमुखीही पडत आहेत. या संसर्गामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तिच्या कुटुंबियांना मृतदेह दिला जात नाही. सरकारी कर्मचार्यांकडून त्याचे दहन केले जाते. त्यामुळे मृतदेहाच्या अस्थीही मिळू शकत नाहीत. अशा प्रसंगी ‘अंत्यविधी कसे करावेत ?’, असा प्रश्न समाजात निर्माण झाला आहे.
१. मृत व्यक्तीचा देह मिळत नसल्यास अशा व्यक्तीच्या
अंत्यसंस्कारासाठी धर्मशास्त्राने ‘पालाशविधी’ करण्यास सांगितला असणे
‘एखादी व्यक्ती हरवली असेल आणि काही कालावधीनंतर ‘त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे’, असे समजले, तर अशा प्रसंगात व्यक्तीचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी मिळत नाही. अशा वेळी धर्मशास्त्राने ‘पालाशविधी’ करण्यास सांगितला आहे. कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांचा देह किंवा अस्थी त्यांच्या नातेवाईकांकडे दिल्या जात नाहीत. या प्रसंगीही धर्मशास्त्रानुसार ‘पालाशविधी’ करणे सयुक्तिक होईल.
२. व्यक्ती मृत झाल्याचे कळल्यावर काय करावे ?
अ. कुटुंबातील व्यक्ती मृत झाल्यावर नेहमीप्रमाणे पहिले १० दिवस सुतक पाळावे, तसेच १० दिवस दिव्याचे दक्षिणेकडे तोंड करून तेलाचा दिवा लावून ठेवावा.
आ. पहिल्या १० दिवसांत आपल्या कुळाच्या परंपरेनुसार ज्या कृती करणे सहज शक्य आहेत, त्या कराव्यात.
इ. सध्या देशात दळणवळण बंदी आहेच आणि काही ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्याने तो भाग ‘प्रतिबंधित क्षेत्र’ म्हणूनही घोषित झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव न्यून झाल्यावर किंवा परिस्थिती पूर्ववत झाल्यावर लवकरात लवकर ‘पालाशविधी’ करावा. यासाठी आपल्या जवळच्या स्थानिक पुरोहितांशी संपर्क साधावा. एखादा धार्मिक विधी करतांना आपण दिनशुद्धी, म्हणजे ‘त्या कर्मासाठी तो दिवस योग्य आहे का ?’, हेे पहातो, तसे या विधीसाठी पुरोहितांकडून योग्य दिवस निश्चित करून घ्यावा. नंतर त्यांंच्या मार्गदर्शनानुसार हा विधी करून घ्यावा.
३. ‘पालाशविधी’ कसा आणि कुठे करावा ?
अ. व्यक्ती मृत झाल्यावर ती प्रेतयोनीत जाते. त्यासाठी पळसाची पाने, दर्भ, पुरोहितांच्या मार्गदर्शनानुसार ठराविक प्रकारची फळे आणि पाने ठराविक संख्येत घेऊन त्या व्यक्तीचा पुतळा सिद्ध करावा.
आ. त्या पुतळ्याला सातूच्या पिठाचे लिंपन करावे. त्यानंतर प्रत्यक्ष मृतदेहाचे अंत्यसंस्कार करतांना ज्याप्रमाणे मृतदेहाला मंत्राग्नी दिला जातो, त्याप्रमाणे त्या पुतळ्याला मंत्राग्नी द्यावा.
इ. त्या पुढील दिवसांचे विधीही नेहमीप्रमाणेच क्रमाक्रमाने करावेत.
ई. त्या व्यक्तीच्या मृत्यूसमयी ‘त्रिपाद शांत’ किंवा ‘पंचक (अशुभ नक्षत्रे)’ लागले असेल, तर त्यासाठीचे विधीही नेहमीप्रमाणेच करावेत.
उ. एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अथवा ज्या ठिकाणी दशक्रियाविधी आदी अंत्यविधी केले जातात, अशा ठिकाणी हा विधी करावा.
ऊ. हे विधी करतांना घरातील आवश्यक आणि मोजक्याच व्यक्तींनी उपस्थित रहावे. ‘तेथे गर्दी होणार नाही’, याची काळजी घ्यावी, तसेच सामाजिक अंतर राखावे. कोरोनाच्या संदर्भात सरकारने दिलेल्या सर्व आदेशांचे काटेकोर पालन करावे.
ए. सर्व अंत्यविधी पूर्ण झाल्यानंतर घरी ‘निधनशांत’ किंवा ‘उदकशांत’ हे विधी करावेत.’
पालाश विधीची detail माहिती मिळेल का?