१. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज साक्षात् परब्रह्म
असूनही त्यांना संत नामदेवांचा सत्संग हवा असणे
संत नामदेवांसारख्या प्रेमळ भक्ताची संगत (सत्संग) सर्वांना मिळावी; म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः पंढरपुरात येऊन नामदेवांची भेट घेतली आणि ते त्यांच्यासमवेत तीर्थयात्रा करण्यास निघाले. त्या वेळी पांडुरंग नामदेवांना म्हणाला, ‘ज्ञानेश्वर स्वतः साक्षात् परब्रह्म आहेत, तरीही त्यांना तुझी संगत हवी आहे; म्हणून तू त्यांच्यासह तीर्थयात्रा करून लवकर परत ये. प्रवासात मला विसरू नकोस. माझ्यावर लोभ असू दे. मलाही तुझी सतत आठवण येईल.’ नामा विठ्ठलाचा सर्वाधिक प्रिय असा भक्त होता.
२. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर यांना नामदेवांकडून भक्तीचे रहस्य जाणून घेण्याची इच्छा होणे
ज्ञानेश्वरांनीही तीर्थयात्रेच्या वेळी नामदेवांची पुष्कळ समजूत घातली; कारण नामदेवांनाही पांडुरंगाला सोडून तीर्थयात्रा करणे रूचत नव्हते. नामदेवांच्या भक्तीमुळे ज्ञानेश्वरांनासुद्धा त्यांच्याकडून भक्तीचे रहस्य ऐकून घेण्याची इच्छा झाली होती.
३. संत नामदेवांनी ज्ञानेश्वरांना कथन केलेले ‘भक्तीचे रहस्य’ !
३ अ. भजन
ज्ञानदेवांची उत्कंठा पाहून नामदेव सांगू लागले, ‘‘अंगी वैराग्य असणे, मनात सर्व भूतांविषयी दया असणे, अंतःकरणात प्रपंचाची, मी-तू पणाची खळबळ नसणे, अशी जी स्थिति असते, तिलाच ‘भजन’ असे म्हणतात.
३ आ. अखंड नमन
व्यवहारामध्ये एक श्रेष्ठ, तर दुसरा कनिष्ठ, असा भेदभाव नसणे, हेच ‘अखंड नमन’ होय.
३ इ. ध्यान
सर्व ठिकाणी एकच परमेश्वर व्याप्त आहे, याचे निरंतर अनुसंधान म्हणजेच ध्यान.
३ ई. श्रवणभक्ती
देहभान विसरून समरसतेने हरिकीर्तन ऐकणे, हीच खरी ‘श्रवणभक्ती’ होय.
३ उ. मनन
प्रपंचात राहून स्वहिताचा (आत्मोद्धाराचा) विचार करणे, हेच ‘मनन’ होय.
३ ऊ. निदिध्यास
संसारात लोकांमध्ये वावरत असतांनाही (लोकाचाराला धरून) चित्त सतत परमेश्वराचे चरणी ठेवून असणे, म्हणजेच ‘निदिध्यास’ होय.
३ ए. विश्रांती
आपले मन, काया आणि वाचा यांच्या माध्यमातून परमेश्वराला शरण जाणे, हीच खरी ‘विश्रांती’ होय.
३ ऐ. नरजन्माचे ध्येय
हरिकीर्तनच या जगात सर्वश्रेष्ठ साधन आहे, तर ईश्वराची प्राप्ती करून घेणे, हेच सर्वोत्तम असे ध्येय आहे. सर्व साधनांचा आटापिटा केवळ भगवंताची प्राप्ती करून घेणे, यासाठीच आहे आणि हीच उद्दिष्टपूर्ती आहे, तर हे सोडून जे प्रयत्न होतील ते सर्व बंधन ठरते.’’
अशा प्रकारे भक्तीचे रहस्य संत नामदेव यांनी कथन केले. म्हणूनच म्हणतात की, ‘विष्णुभक्त उदंड आहेत, पुढेही होतील; पण नामदेवांसारखे केवळ नामदेवच’, असे गौरवोद्गार काढून संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी नामदेवांना दृढ आलिंगन दिले.