भारतीय संस्कृतीत १४ विद्या आणि ६४ कला यांचा उल्लेख आहे. सध्या कलेसाठी अथवा मनोरंजन, अर्थार्जन यांसाठी कलेचा उपयोग केला जातो. साधना म्हणून अथवा ईश्वराला आळवण्याचे साधन म्हणून कलेचे माध्यम निवडल्यास त्या कलेत आर्तता येते. साधनेमुळे कलाकाराच्या कलाकृतींत जिवंतपणा येतो. त्याची प्रचीती साधक श्री. विजय जाधव यांनी रेखाटलेली चित्रे पाहून येते. श्री. जाधव यांनी रेखाटलेली ही संतांची चित्रे अत्यंत सुबक आणि रेखीव आहेत. या चित्रांतील संतांचे डोळे अत्यंत बोलके आहेत. ‘चित्रातील बारकाव्यांमुळे ते रेखाचित्र नसून प्रत्यक्ष छायाचित्रच आहे’, असे वाटते.
‘मी प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. डॉ. आठवले यांची चित्रे दळणवळण बंदीच्या काळात काढली आहेत. मी दुपारी विश्रांतीच्या वेळेत प.पू. डॉ. आठवले यांचे चित्र काढायला आरंभ केल्यावर माझ्या लक्षात आले, ‘चित्र काढतांना वारंवार मूळ चित्राकडे बघावे लागते.’ तेव्हा मला जाणवले, ‘गुरुदेव माझ्याकडे बघत आहेत.’ तेव्हापासून चित्र काढतांना मी भावस्थिती अनुभवत होतो आणि मला ही स्थिती पुनःपुन्हा अनुभवण्याची संधी मिळावी; म्हणून मी अजून दोन चित्रे काढली. मला एक चित्र काढायला अनुमाने ५ – ६ दिवस लागले. मला भावस्थिती अनुभवता आल्याने गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’ – श्री. विजय गुलाबराव जाधव, जळगाव