सध्या नास्तिकतावाद्यांची चलती आहे. ते कोरोनाच्या खांद्यावरून हिंदु धर्माला लक्ष्य करण्याची एकही संधी सोडू इच्छित नाहीत. अलीकडेच नास्तिकतावाद्यांचा श्राद्धकर्माला लक्ष्य करणारा एक व्हॉटसअप संदेश फिरत असल्याचे एक धर्मनिष्ठ व्यक्तीने निदर्शनास आणून दिले. या संदेशामुळे दिग्भ्रमित होऊ शकणार्या अनेकांच्या मनातील शंकांचे निरसन होण्यासाठी उत्तर देणे आवश्यक होते. म्हणून हा लेखप्रपंच लिहित आहे.
– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था
१. श्राद्धकर्माला लक्ष्य करणारा नास्तिकतवाद्यांचा अयोग्य विचार
सध्या एक व्हॉट्सअप संदेश आणि फेसबूक पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहे. त्याती संदेश असा आहे –
‘‘कोरोनामुळे सध्या जी माणसे मृत्युमुखी पडत आहेत, त्यांचे ना पिंडदान होत आहे, ना तेरावे, ना गरूड पारायण, ना कोणाला दान-दक्षिणा, अस्थीविसर्जन करायला कोणी नाशिक, आळंदी, पंचगंगा, काशी, ओंकारेश्वर, पैठण येथे जात नाहीत, तेथे कुणाला दान देत नाहीत; पण आत्मे बरोबर जिथे जायचे तेथे व्यवस्थित जात आहेत ! म्हणजे संत तुकाराम, प्रबोधनकार ठाकरे, तुकडोजी महाराज, गाडगेबाबा सांगत होते तेच तंतोतंत खरे आहे. अनिष्ट रूढी-परंपरा यांवर वायफळ खर्च करण्यापेक्षा आरोग्य, शिक्षण यांवर खर्च करा !’’
२. अध्यात्माचा अभ्यास न केल्याने केविलवाणे निष्कर्ष काढणारे बुद्धीवादी !
खरे तर अशा प्रकारचा संदेश नास्तिकांकडून पसरवणार्यांनी मृत्योत्तर अंत्यविधी, १३ दिवसांचे संस्कार आणि गरुड पुराणाचे पारायण हे कशासाठी केले जाते, याचे ज्ञान करून घेण्याची तसदी घेतली असती, तरी ते तसे लिहिण्यास धजावले नसते. अभ्यास न करता चिंतन मांडणे, ही आधुनिक बुद्धीवाद्यांची मर्यादा यातून लक्षात येते. अध्यात्माचा अभ्यास न केल्याने अशा प्रकारचे केविलवाणे निष्कर्ष काढले जातात.
२ अ. लिंगदेहाला चांगली गती मिळण्यासाठी श्राद्धादी कर्मे आवश्यक !
सनातन धर्मात पुनर्जन्मसिद्धांत सांगितलेला आहे. ‘व्यक्तीच्या कर्मानुसार त्याला मृत्यूनंतरची गती प्राप्त होते’, असे शास्त्र सांगते. जीवनभर सत्कर्मे केली असतील, तर जीवाला मृत्यूनंतर सद्गती प्राप्त होते; परंतु जीवनात पाप, परपीडा, अनैतिक इत्यादी कृत्ये केली असतील, तर कर्माची फळं परलोकी अधोगतीकडे घेऊन जातात. अशांना पुनर्जन्म मनुष्यरूपात नाही, तर कीटक, मुंगी, कुत्रा, वनस्पती इत्यादी चौर्यांशी लक्ष योनीत मिळू शकतो.
मृत्यूपर्यंत सत्कर्म न केल्याने आणि मृत्यूपूर्वी असलेल्या इच्छा-आकांक्षा यांमुळे मृत्यूनंतर शरीर त्यागलेला लिंगदेह पृथ्वीच्या वर असलेल्या भुवर्लोकात अडकतो. तो तेथे अडकू नये आणि त्याला त्याच्या पुढील गती मिळावी म्हणजे स्वर्गादी उच्चलोक प्राप्त व्हावा, यासाठी श्राद्धकर्मादी कृत्ये सांगितली आहेत. अंत्यविधी, तेरा दिवसीय संस्कार, गरुड पुराणाचे पारायण इत्यादी करण्याची परंपरा त्यासाठी आहे. येथे समजून घेण्याचे महत्त्वाचे सूत्र म्हणजे जे भुवर्लोकात अडकले आहेत, त्यांच्या मुक्तीसाठी ही धार्मिक कृत्ये केली जातात. जे जीवनभर सत्कर्म आणि धर्म यांच्या मार्गाने जातात, ते त्यांच्या धर्मबळावर परमगती प्राप्त करतात. त्यांना कुणी श्राद्ध केले अथवा नाही केले, याने काही फरक पडत नाही. साधनेत उन्नती केलेले तर पृथ्वीवर पुन्हा जन्म घेत नाहीत. ते सप्तलोकांना छेदत मोक्षाला जातात.
अशा वेळी प्रश्न रहातो की, खरंच आपण जीवनभर सत्कर्म करतो का आणि जीवनभर धर्माच्या मार्गाने चालतो का ? आपले उत्तर ‘नाही’ असेल, तर आपल्याला आपल्या मृत्यूनंतर आपल्या वंशजांनी श्राद्ध करण्याची आवश्यकता आहे.
‘कोरोनाच्या काळात श्राद्धविधी, अंत्यविधी इत्यादींना मर्यादा आहेत’, हे मान्य; परंतु धर्माने त्याची व्यवस्था केलेली आहे. अशा काळासाठी आपद्धर्माची व्यवस्था आहे. अर्थात जिज्ञासू हा ज्ञानाचा अधिकारी असतो. त्यामुळे विस्तार करत नाही.
२ आ. गरुड पुराणाचे श्रवण करण्याचे महत्त्व समजून घ्या !
पक्षीराज गरुड हे भगवान विष्णूचे वाहन आहे. एकदा पक्षीराज गरुडाने भगवान विष्णूंना मृत्यूनंतर होणारी प्राणिमात्रांची स्थिती, जीवाची यमलोकयात्रा, विभिन्न दुष्कर्मांमुळे प्राप्त होणारे नरक, ८४ लक्ष योनी, पाप करणार्यांची होणारी दुर्गती इत्यादींसंबंधी अनेक गूढ प्रश्न विचारले. त्यावर भगवान विष्णूने जो ज्ञानमय उपदेश केला, तो या पुराणामध्ये विशद आहे. जीवाच्या मृत्यूनंतर त्याच्या परिवाराने हे पुराण ऐकून सत्मार्गाला लागावे आणि आयुष्यभर सत्कर्म करण्याचा संकल्प करावा आणि मृत्यूनंतर सद्गति प्राप्त करावी, यासाठी गरुड पुराणाचे श्रवण करण्याचे धर्मशास्त्रीय प्रावधान आहे.
अर्थातच नास्तिक मंडळींना सत्कर्म करायचे बंधन नको असल्याने ते गरुड पुराण ऐकण्यास विरोध करतात !
२ इ. श्राद्धकर्म करू नका, असे सांगणारा संत तुकाराम महाराजांचा एकही अभंग नाही !
संत तुकाराम महाराजांनी अंत्यविधी करू नका, श्राद्धकर्म करू नका, असे कुठेही कुठल्याही अभंगात सांगितलेले नाही. हा संदेश लिहिणार्याने संतांची नावे घेतली आहेत; पण त्यांचे अभंग दाखवण्याची तसदी घेतली नाही, ती त्यामुळेच ! तुकाराम महाराजांचा एक तरी अभंग असा दाखवा की, ज्यात असा दाखला आहे.
उलट संत तुकाराम महाराज म्हणतात की, श्राद्ध केलं पाहिजे. तसा त्यांनी एक अभंग आपल्या गाथेमध्ये लिहिलेला आहे.
। पिंड पदावरी । दिला आपुलिया करी ।
। माझे झाले गयावर्जन । फिटले पितरांचे ऋण ।
। केले कर्मातर । बोंब मारली हरिहर ।
। तुका म्हणे माझे । भार उतरले ओझे ।
वरील अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात की, जेव्हा पूर्वजांच्या नावाने मी पिंड हातात घेऊन त्यांच्या सद्गतीसाठी प्रार्थना केली तेव्हा मला गयेच्या ठिकाणी जाऊन पिंडदान केल्याचा भास झाला आणि या पिंडामुळे माझ्या २१ कुळांतील लोकांचा उद्धार होईल असं मला वाटतं आहे.
पुढे याच अभंगात ते लिहितात, हे कर्मकांड करतानाच मी विठुमाऊलीला ही साद घातली आहे. त्यामुळे त्या विठुमाऊलीच्या आशीर्वादाने आणि पूर्वजांच्या पुण्यकर्मामुळे माझा भार उतरला आहे आणि श्राद्ध केल्याचं समाधान प्राप्त होऊन त्यांच्या बंधनाचा भार हलका झाला आहे असं मला वाटतं.
त्यामुळे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी त्यांच्या पूर्वजांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी श्राद्ध केलं आणि हा अभंग लिहिला असावा, असं म्हणायला काही हरकत नाही.
२ इ. समाजसेवक म्हणजे धर्माधिकारी नव्हेत !
प्रबोधनकार ठाकरे आणि गाडगेबाबा हे समाजसेवक होते. धर्मातले अधिकारी नव्हते; त्यामुळे त्यांच्या धर्मविषयक विधानांचा दाखला देण्याची आवश्यकता नाही. ‘अधिकार तैसा करो उपदेश ।’, असे सांगितले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हेही भक्तीच्या मार्गाने समाजकार्य आणि राष्ट्रकार्य करणारे होते; परंतु धर्माधिकारी नव्हते ! त्यामुळे त्यांनी कर्मकांडाला विरोध केला; परंतु त्यांची शिकवण किती लोकांनी आचरणात आणली. उलट त्यांचीही मृत्युनंतर समाधी बांधली गेली आणि पुढे त्या समाधीची पूजा-अर्चा चालू झाली !
२ ई. काळाच्या कसोटीवर टिकलेली चैतन्यमयी श्राद्धपरंपरा !
रामकृष्णादी अवतारांनीही श्राद्धकर्मेही केली. आज लाखो वर्षे श्राद्धपरंपरा चालू आहे. एखादी परंपरा लाखो वर्षे टिकते, त्यात काही ना काहीतरी चैतन्य असते म्हणूनच ! प्रबोधनकार ठाकरे यांच्या मृत्यूनंतर श्राद्ध न करण्याची परंपरा थांबली का ? याचे उत्तर नकारार्थी आहे. याचे कारण त्यांचे पुत्र मा. बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व अंत्यविधी यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केले. ज्या व्यक्तीचे तत्त्वज्ञान त्यांच्या पुढच्या पिढीनेसुद्धा कृतीत आणले नाही, त्यात कुठले चैतन्य आणि कसले काय ?
२ उ. पूर्वजांसाठी पैसे खर्च करू नका, असे सांगणे, हा कृतघ्नपणा !
श्राद्धावर वायफळ खर्च करण्यापेक्षा आरोग्य, शिक्षण यांवर खर्च करा !, असे सांगणे हे नास्तिकतावाद्यांचे फुकाचे बोल आहेत. ही मंडळी स्वतः समाजाचे आरोग्य, शिक्षण यांवर खर्च करत नाहीत. त्यांच्या शिक्षणसंस्था नसतात. रुग्णालये नसतात. ते स्वतःच्या खिशातून समाजसेवा करत नाहीत; केवळ श्रद्धावान लोकांचे दुष्प्रबोधन करून आयत्या पैशांवर समाजकार्य करतात. याउलट श्रद्धावान लोक धर्मादाय संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शिक्षणसंस्था आणि रुग्णालये चालवतात. पूर्वजांप्रती कृतघ्न असणार्या नास्तिकवाद्यांना असे सांगण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का ?
३. सश्रद्ध समाजाला आवाहन
अशी नास्तिकतावादी मंडळी अशा प्रकारचे ‘व्हॉट्सअप मेसेज’ पाठवून लोकांना धर्माच्या मार्गावरून दूर नेतात. त्यांची ना रामकृष्णांवर श्रद्धा असते ना तुकाराम महाराजांवर ! त्यामुळे आपणा सर्वांना आवाहन आहे की, अशा नास्तिकवाद्यांपासून सावध रहा ! पूर्वजांना सद्गति मिळावी म्हणून महाराजे भगीरथ आणि त्यांच्या पूर्वज राजपुरुषांनी हजारो वर्षे तप केले; म्हणून आज देवनदी गंगेचे दिव्य सान्निध्य अनुभवत आहोत. श्राद्धकर्माचे फळ हे उत्तमच असते; म्हणून श्राद्धकर्मे श्रद्धेने करा !