सनातन संस्थेच्या ७४ व्या संत पू. (सौ.) संगीता जाधव यांचा साधनाप्रवास

(पू.) सौ. संगीता जाधव

‘पू. (सौ.) संगीता जाधव साधनेत आल्यापासून त्यांनी घरादाराचा विचार न करता साधनेला पूर्णपणे वाहून घेतले. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत दौरे करून त्या सत्संग घ्यायच्या. त्यांच्या प्रगतीविषयी मला आश्‍चर्य वाटायचे आणि त्यांच्या साधनाप्रवासाविषयी खूप जिज्ञासा वाटायची. त्यांनी लिहिलेला त्यांचा साधनाप्रवास वाचून माझी जिज्ञासा पूर्णपणे मिटली. त्यांची पुढील प्रगती अशीच जलद गतीने होईल, याची मला खात्री आहे !’ 

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

१. बालपण

१ अ. लहानपणापासूनच देवाची आवड असणे

‘माझा जन्म धाराशीव येथे झाला. माझे वडील वारकरी संप्रदायाचे असल्याने ते माझ्याकडून विठ्ठलाचा नामजप करवून घ्यायचे, तसेच मला भक्त आणि विठ्ठल यांच्या गोष्टी सांगायचे. माझ्या कुटुंबात आई-वडील, २ मोठ्या बहिणी आणि २ मोठे भाऊ होते. त्या सर्वांमध्ये मी सर्वांत लहान होते. मला लहानपणापासूनच देवाची आवड होती. मी ‘पूजा करणे, जप करणे, ग्रंथांचे वाचन करणे’ इत्यादी लहानपणापासूनच करत होते. शिक्षणासाठी मी मामाकडे आजोळी, म्हणजे तुळजापूर येथे होते. त्यामुळे माझे सातत्याने भवानीमातेच्या दर्शनासाठी जाणे व्हायचे. मी देवीशी मनातले बोलल्यावर ‘ती प्रतिसाद देत आहे’, असे मला जाणवायचे.

१ आ. घरी मुक्कामाला आलेल्या धर्मप्रचारकांना पाहून ‘आपणही असे काहीतरी करायला पाहिजे’, असे वाटणे

मी तुळजापूरला मामाकडे शिकायला असल्याने सुटीमध्ये गावाला जायचे. गावात आमचा मोठा वाडा होता. माझे बाबा वारकरी संप्रदायाचे असल्याने धर्मप्रचारासाठी येणारे लोक घरी विसाव्यासाठी यायचे आणि मुक्कामही करायचे. त्यांना पाहून ‘आपणही असे काहीतरी करायला पाहिजे’, असे मला वाटायचे.

१ इ. घरी आलेल्या एका जैन धर्मप्रचारक साधिकेच्या समवेत तिच्या प्रवचनाला जाणे,
त्यांनी केलेले मार्गदर्शन आवडणे आणि ‘ही मुलगी पुष्कळ चांगली साधना करणार आहे’, असे त्यांनी सांगणे

एकदा एक जैन धर्मप्रचारक साधिका आमच्याकडे आल्या होत्या. मी त्यांचे मार्गदर्शन ऐकले. मला ते पुष्कळ आवडले. मी त्या वेळी पाचव्या-सहाव्या इयत्तेत असेन. त्या धर्मप्रचारक साधिका मला म्हणाल्या, ‘‘तू आमच्या समवेत येतेस का ?’’ मी लगेच ‘हो’ म्हणाले. मी त्यांच्या समवेत दहा कि.मी. चालत गेले. कार्यक्रमात त्यांनी सांगितलेले त्यागाचे महत्त्व आणि साधकांना केलेले मार्गदर्शन मला पुष्कळ आवडले. माझे बाबा दुसर्‍या दिवशी मला घेण्यासाठी आले. तेव्हा धर्मप्रचारक साधिका म्हणाल्या, ‘‘ही मुलगी पुष्कळ चांगली साधना करणार आहे.’’

 

२. गजानन महाराज यांची भक्ती करणे

२ अ. काकू गजानन महाराजांचा ग्रंथ वाचत असतांना तो ऐकल्यावर गजानन महाराजांची भक्ती करू लागणे

मी आईला नेहमी विचारायचे, ‘‘देवाने हा संसार कशाला निर्माण केला ?’’ मी दहाव्या इयत्तेत असतांना एकदा माझी काकू गजानन महाराजांचा ग्रंथ वाचत होती. तेव्हा मी तो पूर्ण ऐकला आणि त्यानंतर मी गजानन महाराजांची भक्ती करायला लागले. मला त्यांच्या संदर्भात अनुभूतीही येऊ लागल्या. ‘नियमित एक अध्याय वाचल्याविना मी पाणी प्यायचे नाही. प्रतिदिन गजानन महाराजांच्या छायाचित्राशी बोलायचे. मनातील सर्व त्यांना सांगायचे’, अशी माझी नित्य साधना चालू होती.

२ आ. गजानन महाराजांचा ग्रंथ वाचतांना त्याचा
भावार्थ न कळणे आणि सनातन संस्थेमध्ये आल्यावर तो समजणे

मी गजानन महाराजांचा ग्रंथ वाचत असले, तरी मला त्याचा भावार्थ कळत नसे, उदा. एका भक्तावर गजानन महाराज प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या भक्ताला काहीतरी मागण्यास सांगितले. त्याने ‘मला थोडेसे धन आणि सुंदर बायको मिळू दे’, असे मागितले. तेव्हा ‘मी तुला काय देऊ शकतो आणि तू काय मागितलेस ?’, असे म्हणून गजानन महाराज त्याच्यावर थुंकले आणि महाराजांनी त्याला त्याने मागितलेले दिले. तेव्हा मला प्रश्‍न पडला, ‘त्याने काय चुकीचे मागितले ? महाराज का थुंकले ?’ सनातन संस्थेमध्ये आल्यावर त्याचा पुढील भावार्थ माझ्या लक्षात आला, ‘गजानन महाराज एवढे सामर्थ्यशाली होते की, ते चिरंतन आनंद देऊन त्या भक्ताला सर्वांतून मुक्त करू शकत होते; पण त्यांच्याकडे त्याने मायेतील गोष्टी मागितल्या. त्यामुळे ते त्याच्यावर थुंकले.’

 

३. अनुभूती – अंथरुणाजवळ साप येणे आणि मांजरीच्या माध्यमातून भगवंताने रक्षण करणे

आमच्याकडे एक छोटी पांढरी मांजर होती. ती पुष्कळ सात्त्विक होती. आपण खायला दिल्याविना ती काही खात नसे. आरती आणि पूजा चालू असेल, तर ती शांतपणे बाजूला येऊन बसे. मी ग्रंथवाचन करायला बसले की, ती तेवढा वेळ मांडीवर शांतपणे बसायची. एके दिवशी ती मांजरी माझ्याजवळ झोपली होती. त्या वेळी अंथरुणाजवळ साप आला. तेव्हा ती जागी होऊन त्याला पंजे मारत होती आणि त्याला माझ्या अंथरुणाजवळ येऊ देत नव्हती. तिच्या पंजे मारण्याच्या आवाजाने माझी आई जागी झाली. आईला साप दिसल्यावर तिने मला लगेच उठवले. त्या मांजरीच्या माध्यमातून भगवंतानेच आमचे रक्षण केले.’

 

४. घरी धर्माचरणाच्या कार्यपद्धती असल्याने घरातूनच साधनेचे संस्कार होणे

‘तुळजापूर येथे माझ्या आजोळी पूर्वीपासूनच धर्माचरणाच्या कार्यपद्धती आहेत, उदा. जेवण करतांना महिलांनी मांडी न घालता एक पाय दुमडून अन् दुसरा गुडघा उभा करून बसणे, केस मोकळे न सोडणे, रात्रीच्या वेळी आरशात न पाहणे, वडीलधार्‍या माणसांपुढे मोठ्या आवाजात न बोलणे, नम्रतेने बोलणे, जेवण करतांना आवाज न करणे, भांड्यांचा आवाज न करणे, शास्त्रानुसार जेवणाचे ताट वाढणे, प्रत्येक सण-उत्सव, धार्मिक परंपरा आणि एकत्र कुटुंबपद्धती यांना अतिशय महत्त्व देणे, प्रत्येक कृती वडीलधार्‍यांना विचारून करणे इत्यादी. माझ्यावर हे संस्कार घरातूनच झाले. त्याविषयी वडीलधारे जेव्हा सांगायचे, तेव्हा मला त्याचा अर्थ कळत नसे. ‘हे सर्व आवश्यकच आहे का ?’, असे मला वाटायचे; परंतु सनातन संस्थेमध्ये आल्यावरच त्याचे महत्त्व माझ्या लक्षात आले. ’

 

५. मनाची अस्वस्थता आणि खर्‍या सुखाचा शोध

५ अ. सर्व भौतिक गोष्टी उपभोगूनही समाधान न मिळाल्याने त्याचा कंटाळा येणे

लग्न होऊन १० वर्षे झाली होती. वर्ष १९९८ – ९९ मध्ये मनाची ‘आता बस झाले !’, अशी स्थिती झाली होती. ‘आपण सर्व उपभोगले आहे’, असा विचार येऊन मला अस्वस्थता यायची. याचे कारण शोधले, तर कळत नव्हते; म्हणून मन काहीतरी नवीन शोधत होते. मग एखादी वस्तू घेतल्यावर मन काही दिवस रमायचे. त्यानंतर तिचा कंटाळा यायचा. पुन्हा मन दुसरे काहीतरी शोधायचे. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘या गोष्टीला अंत नाही, म्हणजेच कितीही गोष्टी घेतल्या, तरी आपण तृप्त होत नाही. आपल्याला काहीतरी पाहिजेच असते.’ घर, ‘फर्निचर’, विविध दागिने इत्यादी सर्व करून पाहिले; परंतु थोड्या दिवसांनी त्यांचाही कंटाळा आला. दूरचित्रवाणीवरील सत्संग ऐकल्यावर चांगले वाटायचे. महत्त्वाचे म्हणजे गजानन महाराजांचा ग्रंथ वाचल्यावर मला खरा आनंद मिळायचा. गजानन महाराजांनी सांगितले आहे, ‘या सगळ्या भौतिक गोष्टींमध्ये खरे समाधान नसून ईश्‍वरामध्येच खरे समाधान आहे. त्यामुळे साधना केल्यानंतरच समाधान मिळेल.’ ‘मी तर गजानन महाराजांची साधना प्रतिदिन करत आहे’, असे मला वाटायचे.

५ आ. ‘बाहेरून मिळणारे सुख हे संपणारे आहे’, या जाणिवेने साधना करण्याचे ठरवणे

आम्ही मैसुरू, बेंगळुरू, अशा ठिकाणी फिरायला गेलो होतो. बाहेर गेल्यावर ‘हे दृश्य पाहून थोडा वेळ सुख मिळते. ते सुख परत संपणार’, याचीच चिंता मला असायची. फिरून येतांनाच मी ठरवले, ‘आपण साधनाच करायची.’ मी यजमानांना सांगायचे, ‘‘आपल्याकडे सगळे आहे; पण समाधान वाटत नाही. मनाची अस्वस्थता आहे.’’ ते म्हणायचे, ‘‘तुला दुसरे काही काम नसल्यामुळे असे वाटते. तू काहीतरी साधना करत रहा किंवा कोणतातरी व्यवसाय कर, म्हणजे तुझे डोके शांत राहील.’’

 

६. सनातन संस्थेशी ओळख आणि साधनेला प्रारंभ

६ अ. यजमान सनातन संस्थेच्या व्याख्यानाला गेल्यावर त्यांना त्यातील सर्व सूत्रे आवडणे,
आणि व्याख्यानात शास्त्रानुसार सांगितलेली साधना ऐकून ‘पत्नीने हीच साधना करावी’, असे त्यांना वाटणे

एकदा माझे यजमान त्यांच्या मित्राच्या समवेत सनातन संस्थेच्या व्याख्यानाला गेले होते. मित्र त्यांना म्हणाले, ‘‘माझा एक मित्र आधुनिक वैद्य आहे. त्याच्याकडे सनातन संस्थेच्या साधिका आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत आल्या आहेत. त्यांचे व्याख्यान आपण १ घंटा ऐकूया.’’ मित्र बोलवत आहे; म्हणून यजमान व्याख्यानाला गेले. त्यांनी सर्व व्याख्यान ऐकले. ‘आपली पत्नी देवाचे एवढे काय काय करत असते आणि गजानन महाराजांचा ग्रंथ प्रतिदिन वाचत असते. त्यापेक्षा हे किती चांगले आहे !’, असे त्यांना वाटले. व्याख्यानातील ‘कुलदेवतेचा नामजप आणि पूर्वजांच्या त्रासासाठी दत्ताचा नामजप करणे’, हे सर्व त्यांना आवडले. त्यांनी विचार केला, ‘पत्नीला खरेच साधना करायची आहे, तर तिला हे सर्व करायला हवे, तर तिला पुढचे पुढचे कळायला लागेल.’

६ आ. यजमानांनी सनातनचे ग्रंथ विकत आणून वाचण्यास
सांगणे; परंतु वाचनाची आवड नसल्याने ते तसेच कपाटात ठेवणे

यजमानांनी जवळजवळ सतराशे-अठराशे रुपयांचे सनातनचे ग्रंथ आणि ‘साधना भाग १ आणि २’ अन् ‘शंकानिरसन’ या ध्वनीफिती विकत घेतल्या आणि घरी येऊन मला सांगितले, ‘‘हे पुष्कळ छान आहे. सनातन संस्थेचे हे सर्व ग्रंथ तू वाच.’’ वाचनाची आवड नसल्याने ‘एवढे सगळे ग्रंथ कसे वाचू ?’, असे मला वाटले. मला गजानन महाराज आवडतात; म्हणून मी ग्रंथाचे पारायण करत होते. बाकीच्या कोणत्याच ग्रंथाचे वाचन मी करत नव्हते. ते ग्रंथ मी पाहिलेही नाहीत आणि तसेच कपाटात भरून ठेवले. यजमानांना साधना करतांना मी कधी पाहिले नव्हते. त्यामुळे ‘ते काय सांगतात ?’, याच्याकडेही माझे लक्ष नव्हते.

६ इ. ‘नामसंकीर्तनयोग’ या ग्रंथावरील चित्र पाहून तो वाचणे,
त्यानंतर कृतज्ञता वाटून कुलदेवतेच्या नामजपास प्रारंभ करणे

काही मासांनंतर माझी मुलगी वैष्णवी ७ – ८ मासांची असतांना मी ‘नामसंकीर्तनयोग’ या ग्रंथावरील चित्र पाहून तो ग्रंथ वाचायला घेतला. मला तो एवढा आवडला की, मी तो पूर्ण वाचला. त्या वेळी मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. ‘ज्यांनी कुणी हा ग्रंथ लिहिला आहे, ते किती श्रेष्ठ आहेत ! या ग्रंथात किती बारकावे आहेत, किती अभ्यासपूर्ण माहिती आहे !’, असे मला वाटले. त्या क्षणानंतर मी सर्व नामजप सोडले आणि कुलदेवतेचा नामजप चालू केला. घरातील स्वयंपाक करणार्‍या मावशींना, तसेच येणार्‍या-जाणार्‍या लोकांना मी नामजप सांगायला आरंभ केला.

६ ई. नामजपामुळे निरर्थक विचार, चिंता आणि काळजी न्यून होऊन शांती अन् आनंद यांची अनुभूती
येणे आणि संपर्कात येणार्‍या प्रत्येकाला शास्त्रानुसार कुलदेवता अन् दत्त यांचा नामजप करण्यास सांगणे

मी एक-दीड मास नामजप केला. नंतर नामजपाची रुची निर्माण झाली. पूर्वी मी उपवास करायचे. नंतर ठरवले, ‘अधिकाधिक नामजप करायचा.’ त्या एका मासात जपामुळे एवढा फरक जाणवला की, मनाची अस्वस्थता न्यून होऊन मला शांत वाटू लागले. याआधी मुलाला आणि यजमानांना घरी यायला उशीर झाला, तर चिंता वाटायची आणि मनात निरर्थक विचार यायचे. नामजपामुळे माझ्या मनातील विचार पुष्कळ न्यून होऊन मनाची अस्वस्थता न्यून झाली. त्यामुळे मन आनंदी राहायला लागले. मला पुष्कळ शांत वाटायला लागली. आधी माझ्या स्वप्नामध्ये साप यायचे. प्रतिदिन अर्धा घंटा दत्ताचा नामजप केल्याने दीड मासात स्वप्नामध्ये साप येण्याचे प्रमाण न्यून झाले. मी संपर्कात येणार्‍या प्रत्येकाला त्याची कुलदेवता विचारायचे आणि शास्त्रानुसार कुलदेवता अन् दत्त यांचा नामजप करायला सांगायचे.

६ उ. ‘पुढचे मार्गदर्शन मिळावे’, अशी ओढ लागणे आणि साधकांनी घरी येऊन सत्संग चालू करणे

२ – ३ मासांनंतर मला वाटायला लागले, ‘आपल्याला कुणीतरी पुढचे पुढचे मार्गदर्शन करायला पाहिजे. आपण जप करतो, ते ठीक आहे; पण आता आपले ईश्‍वराशी अनुसंधान व्हायला हवे.’ नंतर वालचंदनगर येथील एक साधक घरी आले आणि त्यांनी आम्हाला सनातन संस्थेची छान माहिती सांगितली. ती ऐकूनच माझा भाव जागृत होत होता. सत्संग चालू झाला.

६ ऊ. प्रवचनाच्या माध्यमातून ‘चिरंतन मिळणारे सुख,
म्हणजे आनंद हा साधनेनेच मिळतो’, हे मनावर बिंबल्याने साधनेचा निश्‍चय होणे

‘मी एक प्रवचन ऐकले. प्रवचन करणार्‍या साधकाने सांगितले, ‘‘आपण जे सुख पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी या माध्यमांतून मिळवतो, त्याला मर्यादा आहेत. पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे आनंद आहे. आनंद अमर्याद आहे. कधी न संपणार्‍या आणि २४ घंटे मिळणार्‍या सुखाला ‘आनंद’ म्हणतात. त्यालाच ‘मोक्ष’ म्हणतात. २४ घंटे मिळणारे सुख केवळ साधनेनेच मिळू शकते.’’ हा भाग मला इतका आवडला की, प्रवचन ऐकत असतांना मला जाणवले, ‘मी या क्षणाचीच वाट पहात होते आणि मला कधी न संपणारे सुख हवे होते.’ ती वाक्ये ऐकल्यानंतर ‘त्या क्षणाला मला गुरूंनी गुरुमंत्र दिला’, अशी जाणीव मला होत होती. माझी भावजागृती होऊन मला वाटत होते, ‘आता कधी न संपणारे सुख या साधनेतूनच मिळणार आहे. त्यामुळे अशाच प्रकारची साधना करायची.’ त्या क्षणालाच माझा साधनेचा निश्‍चय झाला होता.

६ ए. सनातन संस्थेचा परिचय झाल्यापासून ‘परात्पर गुरु डॉ.
आठवले हेच ईश्‍वर असून ते धर्मजागृतीचे कार्य करत आहेत’, असा भाव असणे

प्रवचन करणार्‍या साधकाने सनातन संस्था आणि परात्पर गुरुमाऊलींची ओळख सांगितली. तेव्हा माझ्या मनात शंका आली नाही, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले कोण आहेत ?’ त्या दिवसापासूनच मला वाटत होते, ‘परात्पर गुरु डॉक्टर म्हणजे ईश्‍वर आहेत. ते विष्णुच आहेत. ते कृष्ण आहेत. ते कृष्णाचे अवतार आहेत.’ ‘भगवंत सर्वांमध्ये धर्मजागृती कशी करत आहे ? धर्माला आलेली ग्लानी कशी दूर करत आहे ? भगवान विष्णुच गुरुमाऊलींच्या माध्यमातून कसा कार्य करत आहे ?’, असाच भाव माझ्या मनात होता. त्यामुळे ‘ते देव आहेत कि नाहीत ?’, असा विचार माझ्या मनात कधीच आला नाही.

६ ऐ. सत्संगात सांगितल्याप्रमाणे सर्व कृती केल्याने आनंदात वाढ होणे

सत्संग चालू झाल्यावर पहिल्या आठवड्यातच ‘देवघरात देवतांची मांडणी कशी करायची ?’, याविषयी कळल्यावर या सर्व गोष्टी मी शास्त्राप्रमाणे केल्या. ‘कुलदेवतेचा जप करणे, कुलदेवीशी बोलणे, दत्ताचा नामजप, मानसपूजा, तसेच कुलदेवतेच्या दर्शनाला जाणे’, हे सर्व मी करत होते. माझ्या आनंदात वाढ झाली होती.

 

७. ‘गुरुतत्त्व एकच आहे’, याची आलेली अनुभूती

७ अ. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागल्यावर
‘मी गजानन महाराजांना विसरले कि काय ?’, असा नकारात्मक विचार मनात येणे

याआधी मी गजानन महाराजांचे पुष्कळ करायचे. त्यांचे चित्र काढून मी कपाटात ठेवले होते. २ – ३ मासांनंतर माझ्या मनात नकारात्मक विचार यायला लागले, ‘गजानन महाराजांना मी विसरायला लागले कि काय ?’ ‘आपण स्वतः कुणाला गुरु मानायचे नसते, तर गुरूंनी आपल्याला शिष्य म्हणून स्वीकारायचे असते’, हे कळल्यामुळे मी परात्पर गुरुदेवांना गुरु म्हणत नव्हते.

७ आ. रात्री गजानन महाराजांचे छायाचित्र काढून त्यांच्या
चरणांवर डोके ठेवून रडणे, त्यानंतर झोपल्यावर पहाटे थोडी
जागृत झोप असतांना गजानन महाराजांचे दर्शन होणे, सत्संगसेवकाने परात्पर
गुरु डॉ. आठवले म्हणून गजानन महाराजांशी बोलणे, त्यांच्याशी साधकांची ओळख करून
देणे आणि साधिकेला तेथे एकदा परात्पर गुरु डॉक्टरांंचा, तर एकदा गजानन महाराजांचा तोंडवळा दिसणे

‘आपण गजानन महाराजांशी बोलत होतो; पण आपण त्यांना कपाटात ठेवून दिले आहे’, असे वाटून मी गजानन महाराजांचे छायाचित्र काढले आणि त्यांच्या चरणांवर डोके ठेवून पुष्कळ रडले. रात्री २ वाजेपर्यंत मी गजानन महाराजांशी सूक्ष्मातून बोलले. मी त्यांना म्हणाले, ‘मला तुम्हाला सोडायचे नाही. मी तुम्हाला विसरणार नाही.’ त्या वेळी यजमान घरी नव्हते. मग मी झोपले. पहाटे थोडी जागृत झोप असतांना मला पुढील दृश्य दिसले, ‘पहाटेचाच अंधुक प्रकाश जाणवत होता. मी आणि यजमान रस्त्याने चाललो आहोत आणि तिकडून गजानन महाराज येत आहेत. मी यजमानांना म्हटले, ‘अहो, गजानन महाराज येत आहेत.’ आम्ही वेगाने जायला लागलो. तेव्हा आम्हाला आमचे सत्संगसेवक वाटेत दिसले. ते आमच्या आधी गजानन महाराजांजवळ पोचले. मग आम्ही पोचलो. ते गजानन महाराजांना म्हणाले, ‘हे पहा परात्पर गुरुदेव, हे दोघे सत्संगाला येतात. हे सेवा करतात.’ सत्संगसेवकांना गजानन महाराज परात्पर गुरु डॉक्टर म्हणून दिसत होते. मला एकदा परात्पर गुरु डॉक्टरांंचा, तर एकदा गजानन महाराजांचा तोंडवळा दिसायला लागला. मला कळेना, ‘हे कोण आहेत ?’ परात्पर गुरुदेवांना तर मी छायाचित्रातच पाहिले होते. सत्संगसेवक त्यांच्याशी परात्पर गुरु म्हणूनच बोलत होते. त्यांनी अशा प्रकारे ओळख करून दिल्यानंतर आम्ही त्यांचे गजानन महाराज म्हणूनच दर्शन घेतले.’

७ इ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि गजानन महाराज एकच आहेत’, याची जाणीव होणे

झोपेतून उठतांना माझ्या लक्षात आले, ‘महाराजांना मला हे सांगायचे आहे, ‘तू मनामध्ये संशय बाळगू नकोस. परात्पर गुरु डॉक्टरांच्या रूपाने मीच आता इकडे आहे.’ ‘गुरुतत्त्व कसे एक असते’, याची त्यांनी मला अनुभूती दिली. तेव्हा माझे शंकानिरसन झाले. माझ्या मनात पुन्हा कधी हा विचार आलाच नाही की, गजानन महाराज वेगळे आहेत आणि परात्पर गुरु वेगळे आहेत. त्या दिवशी मला जाणीव झाली, ‘गजानन महाराजांनीच मला इथे आणून सोडले आहे. मी प्रतिदिन तेच तेच वाचत होते आणि तिथेच अडकले होते. माझी प्रगती होण्यासाठी मी पुढचे मार्गदर्शन घेऊन पुढे जायला हवे’, याची गजानन महाराजांनाच काळजी होती.’ नंतर माझ्या मनात कधीही शंका आली नाही.’

 

८. सेवेला झालेला आरंभ आणि केलेल्या विविध सेवा

८ अ. सत्संगसेवकाने सेवेचे महत्त्व सांगून सेवेस प्रवृत्त केल्याने सेवेला आरंभ करणे

आधी मला सत्संग आणि नामजप यांची अधिक ओढ होती. मला सेवेचे काही ठाऊक नव्हते. सत्संगसेवकाने सेवेचे महत्त्व सांगून मला लहान लहान सेवा करण्यास प्रवृत्त केले. त्यांनी भ्रमणभाषवर ‘सनातन प्रभात’चे अंक प्रायोजित करण्यास सुचवले. त्यामुळे मी लगेच ओळखीच्या लोकांना वर्गणीदार करायला आरंभ केला. त्यानंतर मी ग्रंथ वाचून नामजप करत असल्याने लोकांना ग्रंथांचे महत्त्व सांगायचे. ‘अध्यात्म’, ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’ या आणि मी वाचलेल्या ग्रंथांविषयी अधिक सांगायचे.

८ आ. सत्संगसेवकांनी प्रसारसेवेचे महत्त्व सांगितल्यावर विज्ञापने आणण्याची
सेवा करण्याचे ठरवणे, ‘समवेत कृष्ण आहे’, असा भाव मनात ठेवून विज्ञापने आणण्यासाठी
जाणे आणि विज्ञापन मिळाल्यावर साधना अन् परात्पर गुरुदेव यांची माहिती सांगितल्याचा आनंद अधिक होणे

‘सेवा म्हणजे बाहेर जाऊन काहीतरी करायला हवे’, हे माझ्या लक्षात येत नव्हते. सत्संगसेवकांनी मला सांगितले, ‘‘प्रसार करणे महत्त्वाचे आहे. गुरुपौर्णिमा जवळ आली आहे. तुम्ही बाहेर जाऊन विज्ञापने आणायला हवीत.’’

प्रसारात बाहेर जाऊन विज्ञापने मिळवण्याच्या सेवेचा माझा पहिला दिवस होता आणि माझ्या समवेत कुणीच नव्हते. त्या वेळी सेवेला जातांना ‘माझ्या समवेत कृष्ण आहे’, असा भाव माझ्या मनात होता. संबंधित ठिकाणी गेल्यानंतर मी देवालाच प्रार्थना केली, ‘आता तूच समवेत आहेस आणि माझ्या माध्यमातून तूच साधना सांगणार आहेस.’ जिज्ञासूला भेटल्यावर मी त्यांना सनातन संस्था आणि परात्पर गुरुदेव यांची ओळख, तसेच त्यांचे अध्यात्मप्रसाराचे कार्य यांविषयी माहिती सांगितली. हे सांगतांना मला पुष्कळ आनंद मिळत होता. त्यानंतर त्यांनी मला विज्ञापन दिले. विज्ञापन मिळाले, यापेक्षा त्यांना सर्व माहिती सांगितल्याचा मला अधिक आनंद झाला.

८ इ. सेवेतून एक वेगळी आनंदावस्था अनुभवणे, तेव्हापासून
इतरांना सेवेचे महत्त्व सांगणे आणि विविध सेवा करण्यास आरंभ करणे

नंतर मी दुसर्‍या ठिकाणी गेले. तेव्हा एक साधिका माझ्या समवेत आली आणि आम्ही ४ – ५ घंटे सेवा केली. त्या वेळी घरी गेल्यावर मला निराळाच आनंद मिळाला. इतर वेळी माझ्या मनावर एक दडपण आणि अस्वस्थता असायची; पण मी नेहमीपेक्षा हा आगळा-वेगळा दिवस अनुभवला. त्या दिवशी माझ्या मनात कोणतेच काळजीचे विचार नव्हते आणि मी इतकी आनंदी होते की, ‘हवेत तरंगते आहे कि काय ?’, असे मला वाटत होते. त्या दिवशी मला शास्त्र कळले, ‘आनंद हा कोणत्याही वस्तूतून नाही, तर तो आतून मिळतो आणि तो आनंद हाच आहे.’ सेवा केल्यावर ‘देव सेवेतून आनंद कसा अनुभवण्यास देतो ?’, हे मला शिकायला मिळाले. त्या दिवसापासून मी सर्वांना ‘सेवा करणे किती महत्त्वाचे आहे आणि त्यातून आपल्याला आनंद कसा मिळतो ?’, हे ठामपणे सांगू लागले. तेव्हापासून मी प्रसारातील अनेक सेवा चालू केल्या. ‘प्रवचने करणे, विज्ञापने गोळा करणे, वर्गणीदार करणे, वेगवेगळ्या भागांत सत्संग चालू करणे, साधकांना घेऊन गावोगाव प्रसार करणे, सत्संग वाढवणे’, अशा विविध सेवा मी करू लागले.

 

९. सेवेला बाहेर गेल्यावर शेजारच्या कुटुंबाच्या रूपात देवाने केलेले साहाय्य !

९ अ. शेजारच्या जबडे कुटुंबियांशी जवळचे संबंध असल्याने
त्यांच्या सांगण्यानुसार सेवेला जातांना मुलीला (वैष्णवीला) त्यांच्या घरी ठेवणे

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागल्यावर मी माझी मुलगी वैष्णवी हिला कु. वर्षा जबडे या साधिकेच्या घरी ठेवायचे. सनातन संस्थेत येण्यापूर्वीपासूनच त्यांच्याशी आमचे घरचे संबंध होते. वर्षाचे भाऊ आणि माझे दीर यांची मैत्री होती. वैष्णवी ४ – ५ मासांची असतांनाही वर्षाचा भाऊ तिला त्यांच्या घरी घेऊन जायचा. जशी माझी सेवा वाढू लागली, तसे त्यांच्या घरचे म्हणू लागले, ‘‘वैष्णवी सर्वांना आवडते. आमचे कुटुंबही मोठे आहे, तर तुम्ही तिला आमच्याकडे ठेवत जा.’’ नंतर माझा सेवेचा कालावधी वाढायला लागला, तसा वैष्णवीचा तिथे रहायचा कालावधीही वाढायला लागला.

९ आ. मुलीचा वाढदिवस असल्याचे विसरल्याने त्याच दिवशी
प्रवचनाचे आयोजन करणे आणि त्यामुळे प्रवचन झाल्यावर वाढदिवस साजरा करण्याचे ठरवणे

आम्ही साधक प्रचारासाठी वेगवेगळ्या गावांत जायचो आणि तेथे गेल्यानंतर दुसर्‍या दिवशीचे प्रवचन ठरवायचो. एका गावात आमचे प्रवचन ठरले आणि त्याच दिवशी वैष्णवीचा वाढदिवस होता. तिला दोन वर्षे पूर्ण झाली होती. वैष्णवीचे बाबा कामानिमित्त पुण्याला गेले होते. त्या दिवशी आधीच प्रवचन ठरवले होते आणि ते घेणारे दुसरे कुणी नसल्याने ते मलाच घ्यावे लागणार होते. मी तिचा वाढदिवस असल्याचे विसरले होते. त्यामुळे ‘प्रवचन झाल्यावर रात्री ९ नंतर वाढदिवस साजरा करू’, असे मी ठरवले.

९ इ. जबडे कुटुंबियांनी उत्तम प्रकारे साजरा केलेला वैष्णवीचा वाढदिवस !

मी परत आले, तर वर्षाच्या घरी त्यांनी वैष्णवीचा वाढदिवस पुष्कळ चांगल्या पद्धतीने साजरा केल्याचे मला दिसले. त्यांची बैठकीची खोली सजवली होती. आसपासची सर्व मुलेही बोलावली होती. त्यांनी वैष्णवीला कपडे, लहान मुलांसाठी खेळणी, तसेच सर्वांना द्यायला भेटवस्तूही आणल्या होत्या. सायंकाळी ७ वाजताच त्यांनी वाढदिवस चांगल्या पद्धतीने साजरा केला होता. वैष्णवीचे बाबा पुण्याहून आल्यावर आम्ही दोघे वैष्णवीला आणायला गेलो, तर त्यांनी आम्हाला थांबवून जेवण करूनच पाठवले. यातून ‘परात्पर गुरुमाऊलींचे किती लक्ष आहे ! ते किती जणांना समष्टी रूपाने साहाय्य करतात आणि सगळ्यांची हौस कशी पूर्ण करतात ?’ हे मला अनुभवायला मिळाले.

 

१०. कुटुंबियांनी साधना करायला पाठिंबा देणे

१० अ. ‘सासर आणि माहेरच्या माणसांनी साधनेला विरोध न करणे’, ही देवाचीच कृपा आहे’, असे जाणवणे

देवाची एवढी कृपा आहे की, माझे सासर आणि माहेर या दोघांकडूनही मला कुणी विरोध केला नाही. आमचे ५० -६० जणांचे कुटुंब आहे. घरात सासू-सासरे, यजमानांचे पाच भाऊ, त्यांची मुले, मोठ्या दिरांच्या सुना आणि नातू आहेत. घरात सातत्याने कार्यक्रम होत असतात. मी घरातील सर्व सोडून प्रसाराला जायचे, तरी मला कुणी विरोध केला नाही.

सनातन संस्थेमध्ये आल्यावर सेवेमुळे माझा सर्वांशी संपर्क एकदम न्यून झाला. त्यामुळेे सर्वांना थोडे दुःख वाटले; पण कुणी या गोष्टीला विरोध केला नाही. माझ्या सासूबाईंनी मला एका शब्दानेही काही विचारले नाही. मला त्यांच्याविषयीही कृतज्ञता वाटते. माझ्या आई-वडिलांनी पहिल्यापासूनच काही ना काही साधना केलेली आहे. त्यांना ‘मी साधनेतले काहीतरी करते’, असे कळल्यावर आनंद झाला. वैष्णवी छोटी असल्याने माझी आई आमच्याकडे जवळजवळ २ वर्षे राहिली. मला सगळ्यांचे पुष्कळ आशीर्वाद अन् सदिच्छा मिळाल्या. त्यामुळे मला साधना करायला प्रोत्साहन मिळत होते.

१० आ. यजमानांच्या संपूर्ण पाठिंब्यामुळे साधनेला प्राधान्य देता येणे

वैष्णवीचे बाबा मला साधना आणि सेवा करायला कधीच अडवत नव्हते. ‘या गोष्टीसाठी तू थांब’, असे ते कधी म्हणत नसत. ते नेहमी म्हणत, ‘‘तू नेहमी साधनेला प्राधान्य दे.’’ ते मला सेवेला पाठवायचे किंवा सोडायला यायचे. जेवढी वर्षे मी साधनेमध्ये आहे, तेवढी वर्षे यजमानांनी मला १०० टक्के साहाय्य केले आहे. ‘तू पाठीमागे न बघता गुरूंना अपेक्षित अशी सेवा आणि साधना कर’, असे ते मला सांगत असत.

असे सगळ्यांचे आशीर्वाद आणि सदिच्छा पाठीशी असल्याने मला सेवा अन् साधना करता आली आहे.’

– (पू.) सौ. संगीता जाधव, मुंबई (१८.७.२०१८)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment