१२५ हून अधिक हिंदुत्वनिष्ठांची उपस्थिती !
जळगाव – उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भस्तरीय हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिकार्यांची ‘ऑनलाईन’ बैठक ३१ मे या दिवशी घेण्यात आली. या बैठकीला सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांनी ‘भावी भीषण आपत्काळ आणि आध्यात्मिक बळ वाढवण्याचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन, तर हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी ‘विकृत सेक्युलॅरिझम’मुळे हिंदूंचे दमन अन् हिंदु राष्ट्र’ या विषयावर उपस्थितांना संबोधित केले.
शंखनाद आणि वेदमंत्रपठण करून बैठकीला प्रारंभ झाला. हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. वैश्विक संकटात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केलेल्या साहाय्याविषयी धुळे येथून श्री. संजय शर्मा, चाळीसगाव येथून श्री. सुनील निकम, नगर येथील श्री. मिलिंद चवंडके, नांदेड येथून श्री. अभिजित पाटील, जालना येथून ह.भ.प. मेटे महाराज, जालना येथील भगवती पुरोहित संघाचे श्री. विनायक महाराज फुलंब्रीकर, नगर येथील श्री. बापू ठाणगे, धुळे येथील श्री. मनोज घोडके या हिंदुत्वनिष्ठांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
आपत्काळात तरून जाण्यासाठी साधना करून
आध्यात्मिक बळ वाढवणे आवश्यक ! – पू. अशोक पात्रीकर
जगभरातील अनेक भविष्यवेत्ते आणि संत यांनी आगामी काळ हा ‘आपत्काळ’ असून यातून तरून जाण्यासाठी साधना करून आध्यात्मिक बळ वाढवणे आवश्यक आहे. विविध संप्रदायातील संतांच्या भाकितानुसार आगामी काळात सुनामी, वादळे, अतिवृष्टी, अनावृष्टी यांसारखी संकटे येतील. नरसंहार होईल. भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतामध्ये सांगितल्याप्रमाणे ‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ म्हणजेच माझ्या भक्ताचा नाश होत नाही. त्यामुळे आपण देवाचे भक्त होण्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन पू. अशोक पात्रीकर यांनी केले.