‘मागील काही वर्षांपासून संपूर्ण जगाला नैसर्गिक आपत्तींची तीव्रता जाणवत आहे. या नैसर्गिक आपत्तीरूपी संकटांच्या संदर्भात द्रष्टे संत अनेक वर्षांपासून समाजाला सावध करत आहेत आणि त्यांवर मात करण्यासाठी करावयाच्या आवश्यक आध्यात्मिक उपायांच्या संदर्भात मार्गदर्शनही करत आहेत; मात्र समाज आणि शासनकर्ते यांनी या मार्गदर्शनाकडे केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सर्वत्रच्या मानवजातीला नैसर्गिक आपत्ती अधिक प्रमाणात भोगाव्या लागत आहेत. जुलै २०१९ पासून भारताच्या विविध राज्यांत आलेला पूर संतांनी केलेली भाकिते सत्य होण्याची जणू प्रचीतीच आहे. येथे दिलेल्या लेखातून नैसर्गिक आपत्तींचे वर्तमानकाळातील भयावह स्वरूप, संतांनी त्यांसंदर्भात सांगितलेली सूत्रे आणि त्यांचे पालन न केल्याने झालेली दुःस्थिती, तसेच ‘तीव्र आपत्काळातही समष्टीचे रक्षण करण्यासाठी संत कशा प्रकारे कार्यरत आहेत ?’, ही सूत्रे येथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
१. नैसर्गिक आपत्तींचे भयावह स्वरूप
१ अ. भारताची स्थिती
‘जुलै २०१९ पासून चालू असलेल्या अतीवृष्टीमुळे झालेली स्थिती येथे थोडक्यात मांडत आहे.
१ अ १. महाराष्ट्र
मुंबई येथील सांताक्रूझ हवामान वेधशाळेतील नोंदीमध्ये १ जून ते २ ऑगस्ट २०१९ या २ मासांच्या (महिन्यांच्या) काळात २११७ मि.मी. पाऊस झाल्याचे लक्षात आले. खरेतर मुंबईत जून ते सप्टेंबर या ३ मासांच्या कालावधीत पडणारे पावसाचे सरासरी प्रमाण २३१७ मि.मी. एवढे आहे. याचा अर्थ मुंबईत ३ मासांमध्ये पडणारा पाऊस या वर्षी २ मासांमध्येच पडला. या वर्षी पावसाळ्यात मुंबईच्या उपनगरांमध्ये पडलेला पाऊस तेथील सरासरी पावसापेक्षा ४९ टक्के अधिक होता. अशाच अतीवृष्टीचा फटका महाराष्ट्राच्या ७६१ गावांना बसला असून त्यामुळे १४४ पेक्षा अधिक जणांचा बळी गेला आणि २ लाख ८५ सहस्र लोक पूरग्रस्त स्थितीने ग्रस्त झाले. पुरामुळे वाहतूक ठप्प झाल्याने प्रवासी गाड्या चालवू न शकल्याने शासनाच्या ‘महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळा’ला १०० कोटी रुपयांची हानी झाली. या वर्षी १ लाख हेक्टर शेतभूमी पाण्याखाली गेल्याने शेतकर्यांचीही पुष्कळ हानी झाली. (संदर्भ : संकेतस्थळ आणि दैनिक ‘सनातन प्रभात’)
१ अ २. कर्नाटक
८ ऑगस्ट २०१९ या दिवशी कर्नाटकात पडलेला पाऊस तेथे एका दिवसात पडणार्या सरासरी पावसाच्या तुलनेत ५ पट अधिक पडला. या दिवशी दक्षिण कर्नाटकातील म्हैसुरू येथे पडलेला पाऊस तेथे एका दिवसात पडणार्या सरासरी पावसाच्या तुलनेत ३२ पट अधिक पडला, तर त्याच दिवशी उत्तर कर्नाटकातील धारवाड येथे सरासरीपेक्षा २२ पट अधिक पाऊस पडला. ऑगस्टच्या मध्यापर्यंत कर्नाटकातील ७ जिल्ह्यांमध्ये तेथील सरासरी पावसाच्या तुलनेत दुप्पट पाऊस पडला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी पावसामुळे २६ लोकांचा मृत्यू झाल्याचे, तर राज्यातील १ सहस्र गावांमध्ये पूरस्थिती असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी ‘पावसामुळे झालेली मागील ४५ वर्षांतील सर्वांत मोठी विपत्ती !’, असे घोषित केले. महापुरामुळे सैन्याने २ लाख ७ सहस्र लोकांचे स्थलांतर केले असून ६५० गावांतील ११ सहस्र घरे नष्ट झाली आहेत. देशातील कॉफीच्या एकूण उत्पादनापैकी ४० टक्के उत्पादन कर्नाटक राज्यात होते. पावसामुळे कॉफीच्या उत्पादनाचीही हानी झाली आहे. (संदर्भ : संकेतस्थळ)
१ अ ३. केरळ
केरळ राज्यात पूर आणि भूस्खलन यांमुळे आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे ८५ लोकांचा मृत्यू झाला आणि ५३ लोक बेपत्ता आहेत, तर भूस्खलनामुळे २८ लोकांचा मृत्यू झाला आहे. २ लाख ५० सहस्रांहून अधिक लोकांनी साहाय्य-शिबिरांमध्ये आश्रय घेतला आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन् यांनी केरळमध्ये ३ दिवसांत ८ जिल्ह्यांमध्ये ८० हून अधिक ठिकाणी भूस्खलन झाल्याचे ‘ट्वीट’ करून सांगितलेे. (संदर्भ : संकेतस्थळ)
१ अ ४. बिहार
बिहार राज्यामध्ये झालेल्या अतीवृष्टीमुळे तेथील १३ जिल्ह्यांमध्ये पूर आला आहे. यात १३० लोकांचा बळी गेला, तर ८८ लाख ४६ सहस्र जनता पूरक्षेत्रामध्ये आहे. या वर्षी झालेल्या पावसामुळे एका दिवसात सर्वाधिक पाऊस येण्याचा ५४ वर्षे जुना विक्रम मोडला गेला. (संदर्भ : संकेतस्थळ)
१ अ ५. आसाम
आसाम राज्यातील ३ सहस्र २४ गावांतील ४४ लाखांहून अधिक जनतेला पुराचा फटका बसला आहे. १३ जुलै २०१९ पासून १ मासामध्ये ‘काझीरंगा राष्ट्र्रीय उद्याना’तील १२० हून अधिक प्राण्यांचा पुरामुळे मृत्यू झाला आहे. (संदर्भ : संकेतस्थळ)
१ अ ६. गुजरात
या वर्षी जुलै मास आणि ऑगस्टचा पहिला आठवडा या कालावधीमध्ये झालेल्या अती पावसामुळे गुजरातचे बडोदा शहर आणि त्याच्या आसपासची गावे यांमध्ये पूर आला. ३१ जुलै २०१९ या दिवशी ६ घंट्यांमध्ये ४२४ मि.मी. पाऊस झाला. पुरामुळे ८ लोकांचा मृत्यू झाला असून ६ सहस्र लोकांना स्थलांतरित करण्यात आले. बडोदा शहरात पुराच्या पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणात मगरी आल्या. त्यामुळे नागरिकांना धोका निर्माण झाला. तेथे २२ मगरींना निवासी भागातून पकडण्यात आले. (संदर्भ : संकेतस्थळ)
१ आ. जगाची स्थिती
१ आ १. नेपाळ
जुलै २०१९ पासून झालेल्या अतीवृष्टीमुळे नेपाळचे ३१ जिल्हे पूरग्रस्त झाले आहेत. नेपाळच्या गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पाऊस आणि भूस्खलन यांमुळे १०८ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ३३ लोक बेपत्ता आहेत. (संदर्भ : संकेतस्थळ)
१ आ २. बांगलादेश
बांगलादेशमध्ये आलेल्या पुरामध्ये ११४ लोकांचा मृत्यू झाला असून ९५ लोक वाहून गेले. १० ते २६ जुलै २०१९ या कालावधीत पुराच्या पाण्यामुळे होणारे साथीचे रोग यांमुळे तेथील १४ सहस्र ७८१ लोक आजारी आहेत. (संदर्भ : संकेतस्थळ )
१ आ ३. न्यूयॉर्क
२३ जुलै २०१९ या दिवशी आलेल्या चक्रीवादळामुळे विद्युत व्यवस्था खंडित झाल्याने न्यू जर्सीमधील ३ लक्ष लोकांना विजेविना रहावे लागले. चक्रीवादळामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाल्याने ब्रूकलिन शहराच्या काही भागात कमरेएवढे पाणी भरले होते. १३ जुलै २०१९ या दिवशी आलेल्या उष्ण वार्याच्या लहरींमुळे न्यूयॉर्क शहरातील सहस्रो नागरिकांना अंधारामध्ये (ब्लॅकआऊट) रहावे लागले.
१ आ ४. जगातील अन्य देश
पाकिस्तान, मध्य-पश्चिम अमेरिका, दक्षिण आणि दक्षिण-पूर्व अमेरिका, इंडोनेशियामधील दक्षिण सुलावेसी, ऑस्ट्रियामधील टाऊनस्विले इत्यादी ठिकाणीही पूर येऊन मोठ्या प्रमाणात आर्थिकहानी आणि जीवितहानी झाली आहे.
वरील माहितीतून लक्षात येते की, संपूर्ण जगात आपत्काळामुळे कशा प्रकारे नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ होत आहे.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा द्रष्टेपणा आणि
त्यांनी समाजात आपत्काळाच्या संदर्भात जागृती होण्यासाठी केलेले कार्य
संत त्रिकालदर्शी असतात. यामुळे ते भविष्यात येणार्या तीव्र संकटांच्या संदर्भात समाजाला मार्गदर्शन करू शकतात. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले उच्च कोटीचे समष्टी संत आहेत. त्यांना ‘समाजाचे कल्याण व्हावे’, असे वाटते. यामुळे ते वर्ष २००० पासून भविष्यातील आपत्काळाच्या संदर्भात समाजात विविध माध्यमांतून जागृती करत आहेत आणि या आपत्काळातून वाचण्यासाठी ‘साधना करणे’ हाच मार्ग असल्याचे सांगत आहेत. त्यांनी केलेल्या या व्यापक कार्याचा आढावा येथे थोडक्यात देण्याचा प्रयत्न करत आहे.
२ अ. नैसर्गिक आपत्तींपासून समाजाला आपले रक्षण करता येेण्यासाठी निर्माण केलेली ग्रंथमालिका
आपत्काळात स्वतःचे रक्षण करून इतरांना साहाय्य करता यावे, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आपत्काळात उपयोगी असणार्या विविध उपाययोजनांशी संबधित ग्रंथमालिका सिद्ध केली आहे. या मालिकेत जुलै २०१९ पर्यंत विविध विषयांवर २१ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. यामध्ये स्वतःला होणार्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवरील त्रासांच्या निवारणासाठी बिंदूदाबन-उपचार, रिफ्लेक्सॉलॉजी, प्राणशक्तीवहन उपाय, संमोहन उपचार, योगासने, बंध, प्राणायाम, देवतांचे नामजप आणि बीजमंत्र, रिकाम्या खोक्यांचे उपाय आदी विषयांवर ग्रंथ प्रकाशित करण्यात आले आहेत. यांसोबत आपत्काळात स्वतः आणि इतरांना साहाय्य करण्यासाठी अग्नीशमन, प्रथमोपचार, आपत्कालीन साहाय्य, औषधी वनस्पतींची लागवड आणि अग्निहोत्र या विषयांवरही ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. सनातनच्या आपत्कालीन ग्रंथसंपदेच्या संदर्भात अधिक माहितीसाठी पहा : https://www.sanatan.org/mr/a/ 12919.html
२ आ. समाजाला आपत्काळाची तीव्रता समजण्यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये लेख लिहिणे
दैनिक हे समाजजागृतीचे एक प्रमुख माध्यम आहे. समाजाला आपत्काळाची तीव्रता स्पष्ट करणारे आणि आपत्काळावर उपाययोजना सांगणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अनेक लेख दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झाले आहेत. त्यांतील काही ठळक लेखांची नावे आणि त्या लेखांचे सार येथे दिले आहे.
२ आ १. संकटांपासून रक्षण होण्यासाठी व्यष्टी साधना, म्हणजे भक्ती वाढवण्याचे मार्गदर्शन करणे
‘साधना न करणारे राज्यकर्ते जनतेचे रक्षण करू शकत नाहीत, त्यामुळे ईश्वराचे भक्त बना !’ हा लेख परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष २०१५ मध्ये नेपाळमधील भूकंप; अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स आदी प्रगत देशांवरील आतंकवादी आक्रमणे; भारतातील चेन्नईमधील अतिवृष्टी आदी घटनांनंतर लिहिला होता. त्यात त्यांनी ‘आपत्काळातून तरून जाण्यासाठी साधकांनी साधना वाढवून ईश्वराचे भक्त बनणे आवश्यक आहे’, असा संदेश दिला होता.
२ आ २. विविध संकटे आणि आक्रमणे यांपासून रक्षण होण्यासाठी ‘समष्टी साधना, म्हणजे संघटित होऊन कार्य करण्याचे’ आवाहन करणे
वर्ष २०१७ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘या घटना म्हणजे भयावह आपत्काळाची नांदी नव्हे का ?’, हा मथळा असलेला लेख लिहिला होता. ११ जून २०१७ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रकाशित झालेल्या या लेखात त्यांनी असुरक्षित समाज जीवन, आंतकवादी संकटे आणि नैसर्गिक आपत्ती यांचे विवेचन करून त्यांना तोंड देण्यासाठी हिंदूंना संघटित होऊन कार्य करण्याचे आवाहन केले आहे. सविस्तर लेख पुढील मार्गिकेवर उपलब्ध आहे. – https://www.sanatan.org/mr/a/ 29323.html
२ आ ३. आपत्काळापासून रक्षण होण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी दोन्ही स्तरांवर करायच्या प्रयत्नांच्या संदर्भात प्रायोगिक स्तरावर मार्गदर्शन करणे
६ जानेवारी २०१९ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘भावी भीषण आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी विविध स्तरांवर आतापासूनच सिद्धता करा !’ हा लेख परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लिहिला होता. आपत्काळात वादळ, भूकंप आदींमुळे वीजपुरवठा बंद पडतो. पेट्रोल, डीझेल आदींचा तुटवडा निर्माण झाल्याने वाहतूक-व्यवस्थाही कोलमडून पडते. त्यामुळे स्वयंपाकाचा गॅस, खाण्या-पिण्याच्या वस्तू आदी अनेक मास (महिने) मिळत नाहीत वा मिळाल्या तरी त्यांचे ‘रेशनिंग’ होते. आपत्काळात डॉक्टर, वैद्य, औषधे, रुग्णालये आदी उपलब्ध होणे जवळजवळ अशक्यच असते. हे सर्व लक्षात घेऊन आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी सर्वांनी शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, आध्यात्मिक इत्यादी स्तरांवर करावयाच्या पूर्वसिद्धतेच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी या लेखातून मार्गदर्शन केले आहे. हा लेख पुढील मार्गिकेवर उपलब्ध आहे. – https://www.sanatan.org/mr/a/ 53221.html
जुलै आणि ऑगस्ट २०१९ मध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि अन्य काही राज्यांमध्ये आलेल्या पुरात वरील लेखांमध्ये दिल्याप्रमाणे विदारक स्थिती निर्माण झाल्याचे लक्षात येतेे. यातूनच द्रष्टे संत काळानुसार सांगत असलेल्या सूत्रांचे पालन करणे किती महत्त्वपूर्ण आहे, ते लक्षात येते.
३. नैसर्गिक आपत्ती आणि युद्ध यांपासून रक्षण होण्यासाठी ‘साधना करणे’ हाच एकमेव पर्याय !
यावरून लक्षात येते की, जगभर आलेल्या विविध नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती यांमागे रज-तम हेच मुख्य कारण आहे. मनुष्याने संत किंवा गुरु यांच्या मार्गदर्शनानुसार साधना केल्यावर त्याच्यातील सात्त्विकतेमध्ये वाढ होते आणि त्याचे विविध आपत्तींपासून रक्षण होण्याची शक्यता वाढते. बहुतांश जीव आणि राजकारणी रज-तमप्रधान असल्याने ते संत किंवा गुरु यांच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करतात. या लेखाच्या माध्यमातून समाज आणि राज्यकर्ते यांना संत किंवा गुरु यांचे आज्ञापालन करण्याची बुद्धी व्हावी आणि त्यांची साधनेकडे वाटचाल व्हावी, अशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना !’
– कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१४.८.२०१९)
साधना करणार्या जिवांच्या रक्षणासाठी संत करत असलेले कार्य
साधना करणारे जीव ईश्वराला प्रिय असतात. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला उपदेश करतांनाही श्रीकृष्ण सांगतात, ‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ (अर्थ : माझ्या भक्ताचा नाश होत नाही.) यामुळे साधना करणार्या जिवांच्या रक्षणासाठी ईश्वर संतांच्या माध्यमातून कार्य करत असतो. साधकांचे नैसर्गिक आपत्तींपासून, म्हणजे पंचमहाभूतांच्या प्रकोपापासून रक्षण व्हावे, म्हणून पुणे येथील थोर संत प.पू. आबा उपाध्ये यांनी पंचमहाभूतांसाठी (पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांसाठी) यज्ञ करायला सांगितले. त्यानुसार २६.७.२०१९ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात ‘पंचमहाभूत यज्ञ’ करण्यात आला.
१. यज्ञाचे महत्त्व
‘यज्ञातून मानवाच्या देहाभोवती आणि वायूमंडलात दैवी स्पंदनांचे सूक्ष्म कोष निर्माण होतात. दैवी स्पंदनांचे सूक्ष्म कोष संरक्षककवचाप्रमाणे कार्य करत असल्याने नैसर्गिक आपत्ती आणि तिसर्या महायुद्धासारखा भीषण संहार यांपासून जिवाचे रक्षण होते.
२. नैसर्गिक आपत्ती आणि अणूबॉम्ब विस्फोट यांमुळे
प्राणशक्ती भूमंडलाकडे न आल्याने जीवसृष्टी लोप पावू लागणे
पुढील काळात मानवजातीला अतीवृष्टी, अनावृष्टी, उष्माघात, भूकंप, वादळ, सुनामी इत्यादी नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागणार आहे. त्यानंतर होणार्या तिसर्या महायुद्धामध्ये वापरण्यात येणार्या अणूबॉम्बमुळे पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात संहार घडून येईल. अणूबॉम्बच्या वापरामुळे वायूमंडलामध्ये मोठ्या प्रमाणात तेजतत्त्व, वायुतत्त्व आणि आकाशतत्त्व यांच्या स्तरावर रज-तमात्मक लहरींचे प्रक्षेपण होते.
अशा प्रकारे आपत्काळात विविध कारणांनी निर्माण होणारी संहारक ऊर्जा वैश्विक मंडलाला भेदते. त्यामुळे वैश्विक मंडलातून प्राणशक्तीची स्पंदने भूमंडलाकडे येण्यास अडथळा निर्माण होऊन त्याचा प्रत्यक्ष परिणाम जीवसृष्टीतील प्राणीमात्रांवर होऊन हळूहळू जीवसृष्टी लोप पावण्याच्या दिशेने वाटचाल करते.
३. ‘पंचमहाभूत यज्ञा’चे सृष्टीवर होणार्या परिणामांविषयी कु. प्रियांका लोटलीकर यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण
‘पंचमहाभूत यज्ञा’तून निर्माण होणार्या तेजोलहरी वैश्विक मंडलापर्यंत पोचतात आणि जीवसृष्टीसाठी आवश्यक असणार्या प्राणशक्तीच्या लहरींना खेचून भूमंडलावर आणतात. या यज्ञातून निर्माण होणार्या चैतन्यमय लहरी तेज, वायु आणि आकाश या तत्त्वांच्या स्तरांवर आक्रमण करणार्या रज-तमात्मक लहरींचे त्याच तत्त्वांच्या बळावर उच्चाटन करतात. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती आणि अणूबॉम्ब विस्फोट यांमुळे निर्माण झालेले रज-तम नष्ट होण्यास साहाय्य होते. ‘पंचमहाभूत यज्ञ’ केल्याने वातावरणाची सात्त्विकता वाढून रज-तमाचे उच्चाटन झाल्याने साधकांचे रक्षण होण्यास अशा प्रकारे साहाय्य होते.
येणार्या आपत्काळामध्ये संतांची कृपा आणि त्यांनी सांगितलेले उपाय करणे, यांमुळे साधकांना जीवदान मिळून त्यांचे रक्षण होणार आहे.’