दळणवळण बंदीच्या कालावधीमध्ये मनोविकाराच्या समस्या, कौटुंबिक कलह, महिलांवरील अत्याचार यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशा लोकांना मानसोपचारतज्ञांचा सल्ला देण्यासाठी ‘टोल फ्री’ क्रमांक चालू करणे शासनाला भाग पडले. विदेशात ही स्थिती याहून भयंकर आहे. अमेरिकेत गुन्हेगारीचे प्रमाण वाढण्याचा धोका लक्षात घेऊन येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे विकत घेऊन स्वत:कडे बाळगायला प्रारंभ केला आहे. कोरोनाच्या संकटकाळात वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत समजले जाणारे देशही त्यांच्या नागरिकांना मानसिक स्वास्थ्य देऊ शकले नाहीत. भौतिक गोष्टी तर जगभरात उत्पादित केल्या जातात; मात्र मन:शांती प्रदान करण्याचे सामर्थ्य केवळ विश्वगुरु समजल्या जाणार्या देवभूमी भारतात आहे आणि ते ज्ञान जगाला देणे हे भारताचे दायित्व आहे. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी भौतिक गोष्टींचा विचार करतांना भारताच्या आत्मज्ञान प्राप्त करण्याच्या परंपरेला विसरणे मूर्खपणाचे ठरेल. ही परंपरा पुढे चालू ठेवण्याच्या दृष्टीने भारताने पाऊल टाकायला हवे. यामध्ये आपण कुठे अल्प पडतो, याविषयी चिंतन झाले, तर आपल्याला त्या दृष्टीने मार्गक्रमण करणे सोपे जाईल.
१. मन:शांती कुठे हरवली ?
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या दळणवळण बंदीमुळे नागरिकांच्या जीवनपद्धतीमध्ये आमूलाग्र पालट झाला. जे ‘ऑनलाईन’ किंवा ‘इंटरनेट’च्या साहाय्याने काम करू शकत होते त्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ (घरात राहून काम करणे) आरंभले; मात्र शारीरिक, यांत्रिक काम करणारे, छोटे-मोठे उद्योजक, घरकाम करणार्या महिला, विद्यार्थी, कामगार वर्ग आदींना घरी रहाणे भाग पडले. मुंबईसारख्या दाटीवाटीच्या शहरांत काही चौरस फुटांच्या भागांत ५-६ व्यक्तींनी एकत्र तेवढ्याच भागात वावरणे म्हणजे जणू त्यांना स्थानबद्धतेचीच शिक्षा होय. त्यामुळे याचा परिणाम व्हायचा तोच झाला. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार दळणवळण बंदीच्या पहिल्या २ आठवड्यांमध्ये १५७ कौटुंबिक तक्रारी आल्या. त्यांमध्ये महिलांवरील अत्याचारांच्या ६९ तक्रारी होत्या. महाराष्ट्रातील गृहमंत्र्यांनी ‘दळणवळण बंदीच्या कालावधीत महिलांवर अत्याचाराचा प्रयत्न केल्यास याद राखा’, अशी चेतावणी द्यावी लागली. एकूणच टीव्ही आणि भ्रमणभाष अन् त्यांवरील ‘व्हिडिओ गेम’ हे अव्याहतपणे उपलब्ध असतांना त्यातून मन:शांती मिळाली का, याचा नागरिकांनी विचार करण्याची वेळ आली आहे आणि ती मिळाली नसल्यास ती कुठे आहे ? याचा आतातरी शोध घेतला पाहिजे.
२. हरवलेले छंद
काही वर्षांपूर्वीचा काळ पाहिला, तर असे लक्षात येते की, त्या काळी भ्रमणभाष आणि टीव्ही नव्हता. त्या वेळी लोक वाचन, चित्रकला, गायन, वादन, मैदानी खेळ, नृत्य, रांगोळी आदी कितीतरी छंद जोपासत होते. या सर्व कला सत्त्वप्रधान, तसेच मन:शांती देणार्या असल्यामुळे त्यातून आनंद आणि उत्साह मिळत होता; मात्र आता त्यांची जागा टीव्ही आणि भ्रमणभाष यांनी घेतली आहे.
चित्रपट आणि मालिका यांतून बिभत्सपणा अन् अश्लीलता यांचा भडीमार पहायला मिळतो. अशी निर्मिती काही काळ मनाला खिळवून ठेवू शकते, मनोरंजन करू शकते; मात्र मन:शांती देऊ शकत नाही. त्यातून मन बाहेर आले की, मन अस्थिर होते आणि अस्थिरता घालवण्यासाठी व्यक्ती अन्य पर्याय शोधायला जाते. त्यातूनच व्यसनाधिनता आणि अनैतिकता वाढत चालली आहे.
३. तपश्चर्येतून आत्मानुभूती देणारे अध्यात्म आणि हतबल झालेले विज्ञान !
सहस्रो वर्षे एकांतात राहून तप करणारे ऋषिमुनी भारतात होऊन गेले आहेत. एका जागेवर वर्षानुवर्षे राहून आत्मानुभूती देण्याचे सामर्थ्य केवळ अध्यात्मात आहे, हे यातून लक्षात येते. उलट या दळणवळण बंदीच्या काळात काही काळ घरात राहिल्याने नागरिक मनोविकारांना बळी पडणे, हे विज्ञानाचे थिटेपण आहे. यातून एक गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट होते, ती म्हणजे विज्ञानाने मनुष्याला भौतिक प्रगतीची उपकरणे दिली; मात्र समाधान आणि आत्मानुभूती यांसाठी अध्यात्मावाचून पर्याय नाही. त्यामुळे विज्ञानाच्या मर्यादा ओळखून प्रत्येक मनुष्याने साधना करणे आवश्यक आहे.
४. महाराष्ट्रात एकाही राजकारण्याने विठ्ठलाच्या स्मरणाचा उपदेश न करणे, हे दुर्दैवी !
दळणवळण बंदीच्या काळात मनोविकारांचे प्रमाण वाढल्यावर शासनाने त्वरित मानसोपचाराचा सल्ला देण्यासाठी ‘हेल्पलाईन’ चालू केली; मात्र एकाही राजकारण्याने भारताच्या थोर अध्यात्म परंपरेचा वारसा सांगितला नाही. महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी राजकारणी पंढरपूरला जातात. या विठ्ठलाची भक्ती करणार्या संतांमुळे महाराष्ट्र ही संतभूमी म्हणून ओळखली जाते. याच महाराष्ट्रात संकटकाळात एकाही राजकारण्याने जनतेला विठ्ठलाच्या स्मरणाचा सल्ला दिला नाही. उलट काही पुरोगामी मंडळींनी ‘आता देव कुठे आहेत ?’, असा ढोल बडवणे चालू केले. ही महाराष्ट्राची शोकांतिका म्हणावी लागेल. हा या संतभूमीचा अपमानच म्हणावा लागेल.
५. पुरोगामीत्व आणि निधर्मीपणा यांनी केलेली समाजाची अपरिमित हानी !
महाराष्ट्रात सर्वपक्षांतील अनेक राजकारणी स्वत: अध्यात्मानुसार आचरण करतात. त्यातून मन:शांती अनुभवतात. त्यांना पूर्ण ठाऊक आहे की, विज्ञान मन:शांती प्रदान करू शकत नाही. त्याचे मूळ अध्यात्मात आहे; मात्र ते समाजाला सार्वजनिकरित्या तसे आवाहन करू शकत नाहीत. कुणी असे आवाहन केले, तर ‘स्वतःला पुरोगामी मंडळी ‘अंधश्रद्धाळू’ ठरवतील’, याची त्यांना भीती असते. त्यात देशाने निधर्मीवाद स्वीकारला असल्यामुळे समाजाला धर्माचरण, अध्यात्म हे शब्द म्हणजे जणू काही अतिरेकी शब्द असल्याप्रमाणे त्यांचा उच्चारही करायला राजकारणी घाबरतात. ‘कुणाच्या तरी धार्मिक भावना दुखावल्या जातील आणि त्याचा परिणाम मतांवर होईल’, अशी भीती त्यांना वाटते. अशा प्रकारे केवळ निधर्मीवादी आणि पुरोगामी मंडळी यांमुळे समाजाला सार्वजनिकरित्या अध्यात्माविषयी सांगितले जात नाही. यातून समाज साधनेपासून दूर राहिला आहे, ही पुरोगामी मंडळी आणि निधर्मीवाद यांनी केलेली समाजाची अपरिमित हानी होय.
६. मनोविकार, कौटुंबिक कलह, गुन्हेगारी हा साधनेच्या अभावाचा परिणाम
साधना केल्यामुळे मन, बुद्धी आणि चित्त यांची शुद्धी होते. मन सकारात्मक आणि समाधानी रहाते. स्वार्थाची भावना लोप पावून त्यागाची भावना निर्माण होते. त्यामुळे प्रामाणिकपणे साधना करणारा मनुष्य दुसर्याचे वाईट चिंतीत नाही. स्वत: नैतिकतेच्या मार्गाने जाऊन समाजहित साधण्याचा प्रयत्न करतो. एकूणच काय तर साधना केल्याने मन स्थिर रहाते. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत मात करणे शक्य होते. साधनेमुळे स्थिरता आली की, मनुष्य स्वत: स्थिर रहातो आणि स्वत:च्या आजूबाजूची पस्थितीतही शांतपणे हाताळतो. त्यामुळे कौटुंबिक कलह, गुन्हेगारी, मनोविकार यांना आळा बसतो. त्यातून साधनेमुळे वैयक्तिक हितासह सामाजिक हित साधले जाते. त्यामुळे समाजव्यवस्था उत्तम रहाण्यास साहाय्य होते. दळणवणळ बंदीच्या काळात मनोविकार, कौटुंबिक कलह आदी जी परिस्थिती निर्माण झाली, त्या परिस्थितीत समाजाला मानसिक स्वास्थ्याची आवश्कता भासू लागली आहे; मात्र यावर नेमके काय करावे, याची माहिती बहुतांश समाजाला नसल्यामुळे समाज बाह्य गोष्टींतून समाधान मिळवण्याचा प्रयत्न करू लागला. अशा नागरिकांनी क्षणाचाही विलंब न करता साधनेला प्रारंभ करावा आणि आनंदी जीवनाचा अनुभव घ्यावा.
कोरोनामुळे आज जी अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे, ती कालांतराने गतीमान होईल. थोडा विलंब होऊ शकेल, अनेक अडचणीही येतील; मात्र त्यातूनही मार्ग निघेल. या काळात समाजव्यवस्था उत्तम राखण्यासाठी सर्वांनी योगदान देणे आवश्यक आहे. हे करत असतांना कोरोनाच्या या संकटातून साधनेचे जे महत्त्व आपल्या लक्षात आले, ते झालेल्या हानीपेक्षा कितीतरी पटीने महत्त्वाचे आणि प्रत्येकाच्या जीवनासाठी अनमोल आहे. साधनेमुळे भविष्यकाळात येणार्या संकटांना आपणाला ध्येयाने आणि आत्मविश्वासाने सामोरे जाता येईल अन् मनाची आनंदावस्थाही टिकून ठेवता येईल. दळणवळण बंदीच्या या काळात आपल्यासाठी साधनेचा मार्ग प्रशस्त झाला आहे, याविषयी भगवंताच्या चरणी कृतज्ञ रहायला राहूया. ज्यांनी अजूनही साधनेला प्रारंभ केला नसेल, त्यांनी समजून घेऊन साधनेला त्वरित प्रारंभ करावा आणि ज्यांना साधना समजली आहे, त्यांनी ती अधिक झोकून देऊन करूया !