‘महर्षींनी नाडीभविष्यामध्ये ‘परात्पर गुरु डॉ. आठवले श्रीविष्णूचे अवतार आहेत’, असे सांगितले आहे. महर्षींनी परात्पर गुरु डॉक्टरांच्या दिव्यत्वाची ओळख साधकांना करून दिली. अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेचा संकल्प केला आहे. यासाठी ते अविरतपणे कार्यरत आहेत. ते करत असलेल्या व्यापक कार्याचे अवलोकन केल्यावर ‘असे कार्य केवळ अवतारी जीवच करू शकतो’, याची जाणीव होते. त्यांच्या जन्मकुंडलीतील ‘उच्च आध्यात्मिक योग’ यासंदर्भातील ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मकुंडलीतील ‘उच्च आध्यात्मिक योग’ !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मकुंडलीत प्रथम स्थानात मिथुन रास (लग्न रास) आहे. कुंडलीत बुध, गुरु, शनि आणि हर्षल हे ४ ग्रह बाराव्या (मोक्ष) स्थानात आहेत. या ग्रहस्थितीमुळे कुंडलीत उच्च आध्यात्मिक योग निर्माण झाले आहेत. तसेच कुंडलीत रवि ग्रह उच्च राशीत आहे. या योगांचे विवरण पुढे दिले आहे.
१ अ. कुंडलीत ‘बुध आणि गुरु हे ग्रह एकत्र असणे’ हा योग ग्रंथनिर्मितीसाठी अनुकूल असणे
बुध ग्रह लेखन, संकलन, प्रकाशन, प्रसारमाध्यमे यांचा कारक आहे, तर गुरु ग्रह ज्ञानाचा कारक आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कुंडलीत ‘बुध आणि गुरु हे ग्रह एकत्र असणे’, हा योग ग्रंथनिर्मितीसाठी अनुकूल आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी आतापर्यंत अध्यात्म, आचारधर्म, देवता आणि त्यांची उपासना, भावी आपत्काळातील संजीवनी आदी विविध विषयांवर ३०० हून अधिक ग्रंथांची निर्मिती केली आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी चालू केलेली ‘सनातन प्रभात’ नियतकालिके आणि संकेतस्थळे यांच्या माध्यमातून अध्यात्मप्रसाराचे कार्य प्रभावीपणे होत आहे.
१ आ. कुंडलीत बुध, शनि आणि हर्षल हे ग्रह एकत्र असल्याने अद्वितीय आध्यात्मिक संशोधन करणे
परात्पर गुरु डॉक्टरांच्या कुंडलीत बुध आणि शनि हे ग्रह एकत्र आहेत. हा योग जिज्ञासा, उत्तम निरीक्षणक्षमता आणि संशोधक बुद्धी ही वैशिष्ट्ये दर्शवतो. हा योग बाराव्या स्थानात म्हणजे अध्यात्माशी संबंधित स्थानात असल्याने परात्पर गुरु डॉक्टरांनी विपुल आध्यात्मिक संशोधन केले आहे. ‘आध्यात्मिक कारणांमुळे व्यक्तीला होणारे त्रास’, ‘साधनेमुळे व्यक्ती, वास्तू आणि वस्तू यांच्यात पंचतत्त्वांच्या स्तरावर होणारे दैवी पालट’, ‘उच्च लोकांतून जन्म घेतलेल्या दैवी बालकांना ओळखणे’ आदी विषयांसंबंधी त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण संशोधन केले आहे.
कुंडलीत बुध आणि शनि या ग्रहांसोबत ‘हर्षल’ ग्रहसुद्धा आहे. ‘हर्षल’ हा ग्रह नाविन्यपूर्ण संशोधनाचा कारक आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘विकार-निर्मूलनासाठी रिकाम्या खोक्यांचे उपाय’, ‘विकार-निर्मूलनासाठी नामजप’, ‘प्राणशक्तीवहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्या विकारांवर करायचे उपाय’ आदी नाविन्यपूर्ण उपायपद्धती विकसित केल्या आहेत. यामुळे आगामी आपत्काळात वैद्य, औषधे इत्यादी उपलब्ध नसतांना व्यक्ती तिला होणार्या त्रासांवर स्वत: उपाय करण्यास सक्षम होईल.
१ इ. कुंडलीत गुरु आणि शनि हे ग्रह एकत्र असल्याने ‘गुरुकृपायोग’ साधनामार्गाची निर्मिती करणे
परात्पर गुरु डॉक्टरांच्या कुंडलीत गुरु आणि शनि ग्रह एकत्र आहेत. गुरु ग्रह साधनेचा, तर शनि ग्रह समाजाचा कारक आहे. गुरु आणि शनि हे ग्रह एकत्र असतात, तेव्हा ‘परिवर्तन योग’ होतो. कुंडली उच्च प्रतीची (दर्जाची) असून कुंडलीत ‘परिवर्तन योग’ असल्यास व्यक्ती मोठा सामाजिक पालट घडवून आणते. परात्पर गुरु डॉक्टरांची कुंडली आध्यात्मिकदृष्ट्या उच्च प्रतीची असून कुंडलीत ‘परिवर्तन योग’ असल्याने त्यांनी ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाची निर्मिती केली. ईश्वरप्राप्ती होण्यासाठी गुरुकृपेविना गत्यंतर नसते. ‘गुरुकृपायोगा’नुसार साधना केल्याने शीघ्र गुरुप्राप्ती होऊन गुरुकृपा सातत्याने होत रहाते.
‘गुरुकृपायोगा’नुसार साधना करून आतापर्यंत १ सहस्रहून अधिक साधक जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाले आहेत.
परात्पर गुरु डॉक्टरांच्या कुंडलीत ‘गुरु आणि शनि ग्रह एकत्र असणे’, हा योग आश्रम निर्मिती दर्शवतो. ‘साधनेसाठी अनुकूल वातावरण मिळावे’, या उद्देशाने परात्पर गुरु डॉक्टरांनी सनातनच्या आश्रमांची निर्मिती केली. सनातनच्या आश्रमांमध्ये राहून अनेक साधक पूर्णवेळ साधना करत आहेत.
१ ई. कुंडलीत बुध, गुरु आणि शनि ग्रह एकत्र असल्याने ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ची स्थापना करणे
बुध ग्रह बुद्धीचा, गुरु ग्रह शिक्षण, विद्या, विश्वविद्यालय आदींचा, तर शनि ग्रह अध्यात्माचा कारक आहे. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कुंडलीत बाराव्या स्थानात बुध, गुरु आणि शनि ग्रह एकत्र आहेत. हा योग आध्यात्मिक विश्वविद्यालयाची निर्मिती दर्शवतो. ‘हिंदु धर्मात सांगितलेल्या १४ विद्या आणि ६४ कला यांद्वारे ईश्वरप्राप्ती कशी करावी ?’, हे शिकवण्यार्या ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ची त्यांनी स्थापना केली. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या माध्यमातून जगभर अध्यात्माचा प्रसार होत आहे.
१ उ. कुंडलीत उच्च आध्यात्मिक योग असण्यासह रवि ग्रह
बलवान असल्याने परात्पर गुरु डॉ. आठवले अध्यात्मातील ‘सर्वोच्चपदी’ विराजमान असणे
रवि ग्रह आत्मा, राजा आणि नेतृत्व यांचा कारक आहे. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कुंडलीत रवि ग्रह उच्च राशीत आहे, म्हणजे बलवान आहे. कुंडलीत उच्च आध्यात्मिक योग असण्यासह रवि ग्रह बलवान असल्यामुळे ‘परात्पर गुरु डॉ. आठवले अध्यात्मातील सर्वोच्चपदी विराजमान आहेत’, हेच हा योग दर्शवतो !’