दाराला लावायच्या पाट्यांतूनही परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अध्यात्मशास्त्राची शिकवण देणे
ईश्वर ‘सत्यम्, शिवम्, सुंदरम्’ आहे. अशा ईश्वराशी एकरूप होऊन सातत्याने आनंदाची अनुभूती घेता येण्यासाठी आपण आणि आपले राहणीमान ‘सत्यम्, शिवम्, सुंदरम्’ असणे आवश्यक असते. जीवनातील प्रत्येक छोट्या गोष्टीत हे सूत्र कसे अवलंबायचे, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या दारावर लावायच्या एका साध्या पाटीच्या माध्यमातून शिकवले. यासाठी त्यांनी त्यांच्या दारावरील ब्रशने रंगवलेल्या आणि संगणकीय प्रत काढून सिद्ध केलेल्या पाट्यांचे सूक्ष्म परीक्षण, तसेच आधुनिक वैज्ञानिक यंत्र यांद्वारे अभ्यास करवून घेतला. या अभ्यासातील निष्कर्ष सारांश रूपाने येथे दिले आहेत.
१. पाट्यांचा सूक्ष्म-परीक्षणातून अभ्यास
परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांच्या खोलीच्या दारावर ‘प.पू. डॉक्टर विश्रांती घेत आहेत. कृपया कोणीही आत जाऊ नये.’, अशी पाटी लावण्यात येते.
ही पाटी वर्ष २०१३ मध्ये सनातन संस्थेचे चित्रकार-साधक आणि ६७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. रामानंद परब यांनी ब्रशने रंगवली होती. परात्पर गुरु डॉ. आठवले विश्रांती घ्यायला जातांना ही पाटी दाराला लावत. अन्य वेळी ही पाटी त्यांच्या खोलीत असायची. या पाटीचा वापर वर्ष २०१३ ते २०२० पर्यंत अव्याहतपणे चालू होता. आता या पाटीच्या अक्षरांतील रंग फिकट झाल्यामुळे २७.४.२०२० या दिवशी याच मजकुराची संगणकीय अक्षरांतील प्रत काढून नवीन पाटी बनवण्यात आली.
ही नवीन पाटी बनवल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘त्याकडे पाहून सूक्ष्मातून काय जाणवते ?’, असा प्रयोग करण्याचा निरोप दिला. त्या वेळी प्रयोग केल्यावर ‘संगणकीय प्रत काढलेल्या पाटीपेक्षा हाताने लिहिलेल्या पाटीकडे पाहून भाव जागृत होतो आणि चांगले वाटते’, असे मला जाणवले. याविषयी त्यांना कळवल्यावर, ‘केवळ एकच दृष्टीकोन नको. अध्यात्म हे अनंताचे शास्त्र आहे. त्यामुळे त्याचे अनेक पैलू असतात. अधिक सूक्ष्म स्पंदने कळण्याच्या दृष्टीने अभ्यास कर’, असा निरोप त्यांनी दिला. प्रत्येक वस्तू ही पंचतत्त्वांनी बनलेली असते. त्यामुळे ‘पाट्यांमध्ये कार्यरत असलेल्या सूक्ष्म पंचतत्त्वांचा अभ्यास करूया’, असे वाटले. त्यानुसार केलेले सूक्ष्म परीक्षण पुढील तक्त्यात दिले आहे.
कार्यरत तत्त्वे | वर्ष २०१३ मधे ब्रशने रंगवलेली पाटी | वर्ष २०२० मधे संगणकीय प्रत काढून सिद्ध केलेली पाटी |
१. पृथ्वी | पाटी आणि पाटी अडकवण्यासाठी बांधलेला दोरा यांना चंदनाप्रमाणे सुगंध येणे | पाटीला प्रिंट केलेल्या कागदाच्या शाईचा गंध येणे |
२. तेज | पाटीला थोड्या प्रमाणात गुलाबी छटा आल्याचे जाणवणे | रंगात पालट नसणे |
३. वायू | अ. ही पाटी मोठी असूनही वजनाने हलकी जाणवणे | अ. ही पाटी जड जाणवणे |
आ. पाटी हलवून वारा घेतल्यावर गार वारा जाणवणे | आ. पाटी हलवून वारा घेतल्यावर उष्ण वारा जाणवणे |
वरील प्रयोगातून प्रामुख्याने पुढील सूत्रे लक्षात आली.
१. संतांमधील चैतन्याचा प्रभाव
श्री. रामानंद परब यांनी रंगवलेली पाटी वर्ष २०१३ पासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वापरात, तसेच त्यांच्या खोलीमध्ये आहे. त्यांचा स्पर्श, तसेच खोली यांतील चैतन्यामुळे त्या पाटीमध्ये सकारात्मक पालट घडून आल्याचे जाणवले.
२. साधकाची उच्च आध्यात्मिक पातळी आणि भाव
६७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. रामानंद परब यांनी पाटी रंगवण्याची सेवा अत्यंत भावपूर्ण केलेली असल्यामुळे त्या पाटीतील स्पंदने पुष्कळ सात्त्विक आहेत.
३. ‘स्थूल डोळ्यांनी चांगली दिसणारी प्रत्येक वस्तू सूक्ष्मातूनही चांगलीच असते’, असे नाही, उदा. विदेशात सर्वत्र स्वच्छता, नीटनेटकेपणा असतो, तर भारतात बहुतांश अस्वच्छता आढळते. असे असूनही विदेशातून भारतामध्ये आल्यानंतर अनेकांना चांगले वाटून आध्यात्मिक स्तरावरील अनुभूती येतात. वरील दोन्ही पाट्यांच्या संदर्भातही हे सूत्र लक्षात आले.
संगणकीय प्रत काढून सिद्ध केलेल्या पाटीतील स्पंदने चांगली नसल्यामुळे पुन्हा हाताने रंगवलेली पाटी बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार श्री. रामानंद परब यांनी ब्रशने रंगवून नवीन पाटी बनवून दिली.
२. ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या यंत्राद्वारे केलेला अभ्यास
भूतपूर्व अणु वैज्ञानिक डॉ. मन्नम् मूर्ती यांनी हे उपकरण विकसित केले आहे. या उपकरणाच्या माध्यमातून एखादी वस्तू, वास्तू, वनस्पती, प्राणी किंवा मनुष्य यांतील सूक्ष्म सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा यांची प्रभावळ मोजता येते. सर्वसाधारण व्यक्ती किंवा वस्तू यांत नकारात्मक ऊर्जा असू शकते; परंतु सकारात्मक ऊर्जा असेलच असे नाही. वर्ष २०१४ ते २०१९ या कालावधीमध्ये ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाच्या माध्यमातून व्यापक संशोधन करण्यात आले आहे. या कालावधीमध्ये १० सहस्रपेक्षा अधिक सजीव आणि निर्जीव घटकांच्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दारावर लावण्यासाठी सिद्ध केलेल्या पाट्यांमधील सूक्ष्म उर्जांचा अभ्यास विज्ञानाद्वारे करण्यासाठी २८.५.२०२० या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाच्या माध्यमातून एक चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निष्कर्ष संक्षेपाने पुढीलप्रमाणे आहेत.
नकारात्मक ऊर्जा (मीटर) | सकारात्मक ऊर्जा (मीटर) | |
वर्ष २०२० मधे संगणकीय प्रत काढून सिद्ध केलेली पाटी | १.५२ | ० |
वर्ष २०१३ मधे ब्रशने रंगवलेली पाटी | ० | २२.५५ पेक्षा अधिक (टीप) |
वर्ष २०२० मधे ब्रशने लिहिलेली पाटी | ० | २२.५५ पेक्षा अधिक (टीप) |
टीप – ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाच्या माध्यमातून मोजणी ज्या आवारात घेतली जात होती, तेथील लांबी मर्यादित असल्याने आणि ब्रशने रंगवलेल्या वरील पाट्यांच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ त्यापेक्षा अधिक असल्याने ती पूर्ण मोजता आली नाही.
वरील सारिणीतून पुढील सूत्रे प्रामुख्याने लक्षात येतात.
१. संगणकीय प्रत काढून सिद्ध केलेल्या पाटीमध्ये नकारात्मक ऊर्जा होती; तर सकारात्मक ऊर्जा नव्हती.
२. वर्ष २०१३ आणि वर्ष २०२० मधे ब्रशने रंगवलेल्या दोन्ही पाट्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा नव्हती, तर सकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात होती.
३. विशेष म्हणजे वर्ष २०२० मधे ब्रशने रंगवलेल्या पाटीला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा स्पर्श झाला नसूनही किंवा ही पाटी त्यांच्या खोलीत ठेवली गेली नसूनही त्यात नकारात्मक ऊर्जा नाही आणि पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आहे.
३. निष्कर्ष
आजकाल सर्वत्र संगणकीय अक्षरांतील पाट्या वापरण्याची पद्धत रूढ झाली आहे. संगणकीय अक्षरे सुबक दिसतात, तसेच रंगवण्याच्या तुलनेत प्रत काढणे सोपे असते. उपरोल्लेखित सूक्ष्म परीक्षण आणि ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाच्या माध्यमातून केलेली चाचणी यांतून संगणकीय प्रत काढून सिद्ध केलेल्या पाटीतून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात, हे स्पष्ट झाले. यावरून चांगली आध्यात्मिक पातळी असलेल्या चित्रकार-साधकाने भावपूर्ण रंगवलेल्या पाटीचे महत्त्व लक्षात येते.’