सनातन संस्थेची वैशिष्ट्ये

Article also available in :

सनातन संस्थेची स्थापना राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती करण्यासाठी झाली असून तिचे कार्य ईश्वरी पाठबळावरच सुरू आहे, याची अनुभूती अनेक साधक, हितचिंतक घेत आहेत. हाच भाग इतरांना शब्दांच्या माध्यमातून अनुभवण्यासाठी येथे सनातन संस्थेची काही वैशिष्ट्ये संक्षिप्त स्वरूपात देत आहोत. यासाठी इतकेच सांगू शकतो की, ‘या, पहा अन् प्रत्यक्ष अनुभव घ्या !’

 

१. सनातनचे साधक आहेत, निर्गुण भाषेचे अधिकारी !

सनातनचे कित्येक साधक पोथ्या, पुराणे न वाचताही केवळ सेवेतून झालेल्या गुरूंच्या कृपेमुळे निर्गुण तत्त्वावर आधारित अध्यात्माची भाषा बोलतात. असाच अनुभव संस्थेचा बांधकाम विभाग, स्वयंपाकघर, तसेच सुतारकाम विभाग यातील साधकांना येतो. अध्यात्मात पंडिती विद्येपेक्षा गुरूंच्या कृपेचीच आवश्यकता असते, हे सनातनने सिद्ध केले आहे.

२. प्रकृतीमार्गानुसार साधक घडवणारी ‘सनातन’ ही एकमेव आध्यात्मिक संस्था !

सनातनमध्ये नाम, सत्संग, सेवा, त्याग आणि प्रीती या घटकांना महत्त्व देऊन प्रत्येकाला त्याच्या प्रकृतीनुसार ईश्वराकडे जाण्याचा मार्ग उपलब्ध करून दिला जातो. नृत्यकला, संगीतकला, चित्रकला, मूर्तीकला अशा विविध प्रकारच्या मार्गांतून त्या त्या साधकाला आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन करून त्याला ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’, या उद्देशातून घडवले जाते.

३. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांचे महत्त्व जाणणारी सनातन संस्था !

सनातनमध्ये जेवढा वेळ साधनेतील प्रमुख अडथळा असलेल्या स्वभावदोष निर्मूलनाला तसेच अहं-निर्मूलनाला दिला जातो, तेवढा वेळ अन्य संप्रदायांत दिला जात नाही; म्हणूनच सनातनच्या साधकांची जलद आध्यात्मिक उन्नती होऊन कित्येक साधक आता लहान वयातच संतपदाकडे वाटचाल करत आहेत.

४. प्रत्येक गोष्टीचे अध्यात्मीकरण करायला शिकवणारी सनातन संस्था !

सनातनमध्ये दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्टीचे अध्यात्मीकरण करण्याला महत्त्व देऊन त्यामागचे शास्त्र सांगितले जाते आणि त्यासंदर्भात सहस्रो संशोधनात्मक सूक्ष्म-चित्रे, ध्वनीचित्र-चकती, आणि ग्रंथ यांची निर्मिती केली जाते.

५. अनेक विषयांवर चौफेर सखोल असे आध्यात्मिक संशोधन, हे सनातनचे अद्वितीयत्व !

सनातनसारखे अनेक विषयांवर सखोल शास्त्रीय भाषेतील आध्यात्मिक संशोधन विश्वातील कोणत्याच आध्यात्मिक संस्थेकडून केले जात नाही; म्हणूनच ती अद्वितीय आहे.

६. प्रत्यक्ष जीवनात ‘अध्यात्म’ जगायला शिकवणारी सनातन संस्था !

सनातनमध्ये अध्यात्माच्या तात्त्विक भागासह प्रायोगिक भागाचेही टप्प्याटप्प्याने शिक्षण दिले जाते आणि प्रत्येक साधकाकडे वैयक्तिक स्तरावर लक्ष देऊन त्याच्याकडून ती कृती योग्य पद्धतीने होत आहे का, ते पाहिले जाते. यामुळे साधक प्रत्यक्ष जीवनात अध्यात्म जगायला शिकतात.

– (पू.) सौ. अंजली गाडगीळ, रामनाथी आश्रम, गोवा.

Leave a Comment