१. आजच्या तरुण पिढीने विभक्त कुटुंबपद्धत म्हणजेच आदर्श कुटुंबपद्धत मानणे
‘आजच्या काळात दोन पिढ्यांमध्ये दुवा सांधणे नव्या पिढीला नको आहे; कारण आजची तरुण पिढी ‘विभक्त कुटुंबपद्धत म्हणजेच आदर्श कुटुंबपद्धत’, अशा विचाराने वागत आहे. ‘एकत्र कुटुंबात आपल्या मताला काहीच किंमत नाही’, असा चुकीचा समज करून घेतला आहे. आजची तरुण पिढी मागील पिढीतील वयस्कर लोकांना काडीचीही किंमत देत नाही, वृद्धांच्या विचारांना नगण्य मानते आणि पदोपदी मागील पिढीतील बुजुर्गांना म्हणजे वृद्धांना अपमानित करते, यातच ती धन्यता मानत आहे. तसेच ‘सासू-सासरे म्हणजे आपल्या चिमुकल्या संसारातील प्रमुख अडचण आणि नको असलेली अडगळ आहे’, असा त्यांचा गोड समज आहे. त्यामुळे त्यांना कधी एकदा ही ब्याद कायमची तोंड काळे करील, याचाच ध्यास लागलेला असतो.
२. मुलगा-सून बाहेर गेल्यावर उत्तरदायी म्हणून घरात वावरणारे आजी-आजोबा !
मुलगा-सून दिवसभर बाहेर जातात. घरात तिसरी लहान पिढी वाढत असते. त्यांच्या संगोपनाचे काय ? त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याचे महत्त्वाचे दायित्व कोण पत्करतो ? आजी-आजोबाच ना ! घरात काय कमी आहे ? काय आणायला हवे आहे ? याचे भान कोण ठेवते ? मुलगा-सून यांच्या अनुपस्थितीत आलेल्या अतिथींचे-अभ्यागतांचे हसतमुखाने स्वागत कोण करतो ? मागील पिढीचे प्रतिनिधी म्हणून उत्तरदायीपणे घरात वावरणारे आजी-आजोबाच असतात.
३. स्वतःच्या जन्मदात्या आई-वडिलांना
सुनावणारे आजचे आई-वडील म्हणजे कृतघ्नपणाचा कळस !
आपल्या नातवंडांनी स्वतःच्या कुळाचे, घराण्याचे नाव उज्ज्वल करावे, म्हणून त्याला चांगले वळण लावण्यासाठी कोण धडपडत असते ? नातवंडांचा वेळच्या वेळी अभ्यास करवून घेऊन त्याला ज्ञानरूपी शिदोरी कोण देते ? दिवसभर आपले आई-बाबा घरात राहून आपल्या पुढील पिढीला योग्य वळण लावतात, समाजात आदर्श नागरिक बनवण्याचे महान कार्य करतात, त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यास आजच्या पिढीतील आई-वडिलांना वेळ नसतो. स्वतःच्या जन्मदात्या आई-वडिलांनी आपल्या पुढील तिसर्या पिढीवर केलेले संस्कार आणि त्या पिढीला आधुनिक जगात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी केलेले कष्ट यांविषयी धन्यता मानण्याऐवजी त्याचे फळ म्हणून ‘तुम्ही नको ती लुडबुड करू नका’, असे लागट-बोचर्या शब्दांत स्वतःच्या जन्मदात्या आई-वडिलांना सुनावणारे आजचे आई-वडील म्हणजे कृतघ्नपणाचा कळस आहे.
४. एकत्र कुटुंबपद्धत म्हणजे भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व;
परंतु आता भारतात पाश्चात्त्य संस्कृतीचे वारे वहातांना दिसत असणे
कलियुगात सामान्य माणसाला या जगात जगण्याचा अधिकार नाही, असे नाईलाजाने म्हणावे लागेल. वर्षानुवर्षे सर्व जगात भारतीय संस्कृतीचा डांगोरा पिटला जात होता. आपली संस्कृती कशी श्रेष्ठ आहे ?, हे जगात मान्य केले जात होते. आई-वडील नसलेल्या अनाथ मुलाला एकत्र कुटुंबात सन्मानाने वागवले जात होते. एखाद्या हुशार होतकरू मुलाला उच्च शिक्षणासाठी आजी-आजोबा, काका-काकू यांच्या प्रयत्नाने (काका-काकूंच्या आर्थिक बळावर) उच्च शिक्षणासाठी विदेशात पाठवले जात असे. ‘तू काळजी करू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत’, असा दिलासा दिला जात होता. अशी आपली भारतीय संस्कृती थोर होती. सर्वांना एकत्र कुटुंबपद्धतीत मानाने जगता येत होते. मग ती व्यक्ती निरक्षर असो, निरुपयोगी असो, निर्धन असो, वयस्कर असो, नाही तर निपुत्रिक असो, सर्वांना त्यांच्या मानाने सन्मानाने वागवले जात असे. कुणाचीही संभावना, अडगळ म्हणून संभावना होत नसे; परंतु आता खरेच जमाना पालटला आहे. कुणी कुणाचा नाही आणि नसतो, हे पाश्चात्त्य संस्कृतीचे वारे भारतात वहायला लागल्यापासून दृगोच्चर होत आहे. ‘जोवरी पैसा, तोवरी बैसा’ हा न्याय सर्वत्र लागू झालेला दिसत आहे, हे लाजिरवाणे आहे.
५. आता वृद्धांनी वृद्धाश्रमाचा मार्ग स्वीकारावा, हेच योग्य !
एकदा का होईना, तुमचे वय वाढले, तुम्ही वृद्ध झालात, तुमचे हातपाय थकले, तुमच्या कुडीतील शक्ती नाहीशी झाली की, कुटुंबात तुमची अडगळ होते. तुमची सेवा करायला कुणीही मायेचा पूत सिद्ध होत नाही. मग अशा व्यक्ती त्या कुटुंबात सर्वांनाच नकोशा होतात. मग अशा व्यक्तींनी ‘कृतातन्तकटकामल ध्वजर्जरा दिसो लागली’ हे वेळीच ओळखून वृद्धाश्रमाचा मार्ग स्वीकारावा हेच योग्य. नाही का ? मग मला सांगा, ‘वृद्धाश्रमांची आवश्यकता आहे कि नाही ?’