‘साधारणतः वयाच्या पन्नाशीनंतर माणसाच्या आरोग्याच्या समस्यांना वाचा फुटायला आरंभ होतो. आयुष्याचा आतापर्यंतचा प्रवास जोम, शक्ती आणि उत्साह अशा काहीशा आनंदी मार्गाने झालेला असतो. इथपर्यंत अनेक संकटे, समस्या, कौटुंबिक उत्तरदायित्व यांनाही निरनिराळ्या पातळीवर आपण तोंड दिलेले असते. सधन मध्यमवर्गीय कुटुंब असो किंवा दारिद्य्राने गांजलेला असो, प्रत्येकाची प्रवाहाविरुद्ध झुंज देत यशाकडे जाण्याची धडपड असते. प्रत्येकाच्या समस्यांचे स्वरूप वेगळे असते एवढेच. अशा समस्यांना पन्नाशीपूर्वी आपण सहजरित्या सामोरे गेलेलो असतो. सळसळणारे रक्त असते, उत्साह आणि जोम असतो. आव्हाने झेलून घ्यायची आणि चार हात करायची खुमखुमी असते.
पन्नाशीनंतर : पन्नाशीनंतर मात्र आपल्या एकेक पराक्रमाला आळा बसायला आरंभ होतो. मनात वळवळणारे विचार शारीरिक क्षमतेअभावी जिथल्या तिथे जिरवणे भाग पडते. उत्तम आरोग्य ज्यांच्या ठायी आहे, अशी पन्नाशी ओलांडलेली व्यक्ती क्वचितच आढळते.
‘साखर अल्प घाला ! जेवणात मीठ अधिक खायचे नाही ! तेलकट पदार्थ, मसाले, हिरवी मिरची चालत नाही !’, अशा नानाविध समस्या पाहुणे आपल्यापुढे उभ्या करत असतात. यातील एखाद्या समस्येचे आपणही बळी असतो. मधुमेह, उच्च किंवा न्यून रक्तदाब, हृदयरोग, आम्लपित्त, संधीवात अशा व्याधींनी ग्रस्त असणार्या साठीच्या वयातील लोकांची संख्या ९० टक्क्यांहून अधिक भरील.
पन्नाशी ओलांडणार्या व्यक्तींनी प्रसन्न आणि चिंतामुक्त जीवनासाठी थोडे अंतर्मुख होऊन, दैनंदिन जीवनक्रमाची आखणी करावी. आतापर्यंत ज्या ज्या पद्धतीने आपण धावपळ केलेली असते आणि शरिराच्या ज्या ज्या अवयवांना प्रमाणापेक्षा अधिक राबवून घेतलेले असते, ते ते अवयव उतारवयात अधिक श्रम करायला कुरकुरतात. त्यांची झीज प्रमाणाहून अधिक झालेली असते. त्यांनी आतापर्यंत तुमच्यासाठी एवढे श्रम केलेले असतात की, येथून पुढे त्या अवयवांना इतर अवयवांच्या तुलनेत थोडी अधिक विश्रांती हवी असते. नेहमीच्या खाक्यानुसार ‘त्याच ठेक्यात त्यांनी राबावे’, असा स्वतःचा अट्टहास असतो. मग हा ताण सहन न झाल्याने हे अवयव आपल्या दैनंदिन वागण्याला खीळ घालतात, त्यालाच आपण ‘अॅटॅक’ म्हणतो. वय आणि पूर्वी आपण ज्या क्षेत्रात राबलो, त्या योगे ज्या अवयवांना आपण विशेष ताण दिला. त्यांना विश्रांती, म्हणजे अल्प ताण द्यायची काळजी घ्यायला हवी. ‘पूर्वीसारखे त्यांनी आताही राबावे’, असा अट्टहास धरू नये. बौद्धिक श्रमाची कामे, मेंदूला ताण, शीण वाटणार नाही असे वाचन आणि कार्यक्षेत्र निवडावे. गल्ल्यावर आणि पेढीवर बसून ज्यांनी आयुष्य काढललेे असते, अशांनी प्रतिदिन चालण्याची, फिरण्याची सवय ठेवावी.
पन्नाशीच्या वळणावर या सार्या गोष्टींचा जाणीवपूर्वक विचार करून पुढील आयुष्याचे दैनंदिन जीवन त्या पद्धतीने आपणच सिद्ध करायला हवे, तरच आपण निरामय जीवनाच्या आनंदात राहू शकू. पन्नाशीनंतरचा आयुष्याचा टप्पा आधुनिक वैद्यांच्या (डॉक्टरांच्या) विळख्यात घेऊन घालवणार कि स्वतःच स्वतःवर नियंत्रण ठेवून सुख-समाधानाने घालवणार ? आपण कुठल्याही क्षेत्रात काम करत असा, अतिरिक्त ताण दिलेल्या अवयवांचा विचार करून त्यांना विश्रांती देण्याची सवय पन्नाशीपासूनच ठेवा. विश्रांती म्हणजे धीराने (सबुरीने) वावर ! मग पहा, पुढील आयुष्य किती सुखमय होईल !’