द्वापरयुगातील गोपींची आठवण करून देणार्या कलियुगातील सनातनच्या रामनाथी आश्रमातील गोपी !
भक्ती कशी असावी, यासंदर्भात ‘नारदीय भक्तिसूत्रां’त (अध्याय २, सूत्र २१) लिहिले आहे, ‘यथा व्रजगोपिकानाम् ।’, म्हणजे ‘व्रजातील गोपींनी केली तशी (भक्ती)’. अनेक ऋषीमुनींनी भक्तीचा अनुभव घेण्यासाठी श्रीकृष्णाच्या वेळी गोपींच्या रूपात जन्म घेतला. मोठमोठ्या ऋषीमुनींना भक्तीसाठी गोपींना गुरु करण्यास सांगण्यात आले होते. अशा गोपींच्या संदर्भात माझ्या मनात जिज्ञासा होती. सनातनच्या रामनाथी (गोवा) आश्रमातील कु. तृप्ती गावडे, कु. दीपाली मतकर, कु. वृषाली कुंभार, कु. प्रतीक्षा आचार्य इत्यादी साधिकांच्या बोलण्या-वागण्यातून, दृष्टीतून, पूजा करण्यातून ‘अखंड कृष्णभावात असणे म्हणजे काय’, ते शिकायला मिळाले. एकदा दीपालीने मला विचारले, ‘‘कृष्णाची राधा एकच होती. आता किती राधा असतील ?’’ मी म्हणालो, ‘‘द्वापरयुगात राधेने जे राधातत्त्वाचे बीज रोवले, त्यापासून आता कलियुगात लहान लहान अनेक फळे निर्माण झाली आहेत. ती फळे म्हणजेच राधातत्त्व असलेल्या साधिका, म्हणजेच कलियुगातील रामनाथी आश्रमातील गोपी.’’
एकदा दीपाली म्हणाली, ‘‘एका पुस्तकात गोपींची चांगली गोष्ट आहे.’’ गोपींना प्रत्यक्ष पहात असल्यामुळे, त्यांचा अनुभव प्रतिदिन घेत असल्यामुळे मला आता गोपींच्या गोष्टी वाचाव्याशा वाटत नाहीत; मात्र कधीकधी वाटते की, मीपण
त्यांच्यासारखीच एक गोपी असायला हवा होतो, म्हणजे ऋषींनी अनुभवला, तसा गोपीभाव मीही अनुभवला असता. अशा या रामनाथी आश्रमातील गोपींच्या संदर्भातील माहिती या ग्रंथमालिकेत संकलित केली आहे.
प्रत्येकीची इतकी माहिती जमा झाली की, प्रत्येकीचा स्वतंत्र ग्रंथ करावा लागला.
त्यामध्ये या गोपी गोपीभाव कशा शिकल्या, त्यांनी तो एकमेकींना कसा शिकवला, त्यांना कृष्णभेटीची तळमळ कशी लागली आहे, त्यांचे एकमेकींमध्ये संभाषण कसे होते इत्यादी माहिती आहे. ही माहिती इतरांनाही स्वतःमध्ये गोपीभाव निर्माण करण्यासाठी उपयोगी आहे.
महर्षि व्यासांना चार वेद, पुराणे, ब्रह्मसूत्रे आणि महाभारत इत्यादी लिहूनही शांती मिळत नव्हती. ते चिंताग्रस्त अवस्थेत बसले असतांना त्यांना देवर्षि नारद भेटले आणि त्यांनी शांतीसाठी भगवंताविषयी गुणवर्णनपर ग्रंथ लिहिण्यास सांगितले. त्याप्रमाणे व्यासांनी ‘भागवतपुराण’ लिहिले आणि त्यांना भाव, आनंद अन् शांती यांची अनुभूती आली. आतापर्यंत संकलित केलेल्या ग्रंथांमुळे मी जो भाव, आनंद अन् शांती अनुभवली नाही, ते सर्व या ग्रंथामुळे थोड्याफार प्रमाणात अनुभवत आहे. एकजण कालिदासाचा पत्ता विचारत होता. त्याला एका व्यक्तीने सांगितले, ‘‘ज्या घरात दास-दासीही अस्खलित संस्कृतमध्ये बोलतात, ते कालिदासाचे घर समजा.’’ त्याचप्रमाणे ‘जेथे कृष्णाप्रती भाव असलेल्या साधिका आहेत, तो म्हणजे रामनाथी आश्रम’, असे आता मला वाटू लागले आहे. रामनाथी आश्रमाची ओळख ‘जेथे सहस्त्रो ग्रंथांची निर्मिती झाली, ते स्थान’ याऐवजी ‘जेथील साधिका गोपीभावात रहातात, तो म्हणजे रामनाथी आश्रम’ ही ओळख साधकांच्या दृष्टीने जास्त महत्त्वाची ठरेल.
१. प.पू. भक्तराज महाराज यांनी ५० वर्षांपूर्वीच
कृष्णभक्तीचे, गोपीभावाचे जे बीज रोवले होते, ते आता फळाला येत आहे !
माझे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांनी वर्ष १९५६-५७ मध्ये कृष्णभक्तीची भजने लिहिली. त्यांतील निवडक ओळी पुढे दिल्या आहेत. त्यावरून त्यांनी ५० वर्षांपूर्वीच कृष्णभक्तीचे, गोपीभावाचे जे बीज रोवले होते, ते आता फळाला येत आहे, हे लक्षात आले.
१ अ. गोकुळात नांदे हरि ।
गोकुळात नांदे हरि । यमुनेच्या तिरी ।
गोपीसंग लीला करी । यमुनेच्या तिरी ।। धृ. ।।
नेत्र अधीर पहाण्या ज्याला । राधेचा कैवारी ।
राधेचा कैवारी ।।
हरि वाजवितो मुरली । तहान-भूक ज्याने हरली ।
हरि रासलीला करी । भुलल्या गोकुळीच्या नारी ।
– संत भक्तराज महाराज (श्रीसद्गुरूंसमोर, तराणा. २८ ऑगस्ट १९५६)
१ आ. वेणू कुणी वाजविला ।
वेणू कुणी वाजविला ।
सखे ग वेणू कुणी वाजविला ।। धृ. ।।
ऐकूनी रव तो वेणूनादाचा ।
जीव माझा घाबरला । सखे ग ।। १ ।।
ओष्ठी अमृत मधुर पानाने ।
जीव कोणी गुंगविला । सखे ग ।। २ ।।
नादलहरी त्या भुलवी जिवाला ।
तोल मनाचा गेला । सखे ग ।। ३ ।।
असा नाद हा वाजविणारा ।
नयनी कुणी पाहियला । सखे ग ।। ४ ।।
– संत भक्तराज महाराज (३ डिसेंबर १९५७)
१ इ. माझे मन मोहिले रे ।
माझे मन मोहिले रे ।
कान्हा यदुकुलराणा ।। धृ. ।।
गोपीसंगे तू लीला करिसी ।
वृंदावनी तू दही-दूध खासी ।
ऐकियले बहू तव लीलेसी ।
का दावी ना आम्हासी ।
ते सौख्य ह्याची नयना ।।
– संत भक्तराज महाराज (२० एप्रिल १९५७)
१ ई. मधु मुरलीचा नाद तो ।
मधु मुरलीचा नाद तो ।
जरा थांबवी रे तू आता ।। धृ. ।।
तालसुराचे हे ज्ञान नसे ।
मज ज्ञान नसे ।
वाजविणारा न नयनी दिसे ।
माझ्या नयनी न दिसे ।
झाले कन्हैया बावरी ।
किती गुंगविसी रे आता ।। १ ।।
– संत भक्तराज महाराज
२. शिंपल्यातील मोत्याप्रमाणे प्रकट झालेल्या सनातनच्या गोपी !
‘प.पू. भक्तराज महाराज यांचे एक भजन आहे, ‘सोनियाच्या शिंपल्यात । घावला हा चिंतामणी ।’ शिंपल्यातील मोती कोणी मानव निर्माण करत नाही. तो मानवाला आयताच मिळतो. त्याचप्रमाणे सनातनच्या गोपींना कोणी गोपीभाव शिकवला नाही. त्यांच्यात तो सनातनमध्ये येण्याआधीपासूनच होता. सनातनचे भाग्य हे की, शिंपला हळूहळू उघडून त्यातून मोती दिसावा, तसे गोपींतील गोपीतत्त्व हळूहळू विकसित होऊन ते सर्वांना अनुभवता आले.’ (ज्येष्ठ कृ. १२, कलियुग वर्ष ५११४ (१६.६.२०१२))
३. कलियुगातील गोपी व्यष्टी साधनेसह समष्टी साधनाही करणार असणे !
द्वापरयुगातील गोपींनी केवळ व्यष्टी साधना केली. श्रीकृष्ण मात्र स्वतः विश्वाचा, म्हणजेच समष्टीचा कार्यभार सांभाळतो; म्हणूनच त्याच्याशी लवकर एकरूप होण्यासाठी समष्टी साधना साहाय्यभूत ठरते. कलियुगातील गोपी काळानुसार आवश्यक म्हणून व्यष्टी साधनेसह समष्टी साधनाही करणार आहेत. त्यासाठी त्या सर्वत्र जाऊन गोपीभाव कसा निर्माण करायचा, हे या गुरुपौर्णिमेनंतर शिकवणार आहेत. त्यामुळे साधकांना व्यष्टी साधनेत लाभ होईल, तसेच कृष्णतत्त्व व्यापक स्तरावर पसरल्याने त्याचा समष्टीलाही लाभ होईल.
श्रीकृष्णाने माझी गोपींच्या संदर्भातील जिज्ञासा पूर्ण केली; म्हणून मी त्याच्या चरणी कृतज्ञ आहे.
– डॉ. आठवले (वैशाख कृ. ४, कलियुग वर्ष ५११४ ड९.५.२०१२)