प्रतिकूल परिस्थितीत घाबरून न जाता पुढील स्वयंसूचना देऊन आत्मबळ वाढवा !

‘सध्या भारतासह अन्य काही राष्ट्रांत ‘कोरोना’ या संसर्गजन्य विषाणूंचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे सर्वत्रचे जनजीवन विस्कळीत होऊन सर्वसामान्य नागरिकांमध्ये भयप्रद वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत ‘लहानसहान कारणांनी मन विचलित होणे, काळजी वाटणे, तसेच भीती वाटून अस्वस्थता येणे’, अशा प्रकारे स्वभावदोषांचे प्रकटीकरण होण्याची शक्यता असते. त्या प्रसंगी योग्य त्या स्वयंसूचना दिल्यास प्राप्त परिस्थितीतून बाहेर पडण्यास साहाय्य होते. या दृष्टीने मनोबळ वाढवून स्थिर रहाण्यासाठी ‘अंतर्मनाला कोणत्या स्वयंसूचना देता येतील ?’, हे पुढे दिले आहेत.

 

१. मनातील विविध अयोग्य विचार आणि ते न्यून होण्यासाठी द्यावयाच्या स्वयंसूचना

१ अ. अयोग्य विचार : सध्याची प्रतिकूल परिस्थिती पाहून मन अस्वस्थ होऊन दुःख वाटणे (परिस्थिती स्वीकारता न येणे)

१ अ १. स्वयंसूचना : ज्या वेळी सध्या ‘कोरोना’मुळे निर्माण झालेली प्रतिकूलता पाहून मी दुःखी होईन, त्या वेळी ‘हे सर्व ईश्‍वरेच्छेने घडत असून संभाव्य आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी भगवंत सर्वांच्या मनाची सिद्धता करून घेत आहे’, याची जाणीव होऊन ‘देव मला यातून काय शिकवत आहे ?’, याचे मी चिंतन करीन.

१ आ. अयोग्य विचार : ‘आपत्कालीन स्थितीत साधनेचे प्रयत्न करणे कठीण आहे’, असे वाटणे

१ आ १. स्वयंसूचना : ज्या वेळी ‘आपत्कालीन स्थितीत साधनेचे प्रयत्न करणे कठीण आहे’, असे मला वाटेल, त्या वेळी ‘सद्य:स्थितीतही मनाच्या स्तरावरील साधनेचे सर्व प्रयत्न (स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन, भाववृद्धीचे प्रयत्न आदी) मी सहज करू शकतो’, याची मला जाणीव होईल आणि संपत्काळापेक्षा आपत्काळामध्ये वेळेचे मूल्य अनेक पटींनी वाढते अन् केलेल्या प्रयत्नांचे फळही काही पटींनी मिळते; म्हणून मी सकारात्मक राहून प्रयत्न करीन.

१ इ. अयोग्य विचार : ‘आयुष्यातील एवढे महत्त्वाचे दिवस मी घरी राहून व्यर्थ घालवत आहे’, असे विचार येणे

१ इ १. स्वयंसूचना : ज्या वेळी माझ्या मनात ‘आयुष्यातील एवढे महत्त्वाचे दिवस मी घरी राहून व्यर्थ घालवत आहे’, असा विचार येईल, त्या वेळी ‘सद्य:स्थितीत कोरोनामुळे ‘नागरिकांनी घरी रहावे’, असा प्रशासनाने आदेश दिल्याने त्याचे तंतोतंत पालन करणे, ही माझी साधना आहे’, याची मला जाणीव होईल आणि ‘मी घरबसल्या व्यष्टी अन् समष्टी साधनेचे कोणते प्रयत्न करू शकतो ?’, हे उत्तरदायी साधकांना विचारीन.

१ ई. अयोग्य विचार : ‘मला घरी राहून पुष्कळ कंटाळा आला आहे’, असा विचार येणे

१ ई १. स्वयंसूचना : ज्या वेळी माझ्या मनात ‘घरी राहून मला पुष्कळ कंटाळा आला आहे’, असा विचार येईल, त्या वेळी मी ‘घरातील कामे सेवा म्हणून केली, तर माझी साधना होणार आहे, तसेच मी घरबसल्या व्यष्टी साधना (स्वभावदोष-अहं निर्मूलन, भाववृद्धीचे प्रयत्न आणि आध्यात्मिक उपाय) अन् शक्य ती समष्टी सेवा करणे श्री गुरूंना अपेक्षित आहे’, याची जाणीव होऊन मी त्यासाठी प्रयत्न करीन.

१ उ. अयोग्य विचार : ‘मला कोरोना विषाणूंची लागण झाल्यास माझा मृत्यू होईल’, अशी भीती वाटणे

१ उ १. स्वयंसूचना : १. ज्या वेळी माझ्या मनात ‘मला कोरोना विषाणूंची लागण झाल्यास माझा मृत्यू होईल’, असा विचार येईल, त्या वेळी ‘प्रत्येकाच्या मृत्यूची वेळ भगवंताने निश्‍चित केलेली असते. त्यामुळे कोरोनामुळेच नव्हे, तर मनुष्याला कोणत्याही कारणामुळे कधीही मृत्यू येऊ शकतो’, याची मला जाणीव होऊन मी मनुष्यजन्माचे सार्थक होण्यासाठी साधनेवर लक्ष केंद्रित करीन.

२. ज्या वेळी माझ्या मनात ‘मला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यास माझा मृत्यू होईल’, असा विचार येईल, त्या वेळी ‘या विषाणूंची लागण झालेल्या ८० टक्के रुग्णांमध्ये आजाराचे स्वरूप सौम्य असते’, याची मला जाणीव होऊन मी सकारात्मक राहीन आणि कुटुंबीय, हितचिंतक अन् सरकारी यंत्रणा यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून आरोग्याची योग्य ती काळजी घेईन.

१ ऊ. अयोग्य विचार : ‘अशा कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेले मनोबल माझ्यात नाही’, असे वाटून ताण येणे

१ ऊ १. स्वयंसूचना : ज्या वेळी ‘कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेले मनोबल माझ्यात नाही’, असे वाटून मला ताण येईल, त्या वेळी ‘दयाघन भगवंत चांगल्या आणि कटू अशा दोन्ही परिस्थितींमध्ये माझ्या समवेत आहे. प्रतिकूल परिस्थितीत मी काय करणे आवश्यक आहे ?’, ते सुचवून तोच माझे मनोबल वाढवणार आहे’, याची मला जाणीव होऊन मी भगवंतावर दृढ श्रद्धा ठेवेन.

१ ए. अयोग्य विचार : ‘मला कोरोना विषाणूचा संसर्ग होईल’, या विचाराने भीती वाटणे

१ ए १. स्वयंसूचना : ज्या वेळी माझ्या मनात ‘मला कोरोना विषाणूचा संसर्ग होईल’, या विचाराने भीती निर्माण होईल, त्या वेळी ‘मी आवश्यक ती सर्व काळजी घेत आहे’, याची मला आठवण करून देईन आणि दिवसभरात अधिकाधिक वेळ नामजप अन् प्रार्थना करून मी सत् मध्ये राहीन.

१ ऐ. अयोग्य विचार : औषधोपचार करूनही मुलीची सर्दी / ताप उणावत नसल्याने तिची काळजी वाटणे

१ ऐ १. स्वयंसूचना : ज्या वेळी मुलीला बर्‍याच दिवसांपासून सर्दी / ताप असेल, त्या वेळी ‘प्रत्येक वेळी सर्दी / ताप हा कोरोना विषाणूंच्या संसर्गामुळे झालेला नसतो’, याची मला जाणीव होईल आणि देवावर श्रद्धा ठेवून मी आधुनिक वैद्यांनी सांगितल्यानुसार तिला औषधे देईन अन् तिची स्थिती वेळोवेळी त्यांना कळवीन.

१ ओ . अयोग्य विचार : ‘कोरोना विषाणूंच्या साथीमुळे माझे कुटुंबीय मला भेटण्यासाठी प्रवास करू शकत नाहीत’, याची चिंता वाटणे

१ ओ १. स्वयंसूचना : ज्या वेळी ‘माझे कुटुंबीय मला भेटण्यासाठी प्रवास करू शकत नाहीत’, या विचाराने मला चिंता वाटत असेल, तेव्हा ‘साथीच्या काळात सर्वांच्या सुरक्षेसाठी प्रवास न करणे हितकारक आहे. ही तत्कालिक स्थिती आहे’, याची मला जाणीव होईल आणि मी ‘मला अन् कुटुंबियांना कोरोना विषाणूंचा संसर्ग होऊ नये’, यासाठी सरकारी यंत्रणेने सुरक्षेच्या दृष्टीने दिलेल्या सूचनांचे पालन करून आरोग्याची काळजी घेईन.

१ औ. अयोग्य विचार : सध्या दळणवळण बंदी असून सर्वत्र जीवनावश्यक वस्तूंचा (दूध, अन्नधान्य, औषधे आदींचा) तुटवडा भासत असल्याने ‘मला त्या उपलब्ध होतील ना ?’, याची काळजी वाटणे

१ औ १. स्वयंसूचना : ज्या वेळी ‘सध्या जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासत असल्याने मला त्या वस्तू उपलब्ध होतील ना ?’, याची काळजी वाटत असेल, त्या वेळी ‘भारत सरकारने सर्व नागरिकांना या वस्तू मिळाव्यात’, यासाठी त्यांचे घरपोच वितरण करण्याची व्यवस्था केली आहे’, याची मला जाणीव होईल. त्यामुळे मी निश्‍चिंत राहून नामजप आणि प्रार्थना यांवर लक्ष केंद्रित करीन.

 

२. स्वयंसूचना देण्याची पद्धत

आपल्या मनात वरीलपैकी ज्या अयोग्य विचारांचा ताण किंवा काळजी असेल, त्या विचारांवर १५ दिवस अथवा विचार न्यून होईपर्यंत संबंधित स्वयंसूचना द्यावी. या स्वयंसूचनांची दिवसभरात ५ सत्रे करावीत. एका सत्राच्या वेळी ५ वेळा एक स्वयंसूचना अंतर्मनाला द्यावी.

 

३. मन एकाग्र करून स्वयंसूचना सत्रे करा आणि
अल्पावधीत मनातील अयोग्य विचार न्यून झाल्याचे अनुभवा !

मन एकाग्र करून स्वयंसूचनांची सत्रे केल्यास सूचनांचा अंतर्मनावर संस्कार होऊन ‘मनातील ताण अथवा काळजी यांचे विचार अल्पावधीत उणावतात’, असे अनेकांनी अनुभवले आहे. त्यामुळे मन एकाग्र करून स्वयंसूचना सत्रे करावीत. मनात येणार्‍या निरर्थक विचारांमुळे सत्र एकाग्रतेने होत नसल्यास थोड्या मोठ्या आवाजात (पुटपुटत) स्वयंसूचना सत्र करू शकतो किंवा कागदावर लिहिलेली स्वयंसूचना वाचू शकतो. यामुळे विचारांकडे लक्ष न जाता ते आपोआपच न्यून होतील आणि स्वयंसूचनेचे सत्र परिणामकारकरित्या होईल. मोठ्या आवाजात सत्र करतांना ‘इतरांना व्यत्यय येणार नाही’, याची काळजी घ्यावी.

वरीलप्रमाणे अन्य कोणत्या विचारामुळे ताण, तणाव, काळजी आदी निर्माण होत असेल, तर त्यासाठीही स्वयंसूचना घेऊ शकतो.

(मनाच्या समस्या दूर करण्यासाठी ‘मनाला योग्य स्वयंसूचना देणे’, हा स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेचा एक भाग आहे. संपूर्ण स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेविषयीची माहिती सनातनची ग्रंथमालिका ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन (७ खंड)’ या ग्रंथांत दिली आहे.)

‘सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत देवच आपले रक्षण करणार आहे’, अशी श्रद्धा ठेवून साधना वाढवा !’

– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.३.२०२०)

 

४. आपत्कालीन स्थितीमुळे चिंता, तणाव
आदींमुळे मन अस्वस्थ असल्यास पुढील सूचना द्या !

४ अ. स्वयंसूचना देण्याचे मनाला स्मरण करून देण्यासाठी द्यावयाची स्वयंसूचना

ज्या वेळी सद्य:स्थिती पाहून माझे मन अस्वस्थ होईल / मला काळजी वाटेल, त्या वेळी ‘मी या विषयावरील योग्य त्या स्वयंसूचना दिल्यास मला विचारांवर लवकर मात करता येणार आहे’, याची जाणीव होऊन मी आश्‍वस्त होऊन मनाला संबंधित स्वयंसूचना देईन.

४ आ. मनाचा उत्साह आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी पुढील सूचना देता येईल !

‘परात्पर गुरुदेवांनी काही वर्षांपूर्वीच संभाव्य आपत्काळाविषयी सर्वांना सूचित केले आणि त्यावरील परिणामकारक उपायही सांगितले. अशा द्रष्ट्या आणि सर्वज्ञ अशा गुरुदेवांचे मार्गदर्शन मला लाभत असल्यामुळे मी अत्यंत भाग्यवान आहे. गुरूंना अपेक्षित अशी साधना करण्याचा मी तळमळीने प्रयत्न करीन.’

ही सूचना दिल्यामुळे गुरुदेवांप्रती कृतज्ञताभाव निर्माण झाल्याने साधनेचे प्रयत्न अधिक उत्साहाने होतील.

मन अस्वस्थ असल्याने अन्य प्रयत्न करणे शक्य नसल्यास वरील १ आणि २ क्रमांकांच्या सूचना प्रत्येकी ५ वेळा देणे आवश्यक आहे.

४ इ. भगवंतावरील श्रद्धा वाढवण्यासाठी पुढील सूचना वाचा !

भगवंतावर श्रद्धा असेल, तर कोणत्याही संकटातून तरून जाण्याचे बळ मिळते. श्रद्धा वाढवण्यासाठी पुढीलपैकी अंतर्मनाला पटणार्‍या निवडक सूचना प्रतिदिन ३ वेळा वाचाव्यात. सर्वच सूचना अंतर्मनाला पटत असल्यास दिवसभरात ३ वेळा (प्रत्येक वेळी खालीलपैकी कोणत्याही २ सूचना याप्रमाणे) वाचता येतील.

४ इ १. आपत्काळातून तरून जाण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे ‘भगवंतावरील श्रद्धा’ ! श्रद्धेमुळे भगवंताचे अभेद्य सुरक्षाकवच आपल्याभोवती निर्माण होते.

४ इ २. ‘देव करतो, ते भल्यासाठीच’, या भगवंताच्या वचनावर माझी पूर्ण श्रद्धा आहे.

४ इ ३. गुरूंनी शिष्याला जवळ केले, तर ते त्याला कोणत्याच जन्मांत कधीच अंतर देत नाहीत. गुरूंचे असे माहात्म्य असतांना मला परात्पर गुरुदेवांच्या मार्गदर्शनानुसार साधना करण्याची संधी लाभत आहे. त्यामुळे मी निश्‍चिंत राहून साधना करायला हवी.

४ इ ४. मी साधना केल्यामुळे आतापर्यंत श्री गुरूंनी मला आणि माझ्या कुटुंबियांना सर्व संकटांतून सुखरूप बाहेर काढल्याची अनुभूती मी घेतलेली आहे.

४ इ ५. सनातनचे सर्व साधक श्री गुरूंच्या छत्रछायेखाली साधना करत आहेत. हे ब्रह्मांडातील सर्वांत सुरक्षित स्थान आहे. प्रत्येकाभोवती गुरुदेवांच्या कृपेचे / चैतन्याचे सुरक्षाकवच आहे. त्यामुळे सूक्ष्मातीसूक्ष्म विषाणूंना साधकांना स्पर्शही करू शकणे अशक्य आहे.

४ इ ६. भक्त प्रल्हादासम अढळ श्रद्धा माझ्या अंतरात निर्माण झाल्यास बाह्य परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी माझ्या अंतर्मनावर तिचा काहीही परिणाम होणार नाही. माझे मन आनंदी, स्थिर आणि भगवंताच्या अनुसंधानात राहील.

– सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment