‘शिवखोरी’ गुहेचा इतिहास !
१. शिवभक्त भस्मासुराने शिवाकडून अमरत्व मिळवण्यासाठी
कठोर तपश्चर्या करणे, शिवाने दुसरा ‘वर’ मागण्यास सांगितल्यावर भस्मासुराने ‘मी ज्या
कुणाच्याही डोक्यावर माझी तर्जनी ठेवीन, तो भस्मसात व्हावा’, असा वर मागणे आणि शिव ‘तथास्तु’ म्हणणे
शिवभक्त भस्मासुराने शिवाकडून अमरत्व मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन शिव त्याला ‘वर’ मागायला सांगतो. तेव्हा भस्मासुर शिवाकडे ‘अमरत्व’ मागतो. त्या वेळी शिव म्हणतो, ‘‘अमरत्व देणे शक्य नसल्याने वेगळा काहीही वर माग.’’ तेव्हा भस्मासूर ‘मी ज्या कुणाच्याही डोक्यावर माझी तर्जनी ठेवीन, तो भस्मसात व्हावा’, असा वर मागतो. शिव त्याला ‘तथास्तु’ म्हणतो.
१ अ. शिवाकडून मिळालेल्या वरामुळे उन्मत्त झालेला भस्मासुर शिवालाच भस्मसात करण्यास उद्युक्त होणे, तेव्हा श्रीमहाविष्णूने सुदर्शनचक्राच्या साहाय्याने गुहा निर्माण करणे, शिव, पार्वती आणि नंदी यांच्यासहित सर्व देवता अन् सप्तर्षी या गुहेत जाणे आणि कामधेनूने त्या गुहेचे रक्षण करणे
शिवाकडून मिळालेल्या वरामुळे उन्मत्त झालेला भस्मासुर शिवालाच भस्म करायला जातो. तेव्हा शिव महाविष्णूकडे जातो. त्या वेळी महाविष्णु शिवाला सांगतो, ‘‘तुम्ही पार्वती आणि नंदी यांना घेऊन कैलास सोडावा.’ हिमालयातील एका सुरक्षित पर्वतावर श्रीविष्णूच्या आज्ञेने कामधेनू गाय वाट काढते आणि तेथे श्री महाविष्णूचे सुदर्शनचक्र गुहेची निर्मिती करते. या गुहेत शिव, पार्वती आणि नंदी यांच्यासहित सर्व देवता अन् सप्तर्षी जातात. नंतर कामधेनू त्या गुहेचे प्रवेशद्वार बंद करते आणि आपल्या परिवारासहित गुहेचे रक्षण करते. तीच ही ‘शिवखोरी’ गुहा होय.
१ आ. भस्मासुराला नष्ट करणारे श्रीमहाविष्णूचे मोहिनी रूप !
इकडे श्रीमहाविष्णु समुद्रमंथनाच्या वेळी धारण केलेले मोहिनी रूप घेऊन भस्मासुराच्या समोर येतो. भस्मासुर मोहिनीकडे बघून सर्वकाही विसरतो आणि तिच्या सौंदर्याकडे आकर्षित होतो. भस्मासुर मोहिनीला लग्न करण्याविषयी विचारतो. तेव्हा मोहिनी म्हणते, ‘‘माझ्याकडून तू नृत्य शिकू शकलास, तरच मी तुझ्याशी विवाह करीन.’’ भस्मासुर लगेच ‘हो’ म्हणतो. मोहिनी भस्मासुराला नृत्य शिकवू लागते. मोहिनी जे काही नृत्य शिकवत असे, ते सर्व भस्मासुर तंतोतंत करून दाखवू लागतो. असे काही दिवस जातात. भस्मासुर मोहिनीच्या मोहमायेत संपूर्णपणे फसलेला असतो. तो क्षण साधून मोहिनी त्याला नृत्याच्या अंतर्गत स्वतःच्या डोक्यावर तर्जनी ठेवायची मुद्रा शिकवते. भस्मासुर तशी मुद्रा करतो आणि तत्क्षणी भस्म होतो !
त्यानंतर शिव-पार्वती आणि नंदी परत कैलास पर्वतावर जातात. शिव ज्या दिवशी कैलास सोडून ‘शिवखोरी’च्या गुहेत येतात, तो दिवस म्हणजे ‘वैशाख पौर्णिमा’ होय. असे या दिवसाचे महत्त्व आहे. अनेक भक्त वैशाख पौर्णिमेला ‘शिवखोरी’ची यात्रा करतात.
२. महर्षि मयन यांनी ‘शिवखोरी’ गुहेचे सांगितलेले रहस्य !
आम्ही सद्गुरु गाडगीळकाकू यांच्या समवेत ‘शिवखोरी’ गुहेच्या बाहेर पोचल्यावर महर्षि मयन यांनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सांगितले, ‘‘भगवान शिव पृथ्वीवर अवतरले, ती ५ स्थाने आहेत – १. कैलास पर्वत (तिबेट, चीन), २. पशुपतीनाथ (नेपाळ), ३. केदारनाथ (उत्तराखंड), ४. अमरनाथ (काश्मीर) आणि ५. शिवखोरी (जम्मू).’’
भगवान शिवाच्या पृथ्वीवरील ५ स्थानांपैकी हे एक स्थान आहे. शिव कैलास सोडून कधीच कुठेही जात नाही. या वेळी कैलास सोडून शिवाला पार्वती आणि नंदी यांच्यासह एका गुहेत जावे लागले. ती गुहा म्हणजे शिवखोरीची गुहा होय. हे सहस्रो वर्षांपूर्वी घडले असावे. ज्याप्रमाणे श्रीमहाविष्णूच्या ‘सत्यनारायण’ या रूपामध्ये ३३ कोटी देवता आणि सर्व ऋषिमुनी सामावलेले आहेत, त्याचप्रमाणे ‘शिवखोरी’ गुहेमध्ये शिव-पार्वती, लक्ष्मी-नारायण, ब्रह्मा-सरस्वती, ३३ कोटी देवता अन् सर्व ऋषिमुनी सामावलेले आहेत.