कोरोनाचे निमित्त करून काही नास्तिकतावाद्यांनी हिंदु धर्मावर द्वेषमूलक टीका करणारा संदेश सामाजिक प्रसारमाध्यमांतून प्रसारित केला आहे. या संदेशाला हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे केलेला रोखठोक प्रतिवाद येथे देत आहोत, जेणेकरून प्रत्येक हिंदूंना नास्तिकतावाद्यांच्या अशा द्वेषमूलक टीकेचा वैचारिक प्रतिवाद करणे शक्य होईल.
नास्तिकतावाद्यांनी पसरवलेला द्वेषमूलक संदेश !
‘कसं काय…? कोरोनाला माणूस घाबरला बघा…’
१. ऊठसूठ मंदिर, मशीद, चर्च यांमध्ये जाणारा श्रद्धेच्या नावाखाली; पण आतून मात्र भित्रा असणारा माणूस आज कसा काय हतबल झाला ?
२. ३३ कोटी देव पाठीशी असूनही शिर्डी, तिरुपती, वाराणसी सुनसान झाले.
३. एवढ्या मोठ्या सैतानाला संपवणार्या प्रेषितांचे मक्का-मदिना रिकामी झाले.
४. अवतारी येसुबाबा, रानबाबा, मरीआई असूनही देवळे रिकामी झाली.
५. कदाचित् नाही विश्वास दगडाच्या देवावर; म्हणून हा माणूस जातोय विज्ञानाच्या इस्पितळात आणि आश्वस्त होतोय डॉक्टरांना पाहून.
६. काय कामाचे पंडित-पुजारी ? कुठे गेले होमहवनवाले ?, कुठे गेले सत्यनारायणवाले ?, काय कामाचे मुल्ला-मौलवी आणि पाद्री ?
७. निसर्ग जेव्हा मानव-निर्मित ढोंग सहन करू शकत नाही, तेव्हा तो कोरोनासारखा सूक्ष्म-जीव देऊन आपल्याला जमिनीवर आणतो आणि मग सर्वांनाच आठवण येते ती डॉक्टरांची, विज्ञानाची, वैद्यकीय शास्त्राची…!’
श्री. रमेश शिंदे यांनी केलेला रोखठोक प्रतिवाद !
‘कोरोनामुळे मंदिर बंद ठेवण्यास सांगितल्याने नास्तिकतावाद्यांचे फावले आहे. त्यांनी लगेच धर्म बेकार असल्याचे, तसेच विज्ञानाच्या महतीचे संदेश पाठवणे चालू केले आहे; मात्र त्यांनी यामागील खरे कारण समजून घेतले आहे का ?
१. आज वैद्यकीय शास्त्राकडे तरी कोरोनाच्या समस्येवर काय उत्तर आहे ? काहीच नाही. औषधच उपलब्ध नाही; म्हणून १० सहस्रांहून अधिक जणांचे बळी गेले आहेत. त्यास विज्ञानाचे अपयश कारणीभूत आहे ना !
२. कोरोनाविषयी आज जी काही काळजी घेण्यास सांगितली जात आहे, ती हिंदु धर्म अगोदरपासूनच सांगत होता; मात्र तेव्हा पाश्चात्त्य पद्धतीने वागणे म्हणजे ‘आधुनिकपणा’ असे सांगितले जात होते.
३. कोरोनाची निर्मिती कुणी केली ? धर्माने तर निश्चितच नाही. तुमच्या विज्ञानाच्या अतिरेकी वापराच्या विचारांतून कोरोना तयार झाल्याचे सुस्पष्ट आहे.
४. कोरोनामुळे केवळ मंदिरे बंद झाली आहेत का ?, तर नाही ! विमाने, रेल्वे, पर्यटनस्थळे, मॉल, शाळा, सरकारी कार्यालये आदी विज्ञानाने शोध लावलेले सर्व प्रकारही बंद आहेत. मग त्याचा दोष कुणाला ? देवाला ?
५. तशीही मंदिरेसुद्धा देवाने नव्हे, तर सरकारने बंद ठेवण्यास सांगितली आहेत. कुठेही लोकांनी घाबरून मंदिरात जाणे बंद केले होते का ?, तर नाही !
६. भौतिक प्रगती केलेल्या जगाला ‘हिंदु धर्मानुसार आचरण केल्याने संसर्ग होत नाही’, याची उपरती झाली आहे. ज्यांनी भारतावर १५० वर्षे राज्य करून हिंदु संस्कृती नष्ट करायचा प्रयत्न केला, अशा इंग्रजांच्या प्रिन्स चार्ल्सनेही ‘नमस्कार’ करण्यास आरंभ केला. मग धर्मच श्रेष्ठच ठरला ना !
७. भौतिक प्रगतीची शिखरे गाठलेले देश अद्याप कोरोनावर लस किंवा औषध शोधू शकलेले नाहीत; मात्र धर्मशास्त्रांपैकीच एक असलेली ‘चरक संहिता’ समाजाला सहस्रो वर्षे आधीच अशा संसर्गजन्य रोगांवरील उपचार सांगून ठेवते, जे आजही लागू पडतात. मग विज्ञान श्रेष्ठ कि धर्म ?
८. जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आणि विज्ञानात प्रगत असलेल्या चीनमध्ये लाखो लोकांना कोरोनाचा संसर्ग होतो, तर दुसरी सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या अन् चीनपेक्षा भौतिक प्रगतीमध्ये कोसो दूर असलेल्या भारतात मात्र अद्याप २०० हून अधिक लोकांपर्यंतच कोरोनाचा संसर्ग मर्यादित रहातो, ते विज्ञानामुळे कि येथे होत असलेल्या धर्माचरणामुळे, आध्यात्मिकतेमुळे, संतांच्या सात्त्विक भूमीमुळे, अग्निहोत्र आणि यज्ञयागादी कर्मकांडांमुळे ?’