भारतीय संस्कृतीचे केले कौतुक
यावरून पुन्हा एकदा हिंदु संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित होते. हिंदु संस्कृती प्राचीन आणि महान असून तिच्या आचरणानेही संसर्गजन्य आजार टाळता येतात. ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे का असेना, देश-विदेशांतील अनेकांना आता हिंदु संस्कृतीची कास धरावी लागत आहे !
वॉशिंग्टन – सध्या जगभरात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्वसामान्यांसह विविध देशांचे सर्वोच्च नेतेही काळजी घेत आहेत आणि त्यांच्याकडून भारतीय संस्कृतीचा अंगीकार करत असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मूळ भारतीय वंशाचे असणारे आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांच्याशी व्हाईट हाऊसमध्ये भेट झाली. या भेटीचा वेळी ट्रम्प यांनी वराडकर यांचे दोन्हीही हात जोडून ‘नमस्ते’ करत स्वागत केले.
पत्रकारांनी डोनाल्ड ट्रम्प आणि लिओ वराडकर यांनी ‘तुम्ही एकमेकांना अभिवादन कसे केले ?’, असे विचारले. त्यावर त्या दोघांनीही हात जोडून ‘नमस्ते’ करून दाखवले आणि ‘आम्ही हस्तांदोलन केले नाही’, असे सांगितले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतीय संस्कृतीचे कौतुक
डोनाल्ड ट्रम्प यांनी या वेळी भारतीय संस्कृतीचे कौतुक करतांना म्हटले, ‘‘मी नुकताच भारत दौर्यावरून परतलो आहे. मी तिथे हस्तांदोलन केले नाही, तर हात जोडले; कारण ती त्यांची संस्कृती आहे. या वेळी ट्रम्प यांनी जपानी संस्कृतीचेही कौतुक केले. त्यानंतर ते म्हणाले की, भारत आणि जपान येथील संस्कृती काळाच्या पुढे आहेत. (जे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना कळते, ते पाश्चात्त्यांचे गोडवे गाणार्या भारतातील पुरो(अधो)गाम्यांना कधी कळणार ? – संपादक)