‘होळीच्या दिवशी गुलालाने पुष्कळ प्रमाणात खेळल्यानंतर त्वचेला लागलेला रंग घालवणे अवघड होते. रंग काढल्यानंतर त्वचा खरखरीत आणि कोरडी होते, तसेच शरिराच्या उघड्या भागाची आग होऊ लागते. अशा वेळी त्वचेला हानी होऊ न देता रंग काढून टाकण्यासाठी काही सोप्या उपायांची माहिती आपल्याला अवश्य उपयोगी पडेल.
१. बेसन किंवा गव्हाचे पीठ यामध्ये लिंबाचा थोडा रस मिसळून मिश्रण तयार करा. ते मिश्रण शरिराला लावून हळूहळू रंग काढून टाका. आपल्याला वाटले, तर बेसन किंवा गव्हाचे पीठ यामध्ये खोबरेल तेल किंवा दही घालूनही त्वचा स्वच्छ करू शकतो.
२. दुधामध्ये थोडी कच्ची पपई वाटावी. त्यात मुलतानी माती आणि बदामाचे तेल घाला. हे मिश्रण चेहर्याला लावून अर्ध्या घंट्यानंतर चेहरा धुवावा.
३. केसांमधील रंग काढण्यासाठी केस चांगल्या प्रकारे झटका. त्यामुळे केसांतील कोरडा रंग निघून जाईल. त्यानंतर केस साध्या पाण्याने धुवा.
४. बेसन, दही किंवा आवळ्याच्या चूर्णानेही डोके धुऊ शकतो. आवळ्याचे चूर्ण एक रात्र पाण्यामध्ये भिजवून ठेवा. त्यानंतर ते लावून केस चांगल्या प्रकारे धुवा. त्यानंतर एक मग पाण्यामध्ये एक मोठा चमचा व्हिनेगर घालून केस धुवा.
५. बेसनमध्ये लिंबू आणि दूध मिसळून आपल्या त्वचेवर लावा. २० मिनिटे ते तसेच राहू द्या. नंतर पाण्याने तोंड आणि हात धुवा.
६. मसुरीची डाळ रात्रभर भिजवून सकाळी ती बारीक वाटून दुधामध्ये मिसळा. हे मिश्रण थोडा वेळ त्वचेला लावून ठेवा. नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका.
७. काकडीचा रस काढून त्यामध्ये थोडे गुलाबपाणी आणि एक चमचा व्हिनेगर मिसळा. हे मिश्रण तोंडाला लावा. काही वेळानंतर पाण्याने तोंड स्वच्छ धुवा.
८. केळे बारीक कुस्करून त्यामध्ये लिंबाचा रस घाला. काही वेळ हा लेप त्वचेवर चोळावा. तो सुकल्यानंतर पाण्याचे हबके मारून त्वचा स्वच्छ करा.
९. मुळ्याचा रस काढून त्यामध्ये दूध आणि बेसन किंवा मैदा मिसळून लेप तयार करा आणि तो तोंडवळ्यावर लावा.
१०. गव्हाचे पीठ आणि बदामाचे तेल एकजीव करा. हे मिश्रण त्वचेला लावून रंग साफ करा.’