महाशिवरात्रीच्या मंगलदिनी ‘रिद्धी-सिद्धीसहित श्री सिद्धीविनायका’चा सनातनच्या आश्रमातील आगमनाचा चैतन्यमय सोहळा !

हातांत फलक आणि भगवे ध्वज धरून रिद्धी-सिद्धीसहित श्री सिद्धीविनायकाच्या मिरवणुकीत सहभागी झालेले साधक अन् साधिका

रामनाथी (गोवा) – विघ्नहर्ता, बुद्धीदाता श्री गणपति ही कोणत्याही उपासकाची प्रथम देवता आहे. नादभाषेचे प्रकाशभाषेत रूपांतर करून भक्ताचा भाव देवतांपर्यंत पोचवणार्‍या श्री गणेशाची उपासना भारतासह देश-विदेशांत केली जाते. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्नरत असणार्‍या सनातन संस्थेच्या साधकांची ‘पृथ्वीवर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, ही प्रार्थना पूर्ण करण्यासाठी अनेक देवी-देवता रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात येऊन शुभाशीर्वाद देत आहेत. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील सर्व अडथळे दूर करण्यासाठी आता विघ्नहर्त्या श्री सिद्धीविनायकाचे रिद्धी-सिद्धीसहित रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन झाले. सप्तर्षींनी पू. (डॉ.) ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून केलेल्या मार्गदर्शनानुसार सनातनच्या रामनाथी आश्रमात महाशिवरात्रीच्या म्हणजे २१.२.२०२० या दिवशी रिद्धी-सिद्धीसहित श्री सिद्धीविनायकाचे मिरवणुकीद्वारे शुभागमन झाले.

 

रिद्धी-सिद्धीसहित श्री सिद्धीविनायकाच्या मूर्तीची वैशिष्ट्ये

रिद्धी-सिद्धीसहित श्री सिद्धीविनायकाच्या मूर्तीचे वजन ५०० किलो असून ‘कृष्णाशिळा’ दगडापासून ती बनवण्यात आली आहे. सप्तर्षींनी केलेल्या मार्गदर्शनानुसार ही मूर्ती घडवण्यात आली आहे.

 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी रिद्धी-सिद्धीसहित श्री सिद्धीविनायक मूर्तीचे सांगितलेले वैशिष्ट्य

‘अन्य मूर्तींकडे एखाद्या विशिष्ट दिशेने बघितल्यावर भावजागृती होते. याउलट रिद्धी-सिद्धीसहित श्री सिद्धीविनायकाच्या मूर्तीला कुठूनही बघितले, तरी भावजागृती होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

रिद्धी-सिद्धीसहित श्री सिद्धीविनायकाच्या चरणी भावपूर्ण वंदन करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले

 

रिद्धी-सिद्धीसहित श्री सिद्धीविनायकाच्या मूर्तीचे शिल्पकार

श्री. विवेकानंद (नंदा) आचारी

कर्नाटक राज्यातील कारवारजवळ असलेल्या शिरवाड (जि. उत्तर कन्नड) येथील शिल्पकार श्री. विवेकानंद (नंदा) आचारी उपाख्य गुरुजी (वय ८० वर्षे) यांनी ७०० किलो वजनाच्या एका पाषाणातून रिद्धी-सिद्धीसहित श्री सिद्धीविनायकाची मूर्ती कोरली आहे. गुरुजी अत्यंत अनासक्त असून ते देहभान विसरून मूर्ती घडवण्याची सेवा करतात. त्यांनी आजपावतो देवी-देवतांच्या १ सहस्रहून अधिक मूर्ती घडवल्या आहेत. गुरुजी श्री गणेशाचे उपासक आहेत. त्यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ भाव आणि श्रद्धा आहे. त्यांना एखाद्या पाषाणाला हात लावल्यावर त्यातून कोणती मूर्ती घडवू शकतो, हे जाणण्याचे आध्यात्मिक सामर्थ्य प्राप्त आहे. त्यांच्या गुरूंनी त्यांना तसा आशीर्वादच दिला आहे की, ‘तू ज्या दगडाला हात लावशील, त्या दगडापासून तुला जी मूर्ती घडवायची आहे, ती घडेल.’ मूर्ती घडवण्यामध्ये गुरुजींचे सुपुत्र श्री. गजानन आचारी यांचेही मोलाचे साहाय्य लाभले आहे.

एखाद्या मूर्तीकाराला एवढी मोठी मूर्ती घडवण्यास साधारण १ वर्षाचा कालावधी लागतो. गुरुजींनी अथक परिश्रम घेऊन ही मूर्ती अवघ्या १५ दिवसांत घडवली. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे मूर्ती घडवत असतांना त्यांना श्री गणपतीने अनेक वेळा स्वप्नामध्ये दर्शन देऊन मूर्तीतील पालट सांगितले. तशाच प्रकारचे पालट करण्याचे निरोप दुसर्‍या दिवशी सनातनच्या एका संतांकडून गुरूंजींना मिळत असत.

गुरुजींसंदर्भातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना ‘रिद्धी-सिद्धीसहित श्री सिद्धीविनायक मूर्ती हे माझे दायित्व आहे’, असे वाटून त्यांनी सनातनच्या आश्रमात स्वत: येऊन ती साधकांकडे सोपवली. (सामान्यतः ‘मूर्तीकार मूर्ती बनवल्याच्या स्थळीच ती गिर्‍हाईकाकडे सोपवतात’, असा प्रघात आहे.) त्यांनी अथक परिश्रम घेऊन ही सुंदर मूर्ती घडवली असून ती सनातन संस्थेला अर्पण केली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment