सनातन संस्थेच्या आश्रमात परिपूर्ण धर्मशिक्षण दिले जाते ! – कुंभकोणम् (तमिळनाडू) येथील पुरोहित श्री. प्रवीण शर्मा

कुंभकोणम् (तमिळनाडू) येथील पुरोहित श्री. प्रवीण शर्मा यांचे सनातनच्या आश्रमाविषयी गौरवोद्गार

१. श्री. प्रवीण शर्मा आणि अन्य पुरोहित यांना ध्यानमंदिराविषयी माहिती सांगतांना सनातन संस्थेच्या साधिका सौ. सौम्या कुदरवळ्ळी

रामनाथी (गोवा) – कोणतेही कार्य करायचे झाल्यास त्याविषयीचे शास्त्र ठाऊक असणे आवश्यक आहे. ते शास्त्र आश्रमात शिकवले जाते. सनातनच्या आश्रमात परिपूर्ण धर्मशिक्षण दिले जाते. प्रत्येक कृती परिपूर्ण कशी करायची ?, ते येथे येऊन शिकण्यासारखे आहे, असे गौरवोद्गार कुंभकोणम् (तमिळनाडू) येथील पुरोहित श्री. प्रवीण शर्मा यांनी काढले. श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीच्या आज्ञेने येथील सनातनच्या आश्रमात २४ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत लोककल्याणार्थ आणि हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला आशीर्वाद मिळावेत, यासाठी शतचंडी यागाचे आयोजन करण्यात आले आहे. या यागाचे मुख्य पौरोहित्य कुंभकोणम् (तमिळनाडू) येथील श्री. प्रवीण शर्मा हे करत आहेत. २५ फेब्रुवारी या दिवशी श्री. प्रवीण शर्मा यांनी सनातनच्या आश्रमात चालणारे विविध राष्ट्र-धर्मविषयक कार्य सनातन संस्थेच्या साधिका सौ. सौम्या कुदरवळ्ळी यांच्याकडून जाणून घेतले.

या प्रसंगी श्री. प्रवीण शर्मा यांच्यासह कर्नाटक आणि तमिळनाडू येथून आलेल्या अन्य पुरोहितांनीही आश्रमात चालणारे कार्य उत्साहाने जाणून घेतले. श्री. शर्मा यांच्यासमवेत सर्वश्री चेतन, कृष्णा एस्. भट, सतीश, योगेश, कार्तिकेय, सतीश शर्मा, योगेश शास्त्री, धीरज जे., कार्तिक डी. भट, चेतन शर्मा, कार्तिक शास्त्री, सुब्रह्मण्य भट, कृष्णा भट आणि राघवेंद्र हे पुरोहित शतचंडी यागामध्ये सहभागी झाले आहेत.

 

श्री. प्रवीण शर्मा यांनी सनातनच्या आश्रमाविषयी काढलेले गौरवोद्गार !

आम्ही आश्रमात राहिल्याने आम्हाला सत्संगात राहिल्यासारखेच वाटत आहे. ‘मनुष्याचा जन्म का झाला ?’, हे येथे (आश्रमात) राहिल्याने कळते. आश्रमात पुष्कळ सकारात्मक ऊर्जा जाणवते. आश्रमातील साधकांमध्ये पुष्कळ विनम्रता असून सर्वजण आनंदी असतात. महत्त्वाचे म्हणजे आश्रमातील वातावरण शब्दांत व्यक्त न करण्यासारखेच आहे.

 

श्री. प्रवीण शर्मा यांचा परिचय

श्री. प्रवीण शर्मा हे कुंभकोणम् (तमिळनाडू) येथील आहेत. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी श्री विद्या दीक्षा घेतली. त्यांनी काही काळ कांची कामकोटी पिठामध्ये शिक्षण घेतले आहे. ते स्वतः कृष्णभक्त आहेत. त्यांच्या घरी श्री विठ्ठल-रुक्मिणी यांची मूर्ती असून ते प्रतिवर्षी त्यांचा उत्सव विधीवत् पद्धतीने साजरा करतात. गेली १० वर्षे ते यज्ञयाग आदी विधींचे पौरोहित्य करत आहेत. आतापर्यंत श्री. शर्मा यांनी १०० शतचंडी याग आणि १० हून अधिक सहस्रचंडी याग केले आहेत.

चंडीयागाविषयी बोलतांना त्यांनी सांगितले की, चंडीदेवीमध्ये सत्त्व, रज आणि तम हे त्रिगुण आहेत, तसेच भक्त चंडीदेवीमध्ये श्री कालीमाता, श्री सरस्वतीमाता आणि श्री लक्ष्मीमाता या तिन्ही देवींची रूपे बघू शकतो. चंडीदेवीची उपासना केल्याने स्वतःचे रक्षण होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment