सरोदवादन हे ईश्‍वरप्राप्तीसाठी असून वादन करतांना ‘मी ध्यान करत आहे’, असा भाव ठेवणारे मुंबईतील प्रसिद्ध सरोदवादक श्री. प्रदीप बारोट !

ईश्वरप्राप्तीसाठी संगीतयोग

 

१. श्री. प्रदीप बारोट यांचा परिचय

सरोदवादन करताना श्री. प्रदीप बारोट
डावीकडून कु. तेजल पात्रीकर, श्री. प्रदीप बारोट आणि श्री. गिरिजय प्रभुदेसाई

१ अ. संगीताचा लाभलेला वारसा आणि श्री. वसंत राय अन् माँ अन्नपूर्णादेवी यांच्याकडे घेतलेले सरोद वादनाचे धडे !

श्री. प्रदीप बारोट यांच्या घराण्यातच संगीत आहे. त्यांचे आजोबा पं. रोडजी बारोट हे प्रसिद्ध सारंगीवादक आणि रतलाम राजघराण्याचे मान्यवर संगीतकार होते. वडील श्री. मोहनलाल बारोट हे गायनासमवेत, सारंगी, बासरी, ‘क्लॅरोनेट’, ‘सॅक्सोफोन’ इत्यादी वाद्ये वाजवत असत. घरात संगीताचेच वातावरण असल्यामुळेे लहानपणापासूनच श्री. प्रदीप यांच्या कानावर संगीत पडत होतेे. वडिलांनी श्री. प्रदीप यांना ‘सरोदवादन शिकवायचे’, असेे ठरवले होते. त्याप्रमाणे श्री. प्रदीप आरंभीची काही वर्षे श्री. वसंत राय यांच्याकडे शिकण्यासाठी जात होते. त्यानंतर मैहर घराण्याचे प्रवर्तक बाबा अल्लाउद्दीन खाँ यांच्या कन्या पद्मभूषण माँ अन्नपूर्णादेवी यांच्याकडे त्यांनी सरोदचे पुढील शिक्षण घेतले. आजपर्यंत देश-विदेशांत त्यांचे सरोदवादनाचे अनेक कार्यक्रम झालेे आहेत आणि अजूनही होत आहेत.

१ आ. ‘सूर’ हे ईश्‍वराला प्राप्त करण्याचे सोपे माध्यम आहे’, असे बाळकडू
मिळालेल्या श्री. प्रदीप बारोट यांनी सरोदवादन करतांना ‘मी ध्यान करत आहे’, असा भाव ठेवणे

श्री. बारोट यांच्या घरी आध्यात्मिक वातावरण आहे. ‘अध्यात्म आणि संगीत हे एकमेकांना पूरक असून संगीताचा साधनेला लाभच होतो. ‘सूर’ हे ईश्‍वराला प्राप्त करण्याचे सोपे माध्यम आहे. ‘मी ईश्‍वरासाठी वाजवत आहे’, असा उद्देेश असेल, तरच त्यातून ईश्‍वरप्राप्ती होऊ शकते’, हे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले आहे. ते म्हणाले, ‘‘वाद्यांमध्ये सूर पकडण्यासाठी फार जागृत रहावे लागते. सरोदवादन करतांना बुद्धी आणि मन एकाग्र झाले, तरच आपण हाताने चांगल्या प्रकारे सरोद वाजवू शकतो.’’ ते अजूनही प्रतिदिन ४ – ५ घंटे सराव करतात. सरोदवादन करतांना ‘मी ध्यान करत आहे’, असा भाव ते ठेवतात.

 

२. माँ अन्नपूर्णादेवी यांच्याकडे सरोद वादनाचे शिक्षण

२ अ. पहिले गुरु श्री. वसंत राय अमेरिकेला जाणार असल्याने त्यांनी
पुढील शिक्षणासाठी श्री. प्रदीप बारोट यांना माँ अन्नपूर्णादेवी यांच्याकडे पाठवणे

आरंभी सरोद शिकण्यासाठी श्री. प्रदीप बारोट श्री. वसंत राय यांच्याकडे जायचे. श्री. वसंत राय ४ – ५ वर्षांनी अमेरिकेला जाणार होते. त्यांनी माँ अन्नपूर्णांदेवींना सांगितले, ‘‘हा मुलगा संगीतात चांगली प्रगती करू शकतो. त्याचे घराणे संगीताचे असून तो प्रामाणिक आहे. मी त्याला जे शिकवतो, ते तो चांगले वाजवतो. तुम्ही त्याला शिकवले, तर आणखी चांगले होईल.’’ त्यानंतर माँनी श्री. प्रदीप यांना सरोद घेऊन बोलावले. तेव्हा श्री. प्रदीप यांच्याकडे छोटे सरोद होते. माँनी त्यांना ‘तुला सरोदवर काय वाजवता येते, ते मला वाजवून दाखव’, असे सांगितले. त्या वेळी गुरुजींनी शिकवलेले ‘छोटे गत’ इत्यादी त्यांनी वाजवून दाखवले. तेव्हा माँ म्हणाल्या, ‘‘मी जसे सांगते, तसे कर आणि प्रत्येक मासात मी बोलवीन, तेव्हा ये.’’ अशा प्रकारे श्री. प्रदीप यांचा माँ अन्नपूर्णादेवी यांच्याकडे सरोद शिकण्यास आरंभ झाला.

२ आ. माँ अन्नपूर्णादेवी यांची शिस्तबद्ध संगीत शिकवण

आरंभी माँ अन्नपूर्णादेवी यांच्याकडे ते १५ दिवसांतून एकदा आणि नंतर प्रती मास एकदा जात होते. माँकडे शिकणारे विद्यार्थी अधिक नव्हते; कारण इतर संगीत शिक्षकांप्रमाणे ‘संगीत शिकून त्याचे सादरीकरण करणे’, यासाठी त्यांचे शिकवणे नव्हते. माँचे शिकवणे एकदम शिस्तबद्ध होते. त्या शिकवतांना आरंभी आलाप, जोड इत्यादी शिकवत आणि मग पुढचे पुढचे शिकवत असत. त्यांची शैली धृपदीय होती. वाद्याची गतकारी त्या धृपद पद्धतीने शिकवायच्या. शिकवतांना त्या एका वेळी एकाच विद्यार्थ्याला शिकवायच्या. एका शिष्यासाठी त्या ३ घंटे वेळ द्यायच्या.

(आलाप : रागाचा संथ गतीने केलेला स्वरविस्तार.
जोड : वाद्यावर एकच स्वरसमुदाय अन्य स्वरांसमवेत परत परत वाजवला जाणे, त्या क्रियेस ‘जोड’ म्हणतात.
धृपद : पूर्वापार चालत आलेला एक गायन प्रकार
गत (गतकारी) : स्वर वाद्यांवर वाजवली जाणारी विशिष्ट रागातील तालबद्ध स्वररचना.)

२ इ. आई-वडिलांनी लग्न ठरवल्यावर श्री. प्रदीप बारोट अस्वस्थ होणे, माँ अन्नपूर्णादेवींच्या
ते लक्षात येणे आणि लग्न ठरल्याचे कळल्यावर त्यांना धक्का बसून त्यांनी ‘तुला शिकवणार नाही’, असे सांगणे

माँकडे सरोद शिकत असतांनाचा एक प्रसंग श्री. प्रदीप यांनी सांगितला. ‘एकदा माँनी मला विचारले, ‘‘तू अस्वस्थ का आहेस ?’’ माँना समोरच्या व्यक्तीच्या मनाची स्थिती समजायची. त्यांना ती दैवी शक्तीच प्राप्त होती. मी त्यांना सांगितले, ‘‘माझ्या आई-वडिलांनी माझे लग्न ठरवले आहे.’’ हे ऐकून त्यांना धक्काच बसला. त्या मला शिकवता शिकवता थांबल्या आणि म्हणाल्या, ‘‘तू मला हे का सांगितले नाहीस ? तू मला माझ्या मुलासारखा आहेस. आता लग्न झाल्यावर तुझे दायित्व वाढणार. त्यामुळे मी तुला शिकवणार नाही. मी ‘यापुढेही कधी शिकवू शकीन कि नाही ?’, हे नंतर सांगेन.’’ त्या वेळी मी फार दुःखी झालो. त्यांनी मला शिकवणे सोडले. माझ्या आई-वडिलांनी त्यांना सांगितले, ‘‘हे लग्न आम्ही ठरवले आहे. त्याची काहीच चूक नाही.’’ तरीही त्या मला शिकवायला सिद्ध नव्हत्या. अशी सात वर्षे गेली. त्या मधल्या काळात मी काही ना काही निमित्त करून त्यांच्याकडे जायचो.

२ ई. सरोद वादनाचे पुढील शिक्षण देण्यास कुणीही सिद्ध न होणे

१. उदयपूरचे झियामुद्दीन डागरसाहेब वीणा वाजवत असत. त्यांच्याशी माझे चांगले संबंध होते. त्यांना मी आवडायचो. मी त्यांना विचारले, ‘‘माँनी मला शिकवायला ‘नाही’ म्हटले आहे. तुम्ही मला शिकवाल का ?’’ तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘तू इकडेतिकडे भटकू नकोस. माताजी तुला पुन्हा शिकवतील !’’

२. मी एका अन्य सरोद वादिकेलाही मला शिकवण्याविषयी विचारणा केली. त्या रागावून म्हणाल्या, ‘‘एकदा ‘नाही’ सांगितले ना ?’’ त्या वेळी माँच्या एका शिष्याने हे सर्व पाहिले आणि माँना जाऊन सांगितले.

२ उ. नोकरी लागल्याचे सांगण्याच्या निमित्ताने माँकडे जाणे,
तेथे गेल्यावर डोळे भरून येऊन ‘तेथून परत जाऊ नये’, असे वाटणे, तेव्हा
माँनी ‘कधीपासून शिकायला यायचे ?’, ते कळवीन’, असे सांगून पुढील शिक्षण चालू करणे

‘मला आकाशवाणीत नोकरी लागली’, हेे सांगण्याच्या निमित्ताने मी माँकडे गेलो. तेव्हा माझे डोळे भरून आले. तेथून परत यायला माझे मन सिद्ध होत नव्हते. तेव्हा माँच्या यजमानांनी माँना समजावले.

माँ बाहेर आल्या आणि मला म्हणाल्या, ‘‘असे बायकांप्रमाणे रडतोस कशाला ? ‘कधीपासून शिकायला यायचे ?’ ते मी तुला कळवते.’’ अशा प्रकारे माझे माँकडे पुन्हा शिकणे चालू झाले. त्या मला म्हणाल्या, ‘‘मी तुला घडवण्याचा जो विचार केला होता, तसे आता तुझ्याकडून होणार नाही; पण या कलेतून तुझी संसाराची गाडी चालू राहील.’’ पुढे त्यांनी मला ‘विद्यार्थ्यांना कसे शिकवायचे ?’ हेही शिकवले.

 

३. माँ अन्नपूर्णादेवी यांच्याकडून मिळालेली
संगीत साधनेची शिकवण आणि त्याप्रमाणे होत असलेले आचरण

अ. माँ म्हणत, ‘तुम्ही स्वतःच्या आवश्यकता न्यून केल्या, तर तुम्हाला कधीच कुठलाही त्रास होणार नाही.’ त्यानुसार वागल्यामुळे मला कधी कुठल्याही गोष्टीचा त्रास झाला नाही. मी समाधानी आहे.

आ. ‘श्री गुरूंच्या कृपेने तुम्हाला दैनंदिन आवश्यकता भागवण्याएवढे निश्‍चित मिळेल; पण पैशाच्या मागे धावू नका. संगीताचा उपयोग व्यवसाय किंवा प्रसिद्धी यांसाठी केला, तर तुम्ही संगीताची पूजा करू शकणार नाही.’ गुरु माँची ही शिकवण असल्यामुळे मी प्रसिद्धीकडे कधी गेलो नाही.

इ. माँनी आम्हाला केवळ संगीत शिकवले नाही, तर ‘जीवनाकडे कसे पहायचे ?’ ‘आपले आचार-विचार कसे असायला हवेत ?’ ‘आयुष्य कसे जगायचे ?’ हेही शिकवले.

ई. त्यांनी विनाप्रसिद्धी इतरांना कितीतरी गोष्टींत साहाय्य केले आहे.

उ. ‘अपात्राला शिकवायचे नाही, भलेही तो स्वतःचा मुलगा का असेना; मात्र पात्र असेल, तर त्याला जरूर शिकवायला हवे’, हेच माँचे तत्त्व मीही आचरतो.

 

४. एका कार्यक्रमात सरोदवादन करत असतांना एक कबूतर
सरोदवर येऊन बसणे, तेव्हा गुरु माँ कबूतरांना दाणे घालत असल्याचे
आठवून ‘सरोदवर कबूतर येऊन बसणे’, हा माँचा आशीर्वाद आहे’, असे जाणवणे

एकदा मुंबई विद्यापिठाच्या सभागृहामध्ये (‘ऑडिटोरियम’मध्ये) ‘हरिदास संगीत संमेलना’त मी सरोदवादन करत होतो. त्या वेळी माझ्या समवेत तानपुर्‍याच्या (तंबोरा) साथीला एक मुलगी होती. कार्यक्रम चालू झाल्यानंतर काही वेळाने व्यासपिठावर त्या मुलीजवळ एक कबूतर आले आणि माझे सरोदवादन चालू असतांना ते माझ्या सरोदवर चढले. मी माझे वाजवणे चालूच ठेवले. नंतर ते कबूतर तेथून प्रेक्षकांत गेले. प्रेक्षकांंनी त्याला पकडून बाहेर सोडले. तेव्हा मला आठवले, ‘गुरु माँ कबूतरांना ज्वारीचे दाणे द्यायच्या.’ तेव्हा या प्रसंगात मला ‘कबूतराच्या रूपाने गुरु माँचा आशीर्वाद मिळाला’, असे वाटले.

 

५. सद्य:स्थितीत संगीताकडे पहाण्याचा समाजाचा दृष्टीकोन

अ. अलीकडे संगीत शिक्षकांना मुलांचे आई-वडील विचारतात, ‘‘आमचा मुलगा मंचावर कार्यक्रम कधी करू शकेल ?’’

आ. बडोद्याचे एक वयस्कर गृहस्थ चांगले तबलावादक होते. ते मला त्यांच्यासमवेत मॉरीशसला घेऊन गेले होते. तेथे कार्यक्रमासाठी आलेल्या एका व्यक्तीने त्यांना विचारले, ‘‘मी किती दिवसांत तबला शिकू शकेन ?’’ त्यांनी त्या व्यक्तीला बोलावले. तिला तबल्यावर हात मारून दाखवला आणि म्हणाले, ‘‘शिकलास ना ? जा आता. एवढेच वाजवायचे असते.’’

कोणतीही साधना करायची असेल, तर त्यासाठी वेळ द्यावा लागतो. आपले मन मारून बसावे लागते. तेव्हाच ते साध्य होऊ शकते. हे सगळे अतिशय शांततेने करावे लागते.

 

६. सध्याच्या कलाकारांची दुःस्थिती

अलीकडे बहुतांश कलाकारांना खाण्या-पिण्याचे छंद असतात; परंतु मला याची कधी आवश्यकता वाटली नाही. चांगल्या चांगल्या कलाकारांना मी व्यसनांच्या आहारी जातांना पाहिले आहे. एक चांगले संवादिनी वादक होते. ते सकाळी उठून पहिल्यांदा दारु प्यायला जायचे. अलीकडे हे असले खाणे-पिणे हे सामाजिक प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते.

 

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या‘संगीत संशोधन
केंद्रा’ला भेट दिल्यावर श्री. प्रदीप बारोट यांनी व्यक्त केलेला अभिप्राय !

२२.१.२०२० या दिवशी गोव्यात एका कार्यक्रमानिमित्त श्री. प्रदीप बारोट आले होते. त्या वेळी त्यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या संशोधन केंद्राला भेट दिली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘आश्रमात आल्यावरच आनंद जाणवतो. येथे स्वरांच्या माध्यमातून ईश्‍वरप्राप्तीचा सरळ मार्ग शिकायला मिळाला. कु. तेजल पात्रीकर यांनी संगीताच्या संशोधनाचे कार्य आणि उद्देश मला सांगितला. ‘आजच्या काळात समाजासाठी हे संशोधन उपयुक्त आहे. आपली भारतीय संस्कृती वाचवण्याचा हाच सोपा मार्ग आहे’, असेही मला प्रकर्षाने जाणवले.’’ सूक्ष्म जगताचे प्रदर्शन पाहून ते म्हणाले, ‘‘साक्षात्काराचा अनुभव आला. सुंदर ! अन्य काही बोलण्यास शब्दच नाहीत.’’

– कु. तेजल पात्रीकर, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१३.२.२०२०)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment