हंगरहळ्ळी (कर्नाटक) येथील भक्तवत्सल श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीचे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आज होणार चैतन्यमय आगमन !

• सनातन संस्थेच्या इतिहासात पुन्हा एकदा नोंदवला जाणार अद्वितीय दैवी क्षण ! •

श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीच्या आगमनाप्रीत्यर्थ साधकांकडून भावपूर्ण सिद्धता !

कर्नाटकातील श्री विद्याचौडेश्‍वरीदेवी

रामनाथी (गोवा) – ‘जय दुर्गे दुर्गति परिहारिणी । शुम्भ विदारिणी माता भवानी ॥’, असे स्वरूप असलेली, साधक आणि भक्त यांना भरभरून आशीर्वाद देणारी, भक्तांच्या हाकेला धावून जाणारी श्री विद्याचौडेश्‍वरीदेवी आणि श्री मठाचे प.पू. श्री श्री श्री बालमंजुनाथ स्वामी यांचे आज (२६ फेब्रुवारीला) रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात चैतन्यमय आगमन होणार आहे.

प.पू. श्री श्री श्री बालमंजुनाथ स्वामी

श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीने प.पू. श्री श्री श्री बालमंजुनाथ स्वामी यांच्या माध्यमातून केलेल्या आज्ञेने येथील आश्रमात शतचंडी यागाला २४ फेब्रुवारी या दिवशीपासून भावपूर्ण आणि चैतन्यमय वातावरणात प्रारंभ झाला. हा याग २४ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत होत आहे. २४ ते २७ फेब्रुवारी या ४ दिवसांमध्ये ११ पुरोहितांद्वारे ‘सप्तशती पाठा’ची १०० पारायणे आणि नवार्ण मंत्राचा १० सहस्र संख्येने जप, तसेच देवीची पूजाअर्चा-आरती आदी विधीही करण्यात येत आहेत. २८ फेब्रुवारी या दिवशी हवन आणि पूर्णाहुती श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीच्या उपस्थितीत होणार आहे, हाही सनातन संस्थेच्या इतिहासात नोंदवला जाणारा अद्वितीय सुवर्णक्षण आहे.

ज्याप्रमाणे हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांना श्री भवानीदेवीने स्वतः प्रकट होऊन आशीर्वाद दिला आणि ‘श्रीं’चे राज्य स्थापन केले. त्याप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ईश्‍वरीय कार्यात येणारे आध्यात्मिक अडथळे दूर व्हावेत आणि या कार्याला आशीर्वाद मिळावेत, या उद्देशाने श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीचे सनातनच्या आश्रमात आगमन होणार आहे. देवीच्या वास्तव्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होण्यासाठी सनातनच्या आश्रमात भावपूर्णरित्या पूर्वसिद्धता करण्यात येत आहे.

६ आणि ७ नोव्हेंबर २०१९ या दिवशी हंगरहळ्ळी (तालुका कुणीगल, कर्नाटक) येथील श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीचे श्री मठाचे प.पू. श्री श्री श्री बालमंजुनाथ स्वामी यांच्यासह आगमन झाले होते. त्या वेळी श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीने सनातन संस्थेच्या कार्याला ‘माझा अनुग्रह आहे’, असा आशीर्वाद दिला. त्यानंतर पुन्हा एकदा श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीचे प.पू. श्री श्री श्री बालमंजुनाथ स्वामी यांच्यासह आगमन होणे, हा सनातन संस्थेच्या इतिहासात पुन्हा एकदा नोंदवला जाणारा अद्वितीय दैवी आणि आनंददायी क्षण आहे.

 

प.पू. जगद्गुरु श्री श्री श्री नंजावधूत महास्वामीजी यांचे सनातनच्या आश्रमात होणार शुभागमन !

प.पू. जगद्गुरु श्री श्री श्री नंजावधूत महास्वामीजी

श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीच्या आज्ञेने रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात २४ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत शतचंडी याग होत आहे. २८ फेब्रुवारी या दिवशी या यागाला श्री स्पटीकपुरी महासंस्थानचे (तालुका शिरा, जिल्हा तुमकूरू, कर्नाटक) पिठाधीश्‍वर प.पू. जगद्गुरु श्री श्री श्री नंजावधूत महास्वामीजी यांची वंदनीय उपस्थिती लाभणार आहे.

ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या सृष्टीचे परिचालन करणारी शक्ती, भगवान श्रीविष्णु आणि शिव यांच्या दिव्य तेजातून निर्माण झालेली महिषासुरमर्दिनी आणि सनातन संस्थेला भरभरून आशीर्वाद देणारीही शक्तीच ! या शक्तीचे रूप असलेल्या श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीच्या चरणी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेतील आध्यात्मिक अडथळे दूर होऊन लवकरात लवकर हिंदु राष्ट्र येवो’, हीच आर्तभावाने प्रार्थना !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment