देवद (पनवेल) – येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला अलिबाग (रामनाथ) येथील काही अधिवक्त्यांनी सदिच्छा भेट दिली. आश्रमजीवन जाणून घेणे आणि आश्रमातील सात्त्विक वातावरणाचा अनुभव घेणे यांसाठी ९ अधिवक्ते आश्रमात आले होते.
आश्रम पहातांना अधिवक्त्यांनी आश्रमात चालणारे राष्ट्र-धर्म विषयक कार्य जाणून घेतले. यानंतर हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांच्याशी अधिवक्त्यांनी चर्चा केली. सर्वच अधिवक्त्यांनी ‘आश्रम पाहून चांगले वाटले’, असे सांगितले.
काही अधिवक्त्यांनी दिलेले अभिप्राय
१. अधिवक्ता जयंत चेऊलकर – मी आणि माझ्या समवेतच्या विधीज्ञ सहकार्यांनी आश्रमास भेट दिल्यावर आश्रमातील शांतता आणि पावित्र्य अनुभवून अन् स्वच्छता पाहून चांगले वाटले. पुन्हा आश्रमास भेट देण्याची इच्छा आहे.
२. अधिवक्ता श्रीराम ठोसर – आश्रम चैतन्यदायी आहे. सनातन संस्था आणि ‘सनातन प्रभात’चे कार्य आज हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी, देव-धर्म कार्यासाठी आवश्यक असेच चालू आहे. आम्ही यथाशक्ती या कार्यासमवेत आहोतच.
३. अधिवक्ता सौरभ पाटील – आश्रमात प्रवेश करतांना एक वेगळे सकारात्मक तरंग (पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स) जाणवले. वातावरण अगदी प्रसन्न आहे. आश्रमात वावरतांना विविध राष्ट्र-धर्म विषयक उपक्रम पाहून पुष्कळ छान वाटले.
४. अधिवक्त्या सविता पिंगळे – अतिशय सुंदर व्यवस्था, सुंदर विचार, एकाग्र चिंतनाकरिता चांगले ठिकाण आहे.