सनातन संस्थेच्या इतिहासात लिहिला जाणारा आणखी एक अलौकिक भावक्षण
‘हिंदु राष्ट्रा’चे ‘शिव’धनुष्य सिद्धीस नेण्यास आला हो श्री सिद्धीविनायक ।
रामनाथी (गोवा) – प्रत्येक शुभकार्यातील विघ्ने नष्ट करणारा श्री सिद्धीविनायक ! सर्व कार्ये सिद्धीस नेणार्या श्री सिद्धीविनायकाचा महिमा अपरंपार आहे. अशा या रिद्धी-सिद्धीसहित श्री सिद्धीविनायकाचे महाशिवरात्रीच्या मंगलदिनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात भक्तीमय आणि चैतन्यपूर्ण वातावरणात शुभागमन झाले. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील आध्यात्मिक अडथळे दूर व्हावेत आणि हे धर्मकार्य सिद्धीस जावे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील महामृत्यूयोगाचे संकट टळून त्यांना दीर्घायुष्य लाभावे, तसेच सर्व साधकांचे रक्षण व्हावे, यांसाठी सनातनच्या आश्रमात रिद्धी-सिद्धीसहित श्री सिद्धीविनायकाचे आगमन होणे, हा सनातन संस्थेच्या इतिहासात लिहिला जाणारा एक अलौकिक भावक्षणच आहे. श्री सिद्धीविनायक आश्रमातच विराजमान होणार असल्यामुळे साधकांना आनंद तर झालाच; पण त्याच समवेत अनेक साधकांचा भावही वृद्धींगत झाला.
पारपतीवाडा (बांदोडा) येथून सायंकाळी ५.२० वाजता श्री सिद्धीविनायकाच्या जयघोषात फुलांनी सजवलेल्या वाहनातून श्री सिद्धीविनायकाची रामनाथी आश्रमापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. सनातन संस्थेच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी मिरवणुकीच्या प्रारंभी रिद्धी-सिद्धीसहित श्री सिद्धीविनायकाच्या मूर्तीचे पुष्पहार अर्पण करून औक्षण केले. या वेळी पारंपरिक वेशात साधकांनी हातात भगवे ध्वज घेतले होते. ध्वनीक्षेपकावर श्री सिद्धीविनायकाची भक्तीगीतेही लावण्यात आली होती.
सायंकाळी ६ वाजता मिरवणुकीद्वारे रिद्धी-सिद्धीसहित श्री सिद्धीविनायकाच्या मूर्तीचे पुरोहितांनी केलेल्या शंखनादात आश्रमाच्या प्रवेशद्वारी शुभागमन झाले. अत्यंत शारीरिक त्रास होत असतांनाही परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी रिद्धी-सिद्धीसहित श्री सिद्धविनायकाचे दर्शन घेतले. स्वागतासाठी आश्रमात सनातन संस्थेचे संत, साधक यांच्यासह एस्.एस्.आर्.एफ्.चे साधकही पारंपरिक वेशभूषेत भावपूर्ण नमस्काराच्या मुद्रेत उभे होते. यानंतर सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी रिद्धी-सिद्धीसहित श्री सिद्धीविनायकाचे पंचोपचार पूजन केले.