सनातन बनली संतांची मांदियाळी ! (भाग – ३)

सनातन बनली संतांची मांदियाळी ! (भाग – २) वाचण्यासाठी यावर क्लिक करा.

सनातनची संतरत्ने

१०१ वे संत पू. श्री. अनंत आठवले

संतपद : २७.६.२०१९

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू तीर्थरूप अनंत बाळाजी आठवले (ती. भाऊकाका) हे व्यष्टी संतपदी विराजमान झाले. भगवान श्रीकृष्णाला गुरुस्थानी मानून साधना करणार्‍या ती. भाऊ यांनी श्रीमद्भगवद्गीतेचा सखोल अभ्यास केला. ती. भाऊंचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी केवळ शाब्दिक अभ्यास केला नाही, तर गीतेतील तत्त्वज्ञान प्रत्यक्ष कृतीत कसे आणायचे ?, यासाठी प्रयत्न केला. एवढेच नव्हे, तर हे तत्त्वज्ञान सर्वांपर्यंत पोचावे, यासाठी त्यांनी गीताज्ञानदर्शन हा अप्रतिम ग्रंथ लिहिला आणि अनेक समर्पक अन् सुंदर उदाहरणांद्वारे त्यांनी गीतेचा भावार्थ उलगडला. गीतेचा अभ्यास केल्याने ती. भाऊंची ज्ञानयोगातून साधना झाली.

१०२ वे संत पू. श्री. शिवाजी वटकर

संतपद : १६.७.२०१९

पू. श्री. शिवाजी वटकर हे समष्टी संतपदी विराजमान झाले. पू. शिवाजी वटकर पूर्वी एका जहाज आस्थापनात मोठ्या पदावर कार्यरत होते. उच्चपदस्थ अधिकारी असूनही त्यांच्या सहज वागण्या-बोलण्यातून तसे कधीच जाणवायचे नाही. ते कोणतीही सेवा अगदी मनापासून, तळमळीने आणि भावपूर्ण रितीने करतात. त्यांच्यामध्ये ‘भाव’ आणि ‘तळमळ’ या गुणांचा अपूर्व संगम पहायला मिळतो. त्यांच्या मनात अन्यायाविरुद्ध सात्त्विक चीड असून देव आणि धर्म यांची विटंबना होऊ नये, यासाठी ते अत्यंत जागरूक असतात. कुठेही देवतांचे विडंबन होत असल्याचे कळले की, स्वतःचा कोणताही विचार न करता ती रोखण्यासाठी ते तळमळीने प्रयत्न करतात.

१०३ वे संत पू. श्री. सदाशिव सामंतआजोबा

संतपद : ९.८.२०१९
देहत्याग : १०.६.२०२१

देवद आश्रमात पूर्णवेळ सेवा करणारे, तसेच नम्र, उत्साही आणि आनंदी असणारे श्री. सदाशिव सामंतआजोबा (वय ८२ वर्षे) हे संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले. आज्ञापालन या गुणामुळे सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर त्यांनी नाम, सत्संग, सेवा, त्याग आणि प्रीती या सर्व टप्प्यांंनुसार साधना केली. त्यांना सेवेची अत्यंत तळमळ असून या वयातही त्यांना सतत सेवेचाच ध्यास असतो. देहबुद्धी न्यून असलेले आणि देेवावर दृढ श्रद्धा असलेले सामंतकाका अखंड भावावस्थेत असतात.  त्यांनी कोणत्याच गोष्टीचा कर्तेपणा स्वतःकडे कधीच घेतला नाही. त्यांचा स्वभाव लहानपणापासूनच अतिशय प्रेमळ होता. पू. सामंतआजोबा हे लहानपणापासून सद्वर्तनी होते. कोणत्याही परिस्थितीत आनंद कसा शोधायचा, हे ते पहायचे.

१०४ व्या संत पू. श्रीमती सुलभा जोशीआजी

संतपद : १०.३.२०२०

सांगवी (पुणे) येथे झालेल्या आध्यात्मिक सोहळ्यात पू. (श्रीमती) सुलभा जोशी (वय ७९ वर्षे) या ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून सनातनच्या १०४ व्या संतपदी (व्यष्टी संत) विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले. धार्मिक वातावरणात वाढलेल्या आणि बालपणापासून दत्तभक्तीचा संस्कार झालेल्या श्रीमती सुलभा जगन्नाथ जोशी यांनी ‘परेच्छेने कसे वागावे ?’ हे अध्यात्मातील तत्त्व पूर्णपणे आचरणात आणले. त्याचप्रमाणे सांसारिक कर्तव्ये शांत आणि समाधानी वृत्तीने पार पाडून ‘आदर्श सहजीवन कसे असावे ?’ याचे उदाहरणही त्यांनी सर्वांसमोर ठेवले आहे. इतरांचा विचार करणे, परेच्छेने वागणे, वात्सल्यभाव, तसेच निरपेक्ष आणि अनासक्त वृत्ती या सर्व गुणांमुळे त्यांची आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होत आहे ‘इतरांचा विचार करणे’, हा त्यांच्या स्वभावातील मोठा पैलू आहे.

१०५ वे संत पू. पट्टाभिरामन् प्रभाकरन्

संतपद : १०.१२.२०२०

चेन्नई येथील श्री. प्रभाकरन् मामा गेल्या १४ वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. पूर्वीचे त्यांचे रहाणीमान पूर्णतः वेगळे होते; मात्र साधना समजल्यावर त्यांनी स्वतःत आमूलाग्र पालट केला. अध्यात्मात ‘तात्त्विक भागाला केवळ २ टक्के, तर कृती करण्याला ९८ टक्के महत्त्व आहे’, हे लक्षात घेऊन त्यांनी कृतीच्या स्तरावर तन-मन आणि धन यांचा त्याग केला. नम्रता, अल्प अहं असलेले अन् वृद्धापकाळातही तळमळीने आणि भावपूर्ण सेवा करणारे सनातन संस्थेचे साधक श्री. पट्टाभिरामन् प्रभाकरन् यांनी संतपद प्राप्त केले आहे. आज्ञापालन करणे आणि सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणे या गुणांमुळे श्री. प्रभाकरन् मामा यांनी वर्ष २०१२ मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आणि २०२० मध्ये संतपद प्राप्त केले.

१०६ वे संत पू. माधव साठे

संतपद : ४.५.२०२१
देहत्याग : २३.४.२०२१

कल्याण, जिल्हा ठाणे येथील माधव साठे वर्ष १९९८ पासून सनातनच्या माध्यमातून साधना करत होते. श्रीगुरुंवर त्यांची अपार श्रद्धा होती. साधनेची तीव्र तळमळ असल्याने त्यांनी मनापासून व्यष्टी अन् समष्टी साधना केली. शांत आणि स्थिर स्वभाव अन् गुरुदेवांवरील अपार श्रद्धा यांमुळे अत्यवस्थ स्थितीतही ते सतत देवाच्या अनुसंधानात होते. ‘आपले संपूर्ण आयुष्य गुरुचरणी समर्पित व्हावे’, ही त्यांची तळमळ अगदी शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहिली. २३.४.२०२१ या दिवशी यांचे हृदयक्रिया बंद पडून निधन झाले. त्यांना उपचारांसाठी अतीदक्षता विभागात ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. या कठीण परिस्थितीतही ते सतत सेवारत आणि शेवटच्या क्षणापर्यंत भगवंताच्या अनुसंधानात होते. त्यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव होता. त्यांच्या याच गुणांमुळे साठेकाका यांनी समष्टी संतपद प्राप्त केले आहे.

१०७ वे संत पू. डॉ. नंदकिशोर वेद

संतपद : २१.५.२०२१
देहत्याग : ११.५.२०२१

अयोध्येसारख्या पवित्र भूमीत जन्म झालेले आणि एकत्र कुटुंबात वाढलेले पू. नंदकिशोर वेद यांना पहिल्यापासूनच अभ्यासाची आवड होती. उत्तम स्मरणशक्ती आणि अभ्यासू वृत्ती असल्याने त्यांनी पुष्कळ परिश्रम घेऊन शिक्षण घेतले. त्यांनी ‘आंतरराष्ट्रीय आतंकवाद’ या विषयावर शोधप्रबंध सादर करून ‘पी.एच्.डी.’ ही पदवी मिळवली. त्यांनी आणखी २ पुस्तकेही लिहिली आहेत. अध्यापनाची सेवा करतांना त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांवर पुत्रवत् प्रेम केले. ‘पी.एच्.डी.’ करणार्‍या विद्यार्थ्यांना त्यांनी विनाशुल्क मार्गदर्शन केले. यातून त्यांची नि:स्पृह आणि निरपेक्ष वृत्ती दिसून येते. यातून त्यांची कर्मयोगानुसार साधना झाली. ‘आदर्श पुत्र’, ‘आदर्श बंधू’, ‘आदर्श शिक्षक’ आणि ‘आदर्श पिता’ अशी सर्वच नाती त्यांनी उत्तम प्रकारे निभावली. डिसेंबर २०१९ मध्ये त्यांना रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. व्यष्टी-समष्टी साधनेचा चांगला पाया आणि ईश्‍वरावर दृढ श्रद्धा असल्यामुळे त्यांनी कर्करोगाचे कटू वास्तव स्वीकारले. असह्य वेदना होत असतांनाही त्यांची ईश्‍वरावरील निष्ठा कधी ढळली नाही. सतत भावविश्‍वात आणि अनुसंधानात राहून ते आंतरिक आनंद अनुभवत होते. जेव्हा साधना अंतर्मनातून होऊ लागते, तेव्हा बाह्य परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी साधनेत अखंडत्व येते, तसेच देहप्रारब्धाकडे साक्षीभावाने पहाता येते. मृत्यूच्या वेळी त्यांची आध्यात्मिक पातळी ६२ टक्क्यांवरून ६९ टक्के झाली. मृत्यूनंतरही त्यांची प्रगती जलद गतीने होऊन या १२ दिवसांत त्यांची आध्यात्मिक पातळी आणखी २ टक्क्यांनी वाढली आणि आता ते संतपदावर विराजमान झाले आहेत. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे घडलेली ही एक अलौकिक घटना आहे.

१०८ व्या संत पू. सौ. सरिता पाळंदे

संतपद : १२.६.२०२१
देहत्याग : ३१.५.२०२१

पुण्यातील सौ. सरिता अरुण पाळंदे मागील २४ वर्षांपासून साधना करत होत्या. साधनेतील प्रत्येक शिकवण त्यांनी आत्मसात केल्याने ‘त्या अध्यात्म जगत होत्या’, असे म्हणावे लागेल. त्यांनी स्वत:च्या पूर्ण कुटुंबावर देवा-धर्माचे संस्कार केले. त्यांच्यामध्ये सेवेची तळमळ असल्याने त्या मनापासून आणि आनंदाने सेवा करायच्या. प्रेमभाव, इतरांचा विचार करणे आणि इतरांना साहाय्य करणे या गुणांमुळे त्या साधकांच्या ‘आध्यात्मिक आई’ बनल्या. ‘प्रत्येक गोष्ट आपल्या प्रारब्धानुसार घडत असल्यामुळे ती स्वीकारली पाहिजे’, हे तत्त्व त्यांनी स्वतः स्वीकारले आणि इतरांनाही सांगितले. काही महिन्यांपूर्वी त्यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. ‘आजारपण म्हणजे प्रारब्ध संपवण्याचा एक भाग’, या श्रद्धेने त्यांनी या आजारपणाकडे पाहिले. यातून त्यांची देवावरील निष्ठा दिसून येते. पोटाचे शस्त्रकर्म झाल्यानंतरही त्या आनंदावस्थेत असायच्या. आनंदावस्थेमुळे त्यांची देहबुद्धी अल्प झाली होती. ‘देह प्रारब्धावरी सोडा, चित्त चैतन्यासी जोडा’ ही प.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण त्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणली होती. आज्ञापालन करणे, शिकण्याची स्थिती, परिस्थिती स्वीकारण्याची वृत्ती, सतत देवाच्या अनुसंधानात असल्याने आणि कृतज्ञताभावात राहिल्यामुळे त्यांची आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होत होती. त्यांच्या निधनानंतरच्या तेराव्या दिवशी (१२.६.२०२१ या दिवशी) त्यांना संत म्हणून घोषित करण्यात आले.

१०९ व्या संत पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे

संतपद : २१.८.२०२१

नवे पारगाव (तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर) येथील डॉ. (श्रीमती) शरदिनी सुधाकर कोरे यांनी ‘स्त्रीरोगतज्ञ’ म्हणून २० वर्षे व्यवसाय केला. त्यांनी ७ वर्षे इंग्लंडमध्येही वैद्यकीय व्यवसाय केला. वर्ष १९९७ पासून त्या सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करू लागल्या. सांगली जिल्ह्यात सनातनचे विशेष कार्य नसतांना डॉ. सुधाकर आणि डॉ. शरदिनी कोरे यांच्या मिरज येथील वास्तूत, ‘कोरे हॉस्पिटल’ येथे डिसेंबर १९९९ मध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’च्या सांगली-कोल्हापूर आवृत्तीचा शुभारंभ झाला. वर्ष २००६ पर्यंत या वास्तूत दैनिक ‘सनातन प्रभात’चे कार्यालय विनामूल्य चालू होते. यातूनच कोरे दांपत्याच्या ‘त्याग’ या गुणाचा परिचय होतो. पहिल्यापासूनच डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे यांच्यामध्ये साधनेची तीव्र तळमळ आहे. एक प्रथितयश स्त्रीरोगतज्ञ असूनही त्यांनी सर्व प्रकारच्या सेवा पुढाकार घेऊन केल्या. प्रसार करणे, सत्संग घेणे, प्रसंगी खेडेगावांमध्ये जाऊन ‘सनातन प्रभात’च्या अंकांचे वितरण करणे, निधीसंकलन करणे, तसेच दैनिक ‘सनातन प्रभात’साठी विज्ञापने मिळवणे, अशा सर्व सेवा त्यांनी तळमळीने केल्या. त्या अनेक वर्षे सनातन आश्रम, मिरज येथे वास्तव्याला होत्या. त्यांनी तेथील आश्रमजीवन आनंदाने स्वीकारले आणि आश्रमात शक्य त्या सेवाही केल्या. ‘त्याग’, ‘आज्ञापालन’ आणि ‘साधनेची तीव्र तळमळ’ या गुणांद्वारे पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे यांना संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले.

११० व्या संत पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी

संतपद : २९.८.२०२१

वयस्कर असूनही अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जाऊन सतत साधनारत रहाणे अतिशय अवघड असते. सनातनच्या ४८ व्या संत पू. (श्रीमती) निर्मला दाते यांच्या विहीणबाई (सून सौ. ज्योती नरेंद्र दाते यांच्या आई) पू. (श्रीमती) उषा मधुसूदन कुलकर्णी वर्ष १९९६ पासून, म्हणजे मागील २५ वर्षांपासून सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करत आहेत. त्यांचा स्वभाव अतिशय कष्टाळू आणि सहनशील असल्यामुळे त्यांनी पुष्कळ शारीरिक श्रम करून स्वतःचे प्रापंचिक दायित्व पार पाडले. परेच्छेने वागणे, इतरांचा विचार करणे आणि परिस्थिती स्वीकारणे या गुणांमुळे संसारात राहूनही त्यांची आध्यात्मिक उन्नती होत राहिली. कुलकर्णीकाकूंच्या स्वभावाचे एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक प्रसंगाकडे सकारात्मक वृत्तीने पहाणे ! कौटुंबिक स्तरावर अनेक अडचणी येऊनही सकारात्मक वृत्ती, निरपेक्षता आणि स्थिर स्वभाव अन् देवावर असलेली दृढ श्रद्धा यांमुळे त्यांनी कठीण प्रसंगांना धैर्याने तोंड दिले. या सर्व गुणांमुळे त्यांची आंतरिक साधना होत राहिली. अंतर्मनातून चालू असलेला नामजप आणि देवाशी असलेले अखंड अनुसंधान यांमुळे त्यांची आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होत आहे. पू. (श्रीमती) उषा मधुसूदन कुलकर्णी ह्या ‘व्यष्टी संत’ म्हणून संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले.

१११ वे संत पू. (श्री.) गजानन बळवंत साठे

संतपद : २९.८.२०२१

पू. (श्री.) गजानन बळवंत साठे मागील १९ वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. त्यांनी ‘स्थापत्य अभियंता’ ही पदवी संपादन करून त्यापुढील पदव्युत्तर (‘एम्.ई. सिव्हिल’चे) शिक्षणही घेतले आहे. त्यांनी ३४ वर्षे शासकीय नोकरी केली. सध्याच्या काळात शासकीय नोकरी सचोटीने करणे अत्यंत कठीण असतांना साठेकाकांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता आपला कार्यकाळ प्रामाणिकपणे पूर्ण केला. हे अत्यंत कौतुकास्पद आहे. यातूनच त्यांची कर्मयोगातून साधना झाली. वर्ष २००२ पासून सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करतांना त्यांनी विज्ञापने आणणे, दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या अंकांचे वितरण करणे आदी सेवा आनंदाने अन् भावपूर्ण रितीने केल्या. शांत, नम्र स्वभाव आणि अल्प अहं असलेल्या साठेकाकांची या वयातही कोणतीही सेवा करण्याची सिद्धता असते. ते स्वतःच्या प्रारब्धभोगांकडे साक्षीभावाने पहातात. पू. (श्री.) गजानन बळवंत साठे हे ‘व्यष्टी संत’ म्हणून संतपदावर विराजमान झाले आहेत.

११२ व्या संत पू. (कु.) दीपाली मतकर

संतपद : २८.१०.२०२१

समष्टी साधनेची तीव्र तळमळ, साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीचा ध्यास घेऊन त्यांना सातत्याने साधनेत आईप्रमाणे साहाय्य करणार्‍या, तसेच श्रीकृष्णाप्रती गोपीभाव असलेल्या कु. दीपाली मतकर या समष्टी संतपदी विराजमान झाल्या. ईश्वरप्राप्तीच्या ओढीने त्यांनी तळमळीने साधनेला आरंभ केला. आरंभी ‘भोळ्या भावाने देवाला आळवणे आणि श्रीकृष्णाच्या भक्तीत रमून जाणे’, अशी त्यांची व्यष्टी प्रकृती होती. आध्यात्मिक प्रगती झाल्यावर साधकांची प्रतिभा आपोआप जागृत होऊ लागते. साधनेमुळे दीपाली यांचीही प्रतिभा जागृत होऊन त्यांना कवितांच्या रूपात ज्ञान स्फुरू लागले. या कवितांतून त्यांची भगवंताप्रतीची भक्ती, व्याकुळता आदी सर्व गोष्टी सहजसुंदर भाषेत व्यक्त झाल्या आहेत. कु. दीपाली यांचे वैशिष्ट्य म्हणजे आरंभी व्यष्टी प्रकृती असलेल्या दीपाली यांनी ‘शिकण्याची वृत्ती’, ‘आज्ञापालन करणे’ आणि ‘साधकांवरील निरपेक्ष प्रीती’ या गुणांद्वारे व्यष्टी अन् समष्टी साधनेची सुरेख सांगड घातली.

११३ व्या व्यष्टी संत पू. (श्रीमती) विजया दीक्षितआजी

संतपद : कार्तिक शुक्ल पक्ष त्रयोदशी (१७.११.२०२१)

संतपती पू. नीलकंठ दीक्षित यांची शिष्यभावाने सेवा करणार्‍या, व्रतस्थपणे आयुष्य जगलेल्या आणि सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उत्कट भाव असलेल्या बेळगाव येथील श्रीमती विजया दीक्षित व्यष्टी संतपदी विराजमान झाल्या. पू. (कै.) डॉ. नीलकंठ अमृत दीक्षित यांचे वेगवेगळ्या ठिकाणी स्थानांतर व्हायचे. काही वेळा त्यांना लहान गावातही रहावे लागायचे. ते ज्या ज्या ठिकाणी राहिले, त्या ठिकाणी श्रीमती विजया दीक्षित यांनी त्यांच्या बरोबरीने समाजकार्य करण्यात पुढाकार घेतला आणि निरपेक्ष वृत्तीने सेवा केली. त्या वेळी श्रीमती विजया दीक्षित यांनी प्रत्येक गावात महिलामंडळ स्थापन करून महिलांचे संघटन केले. आईने महिलांचे प्रबोधन करून त्यांच्यात धार्मिकतेचे बीज रोवले. ‘साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी’ या उक्तीप्रमाणे जीवन जगल्याने त्या दोघांनी समाजात एक आदराचे स्थान निर्माण केले. त्यांचा अनासक्त आणि प्रेमळ स्वभाव असल्याने सगळ्यांना तिचा आजही आधार वाटतो.

११४ वे व्यष्टी संत पू. लक्ष्मण गोरे

संतपद : ६.१२.२०२१

निरागसता, प्रीती आणि उत्कट राष्ट्र अन् धर्म प्रेम असणारे फोंडा, गोवा येथील सनातनचे ८० वर्षीय साधक श्री. लक्ष्मण गोरे हे व्यष्टी संतपदी विराजमान झाले. गोरेआजोबा यांची अवघ्या ४ मासांत ८ टक्के आध्यात्मिक पातळी वाढली, ही एक वैशिष्ट्यपूर्ण घटना होय. मूळचे तळेगाव दाभाडे (पुणे) येथील श्री. लक्ष्मण गोरे हे पूर्वी एका मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेत राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांचे कार्य करत होते. तेव्हापासूनच ते त्यागी जीवन जगत आहेत. नंतर ‘त्या संघटनेचे कार्य सोडून सनातनमय होणे’, हे त्यांनी देवाच्या कृपेनेच साध्य केले. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केल्यावर ते आश्रमात ‘दिसेल ते कर्तव्य’, या भावाने मिळेल ती आणि दिसेल ती सेवा करू लागले. त्यांनी देवद आश्रमात परात्पर गुरु पांडे महाराज यांची मनोभावे सेवा केली. सतत अंतर्मुख असलेल्या काकांनी स्वभावदोष-निर्मूलनासाठी कठोर प्रयत्न करून स्वतःत आमूलाग्र पालट घडवून आणले आहेत. आतापर्यंत गोरेकाकांची हृदयाची ३ शस्त्रकर्मे झाली आहेत. हृदयविकारामुळे आजारी असतांनाही काका देवावरील दृढ श्रद्धेच्या बळावर स्थिर होते.

११५ वे समष्टी संत पू. संजीव कुमार

संतपद : २३.१२.२०२१

त्यागी वृत्ती आणि सतत कृतज्ञताभावात रहाणारे देहली येथील श्री. संजीव कुमार हे समष्टी संतपदी विराजमान झाले. पू. संजीव कुमार हे देहली येथील प्रतिष्ठित आणि यशस्वी उद्योजक आहेत. ते वर्ष १९९९ पासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करत आहेत. अध्यात्मात सगळ्यात महत्त्वाचा असतो, तो त्याग ! श्री. संजीव कुमार यांना साधना कळल्यावर त्यांनी त्यागाचे महत्त्व जाणले आणि धनाचा त्याग करण्याची प्रत्येक संधी शोधली. साधक, प्रसारकार्य, तसेच सेवाकेंद्र यांसाठी निरपेक्ष वृत्तीने केलेल्या धनाच्या त्यागातून त्यांनी शीघ्रतेने आध्यात्मिक प्रगती करून घेतली. श्री. संजीव कुमार आणि सौ. माला कुमार या उभयतांच्या मनात साधकांप्रती अत्यंत प्रीती आहे. सर्व साधक-परिवार त्यांना आपलाच वाटतो. ते दोघे साधकांचे आदरातिथ्य इतक्या प्रेमाने करतात की, सेवेसाठी घरदार सोडून आलेल्या साधकांना ते आपले माता-पिताच वाटतात. धर्म आणि अध्यात्मप्रसार कार्य करणार्‍या देहलीतील साधकांसाठी ते मोठा आधारस्तंभ आहेत.

११६ व्या समष्टी संत पू. (सौ.) माला कुमार

संतपद : २३.१२.२०२१

सेवाभावी वृत्ती आणि सतत आनंदावस्थेत रहाणार्‍या देहली येथील पू. संजीव कुमार त्यांच्या पत्नी सौ. माला कुमार समष्टी संतपदी विराजमान झाल्या. त्या प्रत्येक सेवा अत्यंत कलात्मक, सात्त्विक पद्धतीने, तळमळीने, उत्साहाने आणि भावपूर्ण करतात. मागील पावणेदोन वर्षांपासून ‘कोरोना’च्या संसर्गामुळे सर्वत्र भयप्रद वातावरण निर्माण झाले आहे. देहलीतही सर्वत्र ‘कोरोना’ने हाहाःकार माजवला. अशा स्थितीत ईश्वरावरील अतूट श्रद्धेच्या बळावर श्री. संजीव कुमार आणि सौ. माला कुमार यांनी या प्रतिकूल परिस्थितीचा साधनेसाठी, तसेच भाववृद्धीसाठी लाभ करून घेतला. भावावस्थेत राहिल्यामुळे अशा आपत्कालीन स्थितीत त्यांना ‘भाव तेथे देव’ या उक्तीची पदोपदी अनुभूती घेता आली आणि या काळात त्या दोघांची आध्यात्मिक उन्नती झपाट्याने झाली. या दांपत्याने एकत्रितपणे साधनेला आरंभ केला. वर्ष २०१७ मध्ये एकाच दिवशी या दोघांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली आणि आजच्या शुभदिनी या दोघांनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून एकाच दिवशी संतपदही प्राप्त केले आहे.

११७ व्या व्यष्टी संत पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ

संतपद : ७.२.२०२२

स्थिर, निरपेक्षता, त्यागी वृत्तीच्या आणि देवाप्रती श्रद्धा आणि भाव असणार्‍या मूळच्या सावईवेरे, गोवा येथील श्रीमती सुधा उमाकांत सिंगबाळ या संतपदी विराजमान झाल्या. पू. (श्रीमती) सुधा उमाकांत सिंगबाळ सनातनचे संत पू. नीलेश सिंगबाळ यांच्या मातोश्री असून श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या सासूबाई आहेत. पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ पहिल्यापासूनच धार्मिक आणि आतिथ्यशील वृत्तीच्या आहेत. पू. नीलेश सिंगबाळ मागील अनेक वर्षांपासून धर्मप्रसारासाठी वाराणसी येथे रहात आहेत, तर श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ रामनाथी आश्रमात राहून सेवा करतात. श्रीमती सिंगबाळ यांनी या दोघांना सेवा आणि साधना करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे.

११८ व्या समष्टी संत पू. (सुश्री) रत्नमाला दळवी

संतपद : ६.३.२०२२

तत्त्वनिष्ठता, आज्ञापालन, स्थिरता, नम्रता, अंतर्मुखता, समर्पणभावाने सेवा करणे आदी अनेक गुणरत्नांचा खजिना असणार्‍या मूळच्या तिवरे (तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी) येथील सुश्री (कु.) रत्नमाला दळवी (वय ४४ वर्षे) वर्ष २००३ पासून सनातनच्या माध्यमातून साधना करत आहेत. अध्यात्मात सर्वांत महत्त्वाचे असते, ते म्हणजे समजलेली साधना कृतीत आणणे ! सुश्री (कु.) रत्नमाला यांनी आतापर्यंतच्या त्यांच्या साधनाप्रवासात ही गोष्ट उत्तमप्रकारे साध्य केली. गुरुकृपायोगानुसार साधना समजल्यावर त्यांनी व्यष्टी आणि समष्टी साधना यांची सुरेख सांगड घातली. यातून त्यांचा ‘आज्ञापालन’ हा गुण लक्षात येतो.
सुश्री (कु.) रत्नमाला यांच्यातील सेवाभावी वृत्ती अत्यंत वाखाणण्याजोगी आहे. अनेक शारीरिक त्रास होत असतांनाही त्या भावपूर्ण, परिपूर्ण आणि ईश्वराच्या अनुसंधानात राहून सेवा करतात. त्या सध्या देवद आश्रमात सेवा करत आहेत. ‘दिसेल ते कर्तव्य’ असा त्यांचा भाव असून आश्रमातील अन्य सेवाही त्या पुढाकार घेऊन करतात. ‘आधी केले, मग सांगितले’, ही उक्ती त्यांच्याबाबत सार्थ ठरते. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी सहसाधकांवर व्यष्टी साधना आणि परिपूर्ण सेवा यांचे महत्त्व बिंबवले आहे आणि त्या सर्वांकडून उत्तम प्रकारे साधना करून घेत आहेत.

११९ व्या समष्टी संत पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार

संतपद : १०.४.२०२२

समष्टी साधनेची तीव्र तळमळ असणाऱ्या, साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीचा ध्यास घेऊन त्यांना सातत्याने साधनेत आईप्रमाणे साहाय्य करणाऱ्या, तसेच भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करणाऱ्या मूळ वर्धा येथील सनातनच्या साधिका श्रीमती मंदाकिनी डगवार या समष्टी संतपदी विराजमान झाल्या. शांत, स्थिर स्वभावाच्या आणि साधनेची तीव्र तळमळ असल्याने कुटुंबीय अन् नातेवाईक यांची साधना व्हावी, यासाठी प्रयत्न करणे ही त्यांची काही गुणवैशिष्ट्ये आहेत.

१२० व्या व्यष्टी संत पू. (श्रीमती) मालती नवनीतदास शहा

संतपद : ४.८.२०२२

‘पुणे येथील श्रीमती मालती नवनीतदास शहा गेल्या २० वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. पहिल्यापासूनच त्यांची दत्तगुरूंवर श्रद्धा आहे. आजींच्या घरी सेवेच्या निमित्ताने अनेक साधक यायचे. आजींनी आपल्या प्रेमभावामुळे त्या सर्वांना आपलेसे करून घेतले आहे. आजींच्या प्रेमळ आणि आतिथ्यशील स्वभावामुळे साधकांनाही त्यांच्या सहवासात रहावेसे वाटते.
आजींच्या आयुष्यात अनेक प्रतिकूल प्रसंग आले. साधनेमुळे आलेली सहनशीलता आणि देवावर असलेली दृढ श्रद्धा यांमुळे त्यांनी ते सर्व प्रसंग स्थिरतेने स्वीकारले. वयोमानामुळे आजींची प्रकृती ठीक नसते, तरी त्या देवाच्या अखंड अनुसंधानात असतात. स्थिरता, निरासक्त वृत्ती आणि देवावरील दृढ श्रद्धा यांमुळे आजींची आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होत आहे.

१२१ व्या व्यष्टी संत पू. (कै.) सौ. प्रमिला रामदास केसरकर

संतपद : १२.८.२०२२
देहत्याग : १८.१०.२०२१

‘साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी’, असे जीवन जगलेल्या आणि दुर्धर व्याधीतही तळमळीने साधना करून ‘नामची तारी भवसागरी’ या उक्तीप्रमाणे जीवन जगून कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर यांनी व्यष्टी संतपद’ प्राप्त केले. वर्ष २०१६ मध्ये सौ. प्रमिला केसरकर यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. पुढे त्यांचा आजार वाढतच गेला आणि त्याचबरोबर त्यांची आंतरिक साधनाही वाढू लागली. साधना आणि देवावरील दृढ श्रद्धा यांमुळे सौ. केसरकर यांनी दुर्धर आजारपणाला धैर्याने तोंड दिले. यातून त्यांच्यातील अफाट सहनशीलतेचे दर्शन होते. कर्करोगासारख्या दुर्धर व्याधीतही तळमळीने साधना करून प्रगती करण्याचा आदर्श त्यांनी सर्वांसमोर ठेवला आहे. ‘ सौ. प्रमिला केसरकर यांचे कर्करोगाच्या आजारामुळे निधन झाले.

१२२ व्या व्यष्टी संत पू. (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे

संतपद : १२.८.२०२२
देहत्याग : १६.७.२०२२

निरपेक्ष प्रीती, उत्कट भक्तीभाव आणि गंभीर आजारपणातही सतत कृतज्ञताभावात राहून कै. (सौ.) शालिनी प्रकाश मराठे यांनी ‘व्यष्टी संतपद’ प्राप्त केले. सौ. शालिनी मराठे म्हणजे भोळ्या आणि उत्कट भावाचे मूर्तीमंत उदाहरण ! त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या डोळ्यांतून आणि लिखाणातून साधकांना त्यांच्यात असलेल्या भावाची प्रचीती येत असे. त्यांच्या लिखाणाची एक विशिष्ट आणि भावपूर्ण शैली होती. ‘हृदयस्पर्शी आणि भावभक्तीने ओथंबलेले लिखाण’, ही त्यांच्या लिखाणाची वैशिष्ट्ये होती. मार्च २०२२ मध्ये त्यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. या आजाराला त्या अत्यंत धैर्याने सामोर्‍या गेल्या. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे गंभीर शारीरिक स्थितीतही त्या सतत इतरांचा विचार करायच्या. त्यांच्या चेहर्‍यावर, तसेच त्यांच्या बोलण्यातून सर्वांना आनंद आणि कृतज्ञताभाव जाणवायचा. नंतरच्या काळात सौ. शालिनी मराठे यांचे आजारपण आणखी गंभीर होत गेले आणि त्यांचे कर्करोगाने निधन झाले.

१२३ व्या समष्‍टी संत पू. (सौ.) सौ. मनीषा पाठक

संतपद : १४.३.२०२३

श्री. महेश आणि सौ. मनीषा पाठक हे साधक-दांपत्य पुणे येथे सनातनच्या सेवाकेंद्रात राहून साधना करत आहे. ते दोघेही संगणक अभियंता असून पूर्णवेळ साधना करण्यासाठी अमेरिकेतील नोकरी सोडून भारतात आले आहेत. सौ. मनीषा यांना तीव्र शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास असूनही त्या नेहमी आनंदी असतात. त्यांच्यात उत्तम नेतृत्वगुण असल्याने अमेरिकेतून पुण्यात आल्यावर त्यांनी पुण्यातील प्रसारकार्य वाढावे आणि साधकांची साधना चांगल्या प्रकारे व्हावी, यांसाठी तळमळीने प्रयत्न केले. शांत, स्थिर स्वभाव, इतरांना साहाय्य करण्याची वृत्ती अन् प्रेमभाव या गुणांद्वारे त्यांचे सर्व साधकांशी आध्यात्मिक नाते निर्माण झाले असून सर्व साधकांमध्ये एक सुंदर कुटुंबभावना निर्माण झाली आहे. सतत भावावस्थेत असणार्‍या सौ. मनीषा यांनी ‘ज्योत से ज्योत जगाओ’ या ओळीनुसार साधकांमधील भावज्योत प्रदीप्त केली. त्यामुळे पुण्यातील अनेक साधकांची आध्यात्मिक प्रगती जलद गतीने होत आहे.

१२४ वे व्‍यष्‍टी संत पू. (श्री.) सत्‍यनारायण तिवारी

संतपद : २३.४.२०२३

संभाजीनगर येथील सनातनचे साधक श्री. सत्‍यनारायण तिवारी हे व्‍यष्‍टी संतपदी विराजमान झाले. पू. सत्‍यनारायण तिवारी हे गेल्‍या २ वर्षांपासून तीव्र शारीरिक त्रासांमुळे रुग्‍णाईत असल्‍यामुळे त्‍यांना सतत झोपून रहावे लागते, तसेच त्‍यांना मेंदूच्‍या आजारामुळे विस्‍मृतीही होते. अशा स्‍थितीतही त्‍यांनी आंतरिक साधनेच्‍या बळावर सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या कृपेने संतपद गाठले.

१२५ वे संत पू. (श्री.) अरविंद सहस्रबुद्धे

संतपद : ६.७.२०२३
देहत्याग : १४.१२.२०२४

पुणे येथील नम्र, सर्वांवर पितृवत् प्रेम करणारे आणि भावपूर्ण अन् परिपूर्ण सेवा करणारे श्री. अरविंद सहस्रबुद्धे हे १२५ ‍व्या संतपदी विराजमान झाले. श्री. अरविंद सहस्रबुद्धे पूर्वी नास्तिक होते. सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करण्यास आरंभ केल्यानंतर, तसेच सनातनच्या आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन केल्यानंतर त्यांची देवावर श्रद्धा बसली. प्रेमभाव आणि सहजता या गुणांमुळे सहस्त्रबुद्धेकाकांनी अल्पावधीतच सर्वांची मने जिंकली आहेत. त्यांचे वय अधिक असूनही पत्नीला साहाय्य करण्यासाठी ते घरातील सर्व कामे करतात. त्यात त्यांना कुठलाही न्यूनपणा वाटत नाही. ते मनाने पुष्कळ स्थिर असतात. मागील १५ वर्षांपासून ते साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या संदर्भातील सेवा अखंड करत आहेत. ते ही सेवा मनापासून, भावपूर्णरित्या, अचूक आणि परिपूर्ण करतात. ‘सतत आनंदी रहाणे, सर्वांशी स्वतःहून बोलणे, चूक मनापासून स्वीकारणे, चूक झाल्यावर साधकांची क्षमा मागणे’ इत्यादी अनेक गुणांमुळे ते सर्वांनाच जवळचे वाटतात.

१२६ व्‍या व्‍यष्‍टी संत पू. (श्रीमती) विजया पानवळकर

संतपद : ५.१०.२०२३

साधनेतील सातत्‍य, चिकाटी आणि श्रीकृष्‍णाच्‍या सतत अनुसंधानात असणार्‍या देवरुख येथील श्रीमती विजया वसंत पानवळकर या संतपदी विराजमान झाल्‍या. ईश्‍वरप्राप्‍तीचा ध्‍यास असलेल्‍या पानवळकरआजी घरी आलेल्‍या नातेवाइकांशी प्रापंचिक विषयांवर फारशा बोलत नाहीत; मात्र ‘साधना किंवा अध्‍यात्‍म’, हा विषय निघाला, तर बराच वेळ बोलतात. ‘चिकाटी, सातत्‍य आणि नियोजनबद्धता’, हे गुण असणार्‍या पानवळकरआजी स्‍वतःमधील स्‍वभावदोष न्‍यून करण्‍यासाठी तळमळीने प्रयत्न करतात. आता त्‍यांनी त्‍यांच्‍या आवडी-निवडीचा त्‍याग करायला आरंभ केला आहे. अलीकडे त्‍या प्रत्‍येक प्रसंगाचा ‘ईश्‍वरेच्‍छा’ या भावाने स्‍वीकार करण्‍याचा प्रयत्न करू लागल्‍या आहेत.

१२७ वे संत पू. (श्री.) श्रीपाद हर्षे

संतपद : ११.१०.२०२३

‘कर्णावती (गुजरात) येथील डॉ. श्रीपाद नरहर हर्षे (वय ८९ वर्षे) यांनी पदव्‍युत्तर शिक्षणानंतर (एम्.एस्‍सी. पीएच्.डी.) इंग्‍लंडमध्‍ये वास्‍तव्‍य केले. भारतात परतल्‍यानंतर त्‍यांनी आरंभी नोकरी आणि नंतर व्‍यवसाय केला. त्‍यांना त्‍यांच्‍या संशोधनाच्‍या कार्यासाठी वर्ष १९७७ मध्‍ये ‘राष्‍ट्रपती पुरस्‍कार’ मिळाला. पूर्वीपासून ते देवपूजा, स्‍तोत्रपठण आणि नित्‍य देवदर्शन करत असत. वयाच्‍या ८९ व्‍या वर्षी हर्षेआजोबा समष्‍टीसाठी नामजप करतात, तसेच ते आध्‍यात्‍मिक त्रास असणार्‍या साधकांना नामजप शोधून देण्‍याची सेवा करतात. ही सेवा करण्‍यासाठी त्‍यांनी सनातनच्‍या ‘प्राणशक्‍तीवहन संस्‍थेतील अडथळ्‍यांमुळे होणार्‍या विकारांवर करायचे उपाय’ या, तसेच अन्‍य उपायांविषयीच्‍या ग्रंथांचा सखोल अभ्‍यास केला आहे.
संसारात राहून साधना करून आध्‍यात्‍मिक उन्‍नती करण्‍याचा आदर्श हर्षेआजोबांनी सर्वांसमोर ठेवला आहे.

१२८ व्या संत पू. (श्रीमती) सौदामिनी माधवन् कैमल

संतपद : १८.७.२०२४
देहत्याग : ६.७.२०२४

पू. कैमलआजींची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा होती आणि त्यांच्याप्रती पुष्कळ समर्पितभाव अन् कृतज्ञताभाव होता. गेल्या १ वर्षापासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्या शेवटपर्यंत अखंड नामजप करत होत्या. पू. कैमलआजी समष्टीसाठी नामजप करायच्या (साधकांच्या साधनेतील अडचणी दूर होण्यासाठी त्यांच्यासाठी प्रार्थना आणि नामजप करणे). ‘नामजप करायचा राहिला’, असे त्यांच्याकडून कधीच झाले नाही. त्या आध्यात्मिक स्तरावरील उपाय नियमितपणे करायच्या. शारीरिक स्थिती चांगली असेपर्यंत पू. कैमलआजी घरोघरी जाऊन गुरुपौर्णिमेसाठी अर्पण गोळा करण्याची सेवा करत असत. त्यानंतर त्या दूरभाषवरून समाजातील जिज्ञासूंशी संपर्क साधून त्यांना साधना किंवा गुरुपौर्णिमा यांचे महत्त्व सांगायच्या आणि त्यांच्याकडून अर्पण करून घ्यायच्या.

१२९ ‍वे समष्‍टी संत पू. सांतप्‍पा गौडा

संतपद : १८.११.२०२४

वर्ष २००१ पासून श्री. सांतप्‍पा गौडा सनातन संस्‍थेच्‍या माध्‍यमातून साधना करत आहेत. त्‍यांचे वैशिष्‍ट्य म्‍हणजे या वयातही ते प्रतिदिन प्रसारसेवेसाठी बाहेर जातात. ‘सेवा’ हा जणू सांतप्‍पामामांचा श्‍वास आहे. एखाद्या दिवशी सेवा करायला मिळाली नाही, तर त्‍यांना आतून अस्‍वस्‍थ वाटते. ‘सेवेची तीव्र तळमळ’ आणि ‘देवावरील श्रद्धा’ यांमुळे कितीही कठीण परिस्‍थिती असली, तरी त्‍यांच्‍या सेवांत कधी खंड पडत नाही. सनातन संस्‍थेशी परिचय झाल्‍यापासून ‘सनातन’ हेच माझे कुटुंब असून आता मला पुष्‍कळ मोठा परिवार मिळाला आहे’, असे वाटून मामांची भावजागृती होते. सांतप्‍पामामा हे भावस्‍थितीचे मूर्तीमंत उदाहरण आहेत. भावामुळे त्‍यांना ‘ईश्‍वर सतत सोबत आहे’, तसेच ‘स्‍वतःभोवती देवतांचे संरक्षककवच आहे’, अशा स्‍वरूपाच्‍या अनुभूती येतात.

१३० व्या व्‍यष्‍टी संत पू. (श्रीमती) कमलम्‍मा

संतपद : १८.११.२०२४

वर्ष २००४ पासून श्रीमती कमलम्‍मा सनातनच्‍या माध्‍यमातून साधना करत आहेत. त्‍यांच्‍यामध्‍ये ‘आज्ञापालन’ हा महत्त्वाचा गुण असल्‍याने सत्‍संगात जे जे सांगितले, ते सर्व त्‍यांनी कृतीत आणण्‍याचा प्रयत्न केला. श्रीमती कमलम्‍मा यांचे साधकांवर पुष्‍कळ प्रेम आहे. साधकांसाठी कितीही कष्‍ट करण्‍याची त्‍यांची सिद्धता असते. स्‍वतःच्‍या परिवारापेक्षा त्‍यांना साधक-परिवार अधिक आपला वाटतो. श्रीमती कमलम्‍मा ‘तळमळ’ या गुणाचे मूर्तीमंत रूप आहेत. सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ समाजापर्यंत पोचावेत, यासाठी त्‍या तळमळीने प्रयत्न करतात. साधनेमुळे स्‍वतःला झालेले लाभ इतरांनाही व्‍हावेत, यासाठी त्‍या भेटणार्‍या व्‍यक्‍तींना साधनेविषयी माहिती सांगतात. घरी साधनेसाठी पूरक वातावरण नसतांनाही ‘तळमळ, अंतर्मनाची साधना आणि देवाप्रती समर्पितभाव’ या गुणांमुळे कमलम्‍मा यांची आध्‍यात्मिक उन्‍नती होत आहे.



१३१ व्या व्‍यष्‍टी संत पू. (सौ.) शशिकला किणी

संतपद : १८.११.२०२४

वर्ष १९९९ पासून मंगळुरू येथील सौ. शशिकला किणी सनातन संस्‍थेच्‍या माध्‍यमातून साधना करत आहेत. बालपणापासूनच त्‍यांची प्रभु श्रीरामावर नितांत श्रद्धा होती. त्‍यामुळे त्‍या रामनाम लिहायच्‍या आणि श्रीरामाचा नामजपही करायच्‍या. विवाहानंतर कर्मकांडानुसार साधना करतांना त्‍यांनी मंगळुरू येथे सनातन संस्‍थेचे प्रवचन ऐकले आणि त्‍या नियमित सत्‍संगाला जाऊ लागल्‍या. सत्‍संगात सांगितलेली सर्व सूत्रे त्‍या आचरणात आणण्‍याचा प्रयत्न करू लागल्‍या. सौ. किणी यांना सर्व साधकांप्रती पुष्‍कळ प्रीती वाटते. ‘सनातनचे सर्व साधक म्‍हणजे माझी मुलेच आहेत’, असा त्‍यांच्‍या मनात वात्‍सल्‍यभाव असतो. या भावामुळे त्‍या साधकांची मनापासून काळजी घेतात. सौ. किणी सतत देवाच्‍या अनुसंधानात असतात. त्‍यांना ठायी ठायी भगवान श्रीकृष्‍णाचे अस्‍तित्‍व जाणवते आणि ‘श्रीकृष्‍ण स्‍वतः समवेत आहे’, अशी अनुभूती येते.


१२९ ‍वे संत

संतपद :

१३० व्या व्‍यष्‍टी संत

संतपद :

Leave a Comment