दुधी भोपळा आणि कडू भोपळा यांचे औषधी उपयोग

Article also available in :

दुधी भोपळा ही एक उपयुक्त फळभाजी आहे. ‘दुधी भोपळ्याचा रस प्या आणि वजन न्यून करा’, असे ऐकून आजकाल वजन न्यून करण्यासाठी लोक तशी कृती करतात; परंतु सर्वांनीच तसे करणे योग्य नाही. आयुर्वेदातील कुठलाही प्रयोग जवळच्या तज्ञ वैद्यांना विचारूनच करावा.

 

१. दुधी भोपळा

१ अ. दुधी भोपळ्यापासून बनणारे काही पदार्थ

वैद्य विलास शिंदे
१ अ १. हलवा

दुधी भोपळा किसून तुपात परतून शिजवून घ्यावा. शिजल्यावर त्यात दूध घालून त्याचा मावा होईपर्यंत आटवावे. नंतर साखर घालून वाफ आणावी. उपलब्धतेनुसार काजू, बदाम, पिस्ते आदी घालावे.

१ अ २. बर्फी

किसलेला दुधी भोपळा शिजवून घ्यावा. साखरेचा पाक करून त्यात दुधाचा मावा, शिजलेला दुधी भोपळा घालावा. चवीसाठी वेलची, केशर, बदाम, काजू आदी घालून नंतर वड्या पाडाव्यात.

१ अ ३. मोरंबा

दुधी भोपळ्याचे तुकडे करून ते वाफवावेत. वाफवलेले तुकडे नंतर साखरेच्या पाकात घालावेत.

१ अ ४. भाजी

दुधी भोपळ्याची भाजी चविष्ट आणि पौष्टिक असते.

१ आ. दुधी भोपळ्याचे लाभ

१ आ १. पित्त विकार न्यून होणे आणि शरिराची वाढ होणे

दुधी भोपळ्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी पित्तावर लाभदायक आहे. अंगातील कडकी (अंगात भिनलेली उष्णता) घालवण्यासाठी दुधी भोपळ्याच्या भाजीचा चांगला लाभ होतो. या भाजीमुळे तोंडाला चव येते. रस (शरिरातील एक द्रव धातू (घटक)), रक्त, मांस आदी शरीर घटकांची चांगली वाढ होते.

१ आ २. गर्भपात टळणे

दुधी भोपळ्याच्या बिया वाटून दूध साखरेतून घ्याव्यात. ज्या स्त्रियांचा वारंवार गर्भपात होतो, त्यांनी जवळच्या वैद्याकडे जाऊन वरील उपचारांसह पंचकर्मातील ‘बस्ती’ हा उपचार घ्यावा.

१ आ ३. गर्भाची वाढ होणे

दुधी भोपळ्याचे सर्व पदार्थ गर्भिणीने अवश्य खावेत. याने शक्ती वाढते. गर्भाची वाढ चांगली होण्यासाठी महिन्यातून २ वेळा दुधी भोपळ्याची भाजी खावी.

 

२. कडू भोपळा

कडू भोपळ्याला संस्कृतमध्ये ‘कटुतुंबी’ असे म्हणतात. दुधी भोपळ्याप्रमाणे याचीही वेल असते; परंतु कडू भोपळ्याचा आकार मोठा असतो. खेडेगावात कडू भोपळा पाठीला बांधून मुले पोहण्यासाठी जातात. कडू भोपळा आणि त्याची पाने जाळून बनवलेली राख औषधी असते.

२ अ. कडू भोपळ्याचे औषधी उपयोग

२ अ १. कावीळ

कडू भोपळ्याच्या पानांचा रस घेतल्याने पोट साफ होऊन कावीळ उतरते. काही लोक याचा गर पाण्यात वाटून देतात. याने जुलाब होतात, म्हणून हे औषध वैद्यांना विचारूनच घ्यावे.

२ अ २. शरिरात होणार्‍या गाठी

गावठी वैद्य कडू भोपळ्यात भरलेले पाणी प्रतिदिन सकाळी २ – ३ चमचे घेण्यास सांगतात. याने शरिरावरील गाठी विरघळतात, असा त्यांचा अनुभव आहे. याची पानेही कुटून गाठींवर लावतात.

२ अ ३. अंग (गुदद्वार) बाहेर येणे

काही औषधांसह कडू भोपळ्याची पाने वाटून गुदद्वारावर लावल्यास त्याचा चांगला लाभ होतो.

– वैद्य विलास जगन्नाथ शिंदे, जिजाई आयुर्वेद चिकित्सालय, खालापूर, जिल्हा रायगड.

Leave a Comment