शिरगाव (सिंधुदुर्ग) येथील हिंदु राष्ट्र जागृती सभेला ५ सहस्र ५०० धर्माभिमान्यांची उपस्थिती
देवगड – काही काळापूर्वी ‘हिंदु’ हा शब्द उच्चारण्याची भीती हिंदु धर्मियांना वाटत होती; मात्र आता काळ पालटत असून हिंदूंना सकारात्मक असे अनेक निर्णय घेतले जात आहेत. हिंदु राष्ट्र-जागृती सभांनी केवळ काही लाख लोकांमध्ये जागृती केली असे नव्हे, तर राज्यकर्त्यांच्या मनातदेखील जागृती केली आहे. हिंदु राष्ट्र संकल्पनेचा एवढा दबदबा निर्माण झाला आहे की, विरोधकही विरोध करतांना हिंदु राष्ट्र संकल्पनेचाच उद्घोष करतांना दिसतात. हिंदु राष्ट्र ही संकल्पना सर्वांच्या मनात रुजत असून तो दिवस लवकरच येईल, असे आश्वस्त मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी येथे केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तालुक्यातील शिरगाव येथील शिरगाव हायस्कूलच्या पटांगणात रविवार, ९ फेब्रुवारी या दिवशी जाहीर हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये मार्गदर्शन करत होत्या. सभेच्या प्रारंभी समितीचे श्री. राजेंद्र परब यांनी शंखनाद केला. सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम आणि सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.