अमळनेर (जळगाव) येथे उत्तर महाराष्ट्रातील मंदिर विश्वस्त, संत-महंत यांची बैठक पार पडली !
शासनाने अधिग्रहित केलेली मंदिरे भक्तांच्या कह्यात द्यावी !
जळगाव – भारत हा जगाचा आध्यात्मिक गुरु आहे. जगात कोठेही नसतील, इतकी अनेक प्राचीन मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे भारतात आहेत. या तीर्थक्षेत्रांमधील चैतन्य आणि सात्त्विकता यांमुळेच आज भारतात सात्त्विकता टिकून आहे. असे असले, तरी वर्तमान परिस्थितीत मंदिरांची स्थिती चिंताजनक आहे. धर्मांधांकडून मंदिरांच्या जागांवर अतिक्रमण होणे, मूर्तींची तोडफोड करणे, दानपेट्या तोडणे, मंदिरांच्या उत्सवांमध्ये व्यत्यय आणणे आदी आघातांसमवेतच काही ठिकाणी प्रशासकीय अधिकार्यांकडूनही मोठ्या प्रमाणात मंदिर विश्वस्तांना, मंदिराची देखरेख करणार्यांना त्रास देण्याचा भाग होतो. काही वेळा पुरो(अधो)गाम्यांकडून मंदिरांच्या वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरांविषयी वाद निर्माण करून त्या परंपरा मोडीत काढण्यासाठी दबाव निर्माण केला जातो किंवा मंदिराची/मंदिर विश्वस्तांची अपकीर्ती केली जाते. अशा कठीण प्रसंगांना मंदिराचे विश्वस्त मंडळ आणि मंदिराशी जोडलेले काही भाविक हेच तोंड देत असल्याने ते एकटे पडतात. ही परिस्थिती पालटण्यासाठी तसेच संघटितपणे या आघातांना सामोरे जाण्यासाठी मंदिर विश्वस्तांचे संघटन आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकारातून उत्तर महाराष्ट्रातील मंदिरांच्या विश्वस्तांच्या एकत्रित बैठकीचे आयोजन अमळनेर येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिरात करण्यात आले होते. या बैठकीला संत-महंत, वारकरी संप्रदायातील महाराज, उत्तर महाराष्ट्रातील विविध मंदिरांचे विश्वस्त, हिंदुत्वनिष्ठ, तसेच सनदी लेखापाल आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीला सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव, प्रसिद्ध सनदी लेखापाल श्री. गोवर्धन मोदी यांनीही संबोधित केले.
महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात ज्या ज्या मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे, त्या मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे पुराव्यानिशी बाहेर आले आहे. तसेच सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये हिंदु परंपरांचीही पायमल्ली होण्याचे संतापजनक प्रकार घडत आहेत. त्यामुळे यापुढे एकाही मंदिराचे सरकारीकरण होऊ द्यायचे नाही, तसेच आजवर जी मंदिरे शासनाने अधिग्रहित केली आहेत, तीसुद्धा भक्तांच्या कह्यात देण्यासाठी शासनाला भाग पाडायचे, असा निर्धार उत्तर महाराष्ट्रातील मंदिरांच्या विश्वस्तांनी एकमुखाने केला.
मंदिर न्यासाने त्याचे आर्थिक ताळेबंद कसे व्यवस्थित ठेवायला हवे, कोणत्या आर्थिक योजना मंदिरांसाठी उपलब्ध आहेत ?, त्याचा मंदिर न्यासांनी कसा लाभ करून घ्यायला हवा ? काय उपाययोजना करायला हवी ?, याविषयी श्री. मोदी यांनी अमूल्य मार्गदर्शन केले.
मंदिरे म्हणजे ऊर्जास्रोत ! – सद्गुरु नंदकुमार जाधव
मंदिरे ही धर्मशिक्षण मिळण्याची केंद्रे बनली पाहिजेत. यासाठी समितीने बनवलेल्या फ्लेक्स प्रदर्शनाचा उपयोग करू शकता. आपल्याला मंदिरांची सेवा करण्याची अमूल्य संधी मिळाली आहे. आज समाजाला धर्मशिक्षित करण्याची आवश्यकता आहे. यासाठी मंदिरांनी पुढाकार घ्यायला हवा. मंदिरे ही ऊर्जास्रोत आहेत.
‘उत्तर महाराष्ट्र मंदिर-संस्कृती रक्षा कृती समिती’ची स्थापना
मंदिरांचे एकीकरण असल्याने या बैठकीत ‘उत्तर महाराष्ट्र मंदिर-संस्कृती रक्षा कृती समिती’ची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून ज्यांना मंदिर संस्कृती रक्षणाचे कार्य करायचे आहे, त्यांनी ९५५२४२६४३९ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सहभाग
बैठकीला अमळनेर येथील श्री मंगळग्रह सेवा संस्थान, इच्छापूर्ती गणेश मंदिर चांदवड, बालवीर हनुमान मंदिर चोपडा, श्री नवग्रह मंदिर चोपडा, कपिलेश्वर महादेव मंदिर मुडावद, श्री क्षेत्र शिवधाम रत्नपिंप्री, श्रीक्षेत्र ममलेश्वर मंदिर, रोकडोबा मारुति मंदिर धुळे, स्वामीनारायण मंदिर अमळनेर, श्रीराम मंदिर संस्थान शिरपूर, श्री नवनाथ मंदिर रत्नपिंप्री, पाचपावली मंदिर अमळनेर आदी विविध मंदिरांचे विश्वस्त, तसेच वारकरी संप्रदाय, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आदी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.