दमामे (ता. दापोली) पंचक्रोशीच्या सहकार्याने झालेल्या ‘हिंदु राष्ट्र जागृती सभेला ५५० धर्मप्रेमींची उपस्थिती !
दापोली – हिंदु धर्मामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत करण्यात येणार्या प्रत्येक कृतीमागे विज्ञान आहे. धर्मशास्त्र आहे. आपण ते जाणून घेतले पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये ‘टी.व्ही’ आणि ‘मोबाईल’ यांसारख्या आधुनिक सुख-सुविधा नव्हत्या, तरीही समाज समाधानी होता; मात्र आज या सुविधा उपलब्ध असूनही समाज सुखी नाही. याचे कारण म्हणजे धर्म आणि संस्कृती यांचे पालन आज केले जात नाही. घरोघरी चालू असलेल्या दूरदर्शनवरील मालिका धर्म आणि संस्कृती बुडवायला निघाल्या आहेत. यातून नवीन पीढीवर चुकीचे संस्कार होत आहेत.
क्रांतीकारकांनी राष्ट्र आणि धर्म यांसाठी स्वत:चे आयुष्य वेचले. त्यांनी फार मोठा त्याग केला. आजचे तरुण मात्र मैत्रीणीसाठी त्याग करतो आणि त्याच्याकडून राष्ट्रधर्मासाठी त्यागाचा विचार केला जात नाही. यासाठीच धर्माचरण करणे आवश्यक आहे. धर्माचरण केल्याने युवक राष्ट्र आणि धर्म यांसाठी त्याग करू शकतात, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तालुक्यातील दमामे पंचक्रोशीच्या (दमामे, तामोंड, भडवळे, कात्रण) सहकार्याने दमामे गावचे ग्रामदैवत श्री धाराई-श्री जाखमाता मंदिराच्या प्रांगणात आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र- जागृती सभेत ते बोलत होते. या वेळी श्री. सुमित सागवेकर यांनी धर्माचरण कशा पद्धतीने करू शकतो, याविषयीची सूत्रे सांगितली आणि धर्माचरण करण्यास लाजू नका, असे आवाहनही केले. या वेळी अनसपुरे गावचे ह.भ.प. प्रकाश भेकरे महाराज, पन्हाळजे गाव कोंडवाडीचे अध्यक्ष श्री. दत्ताराम नाचरे हे उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी श्री. सुमित सागवेकर, सौ. अपर्णा कुलकर्णी, श्री. प्रकाश मळेकर, श्री. अशोक रेवाळे, श्री. पांडुरंग लोंढे, श्री. अनंत रेवाळे यांनी दीपप्रज्वलन केले.
साधना केल्याने जीवनात आमुलाग्र पालट
होऊ शकतो ! – अधिवक्त्या (सौ.) अपर्णा कुलकर्णी, सनातन संस्था
साधनेचे आपल्या जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे. आपण साधना केली नाही, तर भगवंताने दिलेला मनुष्य जन्म वाया गेला असेच म्हणावे लागेल. साधना म्हणजे प्रत्येक क्षणी आनंद मिळण्यासाठी सातत्याने करावयाचे प्रयत्न होय. यामध्ये कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप प्राधान्याने करायला हवा. यासमवेत आपण धर्माचरणही केले पाहिजे. धर्माचरणानेच आपल्याला देवतेचा आशीर्वाद प्राप्त होतो. साधना केल्याने आपल्यातील ईश्वराचे गुण येतात आणि त्यामुळे जीवनात आमुलाग्र पालट होऊन आपण आनंदी जीवन जगू शकतो.