पुणे – अयोध्येमध्ये श्रीराममंदिर स्थापन करण्यासाठी ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ स्थापन करण्यात आला आहे. या ट्रस्टवर ‘महर्षि वेदव्यास प्रतिष्ठान’च्या माध्यमातून निरंतर धर्मजागरणाचे कार्य करणारे पुणे येथील प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज (पूर्वाश्रमीचे आचार्य किशोरजी व्यास) यांची निवड झाली आहे. त्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने त्यांना ७ फेब्रुवारीला सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सदिच्छा पत्र देण्यात आले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेतच्या आंतरिक बंधामुळे स्वामीजींनी सदिच्छा पत्र वाचून ते भावपूर्णरित्या कपाळाला लावले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.
प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांना सनातन संस्थेचे
संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पाठवलेले सदिच्छा पत्र
॥ जय श्रीराम ॥
दिनांक : ७.२.२०२०
प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या चरणी साष्टांग नमस्कार !
अयोध्येमध्ये भगवान श्रीरामाचे मंदिर उभारण्यासाठी ट्रस्ट स्थापन करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’मध्ये आपली विश्वस्त म्हणून नियुक्ती झाल्याचे समजले. हे वृत्त ऐकून मनस्वी आनंद झाला.
आपण ‘महर्षि वेदव्यास प्रतिष्ठान’च्या माध्यमातून भगवद्गीता, वेदप्रचार आणि प्रसाराचे कार्य संपूर्ण देशभरात निरंतर करत आहात. आपण धर्मरक्षणाच्या कार्यात सदैव अग्रेसर असल्यानेच आपल्याला ही संधी लाभली, अशी आमची भावना आहे.
धर्मरक्षणाच्या कार्यातील आपली निष्ठा अतूट आहे. या निष्ठेतूनच धर्मरक्षणाचे कार्य वृद्धींगत होऊन या पृथ्वीतलावर रामराज्य अर्थात ‘हिंदु राष्ट्रा’ची पहाट लवकरच होवो, अशी प्रभु श्रीरामचरणी प्रार्थना करतो !
आपला,
डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था.