देहली – सनातन संस्थेच्या ४५ व्या समष्टी संत पू. (सौ.) सूरजकांता मेनराय यांनी माघ शुक्ल पक्ष सप्तमीला (शनिवार, १ फेब्रुवारी या दिवशी) सकाळी १०.५० वाजता देहली येथील एका रुग्णालयात देहत्याग केला. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्या मूळच्या फरिदाबाद (हरियाणा) येथील असून त्या ७७ वर्षांच्या होत्या. वर्ष २०१९ मध्ये त्यांची आध्यात्मिक पातळी ७६ टक्के होती.
पू. (सौ.) मेनराय अखंड नामजप करायच्या. त्यांच्यात सतत अन्यांचा विचार करणे, साधनेची तीव्र तळमळ असणे, विनम्रता आदी दैवी गुणांचा संगम होता. त्यांचा विचार करताच ‘प्रेम’ या शब्दाचे स्मरण होते. ‘साधक हे परात्पर गुरुदेवांचेच रूप आहे’, असा त्यांचा भाव असे.
पू. (सौ.) मेनराय यांच्या पश्चात पती तथा सनातन संस्थेचे ४६ वे संत पू. भगवंतकुमार मेनराय, ३ मुली – सौ. ज्योती ल्याओ, सनातन संस्थेच्या पूर्णवेळ साधिका कु. संगीता आणि सौ. मुक्ता कालरा, तसेच जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
१ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी पू. (सौ.) मेनरायआजी यांच्यावर त्यांचा नातू श्री. हर्षित कालरा यांनी अग्नीसंस्कार केले.