१. सूर्य आणि चंद्र यांच्या परिणामानुसार शास्त्रकारांनी प्रत्येक
तिथीच्या देवता ठरवलेल्या असून ‘चतुर्थी’ या तिथीची देवता ‘श्री गणेश’ असणे
श्री गणेश
‘ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्र यांनुसार सूर्य प्राणशक्तीचा, तर चंद्र मनःशक्तीचा कारक आहे. सूर्य आणि चंद्र यांच्यामुळे तिथी होतात. त्यांच्या भ्रमणामुळे निरनिराळे कोन होतात. अमावास्येला चंद्र सूर्यकक्षेत विलीन होतो. पौर्णिमेला दोघेही एकमेकांसमोर १८० अंशात क्षितिजावर दिसतात. अष्टमीला ते अर्ध समरेषेवर असतात. सूर्य आणि चंद्र यांच्या परिणामानुसार शास्त्रकारांनी प्रत्येक तिथीच्या देवता ठरवल्या आहेत.
त्यात ‘चतुर्थी’ या तिथीची देवता ‘श्री गणेश’ आहे; कारण तो विघ्न दूर करणारा आहे. आपल्या संस्कृतीत श्री गणेश आणि सरस्वती या दोन्ही देवतांचे ‘बुद्धीदायी देवता’ असे वर्णन केले आहे; परंतु दोन्ही देवतांची कार्ये भिन्न आहेत. गणेशाच्या कृपाप्रसादाने बुद्धी आणि ज्ञान वाढते, तर सरस्वतीच्या उपासनेने मिळालेले ज्ञान शब्दरूपात व्यक्त करता येते; म्हणून तिला ‘वाक्विलासिनी’, असे म्हटले आहे.
२. गणरायाचे निरनिराळे अवतार आणि त्या प्रत्येक अवतारातील त्याचे नाव अन् कार्य
अवताराचे नाव | अवताराचे स्वरूप | अवताराचे कार्य |
१. वक्रतुंड | तेजःपुंज, शुंडाधारी (सोंड असलेला), सर्वांगाला शेंदूर माखलेला आणि क्रूर नेत्र असलेला | सृष्टी-निर्मितीच्या कार्यात विघ्ने येऊ लागल्यावर ब्रह्मदेवाने याची उपासना केली. त्या वेळी हा प्रकट झाला आणि त्याने सृष्टी-निर्मितीचे कार्य निर्विघ्नपणे चालू करून दिले. |
२. कपिल चिंतामणी | सिंहावर बसलेला; दिव्य अलंकार परिधान केलेला; चतुर्भुज; हातात कमळ, मोदक आणि गदा, परशू आदी आयुधे घेतलेला. कपिल मुनींच्या अनुष्ठानाने यज्ञातून उत्पन्न झाल्यामुळे याचे नाव ‘कपिल’ आहे. ‘कपिल’ हे विशेषण असून त्याचा अर्थ तांबडसर (‘ब्राऊन’) रंग ! याचे आकारात रूप केल्यास ‘कपिला’ म्हणजे गाय दिसेल. गायीचे दूध, दही, गोमूत्र इत्यादी सर्व पदार्थ मानवाच्या हिताचे असतात. त्याप्रमाणे बुद्धीरूपी दही, ज्ञानरूपी तूप आदी गोष्टी मानवाला बुद्धी देऊन पुष्ट बनवत असल्याने याचे ‘कपिल’ हे नाव सार्थ आहे. | द्रविड देशाचा राजा अभिजीत आणि पत्नी गुणवती यांचा पुत्र असून गणदैत्याचा वध करून त्याने कपिल ऋषींचा ‘चिंतामणी’ नावाचा रत्नमणी त्यांना आणून दिला. ऋषींनी तोच मणी त्याच्या कंठात घातला आणि त्याचे नाव ‘चिंतामणी’ असे नाव ठेवले. |
३. गजानन | भगवान शिव-पार्वती यांचा पुत्र. याचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला. गजासुराचे मस्तक लावल्याने याचे नाव ‘गजानन’ आहे. हा पीतवसन (पिवळे वस्त्र), चतुर्बाहू, तसेच सिद्धी अन् बुद्धी असलेला आणि किरीट-कुंडले, दिव्य आयुधे आदी धारण केलेला आहे. | याने सिंदुरासुराचा वध केला. सिंदुरासुराला शस्त्राने मरण नसल्याने त्याचे मर्दन करून आणि त्याचे चूर्ण करून त्याचा वध केला. ते चूर्ण (सिंदूर) त्याने अंगाला लावले आणि तेव्हापासून त्याला सिंदूर आवडू लागले. |
४. विघ्नेश्वर | वरेण्य राजा आणि पुष्पिका यांचा पुत्र. पार्श्वमुनींच्या आश्रमात याचे संगोपन झाले. याचे वाहन ‘मूषक’ आहे. हा गजमुख आणि चतुर्भुज असून याची कांती दिव्य आहे. पाश, अंकुश, परशू आणि कमल ही त्याची आयुधे आहेत. | याने विघ्नासुराला शरण यायला लावले. त्याच्या प्रार्थनेवरून याने ‘विघ्नराज’ हे नाव धारण केले. |
५. बल्लाळेश्वर | हा दिव्य भीमस्वरूप धारण केलेला आणि दहा हातांचा असून याचे रूप भयानक आहे. याच्या उजव्या हातात पाश, अंकुश, परशू, कमळ आणि चक्र आहे, तर डाव्या हातात गदा, खङ्ग, त्रिशूल, तोमर अन् डमरू आहे. | शंखासूर आणि त्याचा भाऊ कमलासूर यांनी वेदादी ग्रंथ नष्ट केले. गजाननाने ‘बल्लाळ’ नावाच्या ब्राह्मणाच्या वेशात प्रकट होऊन वेदविद्येचा उद्धार केला. पुढे दशभुज (दहा हातांचे) रूप धारण करून त्याने कमलासुराचा वध केला आणि ‘मयुरेश्वर क्षेत्रा’ची स्थापना केली. |
६. धूमकेतू | हा माधव आणि दुमरा यांचा पुत्र आहे. हा रक्तवर्णी (लाल रंगाचा), दिव्य कांतीचा, चतुर्बाहू आणि त्रिनयन (तीन डोळे) असलेला आहे. त्याचे वस्त्र शुभ्र असून त्याच्या मस्तकावर किरीट-कुंडले आहेत. त्याने कमल, परशू, मोदक, तसेच मौक्तिक माला धारण केल्या आहेत. हा शुंडाधारी (सोंड असलेला), एकदंत आणि शूर्पकर्ण (सुपासारखे कान) असलेला आहे. | याने धूम दैत्याचा वध केला. त्याने विशाल मुख पसरून सैन्यासह धूमाला गिळले, यावरून त्याला ‘धूमकेतू’ हे नाव पडले. |
७. गणेश | त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी भगवान शंकराने एकाक्षर मंत्राने उपासना केली. शिवाच्या मुखातून देव प्रकट झाले. तेव्हा गणेशही प्रकट झाला. हा पीतवर्णी, दशहस्त असलेला असून त्याने रत्नमौक्तिक धारण केले आहेत. | याने शिवावर प्रसन्न होऊन त्याला त्रिपुरासुराचा वध करण्याचे सामर्थ्य दिले. |
आतापर्यंत गणेशाची उत्पत्ती आणि लय हे अनेक वेळा झाले आहेत. प्रत्येक वेळी गणेशाने त्या त्या प्रसंगानुरूप अवतार धारण केले आहेत. या अवतार चरित्रांत भिन्नता वाटते किंवा दिसते; पण ते सत्य आहेत; कारण ते सारे व्यासांनी वर्णन केलेले आहे. श्रद्धा ठेवून जर गणेशाची उपासना केली, तर आजही फळ मिळते. श्रद्धेमुळेच मानवाचे कल्याण होईल.’